माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ८१

राजवीर सचित्तानंद महाराजांनी घातलेले बंधन तोडू शकेल का?


भाग 81
चार दिवस असेच निघून गेले. अभिराज ऑफिसमध्ये क्षितिजाशी तुटक वागत होता. क्षितिजाला आधीच माहीत होतं की अभिराज तिच्याशी असं वागू शकतो त्यामुळे तिने स्वतःच्या मनाची तयारी केली होती आणि ती तिचं काम शांतपणे करत होती.


आज गार्गी आणि संग्राम सचित्तानंद महाराजांच्या मठात राजवीरने करून ठेवलेल्या करणीचा उपाय करायला जाणार होते. सचित्तानंद महाराजांनी गार्गी आणि संग्राम दोघांनाच त्यासाठी बोलावले होते. दोघे ही सकाळीच तयार होऊन त्यांच्या मठात त्यांनी बोलावलेल्या वेळेवर पोहोचले.

सचित्तानंद महाराज, “ या मी तुमचीच वाट पाहत होतो.सगळी तयारी झाली आहे आपण विधींना सुरुवात करू. ताई संग्रामदादांच्या हातात असलेला तो धागा सोडा आणि तुम्ही दोघे या होमासमोर बसा.” ते म्हणाले.

गार्गीने संग्रामला आठ दिवसांपूर्वी बांधलेला धागा सोडला आणि दोघे ही होमासमोर बसले. तिथे बरेच साहित्य व्यवस्थित मांडलेले दिसत होते.हळद, कुंकू, तूप, धूप, दीप, होमासाठी लागणारी समिधा(लाकडे),अक्षदा,आणि बरच काही एका ताटात पाच रेशमी धागे आणि एका ताटात एकमुखी दहा रुद्राक्ष होते. त्यांचे दोन शिष्य मदतीसाठी हजर होते.

सचित्तानंद महाराज,“ यांना घेऊन जा.(ते एका शिष्याला पाहत म्हणाले.) तुम्ही दोघे मठात जा आणि हे सोवळे परिधान करून या!”ते संग्राम आणि गार्गीला वस्त्राचे ताट देत म्हणाले.

दोघे ही त्या शिष्याबरोबर गेले आणि संग्राम पांढऱ्या रंगाचे धोतर उपरणे आणि गार्गी पांढरी साडी नेसून आले.

सचित्तानंद महाराज,“ आपण आज जो यज्ञ करणार आहोत तो राजवीरने त्याच्या विद्येचा वापर करून जी कर्णी संग्रामदादावर केली आहे त्यासाठी करणार आहोत.त्याने संग्रामदादांच्या हाताची प्रतिकृती बनवून त्या माध्यमातून तुम्हा दोघांच्या आयुष्यात डोकावत आहे कारण त्याला तुमचा पिच्छा पुढच्या जन्मी करायचा आहे आणि त्याच कर्णीला आपण आज बंधन घालणार आहोत. आठ दिवस आधी संग्रामदादांच्या हातात आपण तात्पुरता धागा बांधला होता ज्याने राजवीर तुम्हाला पाहू शकला नाही पण तो तात्पुरता उपाय होता आज आपण त्यावर कायम स्वरूपी उपाय करणार आहोत.

हे पाच धागे आहेत ते पंचतत्त्व म्हणजेच जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी यांचे प्रतीक आहेत. या पंचतत्वनेच आपले शरीर बनले आहे तसेच हे धागे पंचइंद्रियांचे देखील प्रतिक आहेत त्यामुळे आपल्याला वेगवेगळे बोध होत असतात नाक, कान, डोळे, त्वचा आणि जिव्हा जर पंचतत्व नसतील तर आपली इंद्रिये निष्क्रिय होतील जसे हवा आणि वातावरण नसेल तर आपल्याला बोललेले ऐकू येणार नाही कारण ध्वनीला प्रवास करण्यासाठी वायूची गरज लागते तसेच त्वचेचा वातावरणाशी संपर्क असेल तरच आपल्याला स्पर्श जाणवतो. जर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर आपण पडलो तर आपल्याला कोणती ही संवेदना राहत नाही. जीभ सतत लाळेत असते म्हणजेच तिथे जल तत्त्व आले आणि त्यामुळेच आपण चव घेऊ शकतो म्हणून हे पाच धागे प्रत्येक धागा एका इंद्रियाला आणि एका तत्त्वाला बंधन घालेल.जे आपण सिद्ध करून घेणार आहोत. तसेच हे दहा एकमुखी रुद्राक्ष आपण हिमालयातून मागवले आहेत. हे दहा दिशांचे प्रतीक आहेत चार मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चार उपदिशा वायव्य, आग्नेय, नैऋत्य , ईशान्य आणि दोन उरलेल्या दिशा वर आणि खाली या दहा दिशांना प्रत्येक रुद्राक्ष बंधन घालेल त्यामुळे राजवीर कोणत्याच दिशेने संग्रामदादांपर्यंत पोहोचू शकणार नाही. या तंत्रमंत्राचे अधिष्ठात्रे देव शिवशक्ती आहेत म्हणून आपण हा होम त्यांचे आव्हान करून करणार आहोत.” त्यांनी सगळं समजावून सांगितले.

