माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ५४बोनस पार्ट

डॉक्टरने गार्गीला भेटायला का बोलावले असेल?


भाग 54
ते सगळे संग्रामला घेऊन दहा वाजता हॉस्पिटलमध्ये आले होते आणि आता बारा वाजले होते. तब्बल दोन तासांनी इमर्जन्सी रूमचे दार उघडले आणि डॉक्टर तसेच राज्ञी देखील बाहेर आली. डॉक्टरांना पाहून सगळे त्यांच्याजवळ गेले.

सुशांत,“ कसा आहे संग्राम आता डॉक्टर? आणि त्याला काय झाले आहे?” त्याने काळजीने विचारले.

डॉक्टर,“ त्यांना सिव्हीअर स्ट्रोक आला आहे. खूप जास्त प्रमाणात बी. पी लो झाल्यामुळे! तुम्ही त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात आणि आपण उपचार सुरू केले. जर तुम्हाला यायला एक मिनिट जरी उशीर झाला असता तरी आपण काहीच करू शकलो नसतो.” ते म्हणाले.

गार्गी,“ पण अचानक इतका कसा बी.पी लो झाला त्याचा? म्हणजे त्याला आधी काहीच त्रास नाही झाला डॉक्टर!” तिने विचारले.

डॉक्टर,“ असं तुम्हाला वाटतं मिसेस सरनाईक पण शरीर आपल्याला आधीच अशा गोष्टींचे संकेत देत असतं पण त्याकडे मिस्टर सारनाईकांनी दुर्लक्ष केले आहे कदाचित!त्यांनी टेन्शन घेतलं आहे कोणत्या तरी गोष्टीचे त्यात त्यांनी खूप धावपळ केलेली दिसतेय. लांब पल्ल्याचा प्रवास ही या सगळ्याचा परिणाम आहे हा!”

अभिराज,“ हो अंकू आजच पहाटे अमेरिकेवरून आला आहे.”

ते सगळे बोलत होते आणि सिक्युरिटी गार्ड एका माणसाला घेऊन आला तो माणूस म्हणजेच संग्रामचा ड्रायव्हर तुकाराम होता.

गार्ड,“ हा माणूस किती वेळ झालं व्ही. व्ही. आय. पी. सेक्शनमध्ये म्हणजेच इथं येण्यासाठी हुज्जत घालतोय. मॅडम तुम्ही याला ओळखता का?” त्याने गार्गीकडे पाहून विचारले.

गार्गी,“ हो हा ड्रायव्हर आहे आमचा! तुम्ही जा! तुकाराम तुम्ही इथं काय करताय?” तिने विचारले.

तुकाराम,“ सायेब कशे आहेत मॅडम मला रामू कडून कळलं आणि मला चैनच पडणा बगा. माझबी जरा चुकलंच. सायबसनी पाहट इमान तळावर चक्कर आली व्हती मीच त्यांना धरलं नाही तर पडलं असतं ते! मी ईचारल बी की हॉस्पिटलात जाऊ या का? तुमसनी बोलावू का? तर मला म्हणले की काही गरज नाय! आणि मॅडम काय सांगू नगं!मॅडम तुमसनी मी गुपचूप फोन करून सांगाया पायजे व्हतं.” तो अपराधीपणे बोलत होता.

डॉक्टर,“ मी म्हणालो होतो ना की त्यांना शरीराने काही तरी संकेत दिला असेल पण त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना पहाटेच हॉस्पिटलमध्ये आणले असते तर ते क्रिटिकल झाले नसते. कारण ते शुद्धीत होते आणि पुढचं नुकसान टाळता आले असते.” ते गंभीरपणे म्हणाले.

आदिराज,“ क्रिटिकल म्हणजे? तो ठीक तर आहे ना?” त्याने काळजीने विचारले.

डॉक्टर,“आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आहे.ते आता त्याला कसा प्रतिसाद देतात त्यावर सगळं अवलंबून आहे. संध्याकाळी सहापर्यंत काहीच सांगता येणार नाही.” ते म्हणाले.

गार्गी,“ नेमकं काय म्हणायचे आहे डॉक्टर तुम्हाला?” तिने कातर आवाजात विचारले.

