माझ्या राणीचा दरबार 1
"तुम्ही दोघेही एकमेकांचा हात हातात गुंफुन आतमध्ये प्रवेश करा." असे म्हणताच मयंक गालातच हसला आणि "मी माझ्या राणीला चालवत नाही तर उचलून घेऊन येणार." असे म्हणताच एकच हशा पिकला आणि सगळे पहायच्या आत मयंकने नेहाला उचलून घेतले आणि तो आत घेऊन आला. अशाप्रकारे त्यांचा गृहप्रवेश झाला आणि ते पाहून तिथे एकच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.
मयंक आणि नेहा दोघेही आत्ताच लग्न बंधनात अडकले होते. त्या दोघांना पाहून असे वाटणारही नाही की त्यांचे अरेंज मॅरेज आहे. खरंतर त्यांचे लव्ह कम अरेंज मॅरेज होते. मयंकने जेव्हा नेहाला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. जेव्हा मयंक पहिल्यांदाच त्याच्या गावी गेला होता. त्याला त्याच्या गावी जाण्यास आवडत नव्हते पण खूप महत्त्वाचे काम असल्याने तो गावी गेला होता. मयंक आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, अफाट संपत्तीचा एकुलता एक वारस होता. त्याच्याकडे कशाचीच कमी नव्हती. कॉलेजमध्ये आणि ऑफिसमध्ये बऱ्याच मुली त्याच्यावर फिदा होत्या. त्याच्याशी बोलण्यास तरसत होत्या पण मयंक मात्र कोणालाच कधीच भाव देत नव्हता. जेव्हा तो पहिल्यांदा गावात गेला तेव्हा त्याने नेहाला पाहिले आणि त्याला तिच्यामध्ये एक वेगळा स्पार्क दिसून आला. तिचा तो निरागस चेहरा त्याला खूप आवडला. मुळातच गोरीपान आणि चाफेकळी नाक, मोठे सुंदर केस पाहून तो तिच्यावर भुलला होता.
मयंक त्याचे गावाकडील सगळे काम करून जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्यासमोर फक्त आणि फक्त नेहाचा चेहरा दिसत होता. 'आज मला हे असे का होत आहे? कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये आजूबाजूला इतक्या सुंदर मुली पाहिल्या पण ही मुलगी काहीशी वेगळी वाटली. नाहीतर तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला नसता. तिला पुन्हा एकदा भेटावे का?तिच्याशी बोलावे का?' असा विचार त्याच्या मनात येत होता. पुन्हा पुढच्या आठवड्यात त्याला गावी जायचे होते तेव्हा काय ते पाहता येईल असा विचार करून तो शांत राहिला. पुढच्या आठवड्यात जेव्हा तो गावाला गेला तेव्हा त्याला नेहा दिसली नाही. त्याचे काम संपवून तो बराच वेळ ज्या ठिकाणी नेहा दिसली होती त्या ठिकाणी गाडी थांबवून गाडीतच बसला होता. बराच वेळ झाला तरी नेहा काही आली नाही म्हणून तो निघायला तयार झाला होता. इतक्यात त्याला समोर नेहा दिसली. ती एका वाड्यातून बाहेर येताना त्याला दिसली. याचा अर्थ ती इथेच राहत असणार हे त्याने जाणले. तिला कोणीतरी हाक मारली आणि तेव्हाच त्याला तिचे नाव नेहा आहे असे समजले.
'अच्छा, तर हिचे नाव नेहा आहे. ठीक आहे. आपण इतर माहिती गोळा करू.' असे मनातच म्हणून त्याने तिथेच गावातच त्याच्या एका ओळखीच्या मित्राला तिच्याबद्दल विचारले. तेव्हा त्याला सगळी माहिती समजली. तिचे नाव नेहा मनोहर कदम असे होते. तिचे शिक्षण मोठ्या शहरात झाले असून ती नुकतीच शिक्षण संपवून गावात आली होती. तिने एमबीए फायनान्स केले होते. ती स्वाभिमानी होती शिवाय इतर मुलींप्रमाणे ती अजिबात नव्हती. तिच्या काही आशा आकांक्षा होत्या आणि बरीच माहिती मयंकला समजली. तेव्हाच त्याने मनाशी ठरवले की आता लग्न करेन तर तिच्याशी. तसेही त्याचे आई-बाबा काही आढेवेढे घेणाऱ्यातले नव्हते त्यामुळे हे लग्न नक्की होईल अशी त्याला खात्री होती. त्याला तिच्या राणीचा दरबार भरवायचा होता पण हे सगळे सुख त्याच्या पदरात पडेल का? पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा