माझ्या राणीचा दरबार 3

मराठी कथा जलद कथा

माझ्या राणीचा दरबार 3

मयंकच्या बाबांनी सांगितल्यानंतर लगेचच बघण्याचा कार्यक्रम ठरला. मयंकमध्ये काही चूक काढण्यासारखे काहीच नव्हते. एका श्रीमंत घराण्यातील एकुलता एक मुलगा शिवाय त्यांचा स्वतःचा बिझनेस होता, शेतीवाडी होती. दिसायला एकदम हँडसम असा मयंक होता. त्याच्यामध्ये कोणीही चूक काढावे असे काहीच नव्हते त्यामुळे नेहाच्या घरच्यांना सर्वांना मयंक पसंत पडला आणि त्यांच्याकडून लगेच होकार आला. नेहा तर आधीच सर्वांना पसंत होती. मुळात ती मयंकचीच पसंती होती त्यामुळे इतरांनी कोणी आढेवेढे घेतले नाही आणि अशाप्रकारे न काही अडथळा न येता दोघांचे लग्न निर्वीघ्नपणे ठरले.

मयंक आता लग्नाची स्वप्नं पाहत होता. त्याला कधी एकदा नेहा या घरात येते असे झाले होते. मयंक आई बाबांचा एकुलता एक मुलगा असल्याने लग्नात कोणतीही कसूर सोडायची नाही असे त्यांनी ठरवले होते. अगदी मोठमोठ्या लोकांना लग्नासाठी निमंत्रण दिले होते. लग्नाचा सगळा खर्च मयंकच्या आई-बाबांनी उचलला होता शिवाय नेहाच्या आई-बाबांकडून त्यांनी काहीच मागितले नव्हते. फक्त मुलगी आणि नारळ इतकेच बाकी आम्हाला काही नको असे त्याचे म्हटले होते. लक्ष्मीच्या रूपाने सून येणार म्हणून ते दोघेही खूप आनंदात होते. मयंक तर मनाप्रमाणे मुलगी मिळाली म्हणून आत्तापासूनच स्वप्नं पाहत होता. लग्न ठरलेलेच असल्यामुळे तो नेहाला घेऊन इकडे तिकडे फिरायला जात होता. त्याची बडबड ही सुरूच असायची. अगदी लहानपणापासून ते कॉलेजपर्यंतच्या सगळ्या गप्पा तो मारायचा पण नेहा मात्र फक्त त्याचे बोलणे ऐकायची आणि गालातच हसायची. ती त्याला काही प्रत्युत्तर देत नव्हती. ती फक्त त्याचे बोलणे ऐकत हो इतकेच म्हणायची त्यामुळे नेहाच्या मनात नक्की काय सुरू आहे हे मयंकला कळलेच नाही.

"हे काय नेहा, मी एकटाच बडबडतोय आणि तू मात्र अशी शांत शांत बसली आहेस. मला सांग तुझा स्वभाव असा शांतच आहे की मला घाबरून तू शांत बसली आहेस. बरं आता मला घाबरून शांत बसली असशील तरी लग्नानंतर मात्र मला तुलाच घाबरत बसावे लागणार आहे." मयंक तिच्या गालावर हसू फुलण्यासाठी चेष्टा करत होता पण ती मात्र निर्विकावर चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती.

"हॅलो, काय पाहतेस बोल ना? काय झालं? मी काही चुकीचे बोललो का?" इति मयंक

"नाही नाही. मी मुळातच खूप शांत मुलगी आहे. मला जास्त बोलायला आवडत नाही त्यामुळे. तुम्ही बोला मी ऐकते." असे म्हणून नेहाने विषय बदलला.

-------------------************---------------------

ठरल्याप्रमाणे लग्न झाले. लग्नामध्ये मयंकच्या आई-बाबांनी कोणतीच कसूर सोडली नव्हती. त्यांनी अगदी थाटामाटात चार दिवस लग्न ठेवले होते. मोठमोठ्या लोकांना त्या लग्नासाठी बोलवले होते. आधीच गाठीशी पैसा होता त्यात बिझनेस खूप मोठा चालू होता त्यामुळे त्यांना पैशाची काहीच अडचण नव्हती शिवाय एकुलत्या एका मुलाचे लग्न त्यामुळे काहीही कमी होऊ द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. त्यानुसारच मयंक आणि नेहाचे लग्न अगदी उत्साहात, जल्लोषात पार पडले. नेहा मयंकची राणी म्हणून त्याच्या आयुष्यात आली. एवढ्या मोठ्या लग्नात सगळेजण अगदी उत्साहात होते, नाचगाणी करत लग्नसमारंभात सहभागी होत होते पण या सगळ्यांमध्ये जिचे लग्न होते ती मात्र अगदीच शांतपणे हे सगळे विधी पार पाडत होती. कदाचित या सगळ्या गोष्टीची तिला सवय नसावी किंवा या सर्व गोष्टी तिला आवडत नसाव्यात असा मयंकने अंदाज बांधला आणि तो मात्र हे लग्न पूर्णपणे एन्जॉय करू लागला.

लाल रंगाच्या कांजीवरम साडीमध्ये नेहा खूप सुंदर दिसत होती. तिची ती बनवलेली हेअर स्टाईल, गालावरून उडणारा तो छोटासा बट आणि तिचा बनवलेला मेकअप हे सारे काही तिच्या शरीरावर खुलून दिसत होते. केसामध्ये माळलेला तो गजरा आणि ओठावरची लाल रंगाची लिपस्टिक याने तर तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. मुळातच सुंदर असलेली नेहा हातभर चुडा आणि अंगावरील दागिन्यात आणखीनच सुंदर दिसत होती. जणू काही लक्ष्मीचे रूप असावे असे भासत होते.
त्यांचा संसार सुखाचा होईल का?
क्रमशः 

🎭 Series Post

View all