माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ८४

या घटनेमुळे अभिराजच्या मनात क्षितिजाबद्दल असलेले प्रेम पुन्हा जागृत होईल का?


अभिराज आणि क्षितिजा आज सकाळच्या फ्लाईटने बेंगलोरला गेले. अभिराज दोन तासांच्या प्रवासात क्षितिजाशी एक शब्द ही बोलला नाही. ते दोघे बारा वाजता बेंगलोरमध्ये पोहोचले. संग्रामने आधीच लॉजमध्ये ऑनलाइन दोन रूम बुक करून ठेवल्या होत्या. काम दोन दिवसांचे होते. आज दुपारी दोन वाजता त्यांना मिटिंगसाठी जायचे होते. अभिराजने टॅक्सी थांबवली आणि दोघे लॉजवर पोहोचले.

अभिराज,“ मिस पाटील आत्ता बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली आहेत. तुम्ही रूममध्ये समान ठेवा फ्रेश व्हा आणि कॅफेट एरिआमध्ये या आपण जेवण करू आणि मिटिंगसाठी निघू. मी ही फ्रेश होऊन येतो.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ ठीक आहे सर ” ती म्हणाली.

क्षितिजा फ्रेश होऊन खाली आली तर अभिराज तिच्या आधीच तिथे हजर होता. तो क्षितिजाला येताना पाहत होता. तिने ऍपल कटचा क्रीम कलरचा शर्ट, ब्यु जीन्स आणि त्यावर ब्यु कलरचे ब्लेझर घातले होते. केसांची पोनी टेल, पायात हिल्स आणि अगदी लाईट मेकअप ती प्रोफेशनल लूकमध्ये कमाल दिसत होती. अभिराज दोन मिनिटं तिला पाहत राहिला. ती जवळ आली आणि तो भानावर आला. दोघे ही टेबलवर जाऊन बसले.

अभिराज,“ मिस पाटील तुम्ही काय खाणार ऑर्डर द्या. हे मेन्यू कार्ड!” तो मेन्यूकार्ड तिच्याकडे सरकवत म्हणाला.

क्षितिजा,“ प्लिज सर तुम्ही मला मिस पाटील आणि अहो जाहो करू नका.कानाला टोचतात तुमचे हे शब्द! तुम्ही क्षितिजा म्हणा मला.” ती तोंड बारीक करून म्हणाली.

अभिराज,“ बरं ठीक आहे. क्षितिजा जेवण ऑर्डर करूया का?” त्याने विचारले.

क्षितिजा,“ मी राईस प्लेट घेईन कारण आपण मिटिंगला जाणार आहोत तर हलकं अन्न खाल्लेले बरं.” ती म्हणाली आणि अभिराज हसला.अभिराजने वेटरला बोलावले आणि दोन राईस प्लेटची ऑर्डर दिली.

दोघे जेवले आणि मिटिंगला गेले. मिटिंग सहा वाजेपर्यंत चालली आणि दोन दिवसात होणारं काम एकाच दिवसात झालं. अभिराजने चांगल्या पद्धतीने प्रेझेन्टेशन दिले आणि त्याच दिवशी पार्टीने डिल साईन केली. अभिराज त्यामुळे खुश होता. ते ऑफिसमधून निघाले आणि हॉटेलच्या बाहेर टॅक्सीतुन उतरले. रोड क्रॉस करून हॉटेलमध्ये जायचे होते. अभिराजला कोणाचा तरी फोन आला होता म्हणून तो हेडफोन घालून कोणाशी तरी बोलत रोड क्रॉस करत होता आणि क्षितिजा रोडच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली होती. ती अभिराजच्या दिशेने पाहत होती अभिराज फोनवर बोलत येत होता आणि एक गाडी भरधाव वेगाने त्याच्या दिशेने येत होती. गाडी चालक हॉर्न वाजवत होता. कदाचित त्याच्या कधीचा कंट्रोल सुटला होता आणि तो गाडी थांबवण्यास असमर्थ होता म्हणून तो हॉर्न वाजवून अभिराजला बाजूला हो म्हणून खुणावत होता पण हेडफोन घातल्यामुळे त्याला ते ऐकू येत नव्हते आणि त्याचे लक्ष देखील त्या गाडीकडे नव्हते. इकडे क्षितिजा ही त्याला ओरडत होती पण अभिराजवर काहीच परिणाम होत नव्हता. शेवटी क्षितिजा धावत गेली आणि तिने त्याला दंडाला धरून बाजूला केले. या सगळ्यात दोघांचा ही तोल गेला. क्षितिजा रोडच्या कडेला असलेल्या खडीवर पडली. अभिराज तिच्या अंगावर पडला त्यामुळे तिच्या एका हातावर चांगलाच भार पडला आणि तिच्या हाताच्या कोपऱ्याला चांगलीच जखम झाली. अभिराज स्वतः सावरला आणि उठला आणि त्याने क्षितिजाला ही उठायला मदत केली. त्याचे लक्ष क्षितिजाच्या हाताकडे गेले तर तिच्या हातातून रक्ताचे ओघळ येत होते. इतक्यात हॉटेल स्टाफ देखील तिथे आला.

