माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ४७

अभिराज गर्गीच्या समजावण्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडेल का?


भाग 47
इकडे बाहेर संग्राम मात्र खूप अस्वस्थ वाटत होता. आज अभिराजची जी अवस्था आहे ती त्याच्याच मुळे झाली आहे असे त्याला वाटत होते. त्याच्या स्वभावा प्रमाणे तो स्वतःलाच दोष देत होता. गार्गी त्याच्या शेजारी येऊन बसलेली देखील त्याच्या लक्षात आले नाही. गार्गीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो भानावर आला.

संग्राम,“ तू कधी आलीस?” त्याने विचारले.

गार्गी,“ तू कोणत्या तरी गहन विचारात होता तेंव्हा!” ती म्हणाली.

संग्राम,“ अभी कसा आहे मला ही भीती वाटतेय की तो डिप्रेशनमध्ये तर नाही जाणार ना?” तो काळजीने म्हणाला.

गार्गी,“ तो ठीक आहे आणि मी समजावले आहे त्याला त्यामुळे आता तो डिप्रेशन वगैरेमध्ये जाणार नाही. तू
नको काळजी करू पण तू कोणता विचार करत होतास ते सांग?” तिने त्याला रोखून पाहत विचारले.

संग्राम,“कोणताच नाही गं!” तो तिच्यापासून नजर चोरत म्हणाला. गार्गीने त्याचा हात धरला आणि त्याला सरळ बाहेर हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये नेले. ती त्याला घेऊन एका झाडाच्या आडोशाला उभी राहिली.

गार्गी,“ संग्राम मी तुला आज नाही ओळखत सगळं आयुष्य गेलं आपलं एकमेकांबरोबर! अभी बाबत जे झालं त्याच गिल्ट तुला आलं आहे ते कळत नाही मला असं वाटतंय का तुला?” तिने त्याला रोखून पाहत विचारले आणि संग्रामने धरून ठेवलेला बांध फुटला.

संग्राम,“ गार्गी मी कायमच कमी पडतो नाती निभावण्यात. मी आदी बाबतीत जी चूक केली तिच अभी बाबतीत केली मी त्याला नाही समजून घेतले. उलट त्यालाच गुन्हेगार समजून वेठीस धरले. त्याच्याशी कठोरपणे वागलो. क्षितिजा अभीशी चुकीचं वागत आहे हे मला माहित असून देखील मी तिला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला. मी मनात आणलं असतं तर इतकं सगळं घडलंच नसतं. मीच कायम चुकतो.” तो डोळ्यातले पाणी अडवत बोलत होता.

गार्गी,“ झालं मीच मीच करून? स्वतःला सगळ्या जगाचा गुन्हेगार आहे असं समजून? मला याच गोष्टीची भीती होती आणि तेच होत आहे. तू कुठेच कमी पडलेला नाहीस समजलं तुला? अभी मार्ग चुकला होता त्याला योग्य मार्गावर आणण्याचे काम तू त्याचा अंकल आणि गाईड बनून केले. राहिला क्षितिजा अभीशी जे वागली ते रोखण्याचा प्रश्न तर प्रश्न त्या दोघांचा होता. प्रेम आहे त्या दोघांचे एकमेकांवर आणि अशा वेळी तिसऱ्याने मध्ये पडू नये हेच योग्य आणि तू तेच केले. आता गिल्ट मनात घेऊन फिरू नकोस कळतंय का तुला मी काय म्हणते? जी.डी प्लिज सेन्सेटिव्ह असणे चांगले पण ओहर सेन्सेटिव्ह असणे त्रासदायक असते. तू स्वतःला सावर आणि अभी काही डिप्रेशनमध्ये वगैरे जाणार नाही. त्याला मी आपली स्टोरी सांगितली. तो सावरला आहे आणि लवकरच बरा होईल. बाकी त्याच्या नशिबात क्षितिजाचे प्रेम असेल तर त्याला नक्की मिळेल. तूच तर म्हणाला होतास आठवतं तुला!

तेरी किस्मत विच जो लिखया बंदे
ओ कोई ले नयी सकदा!
जो झोली रब ने दी हैं
उसमें से कुछ खो नयी सकदा!

