माझ्या राणीचा दरबार 2

मराठी कथा जलद कथा

माझ्या राणीचा दरबार 2
मयंकला नेहा मनापासून आवडली होती. त्याने गावातील मित्राकडून तिची चौकशी काढली होती आणि त्यानुसार आई-वडिलांना सांगून तिच्याशी लग्न करायचे त्यांनी ठरवले होते .घरी आल्यानंतर त्याने सर्वप्रथम त्याच्या आईला ही गोष्ट सांगितली. तसेही त्याने लगेच जाऊन सांगितले नाही. त्याने आईला थोडेसे बोलण्यात गुंतवले.

"आई, तू किती काम करतेस? आता कंटाळा आला असेल ना? काम करून खूप दमली असशील ना? तुला सून आली की तू फक्त आराम करायचा." मयंक आईला लाडीगोडी लावत होता.

"अच्छा, आज लगेच माझी सून येण्याची चर्चा कशी काय सुरू आहे? बोल तुझ्या मनात नक्की कोण आहे?" मयंकची आई म्हणाली.

"काय हे आई, मी फक्त विषय काढला तर तू माझ्या मनात कोण आहे तेच विचारत आहेस." मयंक आढेवेढे घेत म्हणाला.

"अचानक सुनेचा विषय निघाला म्हणून म्हटले. सांग आता कोण आहे ती? कुठे राहते? काय करते? कशी आहे?" आईने मयंकवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला.

"आई, तू म्हणजे ना खरंच आईच आहेस." 

"अरे, मग मुलगा कधी मुलींचा विषय निघाला की दूर पळणारा आज चक्क मला सून आणण्याविषयी ,बोल आता कोण आहे ती." मयंकची आई म्हणाली.

"आई, ती आपल्या गावाकडची आहे. एमबीए फायनान्स झालंय तिचं. पुण्यात शिक्षण झालेलं आहे. ती खूप चांगली आहे. तू पाहिलीस की तुलाही आवडेल." मयंक आईला लाडीगोडी लावत म्हणाला.

"का नाही आवडणार? माझ्या मुलाची पसंत नक्कीच चांगली असणार. तुझी पसंत तीच माझी पसंत कारण शेवटी संसार हा तुलाच करायचा आहे." मयंकची आई म्हणाली.

"आई आई, तू खरंच किती चांगली आहेस." असे म्हणत त्याने आईसोबत एक गिरकी घेतली. 

"ते आता समजलं का? बरं तू आता निश्चिंत रहा. आम्ही पाहू काय करायचं ते." असे म्हणून मयंकच्या आईने मयंकला जाण्यासाठी सांगितले.

संध्याकाळी जेव्हा मयंकचे बाबा घरी आले तेव्हा मयंकच्या आईने त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनाही ऐकून खूप बरे वाटले. आपला मुलगा आता आणखी एक पाऊल पुढे जाणार म्हणून त्यांना आनंद झाला शिवाय आपल्या गावातीलच मुलगी आहे म्हटल्यावर त्यांना खूप बरे वाटले.

मयंकच्या बाबांनी त्यांच्या गावाकडील एका मित्राकडे त्या मुलीबद्दल चौकशी करण्यास सांगितले शिवाय तिचे आई बाबा कोण आहेत देखील विचारले. म्हणजे त्यांना कल्पना देऊन त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी जावे हा त्यांचा उद्देश होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गावाकडील मित्राने मुलीच्या आई-बाबांकडे त्याची पूर्वकल्पना दिली आणि फायनली पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मयंकच्या आई-बाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण मुलाची पसंत तीच आपली पसंत असे त्यांचे मत होते. शेवटी त्या दोघांना संसार करायचा होता. आता राहिला प्रश्न तो नेहाच्या घरच्यांचा. त्यांना काही अडचण नसली तर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार होते.

मयंकच्या बाबांनी ज्या व्यक्तीकडे चौकशी करायला सांगितले होते त्या व्यक्तीने नेहाच्या घरच्यांना सर्व कल्पना दिली. त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या. नेहाच्या बाबांना एवढे मोठे स्थळ आल्याचे ऐकताच खूप आनंद झाला. त्यांनी नेहाच्या आईला याबाबतीत सांगितले आणि पुढच्या गोष्टीची तयारी करण्यास सांगितले. घरामध्ये सर्वजण खूप आनंदी होते. घरातील पहिली मुलगी इतक्या मोठ्या घरात जाणार म्हणून ते समाधानी होते. तसे पाहता नेहाच्या घरची परिस्थितीसुद्धा खूप चांगली होती. त्यांची शेतीवाडी खूप मोठी होती पण एखादा व्यवसाय आणि शेती यामध्ये फरक हा पडतोच ना त्याप्रमाणे झाले.

दोन्ही घरच्यांना एकमेकांना पाहण्या अगोदरच सारे काही पसंत होते त्यामुळे पुढे काही अडचण येईल असे कोणालाच वाटले नाही. सर्वांची या लग्नाला संमती होती त्यामुळे हे लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडेल यात काल काही वादच नव्हता.
क्रमशः 

🎭 Series Post

View all