माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ९०

अभिराज आणि क्षितिजाच्या नात्याचे भविष्य काय असेल?


दोघे डान्स करत करत एकमेकांच्यासमोर आले होते. दोघांच्या ही हृदयाची धडधड वाढली होती. खरं तर क्षितिजा थोडी बावरली होती आणि घाबरली देखील होती कारण अभिराज तिच्याबरोबर डान्स करेल का हा प्रश्न तिला सतावत होता. इकडे संग्राम, समिधा, सुशांत, राज्ञी आणि डान्स फ्लोअरवर गार्गी, आदिराजचे लक्ष त्या दोघांकडे स्थिरावले होते.

अभिराज दोन मिनिटं थांबला आणि क्षितिजाच्या पुढे त्याने हात केला. क्षितिजाने तिचा थरथरता हात त्याच्या हातात दिला. दोघे ही डान्स करत होते अभिराजचा एक हात क्षितिजाच्या उघड्या कमरेवर होता तर एक हात तिच्या हातात गुंफला होता. क्षितिजा मात्र त्याच्या स्पर्शाने शहारली. इकडे संग्रामने गाणे बदलायला लावले. गाणे सुरू झाले.

दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके
सबको हो रही है, खबर चुपके चुपके

साँसों में बड़ी बेक़रारी, आँखों में कई रत जगे
कभी कहीं लग जये दिल तो, कहीं फिर दिल न लगे
अपन दिल मैं ज़रा थम लूँ
जादु का मैं इसे नाम दूँ
जादु कर रहा है, असर चुपके चुपके
दो दिल मिल रहे हैं …

अभिराज तिला हळूच कानात म्हणाला.

अभिराज,“ मी म्हणालो होतो ना तुला हा कलर खूप उठून दिसेल.” तो म्हणाला आणि क्षितिजा लाजली. थोड्याच वेळात डान्स संपला.


गेल्या दोन महिन्यापासून सगळे घेत असलेली मेहनत फळाला येताना असे दिसत होते. अभिराज क्षितिजाकडे पुन्हा ओढला जात होता. त्यामुळे सगळेच खुश होते. अभिराजला मात्र तो असा का वागतो आहे ते स्वतःला देखील कळत नव्हते. तो मनातून स्वतःवरच चिडला होता आणि स्वतःलाच दोष देत होता.

‛अभिराज काय चालले आहे रे तुझे! मूर्ख माणसा तू असा का वागत आहेस? क्षितिजापासून दूर राहायचं आहे तुला आणि तू तिच्याजवळ जात आहेस तिला कॉम्प्लिमेंट देत आहेस. उगीच तिला आशेला लावणे बरे नाही आणि तू .. तू ही वाहवत जात आहेस. आता स्वतःवर ताबा ठेवायला हवा तू असं वागून क्षितिजा आणि घरातल्या सगळ्यांनाच आशेला लावत आहेस. स्वतःला सावरायला हवं आता’ त्याने स्वतःला बजावले.
★★★


पार्टी होऊन महिना उलटून गेला होता. क्षितिजाला संग्रामने दिलेल्या सहा महिन्यांमधील तीन महिने निघून गेले होते तरी अभिराज क्षितिजाशी फटकून वागत होता. त्याचे मन तिच्याकडे किती ही ओढ घेत असले तरी त्याने स्वतः च्या हट्टा पायी स्वतःच्या मनाला करकचून बांधून ठेवले होते.

आज प्रदोष होता आणि गार्गी-संग्राम पुन्हा पारद शिवलिंगाची पूजा करण्यासाठी फ्लॅटवर गेले होते. आता सगळ्यांच्या हे लक्षात आले होते की गार्गी-संग्राम महिन्यातून दोन दिवस एका रात्रीसाठी गायब होतात आणि पुन्हा घरी परत येतात.पण कोणी ही त्याबद्दल त्यांना विचारले नाही कारण योग्य वेळ आल्यावर ते सगळ्यांना सांगितल हा विश्वास सगळ्यांना होता.

दोघांनी पूजा गेली आणि आज सकाळी पुन्हा गार्गी संग्रामला शक्ती प्रक्षेपित केल्यामुळे थकली होती तर संग्रामला मात्र उत्साह वाटत होता. आज गार्गी पुन्हा थकली आहे हे संग्रामच्या लक्षात आले आणि तो तयार होत बेडवर बसलेल्या गार्गीला म्हणाला.

संग्राम,“ गार्गी मी पाहत आहे तू व्रत केला की दोन दिवस अशक्त वाटतेस! या मागे निर्जल उपवास इतकेच कारण आहे की अजून काही आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस?” त्याने तिला संशयाने पाहत विचारले.

गार्गी त्याच्या या प्रश्नाने थोडी दचकली.तिला चांगलं माहीत होतं की संग्रामला सगळं खरं कळलं तर तो तिला काहीच करू देणार नाही आणि स्वतः ही काही करणार नाही.

‛ देवा! हा संग्राम पण ना जास्तच हुशार आहे. याला जरा बुद्धी कमी घालायला काय झाले होते महादेवा! आता सारवासारव करावी लागेल त्याला पटेल असे उत्तर द्यावे लागेल जर हा हट्टाला पेटला तर माझ्याकडून खरं उगाळून घ्यायला याला वेळ लागणार नाही.आता याला पटेल असे उत्तर द्यावे लागेल ते ही प्रेमाने उठा गार्गी मॅडम आता मस्का मारायची वेळ आली.’ ती मनात स्वतःशीच बोलत उठली आणि ड्रेसिंग टेबलजवळ तिला रोखून पाहत असलेल्या संग्रामच्याजवळ गेली आणि त्याच्या गळ्यात हात गुंफत बोलू लागली.

