माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ९१

अभिराजचा राग केंव्हा शांत होईल?


सगळे संग्रामच्या रूममध्ये जमले होते. संग्राम बराच चिंतीत दिसत होता. त्याला असं चिंतीत पाहून सुशांतने त्याला विचारले.

सुशांत,“ काय झालं संग्र्या तू इतका अपसेट का दिसत आहेस?”

संग्राम,“ अरे काही दिवसांपूर्वी अभी आपल्या प्रयत्नांमुळे क्षितिजाच्या जवळ आला होता पण तो आता पुन्हा त्याच्या कोशात शिरला आहे. क्षितिजाशी फटकून वागत आहे. मी काही दिवसांपासून पाहत आहे. क्षितिजाला दिलेल्या सहा महिन्यांपैकी तीन महिने संपले आहेत आणि हा महिना ही संपत आला आहे.तसं वेळच काही नाही रे मी मुद्दाम क्षितिजाला वेळ दिला कारण तिने अभीच्या जवळ जाण्याचे प्रयत्न करावेत. ती तरी किती प्रयत्न करणार आहे? टाळी एका हाताने थोडीच वाजते.” तो बोलत होता.

गार्गी,“ बरोबर बोलतोय संग्राम चार महिने होत आले तरी हे पोरगं बधत नाही. क्षितिजाने काय याच्या गळ्यात पडावे का? आधीच क्षितिजा त्याला घाबरते एक नंबर खडूस आहे आपलं कार्ट!” ती म्हणाली सगळ्यांची चर्चा सुरू होती.

इकडे मात्र अभिराज मिटिंगसाठी निघणार तर त्याला मिटिंग कॅन्सल झाली म्हणून फोन आला आणि त्याने गाडी घराकडे वळवली.तो मनात विचार करत होता.

‛ चला आज लकिली वेळ मिळाला आहे आपल्याला तर सगळ्यांसोबत डिनर करू. मस्त गप्पा मारू आणि आंटीकडून चंपी करून घेऊ. डोकं दुखतंय आज. बरं झालं क्षितिजा घरी जा म्हणून सांगितले नाही तर तिचा ही वेळ विनाकारण वाया गेला असता.’

तो या विचारात घरी आला आणि त्याने गाडी पार्क न करता गेटच्या थोडी पुढे सोडली आणि वॉचमनकडे चावी दिली. तो घरात गेला तर घरात कोणीच दिसत नव्हतं म्हणून त्याने एका नोकराला विचारले तर त्याने सगळे तिकडच्या घरात आहेत असं सांगितलं. इकडे गॅलरीचे दार संग्रामने लावून घेतल्यामुळे अभिराजच्या गाडीचा आवाज कोणाला ही आला नाही. अभिराज संग्रामच्या घरात गेला तर तिथे ही शुकशुकाट होता त्याला आश्चर्य वाटले इतकी सगळी माणसे गेली कुठे?

त्याने तिथं सखुबाईला विचारले तर तिने सगळे संग्रामच्या रूममध्ये आहेत असं सांगितलं. तो वर गेला. तर दार बंद होत आतून आवाज येत होता बोलण्याचा तो पुढे लोटलेले दार ढकलणार तर त्याला राज्ञीचा बोलण्याचा आवाज आला आणि तो तिथेच थबकला.

राज्ञी,“ अंकू आपण तुझ्या तब्बेतीबद्दल भाईला खोटं बोललो आणि क्षितिजाला त्याची असिस्टंट केले पण त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. आता नवीन काही तरी ट्रिक करावी लागेल.”


ती बोलत होती आणि ते ऐकून अभिराजला मात्र धक्का बसला.त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते कारण त्याच्याच माणसांनी त्याच्याशी खोटं बोलून त्याला इमोशनल ब्लॅकमेल केले होते. तो डोळे पुसून पुढे कोण काय बोलतंय हे ऐकत उभा राहिला.

संजयराव,“ काही ट्रिक वगैरे नाही करायची आता आपण सरळ त्याच आणि क्षितिजाच लग्न लावून देऊ. एकदा लग्न झालं की अभी किती दिवस नखरे करेल!” ते म्हणाले.

सुशांत,“ बरोबर आहे बाबा तुमचं आपण तेच करूया.” तो म्हणाला

आणि दार ढकलून अभिराज टाळ्या वाजवत आत आला. सगळे त्याला तिथे पाहून चकित होते.

अभिराज,“ छान चालले आहे सगळ्यांचे, काय गं राज्ञी डॉक्टर असून तू माझ्याशी अंकलच्या तब्बेती विषयी खोटं बोललीस?तुला काहीच वाटलं नाही का?”तो रागाने विचारत होता.

संग्राम,“ अभी तू पनवेलला गेला होतास ना मिटिंगला आणि जे काही केले ते राज्ञीने माझ्या सांगण्यावरून केले तर उगीच तिला दोष नको देऊन.” तो त्याला पाहत उसने अवसान आणून म्हणाला.

अभिराज,“ हो बरोबर आहे तुझं या ड्राम्याचा डायरेक्टर तर तूच असला पाहिजेस कारण असला खुरापती प्लॅन तर तुझ्याच डोक्यातून येऊ शकतो. बाकी याच्या डायरेक्शन खाली तुम्ही सगळ्यांनीच खूप छान ऍक्टिग केली. तुम्ही सगळे ना खरंच एखादी ड्रामा कंपनी सुरू करा.” तो रागाने पण डोळ्यात पाणी आणून बोलत होता.

