माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ७३

पुढे काय होणार होते?राजवीर जिंकेल की गार्गी संग्रामचे प्रेम?


भाग 73
थोडावेळ शांततेत गेला आणि सचित्तानंद महाराजांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

सचित्तानंद महाराज,“ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ताई तुम्हाला! हो संग्रामदादांनी राजवीरशी त्यांच्याही नकळत हस्तांदोलन केले आणि राजवीर त्याचा आता फायदा घेत आहे पण आपल्याला समस्या सोडवण्याच्या आधी त्या समस्येचा उगम कुठून झाला ते जाणून घ्यावे लागेल. मी आत्ताच म्हणाल्याप्रमाणे आपण म्हणत असतो की नियती, प्रारब्ध कोणाला चुकले आहे पण नियती आपल्याला संधी देत असते. आपले कर्म योग्यरित्या करून आपले नशीब बदलण्याची जो ती संधी ओळखून त्याचे सोने करतो. तो स्वतःचे नशीब बदलतो संग्रामदादा सारखं आणि जो ती संधी न ओळखता ती धुडकावून लावतो तो रसातळाला जातो राजवीर सारखं!” ते म्हणाले.

संग्राम,“ मी कोणत्या संधीचे सोने केले?” त्याने आश्चर्याने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ तुमच्या सुविद्य पत्नी गार्गी संग्राम सरनाईक या कोणी साधारण स्त्री नाहीत त्या भाग्यलक्ष्मी आहेत. अशी स्त्री जी ज्याच्या आयुष्यात जाईल किंवा ज्याला तिच्या प्रेमासाठी निवडेल त्या व्यक्तीचे प्रारब्ध बदलेल. पण नियतीने किंवा त्या विधात्याने इथेच खरी मेख मारून ठेवली होती. गार्गीताईसाठी दोन पर्याय उपब्ध करून दिले होते आणि राजवीर आणि तुमच्यासाठी एक संधी! तुमचे भाग्य बदलण्याची! आणि पूर्व संचितानुसार गार्गीताईना मिळवण्याची आणि स्वतःचे नशीब बदलण्याची पहिली संधी राजवीरला मिळाली पण दैव देतं आणि कर्म नेतं या उक्तीप्रमाणे राजवीरने स्वतःच्या कर्माने ती गमावली. मग ती संधी संग्रामदादाकडे आली. त्यांचे तुमच्यावर निरपेक्ष प्रेम होते म्हणूनच तर त्यांनी लग्नाआधी तुमच्या सगळ्या अटी मान्य करून तुमच्याशी लग्न केले आणि स्वतःच्या कर्माने स्वतःचे भाग्य घडवले. तुम्हाला कुंडली पाहून लग्नाआधीच सांगण्यात आले होते ना की लग्नानंतर संग्रामदादांसाठी एक वर्ष खूप कठीण आहे आणि त्यांच्यावर जीवघेणे संकट येईल. तुमच्या आईच्या आणि माझ्या गुरूंनी देखील घरी येऊन हेच सांगितले होते ना की संग्रामदादांवर मृत्यूचे सावट आहे पण गार्गीताईच्या पवित्र आणि उत्कट प्रेमामुळे ते टळले मी बरोबर बोलतोय ना?” त्यांनी विचारले.

गार्गी,“ हो पण त्या सगळ्याचा इथे काय संबंध?” तिने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ संबंध आहे कारण संग्रामदादांचा त्यांच्या वयाच्या एकतीसाव्या वर्षी अपमृत्यू होता. त्यांना गोळी लागली होती पण गार्गीताई तुमचे भाग्य त्यांच्या भाग्याशी सोडले गेले आणि त्यांचा अपमृत्यू टळला. त्यांचे आयुर्मान वाढले. एवढेच कशाला संग्रामदादांचा दुसरा मृत्यूयोग आत्ताच येऊन गेला आणि तुम्ही दोघांनी पुन्हा मृत्यूला चकवा दिला आहे.” ते म्हणाले.

संग्राम,“ पण माझा अपमृत्यू होता हे तुमच्या गुरूंनी तेंव्हाच का नाही सांगितले? उलट त्यांनी मी माझ्या आई-वडिलांचे नाव काढेन असे सांगितले होते.” त्याने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ कारण त्यांना माहीत होतं तुमच्या कर्माने तुम्ही तुमची भाग्यलक्ष्मी प्राप्त कराल आणि त्या सावलीसारख्या कायम तुमच्याबरोबर राहतील.” ते म्हणाले.

