माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ८७

राजवीर कोणते इंद्रिय त्यागणार होता?


सुशांत, समिधा आणि संग्राम क्षितिजाच्या घरी जाऊन तिला भेटून आले. गार्गीला मात्र बराच थकवा जाणवत होता. ती जाऊन झोपली. संग्रामने समिधाला तिच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले होते. समिधा जेवणाच्या वेळी तिच्या रूममध्ये आली तर गार्गी झोपलेलीच होती.ते पाहून समिधा तिच्याजवळ गेली आणि बेडवर बसत तिला उठवत म्हणाली.

समिधा,“ गार्गी बरं वाटत नाही का तुला? आपण डॉक्टरांना बोलावूया का?” तिने तिच्या केसात हात फिरवत काळजीने विचारले.

गार्गी,“ नाही गं मी ठीक आहे थोडा थकवा आला आहे बास!एक दिवस आराम केला की बरं वाटेल.” ती उठून बसत म्हणाली.

समिधा,“ बरं मी जेवण इथेच घेऊन येते. दोघी जेवू आपण. काका आणि काकूंचजेवण झालं आहे आणि मी ऑफिसमध्ये देखील टिफिन पाठवून दिला आहे.” ती उठत म्हणाली.

गार्गी,“ बरं तू घेऊन ये जेवण तोपर्यंत मी फ्रेश होऊन संग्रामला फोन करते. तो औषध घेत नाही गं कंटाळा करतो आणि क्षितिजा कशी आहे तिला जास्त लागलं आहे का?” ती काळजीने विचारत होती.

समिधा,” नाही गं म्हणजे लागलं आहे तिच्या हाताला बरंच पण काळजी करण्यासारखं काही नाही.” ती म्हणाली.

गार्गी,“ मी काय म्हणते आपण तिन्ही पोरांच्या कुंडल्या सचित्तानंद गुरुजींना दाखवून घेऊ ते आहेत अजून इथल्या आश्रमात. मला अभीची काळजी वाटतेय समी.” ती म्हणाली.

समिधा,“ ठीक आहे उद्या तुला बरं वाटलं तर आपण जाऊ त्यांच्याकडे, गार्गी मला ही अभीची काळजी वाटते गं! तो खूप हट्टी आहे आणि त्यात त्याने असं काही तरी ठरवले आहे स्वतःच्या मनाविरुद्ध. क्षितिजा आणि त्याच नातं पुन्हा फुलायला हवं म्हणून आपण त्याला खोटं बोलत आहोत हे जर त्याला कळलं ना तर तो कसा रिएक्ट होईल देव जाणे.” ती काळजीने बोलत होती.

गार्गी,“ उद्या जाऊयात आपण गुरुजींकडे आणि पाहू ते काय म्हणतात.” ती म्हणाली आणि समिधा गेली.

तिने दोघींसाठी नोकरांकरवी तिथेच जेवण आणून घेतले आणि दोघी जेवल्या.
★★★

दुसऱ्या दिवशी गार्गीला बरं वाटलं आणि ती ऑफिसला गेली तर क्षितिजा ही ऑफिसमध्ये हजर होती. तिला पाहून अभिराज चिडला आणि केबिनमध्ये जाऊन त्याने क्षितिजाला इंटरकॉम करून बोलावून घेतले. क्षितिजा त्याच्या केबिनमध्ये गेली तर तिला पाहून अभिराज भडकला.

अभिराज,“ तुला चार दिवसांची रजा मी दिली होती ना तरी तू आज लगेच ऑफिसला का आलीस?” त्याने तिला पाहत रागाने विचारले.

क्षितिजा,“ मी ठीक आहे सर आता मग कशाला उगीच घरी रहा म्हणून आले ऑफिसला.” ती खाली मान घालून म्हणाली.

अभिराज,“ हो का? लगेच बरं पण वाटायला लागलं का तुला? अगं हाताला किती लागलं आहे तुझ्या आणि ताप पण आला होता ना तुला! औषध वेळेवर घेत आहेस का?” तो तिला चिडून पण काळजीने विचारत होता आणि ते क्षितिजाला जाणवत होते.

क्षितिजा,“ मी ठीक आहे आणि औषध ही घेते वेळेवर, तुम्हांला काळजी करायची गरज नाही.” ती तोंड फुगवून म्हणाली.

अभिराज,“ हो ना मी कशाला काळजी करेन तुझी तू जा.” तो ही चिडून म्हणाला आणि क्षितिजा गालात हसत निघून गेली. ती बाहेर आली तर तिच्या डेस्क जवळ गार्गी येऊन उभी होती.

गार्गी,“ काय मॅडम गालात का हसताय?” तिने विचारले.

क्षितिजा,“ आपण तुमच्या केबिनमध्ये जाऊन बोलूयात का?” तिने विचारले आणि गार्गीने होकारार्थी मान हलवली आणि दोघी ही तिच्या केबिनमध्ये गेल्या.

गार्गी,“ तू कॉफी घेणार ना की चहा?” तिने विचारले.

क्षितिजा,“ कॉफी”

गार्गी,“ दोन कॉफी पाठवून द्या.(तिने इंटर कॉमवरून ऑर्डर दिली आणि बोलू लागली.) बरी आहेस ना तू? आणि अभीच्या वागण्यात काही बदल झाला आहे का?”तिने विचारले.

क्षितिजा,“ बेंगलोरमध्ये तो अपघात झाला आणि अभीसरांनी माझी त्या रात्री रात्रभर काळजी घेतली. त्यानंतर आता ही त्यांच्या चिडण्यामागे त्यांची काळजी स्पष्ट दिसत होती म्हणजे त्यांना माझ्याबद्दल अजून ही काही तरी वाटते ते माझ्या बाबतीत पूर्णच भावनाशून्य नाहीत झाले मॅडम.” ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.