गार्गी,“ बच्चा! अरे जे काही आम्ही केलं ते तुझ्या भल्यासाठी आणि…” ती आवंढा गिळत बोलत होती तर अभिराजने तिचे बोलणे मध्येच तोडले.

अभिराज,“ मेला तुझा बच्चा…” तो रागाने पुढे बोलणार तर संग्राम त्याच्यावर ओरडला.

संग्राम,“ तोंड सांभाळून बोल अभी, तुझा राग आमच्यावर आहे मी समजू शकतो पण उगीच अभद्र बोलू नकोस.” तो रागाने ओरडला.

अभिराज,“ का बोलू नको मी सांग ना? माझ्या फॅमेलीने मिळून चक्क माझी फसवणूक केली. मला वेड्यात काढलं. ज्यांच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच माझ्या इमोशनचा गैरफायदा घेतला!” तो तावातावाने बोलत होता.

सुशांत,“ उगीच तोंडाला येईल ते बोलू नकोस अभी, इथे तुझी कोणी फसवणूक वगैरे केली नाही. तुला कळत नव्हतं की तुझं सुख कशात आहे. उगीच हट्टाला पेटून आणि मनात क्षितिजा विषयी राग ठेवून तू टोकाचा निर्णय घेतलास म्हणून आम्हाला हे सगळं करणं भाग पडले आणि आवाज चढवून आपल्यात मोठ्यांशी बोलत नाहीस. संस्कार विसरलास का?” तो रागातच त्याला म्हणाला.

अभिराज,“ डॅड तू किती ही स्पष्टीकरण दिले तरी हेच सत्य आहे की तुम्ही सगळ्यांनी मला फसवले आहे असो मला आता कोणशीच बोलायचे नाही आणि हो अंकल उद्या ती क्षितिजा माझ्या केबीनसमोर दिसली नाही पाहिजे. तू तिला अपॉइंट केलं होतस ना तर तिला काय काम द्यायचं ते तुझं तू बघ. ती पण तुम्हाला सामील आहे सोडा आपलीच माणसं अशी वागली मग ती तर परकी आहे.” तो रागाने म्हणाला आणि निघाला.

समिधा,“ तू शुद्धीवर आहेस का? काय बोलतोयस तुला तरी कळतय का? तू संग्रामला ऑर्डर देणार आता?” तिने रागाने विचारले.

अभिराज,“ ऑर्डर देणारा मी कोण? ही विनंती आहे आणि जर ती उद्या ही माझी असिस्टंट म्हणून दिसली तर मी ऑफिसच काय पण घरपण सोडून जाईन.” तो डोळे पुसत म्हणाला.

सुशांत,“ धमकी देतो आहेस आम्हाला…”तो पुढे बोलणार तर संजयराव त्याला आडवत म्हणले.

संजयराव,“ ठीक आहे मी गॅरेंटी देतो तुला उद्या क्षितिजा तुझ्या केबीनसमोर दिसणार नाही.” ते म्हणाले आणि अभिराज काहीच न बोलता निघून गेला.

सुशांत,“ काका अहो मला का थांबवलं तुम्ही? तो कसा वागतोय पाहिलंत ना?” तो रागाने म्हणाला.

संजयराव,“ हो पाहिलं आणि ऐकलं ही! सुशा चूक आपली आहे आपण त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं. त्याला खोटं बोललो मग त्याने आपल्याशी अजून कसं वागावे अशी तुझी अपेक्षा आहे? पोरगं दुखावलं गेलं आहे आणि त्याला आपल्या सगळ्यांचा राग ही आला आहे. अशा परिस्थितीत काय म्हणता काय होऊन बसेल. आपण त्याच्या कलाने घ्यायला हवं सध्या.” ते त्याला समजावत म्हणाले.

संग्राम,“ बरोबर बोलत आहेत बाबा सुशांत आपण जरा त्याच्या कलाने घेऊ आणि थोडावेळ जाऊ देऊ मग पुढचं काय ते ठरवू.” त्याने दुजोरा

सुशांत,“ ठीक आहे.” तो म्हणाला.


अभिराजने त्याच्या रूमचे दार लावून घेतले ते नऊ वाजले तरी उघडले नाही. त्यामुळे सगळेच जरा काळजीत होते. त्याला जेवायला बोलवायला आता कोण जायच हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

संग्राम,“ मी बोलावतो त्याला आदी चल माझ्याबरोबर!” तो आदिराजला घेऊन त्याच्या रूमच्या बाहेर गेला आणि आदिराजला त्याला हाक मारायला लावली.

आदिराज,“ भाई जेवायला चल आम्ही सगळे थांबलो आहोत.” तो म्हणाला.

अभिराज,“ मला जेवायचे नाही तुम्ही जेवा.” तो आतुनच ओरडला.

संग्राम,“ ठीक आहे तुला नाही जेवायचे ना!” तो म्हणाला आणि अभिराजने संग्रामचा आवाज ऐकून दार उघडले.तो दोघांना ही काहीच न बोलता डायनींग टेबलवर येऊन बसला. सगळेच जेवायला बसले होते. समिधाने त्याला ताट वाढून दिले त्याने सगळे पदार्थ परत ठेवले आणि दोन घास खाऊन कोणालाच काही न बोलता निघून गेला.


अभिराजचा राग केव्हा शांत होईल? क्षितिजाचे आणि त्याचे नाते आता कायमचे संपले होते का?

©स्वामिनी चौगुले






🎭 Series Post

View all