आणि होम सुरू केला.वेगवेगळे मंत्र म्हणून होम दोन तास केला गेला आणि होम करून सिद्ध झालेले ते पाच धागे आणि दहा रुद्राक्ष महाराजांनी गार्गीच्या हातात दिले आणि ते म्हणाले.

सचित्तानंद महाराज,“ प्रत्येक पुरुषाची शक्ती त्याची स्त्री असते. जसे महादेवांनी अमृत मंथनाच्या वेळी हलाहल प्राशन केले आणि माता पार्वतीने त्यांच्या कंठाला हात लावून ते तिथेच रोखले. त्याच प्रकारे गार्गीताई तुम्ही संग्रामदादांच्या अर्धांगी आहात आणि राजवीर तुम्हालाच पुढच्या जन्मी प्राप्त करण्यासाठी हे सगळं करत आहे म्हणून तुम्ही हे पाच धागे पाचतत्त्व आणि पाच इंद्रियांना स्मरुण एकत्र करा आणि प्रत्येक दिशेचे नाव घेऊन हा रुद्राक्ष त्यात ओवा आणि संग्रामदादांच्या उजव्या हातात बांधा.” ते म्हणाले आणि गार्गीने एकेक धागा जुळवला आणि त्यात रुद्राक्ष ओवले आणि संग्रामच्या उजव्या हातात बांधले.

गार्गी,“ म्हणजे आता राजवीर आमच्या आयुष्यात डोकावू शकणार नाही आणि त्यामुळे बाकी कोणत्याच समस्या उद्भवणार नाहीत. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही महाराज!” ती हात जोडून म्हणाली.

सचित्तानंद महाराज,“ आभार कसले मानताय ताई अहो मनिषाताई माझ्या गुरू भगिनी आहेत. मी तुमच्यापेक्षा लहान असलो तरी नात्याने संग्रामदादांचा मामा आहे आणि गुरूजी जरी प्रत्यक्ष इहलोकात नसले तरी त्यांचे लक्ष त्यांच्या शिष्यांवर आहे त्यांच्याच संकेतावरून आणि आज्ञेवरून मी तुमची मदत करायला आलो आहे तर आभार वगैरे मानू नका.” ते नम्रपणे हात जोडून म्हणाले.

संग्राम,“ हा तुमचा मोठेपणा आहे.” तो म्हणाला.

सचित्तानंद महाराज,“ बरं संग्रामदादा तुम्ही याच्याबरोबर जाऊन हे पाणी बेलाच्या झाडाला ओतून वस्त्र बदलून या!” ते म्हणाले आणि संग्राम त्यांच्या शिष्याबरोबर गेला.

गार्गी,“ मला तुमच्याशी थोडं बोलायचे होते.” ती म्हणाली.

सचित्तानंद महाराज,“ हो ते मला जाणवले. मला देखील तुमच्याशी बोलायचे आहे आणि तुम्हाला काही तरी द्यायचे आहे. तुम्ही आधी बोला मग मी बोलतो.” ते शांतपणे म्हणाले.

गार्गी,“ तुम्ही बंधन घातले आहे तरी मला संग्रामची काळजी वाटते. त्याची तब्बेत खूप नाजूक आहे. त्याने खूप काही भोगले आहे आत्तापर्यंत अनेक यातना आणि बरंच काही! इथून पुढे ही पाच वर्षे तो नॉर्मल आयुष्य जगेल त्यानंतर त्याला त्रास सुरू होईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याला त्रास होऊ नये आणि पुढचे त्याचे आयुष्य सुखकर व्हावे तसेच पुढच्या जन्मी त्याला दीर्घायुष्य लाभावे आणि त्या नीच राजवीरपासून रक्षण व्हावे म्हणून काही व्रत असेल तर मला सांगा. किती ही खडतर व्रत मी त्याच्यासाठी करायला तयार आहे.” ती डोळ्यात पाणी आणून हात जोडून बोलत होती.

