माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ६९

खरचं क्षितिराजच्या प्रेमाचा अंत इथेच होणार होता का?


भाग 69
सकाळी संग्रामने डोळे उघडले तर गार्गी त्याचा हात धरून झोपली होती. त्याने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. त्याने तिच्या हातातून हात काढून घेतला त्यामुळे गार्गी जागी झाली. तिने संग्रामला उठलेले पाहिले आणि उठून बसत त्याला काळजीने विचारले.

गार्गी,“ संग्राम कसं वाटतंय तुला आता?”

संग्राम,“ मी ठीक आहे गार्गी!” तो ही उठून बसत म्हणाला.

गार्गी,“ सॉरी मी तुझ्याशी परवा रात्री भांडले म्हणून कदाचित तुला पुन्हा त्रास झाला आहे. मला कळायला हवं होतं की तू आजारी आहेस. सॉरी संग्राम!” ती रडत म्हणाली.

संग्राम,“ प्लिज यार गार्गी हे तुझं रडणं ना बंद कर. तुझं सारखं सारखं रडणं पाहून मला ना आता वैताग आला आहे आणि जर तुझ्या भांडण्यामुळे मला त्रास व्हायचा असता तर त्याच रात्री झाला असता पण तसं नाही झालं. कदाचित दगदग केल्यामुळे किंवा मग मी आधीच आजारी आहे त्यामुळे मला लो. बी.पी चा त्रास झाला असेल. तू जर अशीच सतत रडणार असशील तर आपण आजच माघारी जाऊ मुंबईला.” तो चिडून बोलत होता.

गार्गी,“ बरं मी नाही रडणार आता पण तू पुन्हा तुझी चीड चीड सुरू करू नकोस.” ती म्हणाली.

संग्राम,“ तसं तर मीच तुला सॉरी म्हणायला हवं. काल रात्री मी तुला साधं लव यु ही म्हणू शकलो नाही सगळ्यांसमोर!” तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला.

गार्गी,“ अच्छा! मग आता सॉरी म्हणण्यापेक्षा कालच लव यु म्हणायचे ना! पण मी तर काल खूप एन्जॉय केलं एका माणसाची उडालेली फजिती! त्याच लाजणं, ते ओठांचे थरथरने, लाल गाल, झुकलेले डोळे आणि तो सतत केसात फिरणारा हात!हे बघ फोटोपण काढून घेतला आहे मी!” ती त्याला चिडवत म्हणाली.

संग्राम,“म्हणजे माझी झालेली फजिती पाहून तुला मजा येत होती. थांब तुला सांगतो आता!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.

गार्गी,“ हो कारण ना खूप कमी क्षण असतात जेंव्हा माझा जी. डी .असा वागतो आणि कोण म्हणतं तू मला लव यु नाही म्हणालास ते; तुझ्या या किलर डोळ्यांनी मला सगळं सांगितलं. बरं आता उठ तुझं आवरू आपण मग नाष्टा कर औषध घे. तुला खूप त्रास झाला आहे रात्री संग्राम!” ती काळजीने त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती आणि तिचा मोबाईल वाजला. राज्ञीचा फोन होता.

राज्ञी,“ आंटी अंकू उठला का गं? त्याला काही त्रास तर नाही ना आता?” तिने काळजीने विचारले.

गार्गी,“ हो उठला आहे तो आत्ताच बोल त्याच्याशीच!” तिने असं म्हणून फोन संग्रामकडे दिला.

राज्ञी,“ अंकू बरा आहेस ना तू आता?”तिने विचारले.

संग्राम,“ हो मी अगदी ठणठणीत आहे.” तो म्हणाला आणि फोन गार्गीने घेतला.

गार्गी,“ आज वेगळे कोणते औषध देऊ का गं?” तिने विचारले.

राज्ञी,“नको नेहमी आहेत तेच दे. आंटी त्याच्यापासून जरा लांब ये मला तुझ्याशी बोलायचे आहे.” ती म्हणाली आणि गार्गी बेडवरून उठून गॅलरीत गेली.

गार्गी,“ बोल गं काही काळजी करण्यासारखे आहे का राज्ञी?” तिने काळजीने विचारले.

राज्ञी,“ आंटी त्याची कंडिशन काय आहे याची तुला पूर्ण कल्पना आहे. त्यात त्याला असा सारखं लो बी.पीचा त्रास होणं चांगलं नाही. तू त्याला दगदग करू देऊ नकोस. त्याचे जेवण-खाणे आणि औषधे वेळेवर दे. रात्री त्याला लवकर झोपायला लाव आणि जर तो नाही झोपला लवकर तर सकाळी जास्त झोपू दे. त्याला खूप जपायची गरज आहे.” ती काळजीने सांगत होती.


