माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ९४

आदिराजला वाटत होत तस अमोली खरचं अभिराजला वस्तू समजत होती का?


साखरपुड्याची खरेदी जोमाने सुरू झाली. आदिराज मात्र अभिराजवर आणि संग्रामवर देखील नाराज होता कारण त्याला राहून राहून वाटत होतं की संग्राममुळे अभिराजने इतक्या लवकर लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि अभिराज मूर्खांसारखा स्वतःच प्रेम सोडून हट्टाला पेटून लग्नाचा निर्णय घेत आहे पण तो गप्प होता आणि जे काही होत आहे ते निमूटपणे पाहत होता. संग्रामने साखरपुड्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमधील हॉल बुक केला होता.

क्षितिजाने मात्र मनावर दगड ठेवला होता. आज साखरपुड्याचा दिवस उजाडला. सकाळपासूनच सगळ्यांची गडबड सुरू होती. संध्याकाळी साखरपुडा होणार होता. कालच अमोली आणि तिचे जवळचे नातेवाईक, मैत्रिणी त्याच हॉटेलवर येऊन राहिले होते. सुशांत-समिधा जाऊन त्यांना सकाळीच भेटून आले होते. संध्याकाळचे पाच वाजले आणि अभिराज तयार होत होता. आदिराज तयार होऊन त्याच्या रूममध्ये आला आणि त्याला म्हणाला.

आदिराज,“ भाई अजून ही वेळ गेलेली नाही. नकार दे या सगळ्याला तू का असा वागत आहेस मला खरंच कळत नाही?” तो काळजीने बोलत होता.

अभिराज,“ आदी मी तुला आधी ही सांगितले आहे मला या विषयावर बोलायचे नाही.” तो टाय बांधत त्याला तिरकस पाहत म्हणाला.

आदिराज,“ बरं नाही बोलत त्या विषयावर! पण एका प्रश्नाचे मला खरं उत्तर देशील?” त्याने त्याला रोखून पाहत विचारले.

अभिराज,“ विचार बाबा एकदाचा नाही तर तुला जेवण पचेल का?” तो हसून म्हणाला.

आदिराज,“ भाई तू खुश आहेस का? अमोली तुला मनापासून आवडली का?” त्याने त्याला पुन्हा रोखून पाहत विचारले.

अभिराज,“ हो आहे खुश मी! अंकू आणि बाकी सगळे ही किती आनंदी आहेत पाहिलेस का?” तो हसून म्हणाला. आदिराज त्याच्या जवळ गेला आणि त्याला आरशासमोर उभं करून त्याचेच प्रतिबिंब आरशात त्यालाच दाखवत म्हणाला.

आदिराज,“ अच्छा? मग तुझ्या ओठांवर असणारे हसू तुझ्या डोळ्यांपर्यंत का पोहोचत नाही रे? भाई तू कोणाला फसवत आहेस? घरच्यांना की स्वतःलाच?का वागतोयस तू असा?” त्याने त्याला रोखून पाहत विचारले आणि अभिराज थोडा गडबडला पण त्याने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला.

अभिराज,“ उगीच काही तरी बोलू नकोस. चल उशीर होतो आहे.” तो त्याची नजर टाळत म्हणाला आणि निघून गेला.

सगळे हॉटेलमध्ये पोहोचले. मुळातच सुंदर असणारी अमोली मरून कलरच्या लेंहंगा-चोलीमध्ये आणखीन सुंदर दिसत होती तर अभिराज देखील मरून कलरच्या सूटमध्ये हँडसम दिसत होता. रिंग सेरेमनी सुरू व्हायला अजून वेळ होता.सगळे एकमेकांशी ओळख करून घेत होते. अमोलीने अभिराजला हाक मारली.

अमोली,“ लूक एट हिम ही इज माय फ़ियॉनसे! खूप हँडसम आहे की नाही. मी म्हणाले होते ना की मी हँडसम अँड रिच मुलाशीच लग्न करणार. ते प्रेम वगैरे वर माझा विश्वास नाही. मी तर लग्न रिच अँड हँडसम मुलाबरोबरच करणार.” ती तिच्या मैत्रिणींना म्हणाली. तिच्या मैत्रिणी अभिराजला रोखून पाहत होत्या आणि अभिराजला मात्र अवघडल्यासारखे झाले होते.त्यातीच तिची एक मैत्रीण त्याला पाहत म्हणाली.

