माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ७४

राजवीरचे पुढचे पाऊल काय असेल?


भाग 74
घरी सगळे संग्राम आणि गार्गीची वाट पाहत होते. सुशांत ही लंचब्रेकनंतर ऑफिसमधून आला होता. कामाच्या गडबडीत त्याला डॉक्टरांनी गार्गीला संग्रामच्या तब्बेतीबद्दल काय सांगितले ते देखील विचारायचे राहिले होते कारण राज्ञी तर हॉस्पिटलमधुनच होस्टेलवर निघून गेली होती. सगळे हॉलमध्ये दोघांची वाट पाहत बसले होते आणि ते दोघे आले.

मनिषाताई,“ सखू लिंबू सरबत घेऊन ये दोन ग्लास!” त्या म्हणाल्या.

संग्राम आणि गार्गी येऊन सोफ्यावर बसले. दोघांचा ही चेहरा उतरलेला होता.

समिधा,“ गार्गी काय म्हणले गं महाराज?” तिने न राहवून विचारले.

गार्गी,“ तो नीच राजवीर पुन्हा कारस्थान करत आहे. आधी त्याने प्रत्यक्ष संग्रामला त्रास दिला आता अप्रत्यक्ष त्याला त्रास द्यायचा आहे. आमच्या भूतकाळातील ती व्यक्ती राजवीरच आहे त्याच्यापासून संग्रामला धोका आहे.” ती रागाने म्हणाली.

संजयराव,“ गार्गी अगं काही तरी कळेल असे बोल! उगीच आमचा जीव टांगणीला नको लाऊस!” ते काळजीने म्हणाले.

संग्राम,“ मी सांगतो सगळं बाबा! गार्गी एक साधारण स्त्री नसून ती भाग्यलक्ष्मी आहे. ज्याच्या आयुष्यात जाणार त्याचे आयुष्य संमृद्ध होणार पण नियतीने तिच्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून दिले आणि राजवीर व माझ्यासाठी भाग्य बदलण्याची संधी! पूर्वसंचितानुसार गार्गीला प्राप्त करण्याची पहिली संधी त्याला मिळाली पण त्याने ती गमावली आणि गार्गी माझ्या आयुष्यात आली. पण राजवीरला वाटते की मी त्याच्याकडून गार्गीला हिरावून घेतले आहे. त्याचा माझ्यावर राग आहे. त्याने तपश्चर्या करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत आणि त्याला आता गार्गी आणि माझा पिच्छा पुढच्या जन्मात करायचा आहे. त्याला गार्गी हवी आहे पुढच्या जन्मी म्हणून त्याने माझ्याशी हस्तांदोलन करून माझ्या हाताची प्रतिकृती तयार केली त्या व्दारे तो आम्हाला पाहू शकतो जेणे करून आम्ही ज्यावेळी मरु त्यावेळी तो ही मृत्यूला कवटाळेल आणि त्याच्या सिद्धी सहित पुन्हा जन्म घेईल. ” त्याने थोडक्यात सगळे सांगितले.

सुशांत,“ काय? तो राजवीर या थराला पोहोचला? पण संग्राम याच्यावर काही उपाय असेलच ना?” त्याने विचारले.

गार्गी,“ हो आहे. आत्ता महाराजांनी मंत्रीत धागा माझ्याकडून संग्रामच्या हातात बांधून घेतला आहे त्यामुळे आता राजवीर आम्हाला पाहू शकणार नाही आणि आठ दिवसांनी प्रदोष असेल त्या दिवशी अनुष्ठान करून रुद्राक्ष एकदा संग्रामच्या हातात बांधले की राजवीरचे काहीच चालणार नाही.” ती म्हणाली.

मनिषाताई,“ आधीच त्या राजवीरने माझ्या चिनूला कमी त्रास दिला आहे का? त्याचा जीव माझ्या चिनूने वाचवून देखील त्याच्या मनात माझ्या लेकराबद्दल द्वेष आहे. आता तर त्याने सिद्धी प्राप्त केल्या आहेत म्हणे मग आता तर तो माझ्या चिनूला काही ही करू शकतो की!” त्या रडत बोलत होत्या.

संग्राम,“ आई अगं रडू नकोस. काही होणार नाही मला कारण मी त्याचा जीव वाचवून त्याच्यावर उपकार केले आहेत. त्याला माझा आणि गार्गीचा पिच्छा पुढच्या जन्मी करायचा आहे म्हणून तो हे सगळं करत आहे. पण आपण महाराजांनी सांगितलेला उपाय केला की त्याचा आपल्याशी संबंध नाही राहणार काही!” तो त्यांच्याजवळ जाऊन त्यांना समजावत म्हणाला.

गार्गी,“ संग्राम बरोबर बोलतोय आई तुम्ही शांत व्हा बरं!” तिने दुजोरा दिला.

संग्राम,“ गार्गी मी वर जातो. आराम करतो जरा!” तो म्हणाला.

गार्गी,“ बरं जा तू.” ती म्हणाली आणि संग्राम निघून गेला.

सुशांत,“ बरं झालं हा गेला. गार्गी काल डॉक्टर काय म्हणाले याच्या तब्बेतीबद्दल?” त्याने विचारले.

गार्गी,“तो आता स्टेबल आहे आणि आपण त्याला स्टेबल ठेवण्यासाठीच प्रयत्न करायचा. तो ऑफिसला गेला तरी चालेल फक्त जास्त ट्रेस नको.” ती म्हणाली आणि बाकी नंतर सांगते असे तिने सुशांतला खुणावले.