गार्गी,“ हो राज्ञी मी घेईन काळजी!” ती म्हणाली.
★★★

इकडे मुंबईमध्ये क्षितिजाने ऑफिसमधून आदिराजचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला फोन केला. आदिराज ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. त्याने अननोन नंबर पाहून फोन उचलला.

आदिराज,“ हॅलो आपण कोण बोलत आहात?” त्याने विचारले.

क्षितिजा,“ मी आहे आदी क्षितिजा पाटील!” ती म्हणाली.

आदिराज,“ क्षिती अगं कुठे गायब होतीस तू इतके दिवस झाले. मी तुझ्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला आणि काल भाईला भेटलीस म्हणे ऑफिसमध्ये तिथे तर तुझा मोबाईल नंबर ठेवायचा ना!” तो नाराजीने म्हणाला.

क्षितिजा,“ हो सांगते ना तुला भेटल्यावर आज भेटुयात का?” त्याने विचारले.

आदिराज,“ हो भेटू आपल्या कॉलेज जवळच्या कॅफेमध्ये संध्याकाळी सहा वाजता.” तो म्हणाला.

क्षितिजा,“ ठीक आहे.” ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला.
★★★

क्षितिजा ठरल्याप्रमाणे सहा वाजता कॅफेमध्ये हजर होती. आदिराज ही ऑफिसमधून तिला भेटायला कॅफेमध्ये पोहोचला.


क्षितिजा,“ तू काय घेणार?” तिने विचारले.

आदिराज,“ कॅफीचीनो! तू इतके दिवस कुठे गायब होतीस क्षिती?” त्याने विचारले.क्षितिजाने कॉफीची ऑर्डर दिली आणि ती बोलू लागली.

क्षितिजा,“ आधी मला सांग की संग्रामसरांना काय झालं होतं? ते कसे आहेत आता. अभिराज सर म्हणत होते की त्यांना सिव्हीयर स्ट्रोक आला होता आणि तो ही अभिराजसरांच्या मुळेच?” तिने काळजीने विचारले.

आदिराज,“तो असं म्हणाला तुला भाई आणि डॅडमध्ये ना काही फरक नाही क्षिती! हो डॅडला खूप सिव्हीयर स्ट्रोक आला होता तो अमरिकेहुन आल्यावर! त्याची कंडिशन खूप क्रिटिकल होती. त्याला मुदतीवर ठेवण्यात आले होते. क्षिती ते सहा तास माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण तास होते. डॅड एका एका श्वासासाठी लढत होता आणि आम्ही पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो. मी आयुष्यात सगळ्यात जास्त त्या दिवशी घाबरलो असेल डॅडला गमावण्याची भीतीने! पण तो या सगळ्यांतून सुखरूप बाहेर पडला तरी तो I. C. Uमध्ये असतानाचे पाच दिवस कसे काढले आहेत मी माझं मला माहित!(तो डोळे पुसत म्हणाला.) तो आता बरा असला तरी या स्ट्रोकचा परिणाम त्याच्या हार्टवर झाला आहे. त्याची खूप काळजी घ्यायला सांगितली आहे डॉक्टरांनी! डॉक्टरांच्याच म्हणण्यानुसार मॉम त्याला हवापालटासाठी उटीला घेऊन गेली आहे दहा दिवस.भाई जे काही तुझ्याशी वागला त्यानंतर तू भाईशी जे वागलीस. त्यात भाईचा झालेला तो अपघात या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर तो डॅडला कदाचित म्हणून भाई तुला असं म्हणाला असेल की त्याच्यामुळे डॅडला स्ट्रोक आला पण तू होतीस कुठे इतके दिवस? तुझा फोन देखील लागत नव्हता?आणि आता काकांची तब्बेत कशी आहे.” त्याने विचारले.

