माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ७९

संग्रामच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतील का?


गार्गी मात्र अभिराजच्या बोलण्यामुळे आपसूकच बावीस वर्षे मागे गेली.

बावीस वर्षांपूर्वी..

लग्नाला तीन वर्षे होऊन आणि दोन वर्षे एकत्र होऊन देखील संग्राम आणि गार्गीला संतती सुख लाभले नव्हते पण ती कमतरता अभिराजने भरून काढली होती. समिधा अभिराज नऊ महिन्यांचा असताना प्रेग्नंट राहिली आणि अभिराजची जबाबदारी संग्राम-गार्गीने घेतली. अभिराज नऊ महिन्याचा असल्यापासून त्यांच्याचजवळ होता. अभिराजला गार्गी-संग्रामचा आणि त्या दोघांना अभिराजचा चांगलाच लळा लागला होता. तो गार्गीला तर जास्तच चिकटला होता. गार्गी त्याच सगळं अगदी मन लावून करायची. ऑफिसला जाईल तितका वेळ तो मनिषाताईजवळ असायचा ती परत आली की पुन्हा तिला बिलगायचा.

गार्गी आणि संग्राम हे मेडिकली आई-बाबा होण्यासाठी फिट होते पण त्यांना अजून तरी ते सुख लाभले नव्हते. पाहता पाहता अभिराज अडीच वर्षांचा झाला आणि दोघेही त्याच्या पालनपोषणात रमून गेले होते. तरी दोघांच्या ही मनात कुठे तरी अपत्यप्राप्तीची आस आणि खंत दोन्हीही होती आणि एक दिवस गार्गीला बाळाची चाहूल लागली.

सगळे घर आनंदाने न्हाऊन निघाले. संजयराव आणि मनिषाताईना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. सुशांत आणि समिधाने तर देवाला साकडे घातले होते. दोघे ही गार्गी-संग्रामसाठी खुश होते. डॉक्टरांनी मात्र गार्गीच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉप्लिकेशन्स आहेत तिला बेडरेस्ट घ्यावा लागेल सांगितले आणि दुसऱ्या महिन्यातच गार्गी रजा घेऊन घरी बसली. मनिषाताई आणि समिधा तिला अगदी बेडवरून उतरू ही देत नव्हत्या. तिचे सगळे डोहाळे बाकी सगळं मनापासून पुरवत होत्या आणि या सगळ्यात लुडबुड होती ती म्हणजे छोट्या अभिराजची तो गार्गीच्या सतत आसपास असायचा त्यामुळे गार्गीची त्याला जास्तच सवय झाली. एक मिनटं ही तो गार्गीशिवाय राहू शकत नव्हता. असेच आठ महिने झाले आणि नऊ महिने पूर्ण व्हायला अजून एक आठवड्याचा अवधी होता. गार्गीला चांगलेच पोट आले होते. तिला आता उठणे बसने ही कठीण झाले होते.

रात्री संग्रामने तिला झोपवले आणि तोही अभिराजला घेऊन झोपला. मध्यरात्री गार्गीच्या उठवण्याने संग्राम जागा झाला.

गार्गी,“ संग्राम मला खूप अस्वस्थ वाटतंय. पोटात बाळाची हालचाल ही जाणवत नाही मला!”ती कशी बशी त्याला उठवून बोलत होते.

संग्राम,“मी आई-बाबांना उठवतो. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ.” तो म्हणाला.

संग्रामने मनिषाताई-संजयरावांना उठवले. अभिराजला समिधाकडे सोडले. सुशांत, संग्राम,मनिषाताई-संजयराव गार्गीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी गार्गीला तपासले आणि ते बाहेर आले. तोपर्यंत सुशांतने गौरव आणि मीनाताईना फोन करून बोलवून घेतले होते.

डॉक्टर,“ गार्गीचा बी.पी खूप जास्त वाढला आहे. पोटात बाळाची ही हालचाल मंदावली आहे आपल्याला सी सेक्शन करावे लागेल अजून वेळ केला तर आई आणि बाळाच्या ही जीवाला धोका आहे.” ते म्हणले.

संग्राम,“काय? पण गार्गीला तर बी.पी चा त्रास नाही डॉक्टर? मग अचानक हे?” त्याने घाबरून विचारले.