सचित्तानंद महाराज,“तुमची काळजी मी समजू शकतो आणि आपण बंधन घातले असले तरी नियतीचे संकेत काही वेगळंच सांगत आहेत.आपण बंधन घातले असले तरी राजवीर मात्र त्यावर काही ना काही उपाय करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार कारण पुढच्या जन्मी तुम्हाला प्राप्त करणे हा एकच उद्देश नाही त्याचा तर त्याहीपेक्षा मोठ्ठ काही तरी त्याला प्राप्त करायचे आहे पण ते काय आहे हे मात्र मी माझी सगळी शक्तीपणाला लावून देखील जाणू शकलो नाही. पण तो पुढच्या जन्मी अनेक सिद्धी प्राप्त असलेला एक तांत्रिक असणार आहे आणि त्या तुलनेत तुम्हीबरोबर असून देखील संग्रामदादा एक सामान्य मनुष्य त्याच्यासमोर तुमचा निभाव कसा लागणार? म्हणून मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे. ते उपाय तुम्ही सुरू करा. त्यामुळे संग्रामदादांचे पुढचे आयुष्य सुखकर होईल त्यांना जडलेल्या व्याधींचा जास्त त्रास होणार नाही आणि पुढच्या जन्मी त्यांच्याजवळ ही राजवीरशी लढण्यासाठी काही अलौकिक शक्ती असतील ज्या योग्य वेळी जागृत होतील पण ते व्रत इतके सोपे असणार नाही ताई!” ते म्हणाले.

गार्गी,“ राजवीरचा मला प्राप्त करण्या व्यतिरिक्त ही काही उद्देश आहे? तो ही खूप मोठ्ठा? असो त्याच्याशी लढण्यासाठी मी पुढच्या जन्मी ही तयार आहे आणि संग्रामसाठी मी कसलेही खडतर व्रत करायला तयार आहे. तुम्ही मला व्रत सांगा.” ती निश्चयाने म्हणाली.


सचित्तानंद महाराज,“ हे पारद शिवलिंग आहे जे मी खास सिद्ध करून घेतले आहे. पारद शिवलिंग हे शिवशक्तीचे प्रतिक आहे. पारद शिवलिंगाची पूजा खास करून मंत्रतंत्र सिध्द करण्यासाठी केली जाते. सामान्य लोक ही याला पूजतात त्यामुळे अनेक लाभ होतात अपमृत्यु टाळतो, संतती प्राप्त होते. घरात भरभराट होते या शिवलिंगाला पूजण्याचे अनेक फायदे आहेत. हे शिवलिंग मी तुम्हाला देत आहे ताई! महिन्यात दोन प्रदोष येतात त्या काळात सायंकाळी या शिवलिंगाची पूजा गुप्तपणे करायची! हे शिवलिंग कोणाच्या ही नजरेस पडू द्यायचे नाही. अगदी तुम्ही आणि संग्रामदादा सोडून याबद्दल कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला माहीत नाही झाले पाहिजे अगदी तुमच्या मुलाला देखील! प्रदोष व्रत करायचे दिवस भर तुम्ही निर्जल उपवास करायचा सायंकाळी हे शिवलिंग काढून दूध,पाण्याने याचा अभिषेक करायचा, पांढरी फुले, विभूती, तांदूळ,धूप, दीप याने पांढरी वस्त्रे परिधान करून पूजा करायची. मी तुम्हाला एक गुप्त मंत्र देतो त्याचे उच्चारण करत ही पूजा करायची. पांढऱ्या पदार्थांचा नैेवेद्य दाखवायचा जसे भात, दूध, दही, भाकरी,साखर, मीठ! तो नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास हेच पांढरे पदार्थ खाऊन सोडायचा. बाकी त्या दिवशी काहीच खायचे नाही. पूजा दोघांनी मिळून करायची उपवास तुम्ही करायचा! पुन्हा हे शिवलिंग कोणाच्या ही नजरेस न पडू देता गुप्त जागेत ठेवायचे. त्याला वाहिलेले पदार्थ तुमच्याच रूममध्ये एखादी कुंडी ठेवून त्यात ओता एक ही पदार्थ बाहेर जाता कामा नये. त्यानंतर त्या रात्री तुम्ही मी दिलेल्या गुप्त मंत्राचा जप करायचा आणि दोघांनी रत व्हायचे त्यामुळे तुमच्याकडून संग्रामदादांकडे शक्ती प्रक्षेपित होत जाईल पण ताई हे इतकं सोपे नाही. दुसऱ्याला शक्ती प्रक्षेपित करणे म्हणजे स्वतःच्या शक्तीचे हनन करणे. एका ठिकाणी खड्डा केल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी भर घालता येत नाही. त्यात मी सांगितलेली पूजा आणि मंत्र तांत्रिक आहे जर या पूजेच्या नियमांचे पालन काटेकोरपणे झाले नाही तर तुमच्या जीवाला ही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच तुम्ही संग्रामदादांना शक्ती प्रक्षेपित केल्यानंतर तुम्हाला दोन तीन दिवस थकवा जाणवेल तुमची शक्ती पुन्हा त्या कालावधीत भरून निघेल पण संग्रामदादांना बाकी काही सांगायचे नाही. फक्त त्यांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी हे व्रत आहे असे सांगा. असेच प्रदोष व्रत केल्यावर एक दिवस तुम्हाला जाणवेल की संग्रामदादांच्या आत्मिक शक्ती जागृत झाल्या आहेत त्यात त्यांचे पहिल्यांदा आज्ञाचक्र जागृत होईल म्हणजेच आपल्या भुवयांच्या मधोमध असलेले चक्र ते चक्र जागृत होईल पण त्याला किती दिवस किती महिने किती वर्षे लागतील आपण सांगू शकत नाही तसेच यात काही बडबड झाली तर तुमचे नुकसान होऊ शकते तसेच तुम्हाला शक्ती प्रक्षेपित केल्याने मी सांगितलेल्या शारीरिक त्रासापेक्षा ही जास्त त्रास ही होऊ शकतो त्यामुळे नीट विचार करून ठरवा.” ते गंभीरपणे म्हणाले.