डॉक्टर,“ संध्याकाळी सहापर्यंत किंवा त्याच्या आत ते शुद्धीवर आले तर ठीक नाही तर ते कोमात जातील किंवा मग आपण त्यांना नाही वाचवू शकणार. लेट्स प्रे फॉर द बेस्ट! आम्ही त्यांना I. C. U मध्ये शिफ्ट करत आहोत तुम्ही त्यांना पाहू शकता.” ते म्हणाले आणि निघून गेले.

डॉक्टरचे बोलणे ऐकून सगळेच हतबल झाले. तितक्यात सुशांतच्या फोनवर संजयरावांचा फोन आला.

संजयराव,“ सुशा अरे किती वाट पहायची तुमच्या फोनची? चिनू कसा आहे? आम्ही येऊ का हॉस्पिटलमध्ये?” त्यांनी काळजीने विचारले.

सुशांत,“ काका तो ठीक आहे आता! उठला होता झोपला आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन काय करणार? तो झोपून उठला की मी फोन लावून देतो त्याला हा पण तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उठणार नाही. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आहे ना! तुम्ही जेवण आणि औषधे घेऊन आराम करा.” तो त्यांना समजावत बोलत होता.

संजयराव,“ खरं बोलतोयस ना तू?” त्यांनी साशंकपणे विचारले.

सुशांत,“ काका विश्वास नाही का माझ्यावर? काकूला ही सांगा की संग्राम ठीक आहे म्हणून!” तो म्हणाला पण त्याला पुढचे बोलणे जड जाऊ लागले कारण त्याचा कंठ दाटून आला होता म्हणून त्याने फोन कट केला.

आदिराज आणि अभिराज संग्रामला पाहून आले. गार्गी त्याच्याजवळ बसली होती. तोपर्यंत सुशांत तिथे आला.

सुशांत,“गार्गी या संग्र्यानी ना कहर केला आहे. याचा खूप राग येतोय मला पण त्यापेक्षा जास्त काळजी वाटते मला याची! मी तुला सांगितले होते ना त्याला समजाव म्हणून अभीच्या बाबतीत जे झाले त्यात त्याचा काही दोष नाही म्हणून!” तो कातर आवाजात बोलत होता.

गार्गी,“ किती आणि काय काय समजावून सांगू मी सुशांत? अरे अभी क्षितिजाशी जे वागला त्याचा दोष याने स्वतःवरच घेतला. अभी माफी मागायला गेला आणि ते सगळं घडलं तेंव्हा ही याने स्वतःलाच दोषी ठरवले. मी अभीशी कठोरच वागलो! क्षितिजा अभीशी चुकीचं वागली तर तिला थांबवायलाच हवं होतं! आणि काय काय अभी तिकडून आल्यावर आजारी पडला पुन्हा तेच त्याला इतक्या कमी वयात इंन्हेलर कायमचे वापरावे लागले तर? नुसती चिंता आणि चिंता बरं मी समजावून थकले मग रागवायला सुरू केले मग तर हा माणूस बोलायचाच बंद झाला. तुला तर माहीतच आहे आदी पेक्षा ही याचा जीव अभीवर कण भर जास्तच आहे. त्यातून मोठी मोठी स्वप्न पहायची आणि स्वतःची परवा न करता त्यांच्या मागे धावायचे. आपण सगळ्यांनी सांगितले नको जाऊ विरोध केला पण ऐकेल तो संग्राम कसला. पाहिलेस ना आज त्याने किती मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली वरून तुकारामला पण सांगितले मला सांगायचे नाही म्हणून! तेव्हाच हॉस्पिटलमध्ये आलो असतो तर याची कंडिशन इतकी बिघडली असती का? मी कशी वागू आता याच्याशी! सुशांत याने सहा वाजेपर्यंत डोळे नाही उघडले तर? मला खूप भीती वाटतेय!” ती संग्रामकडे पाहत सुशांतला म्हणाली.

अभिराज डॉक्टर गार्गीला बोलवत आहेत म्हणून सांगायला तिथे आला होता आणि त्याने थोडे दार उघडले आणि दोघांचा संवाद त्याच्या कानावर पडला. तो तसाच माघारी फिरला आणि हॉस्पिटलमधील मंदिरात गेला. तो बाप्पाच्यासमोर हात जोडून मनोमन प्रार्थना करत होता.