डॉक्टर,“ हो पण कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये बी.पीचा त्रास होऊ शकतो आणि बी.पी वाढू शकतो. आम्ही तयारी करतोय ऑपरेशनची तुम्ही फॉर्मेलिटी पूर्ण करा.” ते म्हणाले आणि निघून गेले.

संग्राम मात्र डॉक्टरांच्या बोलण्याने घाबरला होता.

सुशांत,“ चल आपण फॉर्मेलिटी पूर्ण करू संग्र्या आणि घाबरू नकोस काही होणार नाही गार्गीला ही आणि बाळाला ही!” तो त्याला समजावत म्हणाला.

खरं तर सगळेच टेन्शनमध्ये होते पण कोणीच तसे दाखवले नाही. गार्गीला ऑपरेशनला नेले आणि पाऊण तासात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. थोड्याच वेळात नर्स बाळ बाहेर घेऊन आली. सुशांतने पुढे जाऊन कपड्यात गुंडाळलेले बाळ हातात घेतले.

नर्स,“ अभिनंदन मुलगा झाला आहे.”

संग्राम,“ गार्गी कशी आहे?” त्याने बाळाला घेत विचारले.

नर्स,“ त्यांची सर्जरी अजून सुरू आहे. बाळाला सगळे पहा आणि माझ्याकडे द्या. अजून फॉर्मेलिटीज बाकी आहेत आणि बाळाला स्वच्छ करायचे आहे अजून!” त्या म्हणाल्या आणि सगळ्यांनी बाळाला पाहून बाळ नर्सकडे दिले.

अर्ध्या तासांनी डॉक्टर बाहेर आले.

मीनाताई,“ गार्गी कशी आहे?” त्यांनी काळजीने विचारले.

डॉक्टर,“ त्या ठीक आहेत. काळजी करू नका. त्यांना आम्ही रूममध्ये शिफ्ट करत आहोत. तासाभरात त्या शुद्धीवर येतील.” ते म्हणाले.

आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आता सकाळचे सहा वाजले होते. संग्राम गार्गीजवळ बसून होता. गार्गीला शुद्ध आली.

गार्गी,“ बाळ कुठे आहे आपले? काय झाले आपल्याला?” तिने हळूहळू विचारले.संग्रामने पहिल्यांदा बेल वाजवून नर्सला बोलावले आणि डॉक्टरांना बोलवायला सांगितले. तिथेच पाळण्यात झोपलेल्या बाळाला त्याने घेतले आणि गार्गीच्यासमोर धरत म्हणाला.

संग्राम,“ हे बघ मुलगा झाला आहे आपल्याला!”

गार्गीने बाळाला पाहिले आणि आनंदाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. डॉक्टर तोपर्यंत आले. गार्गी मात्र पुन्हा डोळे झाकत होती. डॉक्टरांनी संग्रामला बाळाला तिथेच ठेवून बाहेर जायला सांगितले. डॉक्टर रूमच्या बाहेर आले आणि त्यांनी नर्सला काही सूचना दिल्या.

संग्राम,“ डॉक्टर काय झालं गार्गीला ती पुन्हा…” त्याचे शब्द घशातच राहिले कारण त्याचा उर भरून आला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला तसं पाहून बाकी सगळे ही तिथे आले.

डॉक्टर,“ मिस्टर सरनाईक अहो इतकं घाबरण्यासारखे काही झालेले नाही. त्या सेफ आहेत. त्यांचं ब्लिडिंग खूप झाले आहे त्यामुळे त्या बेशुद्ध आहेत आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे. पुढचे तीन दिवस अशक्तपणामुळे त्या गुंगीत राहतील बाकी घाबरण्यासारखे काहीच नाही.” ते संग्रामला समजावत म्हणाले.

मनिषाताई,“ पण डॉक्टर जर गार्गी गुंगीत राहिली तर बाळाला वरचे दूध द्यायचे का? आणि बाळ हॉस्पिटलमध्येच असू दे का?” त्यांनी विचारले.

डॉक्टर,“ हो तुम्ही पावडरमिल्क सुरू करा बाळासाठी, बाळ तसे हेल्दी आहे पण गार्गी इथे आहे तर बाळाला पण इथेच राहू द्या.” ते म्हणाले.

संग्राम,“ गार्गीला काही नाही होणार ना डॉक्टर? तिची अवस्था खूप वाईट आहे.” त्याने कातर आवाजात विचारले.