मैत्रीण,“ हा यार ही इज सो हँडसम अँड हॉट! यु आर लकी! बाकी अभिराज जीजू तुम्ही जिम करता वाटतं. डोले शोले वगैरे आणि एब्सपण आहेत का तुमचे? दाखवाल का आम्हाला?” ती डोळा मारत म्हणाली आणि अभिराज मात्र आणखीनच ओशाळला.ते पाहून अमोली म्हणाली.

अमोली,“ यु नॉटि गर्ल!अभिराज तुम्ही नका लक्ष देऊ हिच्याकडे!” ती हसून म्हणाली.

आदिराज लांबून सगळं ऐकत आणि पाहत होता. अभिराज मात्र अमोली आणि तिच्या मैत्रिणींच्या अशा वागण्याने चांगलाच ओशाळला होता त्याला त्यांना काय बोलावे कळत नव्हते. त्याची अशी अवस्था पाहून आदिराजने त्याला हाक मारली आणि अभिराज तिथून सटकला.

अभिराज,“ हुश्शss आदी बरं झालं मला बोलावलेस तू! नाही तर त्यांना काय आणि कसे बोलावे मला कळतच नव्हते.” तो सुटकेचा निःश्वास सोडत म्हणाला.

अदिराज,“भाई पुन्हा विचार कर. अरे ती अमोली एखाद्या वस्तू प्रमाणे तुझे प्रदर्शन करत होती. जसे काही तू तिच्या मालकीची वस्तू आहे.” तो तोंड वाकड करत म्हणाला.

अभिराज,“ कुठला विषय कुठे घेऊन जात आहेस तू आदी अरे त्या फ्लर्ट करत होत्या माझ्याशी आणि अशा कार्यक्रमात हे सगळं चालतं.” तो म्हणाला.

साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला. अमोली आणि तिचे आई वडील नागपूरला निघून गेले.क्षितिजाने मात्र मुद्दामच साखरपुड्याला यायचे टाळले होते.
★★★

दुसऱ्या दिवशी प्रदोष होता आणि गार्गी-संग्राम पुन्हा फ्लॅटवर गेले. आता मात्र मनिषाताईंना ही गार्गी आणि संग्रामच असं गायब होणं खटकत होतं त्यांनी गार्गी घरी आल्यावर त्या विषयी तिला विचारायचे असे मनोमन ठरवले. इकडे गार्गी आणि संग्रामने पूजा केली जेवण केले आणि गार्गी संग्रामच्या मिठीत विसावली होती.

संग्राम,“ गार्गी हे किती दिवस चालणार आहे अजून? आपल्याला घरात कोणी काही विचारत नसले तरी आज मी सुशांतच्या डोळ्यात प्रश्न पाहिले आहेत. जर आपल्याला कोणी तुम्ही महिन्यातून दोन रात्री कुठे आणि कशाला जाता? विचारले तर काय सांगायचे आपण? त्यात तू उपवास करतेस आणि तुला थकवा येतो. त्याबद्दल विचारले तर कोणी? आपण या पूजेची गुप्तता कशी पळणार आहोत?” त्याला सतावणारे प्रश्न तो बोलून दाखवत होता.

गार्गी,“ हो आज येताना मी आईंच्या डोळ्यात देखील प्रश्न पाहिले आहेत. आता सगळ्यांनाच काही तरी उत्तर द्यायची वेळ आली आहे. मी ही तोच विचार करत होते.” ती म्हणाली.

संग्राम,“सगळ्यांनाच काही तरी उत्तर द्यावे लागणार आहे आपल्याला आता.”तो म्हणाला.

गार्गी,“ हो आपण विचार करू. आता हेच बोलायचे आहे का आपण?” तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले.

संग्राम,“ तू ना नालायक आहेस गार्गी. लव यू!” तो तिला हसून म्हणाला.
★★★★

गार्गी आणि संग्राम सकाळी परत आले आज देखिल गार्गी थकलेली वाटत होती. ती आज नेहमीप्रमाणे ऑफिसला जाणार नव्हती. सगळे जिकडे तिकडे झाले आणि गार्गी रूममध्ये काही तरी करत होती तर तिथे मनिषाताई आल्या.

मनिषाताई,“ झोपलीस काय गं?” त्या म्हणाल्या.

गार्गी,“ नाही ओ आई या ना.” ती हसून म्हणाली.