गार्गी,“ संग्रामसाठी मी कोणता ही धोका पत्करायला तयार आहे आणि कोणते ही खडतर व्रत देखील करायला तयार आहे. मी हे व्रत कोणती ही चूक न होऊ देता करेन. तुम्ही आज्ञाचक्र जागृत झाल्यावर काय करायचे ते सांगा कृपा करून.” ती ठामपणे हात जोडून त्यांना म्हणाली.


सचित्तानंद महाराज,“आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर तुम्ही संग्रामदादांना घेऊन माझ्याकडे या मी त्यांना त्याशक्तीचे संतुलन करायला काय करायचे ते सांगेन मग त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना मी देईन पण त्यांना मिळणाऱ्या शक्ती त्यांना या जन्मी वापरता येणार नाहीत त्या पुढच्या जन्मी योग्य वेळी जागृत होतील पण या जन्मी त्यांची प्रकृती नाजूक असून ही त्याचा त्रास होणार नाही. मृत्यू देखील सुसह्य होईल. हे शिवलिंग तुमच्याचसाठी माझ्याकडे आले होते कदाचित!” ते म्हणाले आणि एक अंगठ्या एवढे चकाकणारे पारद शिवलिंग त्यांनी एका छोट्या डबीत घालून गार्गीकडे दिले आणि तिच्या कानात एक गुप्त मंत्र सांगितला.


गार्गी,“ ठीक आहे. आजपासून मी तुमची शिष्य झाले. माझे शिष्यत्व स्वीकारा ही विनंती!” तिने छोटी डबीत घेतली आणि तिच्या पर्समध्ये ठेवली आणि त्यांच्या पाया पडत म्हणाली.

सचित्तानंद महाराज,“ शुभम भवतु:!” त्यांनी आशीर्वाद दिला.


तोपर्यंत संग्राम तिथे आला. गार्गी कपडे बदलून आली आणि गार्गी-संग्राम त्यांचा निरोप घेऊन घरी निघाले.

गार्गी सोडून राजवीरला आणखीन काय प्राप्त करायचे होते? राजवीर सचित्तानंद महाराजांनी घातलेले बंधन तोडू शकेल का?


ही कथा काल्पनिक असून या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि धार्मिक बाबींना ठेस पोहोचवण्याचा उद्देश लेखिकेचा नाही. बाकी लेखिकेने लिहलेला मजकूर हा तिने केलेल्या अभ्यासावर आणि कल्पनेवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.

©स्वामिनी चौगुले







🎭 Series Post

View all