मझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ९३

अमोली आणि अभिराजचे लग्न खरचं होईल का?


दुसऱ्याच दिवशीपासून संग्रामने अभिराजसाठी मुली पहायला सुरुवात केली. त्यातच त्याला त्यांच्या जुन्या बिझनेस असोसिएटची मुलगी लग्नाची आहे असे कळले आणि त्याने त्यांच्याशी संपर्क साधला. या सगळ्यात आठ दिवस निघून गेले. इकडे क्षितिजाला अभिराजसाठी मुलगी पाहत आहेत हे कळले. ती नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आली होती. तिला काही फरक पडला नाही असे जरी ती वरवर दाखवत असली तरी तिच्या डोळ्यातली उदासी सगळं सांगत होती. ते गार्गीच्या लक्षात आले होते म्हणूनच तिने क्षितिजाला तिच्या केबीनमध्ये बोलवून घेतले.

क्षितिजा,“ मॅडम तुम्ही बोलावलेत मला?” तिने दारावर नॉक करून दारातूनच विचारले .

गार्गी,“ हो! ये बस! तुला कळालेच असेल की आम्ही अभीसाठी मुली पाहत आहोत. क्षिती अगं आम्ही खूप प्रयत्न केले. शेवटी संग्रामने तुझ्याशी लग्न कर म्हणून ही गळ घातली अभीला पण तो म्हणाला की त्याच तुझ्यावर प्रेम असलं तरी प्रेम आणि लग्न दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तू आमच्या कुटुंबाच्या योग्य नाही असं त्याचं ठाम मत झाले आहे. त्याचं लग्न आता नाही केलं तर तो असाच राहील बिनलग्नाचा अशी भिती वाटली संग्रामला म्हणून मग त्याने त्याला लग्न करायची गळ घातली तर म्हणाला की आम्ही म्हणू त्या मुलीशी लग्न करेन पण तुझ्याशी नाही. त्याच्या डोक्यात काय खूळ बसले आहे काय माहीत? त्याला तू आमची नाती समजून घेणार नाही असं वाटतं. सॉरी क्षिती मी तुझी मनःस्थिती समजू शकते पण आमचा ही नाईलाज झाला आहे.” ती चेहरा बारीक करून बोलत होती.

क्षितिजा,“ प्लिज काकू तुम्ही मला सॉरी म्हणून लाजवू नका. जे काही झाले आहे किंवा जे काही होत आहे त्यात तुमचा कोणाचाच दोष नाही. कोणाचा दोष असेल तर तो माझा आहे मी कमी पडले अभीसरांना समजून घ्यायला आणि त्यांना मला समजून द्यायला ही आणि संग्रामसरांची भीती साहजिक आहे. तुमच्या जागी दुसरे कोण असते तर माझ्यासाठी आणि अभीसर आणि माझ्या नात्यासाठी इतके एफटर्स घेतले नसते जितके तुम्ही सगळ्यांनी घेतले आहेत.माझी कोणतीच तक्रार नाही. उलट अभीसरांना माझ्यापेक्षा चांगली मुलगी तुम्ही पहाल याची खात्री आहे मला!” ती डोळ्यातले पाणी लपवत म्हणाली आणि निघून गेली. गार्गीने दीर्घ निःश्वास सोडला.

क्षितिजा आज अपसेट होती. तिने दोन दिवसांची लिव्ह घेतली आणि ती लवकरच ऑफिसमधून निघून गेली. ती टॅक्सीत बसून अश्रू ढाळत होती.

कदाचित तुझं आणि माझं (सॉरी सर तुम्हाला आरे तुरे करतेय आज) नातं कधीच सांधल जाणार नाही. आपल्यामध्ये असलेला भावनिक पुल जो मला तुझ्या मनापर्यंत पोहोचवत होता तो तुझ्या बाजूने कोसळला आहे आणि मी माझ्या बाजूच्या पुलाच्या मध्यावर उभी आहे. मला माहित आहे इथून पुढे रस्ताच नाही पण तरी माझे वेडे मन अजून हि मानायला तयार नाही. असो चूक माझीच तर होती आणि त्याची शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागणार आहे तुला गमावून.