डॉक्टर,“ नाही होणार त्यांना काही! त्या सेफ आहेत फक्त खूप विकनेस आहे त्यांना.” ते म्हणाले.

संजयराव,“ चिनू इतकं घाबरून कसे चालेल बेटा! आता बाप झालास तू आणि डॉक्टर म्हणाले ना की गार्गी सेफ आहे.” ते त्याला समजावत म्हणाले.

डॉक्टर,“ तुमच्या पैकी एक लेडीज बाळाला सांभाळायला आणि आणखीन कोणी थांबले तर चालेल बाकी सगळे घरी जा.” ते म्हणाले.

मीनाताई,“ मी थांबते इथे तुम्ही घरी जा ताई! समिधा दोन मुलांबरोबर एकटीच आहे. त्यात अभी गार्गीला सोडून राहत नाही. सुशांत तू आणि भाऊ तुम्ही ही जा मी गौरव, संग्राम आहोत इथे!” त्या म्हणाल्या.

सुशांत,“ नाही काकू मी इथेच थांबतो. काका तुम्ही आणि काकू घरी जा. गौरव दादा तुम्हीही जा रागिणी वहिनी ही एकट्याच आहेत.” तो म्हणाला आणि बाकी सगळे निघून गेले.
★★★

आज दोन दिवस झाले गार्गी झोपूनच होती त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही होती की ती सेफ होती पण सुशांतच्या घरी मात्र छोट्या अभिराजने गार्गीच्या आठवणीने रडून रडून दंगा घातला होता. तो ना काही खात होता! ना दूध पित होता. मनिषाताई, समिधा आणि संजयराव, सुशांत प्रयत्न करून करून थकले होते. अभिराजने गार्गीच्या आठवणीने ताप काढून घेतला होता आणि आता सगळ्यांना अभिराजची काळजी वाटत होती. आज तिसरा दिवस उजाडला होता. दिवस मावळतीकडे झुकत होता.मीनाताई बाळाला दूध पाजत होत्या आणि संग्राम गार्गीजवळ बसून होता.


तेवढ्यात गार्गीने डोळे उघडले. ती आता चांगली शुद्धी वर आली होती. डॉक्टरांनी तिला तपासले आणि काही प्रॉब्लेम नाही असे सांगितले. गार्गीने बाळाला जवळ घेतले आणि अचानक तिने विचारले.

गार्गी,“ मी किती दिवस झोपून होते मम्मा?”

मीनाताई,“ तीन दिवस झाले गार्गी तू झोपून होतीस आज डोळे उघडले आहेस बाई तू!” त्या तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या.

गार्गी,“ काय? संग्राम अभी कुठे आहे? तो मला सोडून राहत नाही. त्याने रडून रडून घर डोक्यावर घेतले असेल मला आत्ताच्या आत्ता अभीला भेटायचे आहे.” ती उठून बसण्याचा प्रयत्न करत बोलत होती.

संग्राम,“ रिलॅक्स गार्गी अगं तुझे स्टीचेस अजून ताजे आहेत. मी बोलावून घेतो सुशंतला तो अभीला लगेच घेऊन येईल.” तो म्हणाला आणि बाहेर जाऊन त्याने सुशांतला फोन केला.

समिधा आणि सुशांत छोट्या अभिराजला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. अभिराज रडून रडून कोमेजला होता. तापाने त्याची रया गेली होती आणि पोटात अन्न नसल्याने तो पेंगुळला होता.त्याला तसं पाहून गार्गीच्या डोळ्यात पाणी आले. तिने त्यालाजवळ बसवून घेतले. गार्गीला पाहून अभिराज तिला चिटकला.

अभिराज,“ अंती तू दिसली नाही. मम्माला माल..”तो बोबडे बोलत तिला बिलगून समिधाची तक्रार करत होता.

गार्गी,“ सॉरी बच्चा! समिधा याला ताप आला आहे की!” ती त्याला गोंजारत म्हणाली.

समिधा,“ तीन दिवस झाले तुझा दोसरा काढला आहे याने.” ती सांगत होती आणि अभिराज गार्गीच्या तोंडाला त्याचा इवलासा हात लावत म्हणाला.

अभिराज,“ अंती… मंमं ” त्याला आता भुकेची जाणीव झाली होती आणि तो गार्गीला खायला मागत होता. तिथे सलाईन पहायला नर्स आली होती.