गार्गी,“ पण राजवीरचे काय? आणि तो महाराज बनून फिरत आहे त्याचे काय? त्याला आता आमच्याकडून काय हवे आणि संग्रामशी हस्तांदोलन करून त्याने काय केले आहे?” तिने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ राजवीर मोरेचा पंचवीस वर्षांपूर्वी संग्रामदादांनी जीव वाचवला आणि ते माफी मागायला आले होते बरोबर?(गार्गीने होकारार्थी मान हलवली.) पण तुम्ही त्यांना अपमानित केले. एक तर ज्या व्यक्तीचा त्यांनी आयुष्यभर द्वेष केला ज्याला शत्रू मानले त्या व्यक्तीने त्यांचा जीव वाचवला आणि वरून तुम्ही त्यांचा अपमान केला त्यामुळे ते उद्विग्न झाले ते भटकत भटकत नाशिकला पोहोचले तिथे ते आत्महत्या करण्यासाठी गोदावरीत उडी मारणार तर त्यांना एका अघोरी साधूने वाचवले. त्यांच्याबद्दल सगळे सांगितले अगदी गार्गीताई तुम्ही त्यांच्या भाग्यलक्ष्मी होतात हे देखील! आणि राजवीरनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. पंचवीस वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि अनेक सिद्धी प्राप्त केल्या त्यातून पुण्यसंचय वाढवयासाठी लोकांचे भले केले.” ते म्हणाले.

संग्राम,“ मग आता त्याला माझ्याकडून काय हवे आहे?” त्याने विचारले.

सचित्तानंद,“ तामसिक भक्ती आणि तपश्चर्या करणाऱ्या लोकांची एक कमजोरी असते ती म्हणजे जर त्यांना एखाद्या व्यक्तीने पाणी जरी दिले तरी त्याचा उपकार त्यांच्यावर राहतो आणि ते त्याच्या उपकाराच्या बंधनात बांधले जातात मग संग्रामदादा तुम्ही तर राजवीरला जीवनदान दिले होते. ते या जन्मात तुमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत कारण त्यांनी तसे केले तर त्यांच्या सिद्धी लुप्त होतील पण ते दुसऱ्याकडून ते काम करून घेऊ शकतात पण राजवीर असं काही करतील असं वाटत नाही मला!” ते म्हणाले.

गार्गी,“ त्याला संग्रामला इजा पोहोचवायची नाही तर मग तो आमच्या आयुष्यात आला का आहे? आणि त्याने संग्रामशी हस्तांदोलन करून काय केले किंवा त्याला काय साध्य करायचे आहे? बरं पण जे झाले ते झाले आता त्याला या सगळ्यातून काय साध्य होणार आहे?” तिने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ राजवीरना असे वाटते की संग्रामदादांनी त्यांचे भाग्य त्यांचे प्रेम त्यांच्यापासून हिरावून घेतले आहे. एकदा नाही दोन वेळा! पण सत्य तर हे आहे की त्यांनी त्यांचे भाग्य त्यांच्या कर्माने घालवले आहे आणि संग्रामदादांनी ते त्यांच्या प्रेमाने आणि सत्कर्माने प्राप्त केले आहे. त्यांचा संग्रामदादांवर राग आहे पहिल्यापासून त्यांनी संग्रामदादांचा द्वेष केला आणि करतात. द्वेष करणारी माणसे स्वतःचे नुकसान तर करून घेतातच पण ते दुसऱ्याचे ही नुकसान करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यांनी संग्रामदादांशी हात मिळवला आणि त्यांच्या विद्येतून त्यांनी संग्रामदादांच्या हाताची प्रतिकृती बनवली आहे. तुमच्या दोघांवर लक्ष ठेवायला. ते त्या हाताच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून तुम्हाला पाहिजे तेंव्हा पाहिजे तसे पाहू शकतात.” ते म्हणाले आणि गार्गी तर उडालीच!

गार्गी,“ काय? पण त्याला आमच्यावर नजर का ठेवायची आहे आणि तो संग्रामला इजा तर पोहोचवणार नाही ना? आणि त्या देवदूताने मला सांगितले होते की जर संग्रामने त्याच्याशी हस्तांदोलन केले तर त्याला पुढच्या जन्मी आमंत्रण दिल्यासारखे होईल. ते काय आहे?” तिने विचारले.

सचित्तानंद,“ राजवीर संग्रामदादांना इजा नाही पोहोचवणार कारण त्यात त्यांचा काहीच फायदा नाही. तसेच ते चांगलं जाणून आहेत की तुम्ही जोपर्यंत संग्रामदादांबरोबर आहात तोपर्यंत त्यांचं कोणीच वाकडं करू शकत नाहीत. ते हे सगळं करत आहेत पुढच्या जन्मासाठी!” ते म्हणाले.

