माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ८०

अभिराज आता क्षितिजाशी कसा वागेल?


भाग 80
आज संग्राम लवकरच उठला. तो गार्गीच्या आधीच उठून तयार होता. गार्गी उठली तर संग्राम केस विंचरत होता. त्याने गार्गीला उठलेले पाहिले आणि तो तिला म्हणाला.

संग्राम,“ उठा मॅडम आज ऑफिसला जायचं आहे ना!”

गार्गी,“ हो जायचं आहे पण साहेब आज माझ्याआधी तयार झालेत. अरे वा! एखादा तरुण कसा दहावी पास झाल्यावर पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये जायला उत्सुक असतो तू तसाच उत्सुक दिसत आहेस. तसं ही खूप सारी रंगीबेरंगी फुलपाखरे एस. एस. सरांची वाट पाहत असतील ना आणि एस.एस सर पण आतुर असतील त्यांना भेटायला.” ती त्याला चिडवण्याच्या सुरात म्हणाली.

संग्राम,“अच्छा! पण सगळ्यात रंगीत फुलपाखरू तर इथे आहे. हे फुलपाखरू सोडून बाकी फुलपाखरे पाहायला मला वेड नाही लागले.” तो तिच्याजवळ बसत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

गार्गी,“ जी.डी. तू ना खूप कमी बोलतोस पण जे बोलतोस ना ते खूप छान असतं. बरं मी आले तयार होऊन तू जा खाली नाष्टा कर आणि आदि उठला का पहा. तो जिममध्ये असेल कदाचित आणि हो उद्यापासून आपण वॉकला जाऊ.” ती म्हणाली.

संग्राम,“ हो पण मला ना अभीची काळजी वाटतेय. आज त्याच्यावर आपण जो बॉम्ब टाकणार आहोत तो कसा रिऍक्ट होईल?” तो म्हणाला.

गार्गी,“ आपण जे करत आहोत त्याच्या भल्यासाठीच ना! तो काही नाही करणार फक्त चिडचिड करणार ती ही क्षितिजावर! तू नको काळजी करू बाकी आपण आहोतच.” ती म्हणाली.

संग्राम,“ ते ही आहेच मी जातो तू ये.” तो म्हणाला आणि गेला.
★★★

आज संग्राम तब्बल जवळ जवळ एक महिन्याने ऑफिसमधून आला होता. अभिराजने त्याची आणि गार्गीची केबीन साफ करून घेतल्यामुळे सगळ्यांना ऑफिसमध्ये कळले होते की संग्राम आणि गार्गी आज ऑफिसला येणार आहेत. त्यामुळे स्टाफने संग्रामच्या स्वागताची तयारी केली होती. संग्राम ऑफिसमध्ये आला आणि ऑफिस मॅनेजर आणि बाकी स्टाफने त्याचे स्वागत गेले.

मॅनेजर,“ वेल कम बॅक सर! तुम्हांला पुन्हा ऑफिसमध्ये पाहून आम्हा सगळ्याला खूप आनंद झाला.” तो बुके देत म्हणाला.

संग्राम,“ थँक्स!” तो हसून म्हणाला.

सुशांत,“ झालं ना ग्रीड करून आता जा सगळे आपआपल्या कामाला.” तो म्हणाला आणि सगळे निघून गेले.

संग्राम त्याच्या केबिनमध्ये गेला त्याच्या पाठोपाठ सुशांत आणि गार्गी होते.

गार्गी,“ सुशांत हा अभीबरोबर त्या अमेरिकन प्रोजेक्टवर काम करेल. ते अंतिम टप्प्यात आहे आणि आजपासून हा माझ्याबरोबर माझ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करेल. एकटा कोणते ही प्रोजेक्ट हॅन्डल करणार नाही तू संग्राम!” ती म्हणाली.

संग्राम,“ म्हणजे थोडक्यात तू माझी आजपासून बॉस होणार.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.

सुशांत,“आजपासून? अरे गेल्या चोवीस वर्षांपासून ही तुझी बॉस आहे येड्या आणि तुला हा साक्षात्कार आज झाला?” तो संग्रामची खेचत म्हणाला.

संग्राम,“ झाली माझी खेचून? जा आता तुझं काम कर आणि क्षितिजा आली की लगेच पाठवून द्या म्हणावं त्या सुषमाला!” तो म्हणाला.