अभिराज,“ अगं किती लागलं आहे तुझ्या हाताला.” असं म्हणून त्याने तिचा हात पाहण्याचा प्रयत्न केला आणि क्षितिजाने त्याचा हात झटकला.

क्षितिजा,“ मूर्ख आहात का तुम्ही? की लहान आहात रोड क्रॉस करताना कोणी फोनवर बोलतं का? तुम्हाला किती हाका मारल्या लक्ष कुठे होत तुमचं?काही झालं असतं म्हणजे?” ती स्वतःचा हात दुसऱ्या हातात घेऊन रागाने त्याला बोलत होती.

अभिराज,“ सॉरी! पण तू चल बरं आपण डॉक्टरांना बोलावून घेऊ की हॉस्पिटलमध्ये जाऊयात?” त्याने काळजीने विचारले.

क्षितिजा,“ त्याची काही गरज नाही मी फस्ट एड करून घेईन.” ती हातावर फुंकर घालत म्हणाली.

अभिराज,“ तू आत चल आणि प्लिज मॅनेजर को बोलके डॉक्टर को बुलवा लिजिए। मैं इन्हें लेकर रूम में जा रहा हूँ आप रूम में डॉक्टर को जल्दी भेज दिजिए।” तो तिथल्या एका वेटरला म्हणाला आणि क्षितिजाच्या हातावर रुमाल धरत तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेला.

थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी क्षितिजाची मलमपट्टी केली.

डॉक्टर,“ टि. टि का इंजेक्शन लेना पडेगा और कुछ दवाइयां लिख देता हूँ मंगवा लिजिए।”ते म्हणले आणि त्यांनी त्यांच्या बॅगेतून इंजेक्शन काढले. ते पाहून क्षितिजा घाबरून म्हणाली.

क्षितिजा,“ इंजेक्शन मुझे नही लेना मैं ठीक हूं। ” ती आवंढा गिळत घाबरून म्हणाली.

अभिराज,“ क्षिती इंजेक्शन घे बरं, हे इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. इतकं लागलं आहे तुला उद्या गँगरीन झालं तर!” तो तिला समजावत म्हणाला.

क्षितिजा,“ सर तुम्ही आणि हा डॉक्टर जा. मला इंजेक्शन घ्यायचे नाही.” ती रागाने म्हणाली.

अभिराज,“ नाटकं करू नकोस जास्त गप्प इंजेक्शन घे. तुला कोणी सांगितले होता नसता पराक्रम करायला. डॉक्टर मैं इसे पकड़ता हूँ आपन इंजेक्शन लगाए। जबरदस्ती करायला लावू नकोस क्षितिजा मला!” तो तिला दम देत म्हणाला.

क्षितिजा,“ काही गरज नाही मला धरायची मी घेते इंजेक्शन!” ती तोंड फुगवून म्हणाली आणि तिने घाबरून डोळे झाकून घेतले. अभिराज तिच्याकडे हसून पाहत होता.

डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आणि अभिराज आणि ते रूमच्या बाहेर आले.

अभिराज,“ घबराने की कोई बात नही है ना डॉक्टर?” त्याने काळजीने विचारले.