संग्राम,“ पुढच्या जन्मासाठी म्हणजे?” त्याने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ हो पुढच्या जन्मासाठी! कारण तुमच्यासारखी एकमेकांवर उत्कट प्रेम करणारी जोडी हजारोवर्षातुन जन्माला येते ज्यात स्त्रीचे भाग्य पुरुषाचे भाग्य असते. त्याला पूर्ण करत असते अगदी अर्धनारीनटेश्वरासारखे तिथे पुरुष आणि प्रकृतीचे मिलन होते आणि जगासमोर प्रेमाचे उदाहरण प्रस्थापित होते अगदी शिवशक्ती सारखं! आणि ही जोडी पुढचे अनेक जन्म एकमेकांसाठी जन्म घेत राहते. संसार सुखाचा आनंद तर घेतेच पण समाजाचे भले देखील करते जे तुम्ही दोघे तुमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आज ही करत आहात. या जन्मी राजवीर चुकले आता ते मनात आणून ही काहीच करू शकत नाहीत म्हणून त्यांना पुढच्या जन्मात तुमचा पिच्छा करायचा आहे आणि गार्गीताईंना प्राप्त करायचे आहे. या सगळ्यात त्यांना संग्रामदादांच्या हाताच्या प्रतिकृतीचा उपयोग होणार आहे कारण ते तुमच्यावर नजर ठेवून तुमच्या मृत्यूबरोबर स्वतः मृत्यूला प्राप्त होतील आणि त्यांनी या जन्मात प्राप्त केलेल्या सिद्धी ते पुढच्या जन्मात देखील घेऊन जाऊ शकतील म्हणून त्यांनी हा खटाटोप केला आहे.” ते म्हणाले.

गार्गी,“ याच्यावर काही उपाय आहे का?” तिने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ हो आहे पण तो उपाय करण्यासाठी आपल्याला प्रदोष असेल त्या दिवशीची वाट पहावी लागेल. प्रदोष म्हणजेच त्रियोदशी मुहूर्त महिन्यातून दोन वेळा येतो. एक प्रदोष होऊन गेला आहे आता दुसरा प्रदोष आठ दिवसांनंतर आहे गार्गीताई तुम्ही आठ दिवसांनंतर येणारा प्रदोषव्रत करायचे आपण त्या दिवशी एक अनुष्ठान करू आणि सिद्ध केलेल्या धाग्यात सिद्ध केलेले रुद्राक्ष ओवून तुमच्या हातून ते संग्रामदादांच्या उजव्या हातात बांधायचे. ज्या हाताची प्रतिकृती राजवीरनी बनवली आहे. त्यामुळे राजवीर तुम्हाला पाहू शकणार नाही आणि तुमच्या दोघांचा मृत्यू जेंव्हा होईल तेंव्हा मृत्यूला प्राप्त करू शकणार नाही आणि तो पुढच्या जन्मी तुमच्या मागे ही येऊ शकणार नाही.” ते म्हणाले.

गार्गी,“ पण तो जर आम्हाला पाहू शकतो तर तो आपल्याला आत्ता पाहत नसेल कशावरून?” तिने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ ते तामसिक शक्तीचे उपासक आहेत त्यांची शक्ती या खोलीपर्यंत पोहोचू शकत नाही.” ते हसून म्हणाले.

संग्राम,“ पण इथून बाहेर पडल्यावर पुढचे आठ दिवस तो आम्हा दोघांना पाहू आणि ऐकू शकतो ना मग त्याला या अनुष्ठानाबद्दल माहीत होईल तर तो ते त्याची शक्तीपणाला लावून अनुष्ठान पूर्ण होऊ देणार नाही त्याचे काय?” त्याने विचारले.

सचित्तानंद महाराज,“ त्याचा ही उपाय आहे माझ्याकडे जोपर्यंत आपण तुमच्या हातात रुद्राक्ष माळ घालत नाही तोपर्यंत हा मी मंत्रांनी सिद्ध केलेला धागा आहे. गार्गीताई हा धागा महादेवाचे स्मरण करून संग्रामदादांच्या हातात बांधा.” ते म्हणाले आणि गार्गीने प्रार्थना करू संग्रामच्या हातात तो धागा बांधला.

इकडे राजवीर ही रोसॉर्ट सोडून त्याच्या आश्रमात निघून गेला होता आणि गेल्या तीन तासांपासून तो गार्गी आणि संग्रामला पाहण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते दिसत नव्हते.

“आशा कोणत्या ठिकाणी लपून बसलास संग्राम की माझी शक्ती तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. असो कितीवेळ माझ्यापासून लपून राहशील मी पण पाहतो?” तो रागाने म्हणाला.

पुढे काय घडणार होते? राजवीर जिंकेल की गार्गी-संग्रामचे प्रेम!
©स्वामिनी चौगुले

ही कथा काल्पनिक असून या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि धार्मिक बाबींना ठेस पोहोचवण्याचा उद्देश लेखिकेचा नाही. बाकी लेखिकेने लिहलेला मजकूर हा तिने केलेल्या अभ्यासावर आणि कल्पनेवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all