गार्गी,“ जी. डी तू पण ना काही ही विचार करतोस. मी तुझ्यापासून कधी तरी काही लपवले आहे का? निर्जल उपवास केल्यावर थकवा येणे साहजिक आहे ना!” ती त्याला लाडिगोडी लावत बोलत होती.

संग्राम,“ खरंच का? पण अजून हा उपवास आणि व्रत किती दिवस करायचे आहे आपल्याला गार्गी! अशाने तुझ्या तब्बेतीवर परिणाम होईल.” तो काळजीने तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता.

गार्गी,“ माझ्यावर विश्वास नाही का तुझा? आणि उपवास आणि हे व्रत आपल्याला किती दिवस करावे लागणार आहे ते गुरुजींनाच माहीत.” ती म्हणाली.

संग्राम,“ तुझ्यावर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे पण मला हे ही चांगलच माहीत आहे की तू माझ्यासाठी कोणत्या ही टोकाला जाऊ शकतेस. मी आत्ता ओळखतो का तुला? बरं आता करा आराम घरी गेल्यावर. बाय द वे गार्गी तू ना अजून ही तशीच आहेस पहिल्या रात्री होती तशीच! तुझ्या सहवास किती ही मिळाला तरी मन नाही भरत! लव यु स्वीट हार्ट.” तो तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला आणि गार्गी लाजून त्याला बिलगली.

गार्गी,“ लव यु टू! आज तो मेरा दिन बन गया। चल आता उशीर होतोय आपल्याला आणि आराम तर मी करणारच आहे. बाकी घरून काम करेन मी.” ती हसून म्हणाली.

दोघे ही घरी गेले आणि संग्राम ऑफिसला निघून गेला. गार्गी मात्र घरीच थांबली होती. तिचा उतरलेला चेहरा पाहून मनीषाताई तिला काळजीने म्हणाल्या.

मनिषाताई,“ गार्गी तू हल्ली महिन्यातून दोन तीन वेळा तरी आजारी पडतेसच. आपण डॉक्टरांना दाखवून घेऊया बेटा! उद्या मीच घेऊन चलते तुला हॉस्पिटलमध्ये!” त्या काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होत्या.

गार्गी,“ आई अहो काळजीचे काहीच कारण नाही. मला आजकाल थकवा येतो अधून मधून तुम्ही म्हणता तर जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये उद्या! कदाचित हीमोग्लोबिन वगैरे कमी झाले असेल.” ती त्यांना समजावत म्हणाली.

मनिषाताई,“ हो पण दुर्लक्ष करून कसं चालेल बेटा! एक तर चिनूची तब्बेत तोळामासा झाली आहे. त्याने ही असेच दुर्लक्ष केलं आणि परिणाम पाहत आहेस ना तू! त्यात तुला काही झालं म्हणजे म्हणून हॉस्पिटलमध्ये जाऊ बच्चा! आराम कर जा आता. जेवायची वेळ झाली की मी जेवण पाठवून देते वर.” त्या म्हणाल्या आणि गार्गीने होकारार्थी मान हलवली.

गार्गी मुद्दामच मनीषाताईंबरोबर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेली तिला मनिषाताईबरोबर संग्रामच्या मनाचे देखील समाधान करायचे.

डॉक्टरांनी तिला चेक केले आणि तिच्या ब्लड टेस्ट केल्या तर हिमोग्लोबिनपासून सगळं नॉर्मल होत. तिला थकवा दगदग केल्यामुळे किंवा उपवास वगैरे केल्यामुळे येत असावा असे निदान केले आणि मनीषाताईंच्याबरोबर संग्रामच्या देखील मनाचे समाधान झाले.
★★★
संग्राम अभिराजच्या क्षितिजाबरोबरच्या वागणुकीचे कोणाच्या ही न कळत निरीक्षण करत होता आणि अभिराज पुन्हा क्षितिजाशी फटकून वागत आहे हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे तो जरा काळजीत होता. संग्रामला माहीत होतं की आज अभिराजची पनवेलला मिटिंग आहे आणि त्याला रात्री घरी पोहोचायला उशीर होणार आहे म्हणून त्याने आज पुन्हा सगळ्यांची मिटिंग रात्री बोलावली होती. क्षितिजा आणि अभिराज बाबतीत चर्चा करण्यासाठी!

गार्गीने पुन्हा एकदा संग्रामला अंधारात ठेवले होते संग्रामला खरे कळल्यावर तो कसा रियाक्ट होईल?सगळ्यांनी इतके प्रयत्न करून ही अभिराज त्याच्या निर्णयावर ठाम होता, त्याच्या आणि क्षितिजाच्या नात्याचे नेमके भविष्य काय होते?
©स्वामिनी चौगुले


ही कथा काल्पनिक असून या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि धार्मिक बाबींना ठेस पोहोचवण्याचा उद्देश लेखिकेचा नाही. बाकी लेखिकेने लिहलेला मजकूर हा तिने केलेल्या अभ्यासावर आणि कल्पनेवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.






🎭 Series Post

View all