मनीषाताई,“ गार्गी मला चिनूची खूप काळजी वाटतेय. माझ्या लेकराने कोणाच्या पाचोळ्यावर देखील कधी पाय दिला नाही आणि हा राजवीर माझ्या लेकराच्या हात धुवून मागे लागला आहे. आता तर तो अघोरी विद्या शिकला आहे. चिनू म्हणाला उपकार वगैरे पण अशा लोकांची मती कधी ही फिरू शकते.” त्या काळजीने बोलत होत्या.

गार्गी,“ आई मी आहे ना तुम्ही नका काळजी करू. मी महाराजांना त्याबद्दल विचारणार आहे. ते जो काही उपाय सांगितलं तो आपण करू.” ती म्हणाली.

मनिषाताई,“ठीक आहे. तू आहेस म्हणून मला आधार आहे गार्गी.” त्या म्हणाल्या.

संजयराव,“ हो ना! आमच्या म्हाताऱ्याचा तोच तर एकमेव आधार आहे. त्याच्याच भोवती आमचे आयुष्य फिरते. आमच्या चितेला अग्नी देणारा तोच तर आहे. आमच्या आधी जर त्याला काही झालं तर ते दुःख आम्ही सहन नाही करू शकणार!” ते डोळ्यात पाणी आणून बोलत होते.

सुशांत,“ काका अहो असं अभद्र कशाला बोलताय. संग्रामला काही नाही होणार आणि तुम्हाला तर अजून आदीचे लग्न त्याची मुले पहायची आहेत. उगीच काही तरी भलता विचार नका करू.” तो त्यांना समजावत म्हणाला.

गार्गी,“ बरोबर बोलतोय सुशांत बाबा आणि तुमच्या लेकाने हे बोलणे ऐकलं तर त्याला कसं वाटेल? तुम्ही निश्चिंत राहा संग्राम त्याच्या वयाच्या एक्काहत्तर वर्षापर्यंत जगणार आहे विश्वास ठेवा माझ्यावर! बरं दुपार टळत आली जा तुम्ही आराम करा. सुशांत तू आणि समिधा ही आराम करा जरा. मी ही जाते.” ती म्हणाली.

गार्गी रूममध्ये गेली तर संग्राम गॅलरीत खुर्चीवर बसला होता. त्याची नजर शून्यात होती. गार्गी आलेली ही त्याला कळले नाही. गार्गी त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर तिने हात ठेवला आणि संग्राम भानावर आला.

गार्गी,“ तू झोपायचं सोडून इथं काय करत आहेस? आणि कसल्या एवढ्या विचारात गढला होतास?” तिने त्याचा हात धरून विचारले.

संग्राम,“ गार्गी मी कधीच कोणाकडून काही हिरावून घेतले नाही. राजवीरकडून तुला हिरावून घ्यायला तू काय वस्तू आहेस का? माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर ही मी तुझ्यावर आजतागायत कधी बंधने नाही लादली. हा आता मात्र तुझ्याशिवाय मी एक ही श्वास नाही घेऊ शकत. तू माझी गरज आहेस आणि मला तू माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहेस. मी तुझ्यावर हक्क गाजवतो पण तुझ्या मर्जीने ….” तो पुढे बोलणार तर गार्गीने त्याच्या ओठावर हात ठेवला आणि ती बोलू लागली.

गार्गी,“ आता हे तू मला सांगणार का? की तू कसा आहेस? मी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते संग्राम! आणि हे स्पष्टीकरण तू कोणाला देत आहेस? आणि तुला मी किती वेळा सांगितलं आहे निर्वाणीची भाषा नाही करायची म्हणून! मी तुझी आहे संग्राम फक्त याच जन्मी नाही तर पुढचे अनेक जन्म आणि तू फक्त माझा आहेस कळलं तुला! राहिला प्रश्न हक्क गाजवण्याचा तर माझे तन, मन आणि माझा आत्मा देखील फक्त आणि फक्त तुझा आहे. त्या मूर्ख राजवीरच काय मनावर घेऊन बसलास? त्याने जे काही गमावले ते त्याच्या कर्माने गमावले. काही लोकांना स्वतःच्या चुका कधीच मान्य करायच्या नसतात म्हणून ते स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतात, राजवीर त्यातलाच एक आहे. आणि पुढचा जन्मच काय पुढचे सात जन्म मी त्याला मिळणार नाही कारण माझा आत्मा तुझ्यात केंव्हाच एकरूप झाला आहे. तू आणि मी वेगळे राहिले आहोत का? यु आर माय सोल!” ती त्याचा चेहऱ्याला हात लावून त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.

संग्राम,“ तरी ही माझ्यामुळे राजवीर संसारिक सुखापासून, प्रेमापासून वंचित राहिला त्याचे वाईट वाटत आहे मला! मी तुझ्याबरोबर खूप सुंदर आयुष्य जगलो गार्गी तुझे उत्कट प्रेम मला मिळाले आणि माझे आयुष्यच बदलून गेले. सचित्तानंद महाराज म्हणले तसं तू खरंच साधारण स्त्री नाहीस तू भाग्यलक्ष्मी आहेस. मी जो काही आहे तो फक्त तुझ्यामुळे! माझ्यातुन तुला वजा केले तर बाकी शून्य उरते. पण राजवीर आयुष्यातील सगळ्या सुखांना मुकला त्याचे वाईट वाटते मला!” तो म्हणाला.

गार्गी,“ तुला त्या राजवीरने आधी ही इतका त्रास दिला. त्याने पहिल्यापासून तुझा फक्त आणि फक्त तिरस्कार केला. तरी तू त्याचा जीव वाचवला एवढं होऊन ही तो नीच माणूस तुझ्या सुखावर टपला आहे. तुला राग येत नाही का त्याचा?” तिने विचारले.
© स्वामिनी चौगुले




























🎭 Series Post

View all