क्षितिजा,“ आदी संग्रामसरांना जो त्रास झाला त्याला मी ही कुठे तरी जबाबदार आहे रादर मीच जबाबदार आहे या सगळ्याला! अभीसरांशी रागाच्या भरात मी खूप चुकीचं वागले आहे पण जे झाले ते मी बदलू नाही शकत त्याची शिक्षा…. असो अरे माझा फोन पाण्यात पडला आणि बंद झाला. मी दुकानात दाखवला त्यातील नंबर तरी मिळतील म्हणून पण मोबाईलचा मदर बोर्ड पूर्ण डॅमेज झाला त्यामुळे सगळे नंबर गेले. मी त्याच नंबरचे सीम देखील मिळवण्याचा प्रयत्न केला पण मला नाही मिळू शकला तो नंबर! त्यामुळे माझ्याकडे कोणाचेच फोन नंबर नव्हते. त्यात बाबांची तब्बेत खूप नाजूक होती. त्यांना कधी ही हॉस्पिटलमध्ये न्यावे लागत होते त्यामुळे मी आईला एकटीला सोडून पुण्याला किंवा मुंबईला नाही येऊ शकले. असं ही दोन महिन्यांची रजा माझ्याकडे होतीच म्हणून मग राहिले मी तिथेच! कालच आले. बाबा आता ठीक आहेत.ऑफिसमध्ये गेले तर सुषमाकडून आणि मग अभीसरांकडून संग्रामसरांबद्दल कळले.” तिने सांगितले.

आदिराज,“ तुझ्यात आणि भाईत काय बोलणे झाले क्षिती? आणि तू शिक्षा वगैरे काही तरी म्हणालीस आणि बोलता बोलता थांबलीस? काय झाले नेमके तुमच्या दोघांच्यामध्ये.” त्याने विचारले.

क्षितिजा,“ आदी अरे अभिसर मला म्हणाले की ते एक वेळ मी त्यांच्याशी जे वागले त्यासाठी ते मला माफ करू शकतील पण माझ्यामुळे रादर त्यांच्यामुळे आमच्या दोघांच्या प्रेमामुळे संग्रामसरांना जो त्रास झाला त्यासाठी ते स्वतःला माफ करू शकत नाहीत तर मला कसे करणार? जर संग्रामसरांना त्या दिवशी काही झालं असतं तर ते तुला, गार्गी मॅडमला आणि आजी-आजोबांना काय तोंड दाखवणार होते? असे म्हणले ते. त्यांनी मला स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सांगितले आहे की मी एका त्रिकोणी आणि आत्मकेंद्रित फॅमिली मधील मुलगी आहे. मी तुमच्या फॅमिलीमधील नाती कधीच समजू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा मी त्यांच्यासमोर प्रेमाचा विषय काढू नये. आदी त्यांचं ही बरोबरच आहे माझ्यामुळे काही महिन्यांपासून तुमची फॅमिली दुःखात होरपळून निघाली आहे. मला अभिराज सरांनी दिलेली शिक्षा मान्य आहे.” ती हे बोलताना तिच्या डोळ्यातून कढ वाहत होते.

आदिराज,“ क्षिती अगं इतक्यात हार मानणार आहेस का तू? मला मान्य भाई खूप मनस्वी आहे. या जगात डॅड त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे पण डॅडला देखील हे आवडणार नाही की तो त्याच्यामुळे तुझ्यापासून दूर जाईल. तू त्याच आणि तो तुझं पहिले प्रेम आहात आणि पहिले प्रेम सहजासहजी विसरता येत नाही क्षिती!” तो तिला समजावत म्हणाला.

क्षितिजा,“मी तर माझ्या वागण्याने प्रेमात कधीच हरले आहे आदी! कदाचित हीच शिक्षा माझ्यासाठी योग्य आहे. मी खरं तर माझी ट्रान्स्फर पुन्हा मुंबईत करा म्हणून संग्रामसरांकडे विनंती करायला आले होते कारण मला अभिराजसरांची माफी मागून माझ्या प्रेमाची कबुली द्यायची होती पण आता मुंबईत पुन्हा ट्रान्स्फर करून मला अभिराजसरांना त्रास नाही द्यायचा. मी आजच पुण्याला माघारी जात आहे आणि तिथे ऑफिस जॉईन करत आहे. उद्या माझी रजा संपणार आहे. त्याआधी मला तुला भेटायचे होते. संग्रामसरांची आणि गार्गी मॅडमची चौकशी करायची होती. माझा मोबाईल नंबर तुझ्याकडे आहेच आता सेव्ह करून घे कधी आठवण आली तर फोन कर. आदी संग्रामसरांची काळजी घे. मी निघते.” ती कातर आवाजात म्हणाली आणि आदिराजच्या उत्तराची वाट ही न पाहता निघून गेली.

खरंच क्षितिराजच्या प्रेमाचा हा अंत होता का?
©स्वामिनी चौगुले






🎭 Series Post

View all