मनिषाताई,“ तब्बेत ठीक आहे ना तुझी?”त्यांनी काळजीने विचारले.

गार्गी,“ हो आई मी ठीक आहे फक्त थोडा थकवा आला आहे मला.” ती म्हणाली.

मनिषाताई,“ तो तर येणारच ना! तू काल खानेच काय पण पाणी देखील घेतले नाहीस म्हणूनच तुला थकवा जाणवत असेल.” त्या म्हणाल्या.गार्गीने त्यांच्याकडे चमकून पाहिले.

गार्गी,“ तुम्हाला कसे कळले आई?” तिने आश्चर्याने विचारले.

मनिषाताई,“ बेटा मी चिनूच नाही तर तुझी देखील आई आहे. मुलं काय करतात काय करत नाहीत हे आईला माहीत असणारच ना? आणि तुम्ही महिन्यातून दोन रात्री कुठे गायब होता गं? समिधा, सुशांत ही विचारत होते मला.” त्या विचारत होत्या.

गार्गी,“ आई असं काही तरी आहे जे मी आणि संग्राम तुम्हालाच काय पण कोणालाच काही ही सांगू शकत नाही.पण मी एका गोष्टीची ग्वाही देते की यातून जे काही निष्पन्न होईल ते संग्रामच्या भल्यासाठी असेल.” ती त्यांचा हात हातात घेत म्हणाली.

मनिषाताई,“ बर तुम्हाला नाही सांगायचे तर नका सांगू पण गार्गी बच्चा काय करशील ते स्वतःची तब्बेत सांभाळून कर. असं ही आता अभीच्या लग्नाची तयारी ही सुरू करावी लागेल ना! तर काय करायचे ते सांभाळून आणि हो संग्रामची चिडचिड होणार नाही ते बघ बाई, त्याच्या तब्बेतीची काळजी वाटते गं हल्ली!” त्या काळजीने म्हणाल्या.

गार्गी,“ हो आई मी स्वतःची आणि संग्रामची देखील काळजी घेईन.” तिने आश्वासन दिले.


तिच्या बोलण्याने मनीषाताई तर शांत झाल्या होत्या पण बाकी लोकांच्या मनात हा प्रश्न असणार म्हणून गर्गीने काही तरी ठेवले होते. रात्रीची जेवणे झाली आणि सगळे संग्रामच्या घरात हॉलमध्ये नेहमीप्रमणे गप्पा मारत बसले होते आणि गार्गीने विषय छेडला.

गार्गी,“ मागील काही महिन्यापासून आम्ही दोघे महिन्यातून दोन रात्री कुठे गायब होतो हा प्रश्न तुम्हां सगळ्यांनाच पडला आहे ना?” तिने विचारले

सुशांत,“ हो! कुठे गायब असता ग संग्र्या आणि तू?”त्याने विचारले.

गार्गी,“ अरे आपल्या जुन्या फ्लॅटच्याजवळ एक विपश्यना केंद्र आहे तिथे घेऊन जाते मी संग्रामाला! सचित्तानंद गुरुजी म्हणाले की त्याला महिन्यातून किमान दोन वेळा विपश्यना करायला लावा म्हणजे त्याचे मन शांत राहील आणि चिडचिड कमी होईल. पण आपल्याला वेळ कुठे असतो ऑफिस आणि बाकी सगळ्यातून म्हणून मग मी संध्याकाळी घेऊन जाते त्याला पण रात्री उशीर होतो म्हणून मग फ्लॅटवर थांबतो आणि सकाळी येतो.” ती म्हणाली आणि संग्राम तिच्याकडे ‘तू हुश्शर ग’ अशा आविर्भावात पाहत होता.

समिधा,“ चांगलंच आहे की मग विपश्यनेमुळे संग्रामची चिडचिड कमी होईल आणि आरोग्य ही सुधारेल.” तिने दुजोरा दिला आणि सगळ्यांना ते कारण पटले आणि गार्गीने सुटकेचा निःश्वास सोडला आता त्यांना कोणी प्रश्न विचारणार नव्हते

आदिराजला वाटत होते तसं अमोली अभिराजला वस्तू समजत होती का? संग्राम-गार्गी करत असलेल्या गुप्त पूजेला केंव्हा यश मिळणार होते की त्याआधीच काही विपरीत घडेल?
©स्वामिनी चौगुले







🎭 Series Post

View all