गार्गी,“ सिस्टर मी आता दूध पाजू शकते ना?” तिने विचारले.

नर्स,“ हो!”

गार्गी,“ दुद्दू पिणार ना बच्चा?” तिने अभिराजच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत विचारले आणि त्याने मान डोलावली.

समिधा,“ गार्गी तुझ्या पहिल्या दुधावर तुझ्या बाळाचा हक्क आहे. अभीला आपण काही तरी चारू ना!” ती म्हणाली.

गार्गी,“ समी माझे पहिले बाळ तर अभीच आहे आणि त्याचा हक्क माझ्यावर माझ्या बाळापेक्षा ही जास्त आहे.” ती म्हणाली आणि सुशांत, संग्राम बाहेर गेले.

गार्गीने तिचे पाहिले दूध अभिराजला पाजले. छोटा अभिराज पोट भर दूध पिऊन तिच्या कुशीत झोपून गेला. तिच्या स्पर्शाने त्याचा ताप तर कुठल्या कुठे पळून गेला. समिधा आणि मीनाताई मात्र दोघांना भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. त्यानंतर कायमच संग्राम आणि गार्गीचे प्रेम आदिराजपेक्षा ही अभिराज वर कण भर जास्तच राहिले.

हळूहळू मुलं मोठी होत होती. आदिराजला मात्र सुशांतची आणि समिधाची ओढ जास्त होती. सुशांत आदिराजला घर भर घेऊन फिरायचा. आदिराजला पाय फुटले आणि तो समिधा आणि सुशांतकडे पळू लागला. तर अभिराज मात्र गार्गी आणि संग्रामच्या मागे फिरायचा. राज्ञी घरातली एकुलती एक मुलगी त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी होती. ती संग्रामच्या जास्त जवळ होती. अभिराज लहान असल्यापासूनच संग्रामची कॉपी करत मोठा झाला. शाळेत पालक मिनिटिंग असो वा महत्त्वाची परीक्षा त्याला संग्राम आणि गार्गी हवे असायचे. सगळे हट्ट तो त्यांच्याकडूनच पुरवून घ्यायचा. आदिराज मात्र सुशांतचा लाडका होता. मनिषाताई आणि संजयराव मात्र तिघांचे ही लाडके आजी आजोबा होते.

अभिराज दहा-बारा वर्षांचा झाला आणि तो आदिराजला स्वतः च्या रूममध्ये घेऊन झोपू लागला. आदिराजच्या बाबतीत अभिराज भाई म्हणून ओहर प्रोटेक्टिव्ह होता.

गार्गी संग्रामच्या कुस बदलण्याने आणि त्याच्या हाताच्या स्पर्शाने भूतकाळातून वर्तमानकाळात आली. तिने कॉर्नर पीस वर ठेवलेली. अभिराज, आदिराज आणि राज्ञीचा फोटो असलेली फोटो फ्रेम हातात घेतली आणि अभिराजच्या फोटो वर प्रेमाने हात फिरवत ती स्वतःशीच बोलू लागली.

‛मला माहित आहे अभी तू उद्या ऑफिसमध्ये क्षितिजाला पाहून चिडणार आणि तिला तुझी असिस्टंट केल्यावर तर जास्तच चिडचिड करणार पण बच्चा क्षितिजा तुझं पहिलं प्रेम आहे. तुझ्यासाठी क्षिती अगदी परफेक्ट आहे. तुझ्या आयुष्यात ती तुझी बायको म्हणून आली तर तुझे आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने भरून जाईल म्हणूच तुझ्या मनाविरुद्ध आम्ही वागत आहोत. तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे बेटा! यु आर सच अ वंडरफुल सन अँड आय नो यु विल बी सच अ वंडरफुल हजबंड लाईक युवर अंकल!’ तिने फोटो फ्रेम ठेवली आणि झोपून गेली.

संग्रामच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील का? आणि राजवीरच काय सुरू असेल?तो त्याला इतकं करून ही संग्राम-गार्गीवर नजर ठेवता नाही आली तर पुढे कोणते पाऊल उचलेल. सचित्तानंद महाराज गार्गीला आणखीन काय उपाय सांगणार होते?
© स्वामिनी चौगुले

















🎭 Series Post

View all