डॉक्टर,“ नही लेकिन जख्म गहरा है तो ध्यान रखना होगा। आज रात उन्हें बुखार आ सकता है तो खयाल रखिए थोड़ा और मैंने लिखकर दी दवाई खाना खिलाकर दीजिए उन्हें। अभी अभी चोट लगी है तो दर्द कम है लेकिन रात को दर्द पढ़ सकता है तो इसमें से ये दवाई दीजिए और बुखार के लिए ये।” ते प्रिस्क्रिप्शन मधील औषधांची नावे दाखवून सांगत होते.

अभिराज,“ ठीक है डॉक्टर।” तो म्हणाला आणि डॉक्टर निघून गेले.अभिराजने स्टाफला औषधे आणायला सांगितली आणि तो क्षितिजाच्या रूममध्ये आला तर क्षितिजा फोनवर तिच्या आईशी बोलत होती. ती त्यांना ती ठीक आहे असे सांगत होती. तिने फोन ठेवला आणि ती अभिराजला पाहून म्हणाली.

क्षितिजा,“ तुम्ही इथे काय करताय सर? जा तुमच्या रूममध्ये स्टाफला औषधं आणायला सांगितली आहेत ना! मी घेईन.” ती बेडवर सरकत म्हणाली पण तिचा चेहरा सांगत होता की तिला किती दुखत आहे ते.

अभिराज,“ झालं बोलून तुझं? तू किती ही नॉर्मल आहे असं दाखवत असलीस तरी तुझा चेहरा तुझ्या वेदना लपवू शकत नाही क्षितिजा!” तो तिला राखून पाहत म्हणाला.

क्षितिजा,“ सर स्वतःच्या वेदना स्वतःलाच सहन कराव्या लागत असतात. तुम्ही जा.” ती आवंढा गिळत म्हणाली.

अभिराज,“ अच्छा! तुला कोणी सांगितले होते गं मध्ये कडमडायला? तुला काही झालं असतं तर मी तुझ्या आई-बाबांना काय उत्तर देणार होतो?” त्याने चिडून विचारले.

क्षितिजा,“ आणि तुम्हाला काही झाले असते तर मी काय उत्तर देणार होते संग्रामसरांना? त्यांनीच पाठवले आहे ना मला तुमच्याबरोबर! मी एकदा विश्वास गमावला आहे आता पुन्हा नाही गमावू शकत. चूक तुमची होती तुम्हाला कळत नाही का रस्ता कसा क्रॉस करावा? इतके बेजबाबदार झालात तुम्ही?”ती ही रागाने म्हणाली.

अभिराज,“ सॉरी चूक माझीच होती आणि थँक्स! आणि मी कुठे ही जाणार नाही डॉक्टरांनी तुझी काळजी घ्यायला सांगितले आहे. आजची रात्र मला सहन कर उद्या आपण दुपारी निघत आहोत कळलं तुला! मी जेवण मागवतो जेव औषधं घे आणि झोप!” तो म्हणाला.

क्षितिजा,“तुम्ही जा मी ठीक आहे. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे.” ती म्हणाली.

अभिराज,“ मी कुठे ही जाणार नाही.”


तो म्हणाला आणि तिथल्या खुर्चीवर बसला.तोपर्यंत जेवण घेऊन वेटर आला. अभिराजने तिच्यासमोर जेवणाचे ताट ठेवले आणि दोघांनी जेवण केले. क्षितिजाला अभिराजने बेडवरच सगळं दिलं आणि ती झोपली. अभिराज खुर्चीत बसून पेंगु लागला. क्षितिजाच्या झोपेत कणण्याच्या आवाजाने तो जागा झाला. त्यानी तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळाला हात लावून पाहिले तर तिला ताप आला होता. अभिराजने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्याने क्षितिजाला उठवून तापाची गोळी दिली आणि त्याचा रुमाल काढून जवळच असलेल्या ग्लासात पाणी घेतले त्यात रुमाल बुडवून तिच्या कपळालावर गार पाण्याच्या घड्या ठेवायला सुरुवात केली. क्षितिजाची अशी अवस्था पाहून त्याला स्वतः चाच राग येत होता आणि क्षितिजाची काळजी वाटत होती.


या घटनेमुळे अभिराजच्या मनात क्षितिजाबद्दल असलेले प्रेम पुन्हा जागृत होईल का?
©स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all