माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ८६

गार्गीला हे व्रत सहन होईल का?


संग्राम आणि गार्गी पूजेसाठी आणि बाकी काही खरेदी करून फ्लॅटवर पोहोचले. गार्गीने तिच्याबरोबर पारद शिवलिंग आणि दोघांसाठी पांढरी वस्त्रे आणली होती. तिने अंघोळ केली आणि पांढरी साडी नेसून ती स्वयंपाकाला लागली.. गार्गीने आधी स्वयंपक करून मग बाकी पूजा वगैरे करायचे ठरवले होते त्याप्रमाणे ती कामला लागली होती.

संग्राम,“ आधीच निर्जल उपवास आहे तुझा तर तुला जे करणार आहेस तेच मी खाईन. उगीच डबल काही करू नकोस आणि मी मदत करू का काही?” तो काळजीने बोलत होता.

गार्गी,“ तू जा आणि निवांत बस. मी पहाते काय करायचे ते मला नको सांगूस.” ती म्हणाली आणि तिने संग्रामला हॉलमध्ये पिटाळले.


तासाभरात स्वयंपाक उरकला आणि तिने हॉलमध्येच पूजा मांडली. संग्रामला घेऊन तिने गुप्त मंत्र म्हणत पारद शिवलिंगाची पूजा केली आणि पांढऱ्याच पदार्थांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर तिने त्याच गुप्त मंत्राची एक माळ ओढली आणि नमस्कार करून उठली.

गार्गी,“ संग्राम चल जेवायला.” ती म्हणाली आणि दोघे डायनिंग टेबलवर जेवायला बसले. गार्गी त्याच्या ताटात पदार्थ वाढत होती आणि संग्राम तिच्याकडे पाहत होता. पनीर मसाला,दाल तडका, चपाती, जीरा राईस आणि गुलाबजमुन!

संग्राम,“ काय गार्गी कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला?” तो नाराजीने म्हणाला.

गार्गी,“खूप दिवस झाले फक्त तुझ्यासाठी तुझ्या आवडीच मी काही केलं नव्हतं. आज चान्स मिळाला मग केलं. उगीच तोंड नको फुगवू आता खाऊन सांग कस झालं आहे ते!” ती म्हणाली.

संग्राम,“ हो आणि तुझं काय ही भाकरी, दूध, भात आणि दही यातलं तुला दही-भात सोडलं तर काहीच आवडत नाही गार्गी! मी काय म्हणतो हे सगळं करणं गरजेचं आहे का?” तो तिच्या ताटाकडे पाहत म्हणाला.

गार्गी,“ संग्राम यावर आपलं आधी ही बोलणं झालं आहे. तू जेवण कर मी एक दिवस मॅनेज करू शकते. पुढच्या वेळी इडली आणि खोबऱ्याची चटणी करेन ते ही पांढरेच पदार्थ आहेत की! तू जेव बरं.” ती म्हणाली.

संग्राम,“ तू कधीच माझं ऐकत नाही. नेहमीप्रमाणे मस्त झाले आहे सगळे गार्गी अगं पण बाईंना काय सांगितलीस तू? ” तो जेवत तिला म्हणाला.

गार्गी,“ त्यांना काढून टाकले मी कामावरून आणि दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना पागर देणार आहे. आता आपल्याला कायमच लागणार आहे फ्लॅट म्हणून!” ती म्हणाली.

संग्राम,“ बरं!तुला काय करायचं ते कर.” तो म्हणाला.

गार्गी,“ इतकं तोंड फुगवण्यासारखं काही झालेलं नाही कळलं तुला आणि जेवण करून औषधं घे मी आलेच सगळं आवरून.” ती म्हणाली.


दोघांनी जेवण केलं आणि संग्राम बेडरूममध्ये गेला. थोड्या वेळात गार्गी सगळं आवरून आली. तिने पारद शिवलिंग पुन्हा आठवणीने तिच्या पर्समध्ये ठेवले आणि पाणी तसेच काही पदार्थ गॅलरीत असलेल्या एका कुंडीत ओतले. ती संग्रामजवळ बेडवर येऊन बसली तर संग्राम मोबाईलमध्ये काही तरी करत होता. तिने आदिराजला फोन करून सगळे जेवले का वगैरे विचारून घेतले.

