"माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग"

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

गोष्ट छोटी डोंगराएवढी

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

लेखिका-मृणाल मधुकर देशमुख
आपल्या आयुष्यात अशी एक घटना घडवून जाते की ज्यामुळे आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते.


इतर सर्व सामान्य मुलींप्रमाणे माझे आयुष्य होते .सर्वात लहान असल्यामुळे आई-वडिलांची लाडकी होते .शिक्षणात हुशार असल्यामुळे आई-बाबांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या . गावात पदव्युत्तर शिक्षणाची सोय नसल्यामुळे खाजगीरित्या राज्यशास्त्र विषयात परीक्षा दिली पण क्लास मिळाला नाही तेव्हा नागपूरला असलेल्या मोठ्या बहिणीने हट्टाने शिक्षणाकरिता नागपूरला नेले .इतिहास विषय घेऊन नागपूर विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण विभागात प्रवेश मिळविला पास झाले .व क्लास मिळाला. त्याच वर्षी लग्न झाले.

लग्नानंतर मी संसारात गुरफटले गेले. दोन मुले झाली. मी आणखीच व्यस्त झाले. माझे प्राध्यापिका होण्याचे ध्येय बाजूला पडले. मात्र माझे पती मला सातत्याने आठवण करून देत असत की" हे तुझे काम नाही तुला वेगळं काहीतरी करायचं आहे तुझ्या शिक्षणाचा उपयोग तुला करायचा आहे."पण मी माझ्या दैनंदिन जीवनात व्यस्त होते व त्यात मी रुची घेऊ लागले होते. मुलांचा अभ्यास घेणे, वेगवेगळे पदार्थ करणे. मैत्रिणींचा मोठा गट निर्माण झाला होता. जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.


थोडक्यात गृहिणीची भूमिका वठवितांना शालेय जीवनात जे ध्येय ठरविले होते जे ध्येय ठरविले होते त्यापासून दूर गेले होते.


मध्येच निवांत क्षणी स्वतःचा विचार करताना वाटायचं दोन विषयात पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यास केला त्याचा आपण काय उपयोग केला? स्वतःलाच प्रश्न विचारायचे. व स्वतःच उत्तर द्यायचे की आता शक्य नाही वेळ निघून गेली. विवाहाला दहा वर्षे लोटली .माझ्या पतीने

"बीएड "चा फॉर्म आणला, तोही सतत तीन वर्षे. पण स्वतःवर चा विश्वास कमी पडल्यामुळे दर वेळेस तो भरला नाही. माझ्या अर्जाचा उपयोग दुसऱ्याच विद्यार्थ्यांना झाला. व ते बी.एड. झाले सुद्धा.

माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती

नेहमीच माझी हेटाळणी करीत असे. त्याचा परिणाम माझ्यावर अजिबात होत नसे. ",माझ्यातच ती क्षमता नाही ,ठीक आहे मी जशी आहे त्यातच मी समाधानी आहे"असे म्हणून स्वतःची समजूत घालत असे.माझी सर्व भावंडे त्यांच्या संसारात व्यस्त असल्यामुळे असेल कदाचित कोणीही बीएड चा आग्रह धरला नाही. किंवा याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र बाबा म्हणायचे"what happens, happens for good".

असे संथ गतीने जीवन सुरू होते. आर्थिक प्रश्न निर्माण झाले नाहीत असे नाही. तरीही मी बी. एड. करणे मनावर घेतले नाही.

मला हे जमणारच नाही असा मी समज करून घेतला होता .पण तो गैरसमज होता ,हे़ एका प्रसंगाने सिद्ध झाले. तो प्रसंग  माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. माझे  आयुष्य बदलून गेले.

झाले असे की माझ्याच कुटुंबातील एक जवळची व्यक्ती माझी टिंगल, अपमान करण्याची एकही संधी सोडत नसे. हे मी पूर्वीच लिहिले आहे. एकदा आम्ही सर्व एकत्र चर्चा करीत असताना त्या व्यक्तीला ही संधी मिळाली. माझ्याच वयाच्या दुसऱ्या स्त्रीने अतिशय कठोर परिश्रमातून प्रशिक्षण घेऊन उच्च पद मिळविले होते . तिचे सर्वत्र कौतुक केले जात होते. माझी नेहमी टिंगल करणारी ती व्यक्ती माझ्याकडे पाहून हात वारे करीत म्हणाली"यांच्याकडून काय होते? यांना हे कधीच जमणार नाही. या काहीच करू शकत नाही". असे म्हणून तिरस्काराने हसायला लागली. मात्र ते शब्द माझ्या जिव्हारी लागले व त्या शब्दांनी माझे जीवन बदलून गेले. मला ते आव्हान वाटले", . आता आपण करून दाखवायचच."असा निर्धार करून बी.एड .,.चा फॉर्म भरला .सरकारी महाविद्यालयात नंबरही लागला. मी बी.एड .झाले.


दुसऱ्याच वर्षी शिवाजी शिक्षण संस्थेत मी रुजू झाले. प्राध्यापिका होण्याचे माझे स्वप्न अशा प्रकारे पूर्ण झाले. मी त्या टिंगल करणाऱ्या व्यक्तीला याकरिता धन्यवाद देते. तिच्यामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग ठरला...

धन्यवाद.

लेखिका - सौ मृणाल मधुकर देशमुख...