गार्गी,“ गुड! क्षिती अभी बदलेल त्याचा निर्णय पुढच्या चार महिन्यात! बघ पाहता पाहता तू रिजॉईन करून दोन महिने उलटून गेले.” ती म्हणाली.

क्षितिजा,“हो लेट्स होप फॉर द बेस्ट!” ती म्हणाली
★★★
इकडे राजवीर संग्रामच्या हातात सचित्तानंद महाराजांनी बांधलेले बंधन कसे तोडायचे याच विचारात होता. तो त्यासाठी नाशिकला त्याच्या गुरूकडे गेला. त्याच्या अघोरी गुरूचे आश्रम तिथे होते पण ते जास्त करून स्मशात वास्तव्यास असायचे. तो त्यांना भेटायला स्मशात गेला.

राजवीर,“ गुरूदेव मी खूप विवंचनेत आहे.” तो हात जोडून म्हणाला.

गुरू,“ मला माहित आहे तुला कोणती विवंचना इथे घेऊन आली आहे.” ते त्याला पाहून म्हणाले.

राजवीर,“गुरूदेव तुम्ही तर सगळंच जाणता मग त्याच्यावर उपाय देखील तुम्हाला ज्ञात असेल.” तो म्हणाला.

गुरू,“ राजवीर जे बंधन संग्रामच्या हातात त्यांच्या गुरूने घातले आहे ते काही साधेसुधे बंधन नाही. अत्यंत पवित्र आणि मजबूत बंधन आहे ते! ते बंधन आपले आदीगुरु आणि देवादी देव शिव-शक्तीचे आव्हान करून तयार करून संग्रामची धर्मपत्नी गार्गीच्या हातून त्याच्या हातात बांधण्यात आले आहे त्याला तोडणे केवळ अशक्य आहे.” ते गंभीर होत म्हणाले.

राजवीर,“ तुम्हीच असं म्हणालात तर मी काय करू? मी इतकी वर्षे तपश्चर्या केली. सिद्धी प्राप्त करून लोकांचे कल्याण केले. कारण माझे ध्येय ठरलेले होते. मला पुढच्या जन्मी नुसतं गार्गीलाच प्राप्त नाही करायचे तर खूप मोठे ध्येय आहे माझ्यासमोर पण जर मी संग्राम-गार्गीला पाहूच शकलो नाही तर मग ते साध्य कसे होणार?” तो उद्विग्नपणे म्हणाला.

गुरू,“इतका उद्विग्न नको होऊस राजवीर! मी म्हणालो की ते बंधन तोडणे अशक्य आहे पण त्या बांधनाला आपण तडा पोहोचवू शकतो. ते देखील इतके सोपे असणार नाही. तुला एक वर्ष कठोर अनुष्ठान करावे लागेल. तसच ते बंधन पंचतत्व आणि पंचइंद्रियांबरोबरच दाही दिशांना धरून केले आहे त्यामुळे त्याला जर तुला तडा द्यायचा असेल तर तुझ्या पंचइंद्रियांमधील एका इंद्रियाची आणि एका तत्त्वाची आहुती द्यावी लागेल तसच एक दिशा कायम तुझ्या विरोधात राहील. याच जन्मी नाही तर पुढच्या जन्मी देखील तू ते इंद्रिय आणि तत्त्व गमावशील आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या दुसऱ्या इंद्रियामार्फत आणि तत्त्वामार्फत तुला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल त्यामुळे या सगळ्याचा सारासार विचार कर आणि कोणत्या इंद्रियाची आहुती तुला द्यायची आहे ते ठरव मग माझ्याकडे ये मी तुला ते अनुष्ठान कसे करायचे ते सांगेन.” ते म्हणाले.

राजवीर,“ ठीक आहे गुरू देव मी आज विचार करून तुम्हाला उद्या माझा निर्णय सांगेन आणि मी ध्येय प्राप्तीसाठी माझे एक इंद्रिय गमवायला तयार आहे.” तो म्हणाला आणि निघून गेला.
★★★
इकडे संग्राम आणि अभिराज मात्र जाम खुश होते कारण त्यांनी इतक्या महिन्यांपासून घेतलेली मेहनत आज सफल झाली होती. आज त्यांनी अमेरिकन कंपनीसाठी डेव्हलोप केलेले सॉफ्टवेअर त्या कंपनीला आवडले होते आणि ते त्यांच्या देश-विदेशातील सगळ्या ऑफिसेसमध्ये ते सॉफ्टवेअर वापरणार होते. तसेच त्यांनी ट्रिपल एस बरोबर सॉफ्टवेअर क्षेत्रात उतरायचा निर्णय देखील घेतला होता. त्यामुळे आता ट्रिपल एस अमेरिका खंडात बिझनेस करू शकणार होती आणि आता ग्लोबल कंपनी म्हणून नावारूपाला येणार होती.

या अचिव्हमेंटचा आनंद साजरा करण्यासाठी संग्रामने एक समारंभ आयोजित करायचे ठेवले आणि त्यामागे आणखीन एक अजेंडा होता. त्याने याबद्दल गार्गी आणि सुशांतशी बोलायचे मनोमन ठरवले.

राजवीर कोणत्या इंद्रियाचा त्याग करेल?
©स्वामिनी चौगुले


ही कथा काल्पनिक असून या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि धार्मिक बाबींना ठेस पोहोचवण्याचा उद्देश लेखिकेचा नाही. बाकी लेखिकेने लिहलेला मजकूर हा तिने केलेल्या अभ्यासावर आणि कल्पनेवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.








🎭 Series Post

View all