गार्गी,“ संग्राम ठेव बरं तो मोबाईल बाजूला. औषधं घेतलीस ना?” ती म्हणाली आणि तिने त्याचा मोबाईल काढून घेतला.

संग्राम,“ हो घेतली आणि तुला थकवा वगैरे आला आहे की नाही.” त्याने विचारले.

गार्गी,“ नाही आला.” असं म्हणून तिने संग्रामला मिठी मारली.

संग्राम आणि ती बराच वेळ एकमेकांमध्ये विरघळत राहिले आणि गार्गी त्याच्या मिठीत विसावली.

संग्राम,“ झालं समाधान तुझं? तू पण ना गार्गी काय काय स्वतः करशील आणि मला करायला लावशील सांगता येत नाही.” तो तिच्या केसातून हात फिरवत बोलत होता.

गार्गी,“ जी. डी. तुला आठवतं का आपण सुरवातीचे काही महिने तिथेच राहिलो होतो. तू पहिल्यांदा मला प्रपोज इथेच केलंस आणि तुझ्याबरोबर मी पहिली रात्र इथेच जगले होते.” ती त्याच्या डोळ्यात पाहत विचारत होती.

संग्राम,“ हो आठवते पण दुर्दैवाने मी दारूच्या नशेत तुझ्याबरोबर काय केले हे आज ही मला आठवत नाही. माझ्यासाठी तर पहिली रात्र ठाण्यातल्या घरातली आहे आणि माझा झालेला गैरसमज तू इथेच दूर केला होतास ते ही आठवते. गार्गी समर्पणाच्या बाबतीत तू कायम माझ्या पुढे राहिलीस.” तो तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला.

गार्गी,“आणि प्रेमाच्या बाबतीत तू! लव यू जी.डी.! बरं ऐक ना मला तुझ्याशी अभीबद्दल बोलायचे आहे.” ती बोलत होती पण तिचा उतरलेला चेहरा तिला आलेला थकवा लपवू शकत नव्हता. तिला अचानक थकवा जाणवत होता आणि सचित्तानंद महाराजांचे बोलणे तिला आठवले तरी ही तिला अभिराजबद्दल संग्रामशी बोलायचे होते.

संग्राम,“ काही बोलायचे नाही आता कोणाबद्दल ही बघ किती थकवा दिसत आहे तुझ्या चेहऱ्यावर आता झोप तू आपण उद्या बोलू.” तो तिला पाहत म्हणाला.

गार्गी,“ मी ठीक आहे. अभीबद्दल खूप महत्त्वाचे बोलायचे आहे मला! आज तो तणतणतच आला आहे घरी! क्षितिजाला काल लागले आहे म्हणे याला वाचवायला जाऊन तिचा छोटा अपघात झाला आहे म्हणत होता मला बाकी काही कळले नाही आणि वेळ ही नव्हता इतका म्हणून मी उद्या बोलते म्हणले.” ती बोलत होती.

संग्राम,“ काय क्षितिजाला लागले आहे? बरं आपण उद्या पाहू काय ते तू आत्ता झोप गार्गी” तो काळजीने म्हणाला.

गार्गी,“बरं उद्या बोलू त्यांच्याबद्दल पण जी.डी आपल्याबद्दल बोलू ना मग!”ती हसून त्याला आणखीन बिलगत म्हणाली.

संग्राम,“गार्गी आता खरंच तुझं खूप झाले. आता राहिलेले सकाळी कळलं तुला, झोपती का आता? जास्त शेफारु नकोस तू! आता झोपायचं कळलं तुला मला ही झोप येतेय.” तो तिला दटावत म्हणाला.

आणि गार्गी झोपली. सकाळी गार्गी उठली तर तिला जास्तच थकवा जाणवत होता.ती कशीबशी उठली आणि तिचे आवरले. संग्राम अजून झोपलेलाच होता. तिने त्याला उठवले तो उठून बसत तिचा उतरलेला चेहरा पाहत म्हणाला.

संग्राम,“ गार्गी अगं किती उतरला आहे चेहरा तुझा! जस काही कोणी तरी तुझ्या चेहऱ्याचे तेज चोरून घेतले एका रात्रीत! आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात.” तो काळजीने बोलत होता.