‛बाप्पा अंकूला काही होऊ देऊ नकोस. त्याच्या या अवस्थेला मीच कुठे तरी जबाबदार आहे. त्याला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.’
★★★

सगळ्यांच्या नजरा संग्रामवर आणि घड्याळावर टिकल्या होत्या. गार्गी संग्रामजवळ बसून होती. जो तो स्वतःच्या परीने देवाजवळ प्रार्थना करत होता. संध्याकाळचे पाच वाजले असतील आणि संग्रामने डोळे उघडले. गार्गीने ते पाहिले आणि बेल वाजवून नर्सला डॉक्टरांना बोलवायला सांगितले. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि तो सेफ असल्याचे सांगितले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सगळ्यांना एक एक करून भेटण्याची परवानगी दिली आणि डॉक्टरांनी गार्गीला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले.

गार्गी,“ सुशांत मी आलेच तुम्ही भेटा तोपर्यंत त्याला आणि आई-बाबांना फोन लावून दे त्याला! आई-बाबांना ही आणि त्याला ही बरं वाटेल.” ती म्हणाली आणि गेली.

सुशांत पहिल्यांदा त्याला भेटायला गेला. संग्राम सगळीकडे पाहत होता.

सुशांत,“ काय पाहताय साहेब आपण? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत ते ही I. C. U मध्ये! असं ही हॉस्पिटल तुमचा फेव्हरेट पिकनिक स्पॉट आहे ना!” तो त्याला पाहून तिरकसपणे म्हणाला.

संग्राम,“ सुशा प्लिज ना नको सुरू होऊ तू आता! एक तर माझं डोकं खूप जड वाटतंय मला!” तो हळू आवाजात म्हणाला.

सुशांत,“ तुला डोकं आहे का? बेअक्कल माणूस तू!” तो आवंढा गिळत पण काहीशा रागाने म्हणाला.

संग्राम,“ सुशा तू जा इथून!” तो वैतागून म्हणाला.

सुशांत,“ जास्त शहाणपणा नको करुस तू आता! आपल्याला म्हातारे आई-बाप आहेत एक फक्त तेवीस वर्षाचा पोरगं आहे याचं तरी भान ठेवायचं ना! मी काकांना फोन लावतो काका-काकूंना बोल जरा! त्यांना बरं वाटेल बिचारे काळजीत आहेत. (तो म्हणाला आणि त्याने फोन लावला.) काका फोन स्पीकरवर करा संग्रामला बोलायचे आहे तुम्हाला!”

संजयराव,“ चिनू बेटा कसा आहेस तू? आज आमची पाचावर धारण बसवलीस बाबा!” ते कापऱ्या आवाजात बोलत होते.

संग्राम,“ मी ठीक आहे बाबा!”तो हळू आवाजात बोलत होता.

मनीषाताई,“ बच्चा आराम कर बघ आवाज सुद्धा किती बारीक येतोय तुझा! आम्ही उद्या भेटायला येतो तुला!” त्या डोळे पुसत म्हणाल्या आणि सुशांतने फोन ठेवला.

संग्राम,“ गार्गी कुठे आहे?” तो म्हणाला आणि आदिराज त्याचे बोलणे ऐकत इथे आला.

आदिराज,“ मम्मा डॉक्टरांना भेटायला गेली आहे डॅडा! कसं वाटतंय तुला आता?” त्याने त्याचा हात धरत विचारले.

संग्राम,“ मी बरा आहे आदी! अभी कुठे आहे?” त्याने विचारले.

सुशांत,“ बाहेर आहे थांब पाठवतो त्याला! आता जास्त बडबड करू नकोस आदी, अभी आला की तुम्ही दोघे लगेच बाहेर या!” तो म्हणाला.

संग्राम पुन्हा एकदा जीवघेण्या संकटातून बाहेर पडला होता असे सगळ्यांना वाटत होते पण हे संकट पूर्ण टळले होते का? गार्गीला डॉक्टरांनी का बोलावले असेल?
© स्वामिनी चौगुले




🎭 Series Post

View all