तुझी होऊ न शकलेली,
क्षितिजा.

ती मनातच अभिराजशी बोलत होती.
★★★

आज रविवार होता आणि सगळे नाष्टा करून एकत्र जमले होते. अभिराज ही तिथेच होता. त्याला पाहून सुशांतने संग्रामला खुणावले आणि संग्राम बोलू लागला.

संग्राम,“ अभी तुझ्याशी बोलायचं आहे आम्हाला.” तो म्हणाला

अभिराज,“ बोल ना मग इतका का विचारात पडला आहेस.” तो म्हणाला.

संग्राम,“ आम्ही तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे.आपले जुने पुण्याचे असोसिएट आहेत म्हणजे त्यांनी बरीच वर्षे झाले सॉफ्टवेअर क्षेत्र सोडले आहे आणि ते आता ट्रान्सपोर्टमध्ये आहेत. सध्या नागपूरला असतात. अजय गायकवाड त्यांचे नाव आहे त्याची एकुलती एक मुलगी अमोली गायकवाड लग्नाची आहे. इंग्लंडमध्ये एम.बी.ए करून आली आहे. ती लग्नाची आहे असे कळले आहे आम्हाला म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तिचा फोटो आणि बायोडाटा पाठवला आहे. आम्ही सगळ्यांनी तिचा फोटो आणि बायोडाटा पाहिला आहे. तुझ्यासाठी अगदी सुयोग्य वाटते ती मुलगी आम्हाला. तुला मी मोबाईलवर त्या मुलीचा फोटो आणि बायोडाटा पाठवला आहे पाहून घे आणि काय ते सांग आम्हाला! तुला मुलगी पसंत असेल तर त्यांना बोलावता येईल.” तो म्हणाला. अभिराज काही बोलणार तर मध्येच आदिराज बोलू लागला.

आदिराज,“ पण डॅड लगेच भाईच लग्न करायलाच हवं का? जाऊ दे ना थोडे दिवस मग विचार करू.” तो नाराजीने म्हणाला.

सुशांत,“ आदी तू अजून लहान आहेस तर या सगळ्यात पडू नकोस कळलं तुला?” तो त्याला दटावत म्हणाला आणि आदिराज गप्प बसला.

अभिराज,“ अंकू तू मुलगी पाहिली आहे म्हणजे योग्यच असणार, मी तयार आहे लग्नाला!” तो म्हणाला आणि निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आदिराज ही गेला.

आदिराज,“ काय चालले आहे भाई तुझे? तू म्हणतोस की तुझं क्षितिजावर प्रेम आहे तरी तुला तिच्याशी लग्न करायचे नाही आणि आज डॅडने निवडलेल्या मुलीशी तू तिला न पाहता लग्न करायला तयार झालास?जिला तू ओळखत देखील नाहीस. थोडे दिवस थांब ना विचार कर आणि मग निर्णय घे.” तो रागानेच तणतणत होता.

अभिराज,“ आदी प्रेम आणि लग्न या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. माझे क्षितिजावर प्रेम आहे पण ती आपल्या कुटुंबासाठी योग्य नाही. लग्न करताना नुसते प्रेम असून चालत नाही तर आपल्या कुटुंबाला सामावून आणि सांभाळून घेणारी मुलगी हवी. तिने आपली नाती आपले घर सगळं सांभाळले पाहिजे म्हणून मी क्षितिजाशी लग्न करायला तयार नाही कारण ती नाही समजू शकत आपली नाती आणि आपलं कुटुंब ही सांभाळू शकत नाही. मी तिचा स्वभाव जवळून पाहिला आहे अनुभवला आहे. तिला स्वतः शिवाय काहीच दिसत नाही त्यात तिची चूक नाही कारण ती त्रिकोणी कुटुंबात वाढलेली एकुलती एक मुलगी आहे. अंकू माझ्यासाठी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल आणि अंकूने पहिल्यांदा माझ्याकडे काही तरी मागितले आहे त्याला मी नाही म्हणू शकत नाही त्याने माझ्यासाठी खूप काही केले आहे. आदी हा विषय पुन्हा काढू नकोस.” तो त्याला समजावत म्हणाला आणि आदिराज निघून गेला.
★★★

