माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ६४

ज्या भूतकाळातील व्यक्तीबद्दल गार्गीला मंदिरात भेटलेल्या तेजस्वी व्यक्तीने सांगितले होते ती व्यक्ती राजवीरच होती का?


भाग 64
गार्गी आणि संग्राम फ्लाईटने कोईमतूरला दोन तासात पोहोचले आणि तिथून टॅक्सीने तीन तासात ते उटीमधील रिसॉर्टमध्ये पोहोचले होते. एकूण पाच तासांचा प्रवास झाला होता. त्यामुळे संग्राम थकला होता. गार्गीने संग्रामला नाष्टा करवला आणि त्याला झोपवले. तिने रूमच्या गॅलरीत जाऊन मनिषाताईंना आठ वाजता फोन केला.

गार्गी,“ आई आम्ही पोहोचलो उटीमध्ये सात वाजता.” ती म्हणाली.

मनिषाताई,“ बरं झालं. मी तुझ्याच फोनची वाट पाहत होते गार्गी! चिनू ठीक आहे ना?” त्यांनी काळजीने विचारले.

गार्गी,“ पाच तासांच्या प्रवासामुळे तो चांगलाच थकला होता म्हणून त्याला खायला घालून झोपले आहे मी! तो उठला की मी पुन्हा फोन करेन. बाबांना आणि समिधाला सांगा. सुशांत ऑफिसमध्ये असेल मी त्याला फोन करून सांगते.” ती म्हणाली.

मनिषाताई,“ काळजी घे चिनूची आणि स्वतःची ही!” त्या म्हणाल्या आणि गार्गीने फोन ठेवला.
★★★

दोन दिवस तर गार्गीने संग्रामला जास्त कुठे फिरू दिले नाही. रिसॉर्ट आणि तिथले गार्डन या व्यतिरिक्त दोघे कोठेच गेले नव्हते. संग्राम मात्र आता बोअर झाला होता.

संग्राम,“काय आहे गार्गी? या रिसॉर्टच्या रूममध्ये बसून मला कंटाळा आला आहे. दोन दिवस झाले आपण इथेच आहोत तू कुठे फिरायला जायला नको म्हणतेस. एक तर माझा मोबाईल मला तू दिला नाहीस. आपण कशासाठी आलो आहोत इथे! असंच पुढचे आठ दिवस घालवायचे असतील तर तू रहा इथे मी जातो मुंबईला परत!” तो चिडून बोलत होता.

गार्गी,“ आपण इथे हवापालटासाठी आलो आहोत संग्राम फिरायला नाही आणि तू आजारी आहेस हे विसरलास का? आणि मी बरोबर असताना तुला बोअर होतंय?” ती हसून त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.

संग्राम,“ लाडात येऊ नकोस आ गार्गी उगीच!” तो चिडून म्हणाला आणि गॅलरीत जाऊन उभा राहिला.

गार्गी,“ बरं उद्या आपण फिरायला जाऊ पण इथेच जवळपास जास्ती दगदग करायची नाही.” ती त्याचा हात हातात घेत म्हणाली.

संग्राम,“ बरं! फोन दे तुझा अभीला फोन करतो.” तो म्हणाला त्याने अभिराजला फोन केला आणि त्याच्याशी बोलून फोन ठेवला.

गार्गी,“ त्या क्षितिजाचा एक काहीच पत्ता नाही. तिचा फोन पण नाही लागत. मला तर ना अभीच्या नशिबात काय लिहले आहे तेच कळत नाही. अभीचे मनापासून प्रेम आहे त्या पोरीवर पण एका चुकीची शिक्षा आणखीन किती दिवस ती पोरगी देणार आहे याला काय माहीत?” ती काळजीने बोलत होती.

संग्राम,“ अभी कोणत्या मनःस्थितीतुन जात आहे मी समजू शकतो. मी गेलो आहे त्या मनःस्थितीतुन आपण कोणावर तरी मनापासून प्रेम करावे आणि त्याबदल्यात आपल्याला तेच प्रेम नाही मिळाले तर खूप वाईट वाटते गार्गी! माणूस आतून पोखरला जातो. तरी माझा तर गैरसमज झाला होता तुझ्या बाबतीत पण या क्षितिजाचे काही कळायला मार्गच नाही. सुशा म्हणत होता की तिची दोन महिन्यांची रजा या आठवड्यात संपणार आहे तिने आपल्या पुणे ब्रँचमध्ये रिजॉईन केले तर आपल्याला काही तरी समजेल.” तो गंभीरपणे बोलत होता.

गार्गी,“ हो ना! बरं चल बाहेर दिवस मावळत आहे किती छान वातावरण झाले आहे.” ती म्हणाली.

संग्राम,“ छान नाही रोमँटिक वातावरण झाले आहे. कशाला बाहेर जायचे थांब इथेच!” तो तिलाजवळ ओढत म्हणाला.

गार्गी,“ हे बरं आहे तुझं आत्ता तर बाहेर घेऊन जात नाही म्हणून मला भांडत होता आणि आता बाहेर चल म्हणलं तर इथेच थांब म्हणे! चल बाहेर आता लवकर.” ती हसून त्याला बाहेर नेत म्हणाली.
★★★

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गार्गी आणि संग्राम दुपारून फिरायला निघाले. त्यांच्या रिसॉर्टपासून जवळच असलेल्या दोडाबेट्टा पॉईंट दोघे पाहून आले. पाचच्या दरम्यान ते रिसॉर्टमध्ये आले तर तिथे फुलांच्या पायघड्या घालून कोणाच्या तरी स्वागताची तयारी करत होते. संग्रामने तिथे उपस्थित असलेल्या एका स्टाफला विचारले.

