माझ्या नवर्‍याची... भाग २

कथा एका खरेदीची
माझ्या नवर्‍याची... भाग २


मागील भागात आपण बघितले की सुजय अवनीला बाहेर जायचा आग्रह करत असतो आणि ती नाही म्हणते. काय कारण आहे बघू आता..



" काय वागलो? अरे निर्दयी प्राण्या आठव. तुला शूज घ्यायचे होते. अख्खा बाजार उपडा घातला.. शूजचा पांढराच रंग नको, मग त्या निळ्याची ती शेड दाखवा.. ही शेड चांगली आहे पण याला ना ही अशी लेस नको होती. ही जी बॉर्डर आहे ना ती थोडीशी जाडी हवी होती... बापरे.. प्रत्येक शूजमधली नसलेली गोष्ट तुला हवी होती. कसलं कानकोंडं झालं होतं मला.. म्हणून मला नाही यायचं तुझ्यासोबत खरेदीला. एकतर चालून चालून पाय दुखतात. आणि मला समजत नसलेल्या गोष्टींमध्ये डोकं घालावं लागतं."

" तुला काय डोकं घालावं लागते?"

" म्हणजे काय.. नवीन शूज काढला की तू मला विचारणार.. हा शूज चांगला की आधीचा? मग तो दुकानदार माझ्या तोंडाकडे आशाळभूतपणे बघणार. आता त्या शूजमधलं मला काय समजणार. पण मी हा चांगला म्हटलं, त्याने पॅक करायला घेतला की मग तुला आधीचा आठवणार.. तसे शूज तुला लहानपणी घ्यायचे होते. जे तुला घ्यायला मिळाले नाहीत. मग त्यावरून तू तुझ्या लहानपणीच्या शंभर वेळा ऐकलेल्या गोष्टी परत ऐकवणार.. नको ना. नको रे असा छळूस. " अवनीने अंगावर शहारा आल्यासारखे केले.

" तू हे अती करते आहेस.. साधारणतः हे संवाद पुरूष वापरतात त्यांच्या बायकोसोबत खरेदीला जाताना."

" अरे, बायकांची खरेदी परवडली. त्या तर आधीच बदनाम असतात खरेदीसाठी.. पण.." अवनीने निराशेचा सुस्कारा सोडला.


" पण बिण सोड.. खरेदीला चल.. मुले यायच्या आधी येऊ पण.. मला फक्त एक शर्ट घ्यायचा आहे.. तो ही निळा. बघ रंगही ठरला आहे. असे जाऊ आणि असे येऊ." अगदीच नाईलाज झाल्यामुळे अवनी सुजय सोबत जायला तयार झाली.


होईल का सुजयची शर्टची खरेदी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all