इकडे संग्रामने अजय गायकवाडशी संपर्क साधून त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. लगेच दोन दिवसात अजय गायकवाड त्यांची मुलगी अमोली आणि बायको अमिता यांना घेऊन मुंबईत हजर झाले. आज पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता. त्याची सगळी जय्यत तयारी गार्गी आणि समिधाने केली होती. अजय गायकवाड एका लॉजवर उतरले होते आणि बरोबर संध्याकाळी चार वाजता ते सुशांतच्या घरी ठरल्याप्रमाणे हजर झाले. गार्गी आणि संग्रामने त्यांचे स्वागत केले.

गार्गी आणि समिधा अमोलीला पाहत होत्या. तसे फोटोत त्यांनी तिला पाहिले होते पण प्रत्यक्षात ती फोटो पेक्षा ही सुंदर होती. गोरा रंग, घारे डोळे, चाफेकळी नाक, केसांचा स्टेप कट आणि शिडशिडीत बांधा! अगदी अभिराजला शोभेल अशी! ती अभिराजला न्याहाळत होती आपला अभिराज तरी कुठे कमी होता. जीन्स आणि मरून कलरच्या शर्ट वर तो हँडसमच दिसत होता. चहा नाष्टा झाला आणि सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. संजयराव अभिराजला म्हणाले.

संजयराव,“ अभी जा आपले घर अमोलीला दाखव.” ते म्हणाले आणि अभिराजने मान डोलावली.

दोघे ही घर पाहायला निघाले. अभिराज तसा शांतच माणूस तो फक्त कामा पूरते अमोलीशी बोलत होता.

अमोली,“ तुमच्यासारख्या हँडसम मुलाची गर्लफ्रेंड नसेल शक्यच नाही.” ती हसून म्हणाली.

अभिराज,“ होती गर्लफ्रेंड नाही म्हणता येणार पण होती कोणी तरी पण नाही जमले आमचे.” तो निर्विकारपणे म्हणाला.

अमोली,“हुंम होत असं.माझ्याबद्दल काही विचारायचे नाही का तुम्हाला?”तिने रोखून पाहत विचारले.

अभिराज,“ नाही कारण मला माझ्या घरच्यांच्या पसंतीवर विश्वास आहे आणि तुम्ही लग्नाला तयार आहात म्हणजे तुमचा भूतकाळ विसरून पुढे चालायचे ठरवले असेलच ना! असे ही मला तुमच्या भूतकाळात इंटरेस्ट नाही.” तो ठामपणे म्हणाला.

अमोली,“ बरोबर आहे तुमचं पण पहिलं प्रेम इतकं सहजासहजी विसरता येत नाही असं म्हणतात बाकी माझा विश्वास नाही प्रेम वगैरे वर ” ती म्हणाली.

अभिराज,“ बरं! चला खाली सगळे वाट पाहत असतील.” तो म्हणाला.

ते तिघे साखरपुड्याची बोलणी करून गेले. एक महिन्याने साखरपुडा आणि मग त्यानंतर महिन्याने लग्न करायचे ठरवले होते. साखरपुडा मुंबईत तर लग्न माथेरानला करायचे ठरले.

अमोलीच आणि अभिराजच लग्न खरंच होईल का? आणि तसं झालं तर मग क्षितिजाचे काय? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा मला!
©स्वामिनी चौगुले











🎭 Series Post

View all