गार्गी,“ इतकं काही झालं नाही मला, कालच्या उपवासाचा थकवा आहे बाकी काही नाही. आराम केला थोडा की बरं वाटेल. आता मला पुन्हा तेच ऐकायचे नाही की हे व्रत करायलाच हवे का वगैरे वगैरे! उठ तू आणि आवर आपण निघू. त्या अभिला आज पाहतेच. खूप लाडावत चालला आहे. क्षितिजाला किती लागलं आहे काय माहीत?” ती रागाने आणि काळजीने बोलत होती.

संग्राम,“ हो आलोच तयार होऊन मी आणि इतकी काळजी नको करुस.” तो म्हणाला आणि तयार होऊन आला. दोघे ही घरी आले तर सगळे नाष्टा करत होते. अभिराज ही तिथेच होता. गार्गी तिथे जाऊन बसली आणि थोडी रागातच बोलू लागली.

गार्गी,“ हा बोल आता अभी काय झालं आहे नेमकं? क्षितिजाला आणि तू इतका बेजबाबदार केंव्हापासून झालास?”

अभिराज,“ आंटी सॉरी ना ते बेंगलोरमध्ये माझ्याकडून चूक झाली. माझं लक्ष नव्हतं त्या गाडीकडे पण या क्षितिजा कोणी सांगितले होते कडमडायलामध्ये!” तो म्हणाला.

सुशांत,“ नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि क्षितिजाला काय झाले?” त्याने काहीच न कळल्यामुळे विचारले.

गार्गी,“ ते तर अभीच सांगू शकेल नीट आणि इट्स नॉट गुड अभी क्षितिजाने तुला वाचवले आणि तिच्या विषयी तू असं बोलत आहेस!” ती रागाने म्हणाली.

अभिराज,“ सॉरी आंटी माझं चुकलं. परवा बेंगलोरमध्ये मिटिंगवरून हॉटेलमध्ये जाताना मी फोनवर बोलत रोड क्रॉस करत होतो. माझे लक्ष नव्हते आणि एक भरधाव येणाऱ्या गाडीने मला ठोकरले असते तर क्षितिजाने मला ओढले आणि ती खाली पडली त्यामुळे तिच्या हाताला लागले आहे बरेच!तिला ताप ही आला होता.”तो खाली मान घालून बोलत होता.

संग्राम,“ इतका कसा बेजबाबदार झालास तू अभी?बरं झालं क्षितिजाला तुझ्याबरोबर पाठवले मी! क्षितिजाला खूप लागले आहे का?”त्याने काळजीने विचारले.

अभिराज,“ सॉरी ना अंकू मी इथून पुढे लक्षत ठेवेन आणि क्षितिजाला लागलं आहे पण ती बरी आहे आता!” तो म्हणाला

समिधा,“ गार्गी आपण क्षितिजाला भेटून येऊ तिच्या घरी जाऊन आज.” ती म्हणाली.

संग्राम,“ गार्गी आज कुठे ही जाणार नाही एवढेच काय ती ऑफिसला ही येणार नाही आज! समिधा तू, मी आणि सुशांत भेटून येऊ क्षितिजा आदीबरोबर! तसेच आम्ही तिघे ऑफिसला जातो तू घरी ये. गार्गीला आज बराच थकवा आला आहे ती आराम करेल घरी.” तो म्हणाला.

गार्गी,“ मी पण येते ना तुमच्याबरोबर वाटलं तर समिधाबरोबर परत घरी येईन.” ती म्हणाली आणि संग्रामने तिच्याकडे रागाने पाहिले तशी ती गप्प बसली.

सुशांत,“ अभी तू ऑफिसला जा आणि गार्गी आराम कर आज तू. आम्ही भेटून येतो क्षितिजाला आज, तू उद्या किंवा परवा जाऊन ये.” तो म्हणाला.

सचित्तानंद महाराज म्हणाले तसा गार्गीला थकवा जाणवत होता. गार्गीला हे व्रत सहन होणार होते का?
©स्वामिनी चौगुले

ही कथा काल्पनिक असून या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि धार्मिक बाबींना ठेस पोहोचवण्याचा उद्देश लेखिकेचा नाही. बाकी लेखिकेने लिहलेला मजकूर हा तिने केलेल्या अभ्यासावर आणि कल्पनेवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.






🎭 Series Post

View all