सुशांत,“ हो आणि गार्गी तुझ्या लॅपटॉपमध्ये तुझ्याकडे असलेल्या प्रोजेक्टच्या डिटेल्स असतीलच बाकी नवीन प्रोजेक्टच्या डिटेल्स मी तुला मेल करतो. अभिराज आला आहे आपल्या आधीच ऑफिसमध्ये त्याला विचार संग्र्या अमेरिकन प्रोजेक्ट कुठवर आले आहे ते!” तो म्हणाला.

संग्राम,“ ठीक आहे.”

गार्गी,“ मी ही जाते बरीच कामे रखडली आहेत. उद्या तुला बाकी प्रोजेक्टबद्दल डिटेल्स देते ज्यात आपण दोघे काम करणार आहोत संग्राम!” ती म्हणाली आणि सुशांत, गार्गी निघून गेले.

अभिराजला संग्रामने बोलावून घेतले आणि त्याच्याशी चर्चा करून त्याने काम सुरू केले. साधारण बाराच्या आसपास क्षितिजा ठरल्याप्रमाणे ऑफिसमध्ये आली आणि ती संग्रामला भेटली. तिथे संग्रामने तिच्याकडून कंपनी वकिलाने तयार केलेले एग्रिमेंट साइन करून घेतले आणि तिच्या हातात जॉईनींग लेटर दिले आणि तो म्हणाला.

संग्राम,“ अभिराजकडे जा त्याला हे लेटर दाखवं.”

क्षितिजा,“ मला भीती वाटते सर!” ती आवंढा गिळत म्हणाली.

संग्राम,“ घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत क्षितिजा! तो फारफार तर चिडेल तुझ्यावर आणि माझ्यावर देखील पण त्याला तुला त्याची असिस्टंट म्हणून ठेवून घ्यावेच लागेल.” तो तिला समजावत म्हणाला आणि क्षितिजा अभिराजच्या केबीनकडे गेली. तिने नॉक केले.

अभिराज,“ एस कम इन!(तो वर पाहत म्हणाला आणि क्षितिजालासमोर पाहून भडकला.) तू इथे काय करत आहेस? तुला मी अंकलला भेटायला सांगितले होते.” तो रागाने बोलत होता. क्षितिजाने त्याच्या हातात लेटर ठेवले आणि ती म्हणाली.

क्षितिजा,“ मला संग्रामसरांनीच पाठवले आहे तुमच्याकडे!” ती खाली मान घालून म्हणाली. अभिराजने तिच्या हातातील लेटर वाचले आणि तो आणखीनच भडकला.

अभिराज,“ व्हॉट द हेल इस दॅट! तू माझी असिस्टंट? हे कधी ठरले? तुला नाही म्हणायला आले नाही का?हा म्हणा तू का नाही म्हणशील तुला तर...” तो रागाने बोलत होता आणि क्षितिजाने त्याचे बोलणे मध्येच तोडले.

क्षितिजा,“ सर उगीच माझ्यावर आरोप करू नका तुम्ही! संग्रामसरांनी मला भेटायला बोलावले होते आणि माझ्याकडून ऍग्रिमेंट साईन करून घेतले आहे तीन वर्षांचे! मी नाही म्हणू शकत नाही कारण मला नोकरीची गरज आहे माझे आई-बाबा माझ्यावर अवलंबून आहेत. संग्रामसरांनी मला तुमची असिस्टंट म्हणून नेमले त्यात माझी काय चूक आहे?” ती डोळ्यातले पाणी आडवत म्हणाली. तिच्या बोलण्याने अभिराज वरमला आणि तिला म्हणाला.

अभिराज,“ यु मे गो नाऊ!” तो म्हणाला आणि तावातावाने केबीनच्या बाहेर पडला.

तो रागातच संग्रामच्या केबिनकडे ते लेटर घेऊन निघाला होता. क्षितिजा त्याला बाहेर येऊन पाहत होती. तिने लगेच सुशांतला मेसेज केला आणि सुशांत त्याच्या केबीनमधून बाहेर आला त्याने अभिराजला पाहिले आणि विचारले.

सुशांत,“ कुठे निघालास अभी इतक्या रागात?”

अभिराज,“ अंकूकडे हे बघ डॅड त्याने क्षितिजाला माझी असिस्टंट बनवले आहे.” तो रागाने लेटर दाखवत म्हणाला.

सुशांत,“ मग काय झाले? तू माझ्या केबीनमध्ये चल!” तो इकडे तिकडे पाहत म्हणाला आणि अभिराज त्याच्या केबिनमध्ये गेला.