संग्राम,“ कौन आलेवाला है? इतनी तैयारी की जा रही है?” त्याने उत्सुकते पोटी विचारले.

स्टाफ,“ सर! आज हमारे रिसॉर्टके मालिक के गुरू राजेश्वर महाराज आनेवाले है। उन्ही के स्वागत की तैयारी हो रही है! उनकी ही कृपा से हमारे मालिक का घाटे में चल रहा बिज़नेस अब जोरोसे शुरू है।” तो म्हणाला.

संग्राम,“अच्छा!” तो म्हणाला

गार्गी,“ बाप रे असे पण काही असते का संग्राम?”

संग्राम,“ असेल ही तू आणि आई नाही का तिच्या गुरुवर विश्वास ठेवत. आता ते नाहीत तर त्यांचे शिष्य सचित्तानंद महाराजांवर विश्वास ठेवता.” तो म्हणाला.

गार्गी,“ ती गोष्ट वेगळी ही गोष्ट वेगळी! बरं चला आता झालं ना फिरून.” तो म्हणाला.

दोघे रूममध्ये गेले आणि रात्री आठ वाजता एकच गलका ऐकू येऊ लागला.

“ राजेश्वर महाराज की जय!”

संग्रामने उत्सुकते पोटी बाहेर येऊन पाहिले तर रिसॉर्टचा मालक कोणा तरी भगवी कफनी घातलेल्या व्यक्तीचे पाय धुत होता. गर्दी असल्याने त्याला ती व्यक्ती नीट दिसली नाही. दुसऱ्या दिवशी ही त्या महाराजाच्या दिमतीला अर्धा स्टाफ लावला होता. त्या महाराजाची राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गार्गी आणि संग्राम आज खरेदी करायला म्हणून बाहेर पडले. गार्गीने रूमची की मॅनेजरला दिली आणि ती म्हणाली.

गार्गी,“हमारे आने तक रूम अच्छे से साफ करवा के रखिए। मेरे हज्बंड की तबियत ठीक नही है। तो हाइजीन का थोड़ा ज्यादा ध्यान रखिए।”तिने सूचना केली

मैनेजर,“ जी मॅडम आप चिंता मत किजिए। वैसे सबसे बड़ा स्वीट और सबसे सुंदर व्ह्यूववाला स्वीट तो आपने बुक किया है। सच कहें तो वो स्वीट हमारे मालिक को उनके गुरु के लिए चहिए था। लेकिन ओ अचानक आ गए उससे पहले आपने स्वीट बुक कर लिया था।” तो म्हणाला

गार्गी,“ अच्छा! ये तो बड़ी दिलचस्प बात पता चली। हम निकलते है।” गार्गी हसून म्हणाली.

दोघे बाहेर पडले ते संध्याकाळी रिसोर्टवर आले.

गार्गी,“ तू पुढे लिफ्टजवळ जा. मी रूमची की घेऊन येते संग्राम!” ती म्हणाली आणि संग्राम लिफ्टजवळ गार्गीची वाट पाहत थांबला होता.

तर त्याला मागून कोणी तरी हाक मारत होते.

“ संग्राम sss संग्राम sss!”

त्याने इथे मला कोण ओळखत असेल म्हणून आश्चर्याने मागे फिरून पाहिले तर त्याच्या दिशेने दाढी वाढवलेला. अंगात भगवी कफनी, कपाळावर विभूती लावलेला त्या रिसॉर्टच्या मालकाचा गुरू येत होता. संग्रामला आणखीनच आश्चर्य वाटत होते की हा आपल्याला कसा ओळखतो. कारण संग्रामला तो ओळखू येत नव्हता. तो महाराज त्याच्याजवळ आला आणि त्याच्यासमोर उजवा हात करत तो शांतपणे म्हणाला.

“संग्राम मला ओळखले नाहीस?” न कळतपणे संग्रामचा ही हात पुढे गेला.

संग्राम,“ कोण आपण आणि मला कसे ओळखता?”त्याने विचारले.

“ मी राजवीर मोरे म्हणजे आता राजेश्वर महाराज!” तो शांतपणे म्हणाला आणि संग्राम ओरडला.

संग्राम,“ राजवीर तू? आणि या अवस्थेत?” तोपर्यंत तिकडून गार्गी आली. तिने संग्रामचा हात त्याच्या हातातून काढून घेतला. तिने राजवीरला ओळखले होते.

गार्गी,“ संग्राम चल इथून!” ती रागाने म्हणाली.

राजवीर,“ गार्गी तू मला अजून ही माफ केले नाहीस? किती वर्षे लोटली त्या सगळ्याला! असो मी राग, लोभ या सगळ्यापलीकडे गेलो आहे.” तो शांतपणे म्हणाला.

गार्गी,“ ही तुझी नाटकं तुझ्याजवळ ठेव. तू सगळ्या जगाला फसवू शकतोस पण मला नाही राजवीर!” ती म्हणाली आणि संग्रामला तिने जवळ-जवळ ओढतच लिफ्टमध्ये नेले.

त्यांच्या मागे एक वेटर शॉपिंगच्या बॅगा घेऊन आला. गार्गीने त्याला बॅगा टेबलवर ठेवायला लावल्या आणि ती दार लावून संग्रामकडे वळली.

गार्गी,“ संग्राम तुला सांगितले होते ना मी की आपल्या भूतकाळातील कोणी तुला भेटले तर त्याच्याशी हस्तांदोलन करायचे नाही!” ती रागाने त्याच्यावर जवळ -जवळ ओरडली.


ज्या भूतकाळातील व्यक्तीबद्दल गार्गीला मंदिरात भेटलेल्या तेजस्वी व्यक्तीने सांगितले होते ती व्यक्ती राजवीरच होती का? पण राजवीर अशा अवतारात कसा?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all