अभिराज,“ काय झाले म्हणून तू मला विचारत आहे डॅड? मला क्षितिजा माझ्या आयुष्यात नको आहे अगदी कोणत्या ही स्वरूपात! झालं तेवढे पुरे झाले. तिच्यामुळे आपल्या कुटूंबाने खूप काही भोगले आहे आणि अंकू मला न विचारता असा डिसीजन घेऊच कसा शकतो? मी त्याला तेच विचारायला निघालो आहे.” तो रागाने म्हणाला.

सुशांत,“ जे काही झाले त्याला एकटी क्षितिजा जबाबदार नव्हती अभी! पहिल्यांदा चूक तू केलीस आणि त्याच्यावर क्षितिजा जे वागली ती तिची रिएक्शन होती बास! आपल्या कुटुंबाला जो त्रास झाला रादर संग्रामला जो त्रास झाला त्याला तू जबाबदार आहेस क्षितिजापेक्षा जास्त कळलं तुला? आणि संग्रामला जाब विचारायला निघालास डोकं ठिकाणावर आहे का तुझं? डॉक्टरने त्याला जपायला सांगितले आहे. त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी करू नका म्हणून सांगितले आहे आणि तू तेच करायला निघालास? तू संग्रामकडे गेलास आणि याबद्दल रागात काही बोललास, संग्रामने ते मनाला लावून घेतले आणि त्याला काही झाले तर? त्याला जबाबदार कोण? तू गार्गी, आदी आणि काका-काकूंना काय उत्तर देणार आहेस? त्याची तब्बेत किती नाजूक आहे तुला चांगलच माहीत आहे तर जरा जबाबदारीने वाग! संग्रामला तू चांगलंच ओळखतोस त्याला वाटत असेल की क्षितिजाने तुझ्याबरोबर काम केले तर तुझ्यात आणि तिच्यात पुन्हा जवळीक निर्माण होईल म्हणून तो असं वागला असेल पण तू..” तो म्हणाला आणि अभिराज एकदम भानावर आल्या सारखा खुर्चीवर बसला. त्याने तिथल्या ग्लासातले पाणी पिले आणि तो म्हणाला.

अभिराज,“ अरे देवा! मी तर रागाच्या तावात हे सगळं विसरूनच गेलो होतो. अंकूची तब्बेत नाजूक आहे. बरं झालं डॅड तू मला भानावर आणलेस पण अंकूला जर वाटत असेल की क्षितिजाला माझी असिस्टंट केल्यामुळे मी आणि ती पुन्हा जवळ येऊ तर तो चुकतोय. माझा निर्णय झाला आहे. क्षितिजा कधीच माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही कारण तिच्यामुळे रादर माझ्या प्रेमामुळे अंकूने आणि आपल्या कुटुंबाने खूप काही भोगले आहे. ज्या प्रेमाने माझ्या अंकुला त्रास दिला ते प्रेम मला नको आहे. ठीक आहे अंकूच्या इच्छे खातर क्षितिजा माझी असिस्टंट म्हणून काम करू शकते पण ती माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ शकत नाही.” तो म्हणाला आणि पुन्हा त्याच्या केबिनमध्ये निघून गेला.

सुशांत मात्र त्याला जाताना पाहून गालात हसत होता.
★★★

इकडे राजवीरने त्याच्या खास शिष्याला मुंबईला पाठवले होते. संग्राम आणि गार्गीचे काय सुरू आहे ते पाहण्यासाठी आणि अशी कोणती शक्ती आहे जी त्याला संग्राम-गार्गीच्या आयुष्यात डोकावण्यापासून रोखत आहे ते जाणून घेण्यासाठी. त्याचा खास शिष्य मनोज त्याला राजवीरने काही सिद्धी शिकवल्या होत्या. त्यामुळे तो त्या शक्तीचा छडा लावू शकता होता.

मनोज आज सकाळपासूनच संग्रामच्या बंगल्या बाहेर घुटमळत होता. त्याने संग्राम आणि गार्गीला लांबून पाहिले होते आणि त्याच्याकडे असलेल्या सिद्धीमुळे त्याने संग्रामच्या हातात असलेला तो दिव्य धागा ओळखला होता.

अभिराज आता क्षितिजाशी कसा वागेल? मनोज जेंव्हा त्या धाग्याबद्दल राजवीरला सांगेल तेंव्हा राजवीर पुढचे पाऊल काय उचलेल?

©स्वामिनी चौगुले







🎭 Series Post

View all