अगर ओ साथ हैं तेरे
उसकी मेहेर हैं तुझ पे!
ओ भी मिल जाएगा
जो तेरा हो नयी सकदा!

या ओळींवर माझा पूर्ण विश्वास आहे कारण माझा माझ्या जी. डी वर विश्वास आहे.” ती त्याला मिठी मारत म्हणाली.

संग्राम,“ इतक्या वर्षानंतर ही तुला हे गाणं आठवतं?आणि तू अभीला आपली स्टोरी सांगितलीस?असं काय आहे आपल्या स्टोरीत विशेष?” त्याने तिला मिठीत घेत विचारले.

गार्गी,“ हो मग तुझा प्रत्येक शब्द मी माझ्या काळजावर कोरून ठेवला आहे. हो आपली स्टोरी सांगितली मी कारण आज अभी आयुष्याच्या ज्या वळणावर उभा आहे त्या वळणावर एके काळी मी उभी होते. अभीची जमेची बाजू ही आहे की क्षितिजा सुरक्षित आहे पण माझं प्रेम माझ्या मूर्खपणामुळे मृत्यूच्या दारात पोहोचले होत. इतकं सगळं घडून ही माझ्या जी.डी ने मला माफ केलं इतकंच नाही तर मला त्याची पट्टराणीपण बनवलं. तेच सांगितलं मी अभीला प्रेमाची परीक्षा आपण किती ही चांगली दिली तरी पास किंवा नापास करणं हे सर्वस्वी आपल्या प्रेमाच्या हातात असतं. तू तुझी प्रेमाची परीक्षा ही दिली आणि तुझे प्रायश्चित्त ही घेतलेस त्यामुळे तुझ्यावर आदीचा किंवा संग्रामचा आणि बाकी कोणाचा ही राग असण्याचा प्रश्नच नाही. आपली स्टोरी खास आहे कारण त्यात हिरो माझा जी.डी आहे. चल आता आणि जास्त विचार करू नकोस कळलं तुला! तुझी नाही पण तुझ्या लो. बी.पीची मला खूप भीती वाटते जी.डी.! ऐकत जा जरा माझं!” ती त्याच्यापासून लांब होत म्हणाली.

संग्राम,“बाप रे! गार्गी तू अजून त्याच जुन्या गोष्टी घेऊन बसलीस आणि मला वाटतं अभी आता लवकर बरा होईल त्याच्या आंटीने इतकं समजावून सांगितले आहे त्याला! गार्गी खरं तर ना तुझ्यावर आज खूप प्रेम येतय. तुला सोडली नसती अशीच पण ना ही वेळ आणि जागा ही ठीक नाही. पण लवकरच होईल सगळं ठीक मग तू आणि मी! लव यु!” तो तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारत कानात कुजबुजला.

गार्गी,“ लव यु टू! अँड आय एम युअर स्वीट हार्ट! आणि मी काय म्हणाले ते लक्षात आहे ना? उगीच गिल्ट घेऊ नकोस संग्राम प्लिज!” ती त्याला समजावत म्हणाली. संग्रामने नुसती होकारार्थी मान हलवली आणि दोघे पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले.

डॉक्टरांनी अभिराजच्या काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. त्याचे रिपोर्ट्स आले होते. डॉक्टर ते रिपोर्ट्स घेऊन आणि अभिराजला तपासून बाहेर आले. राज्ञी ही त्यांच्याबरोबर होती. सुशांतने त्यांना काळजीने विचारले.

सुशांत,“ डॉक्टर अभी कसा आहे आता?काळजी करण्यासारखे तर काही नाही ना?”

डॉक्टर,“ ब्लड टेस्ट आणि आणखीन काही टेस्ट करून घेतल्या आहेत त्याच्या! बाकी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल
आहेत पण हिमोग्लोबिन कमी आहे त्याचे तसेच पायाला ही चांगलीच मोठी जखम आहे त्यामुळे ताप ही आला आहे. लग्जमध्ये विषारी वायू गेल्यामुळे ते कमकुवत झाले आहे म्हणून त्याला आज श्वास घेताना त्रास झाला. कदाचित लग्जचा प्रॉब्लेम काही महिने राहील किंवा मग कायम स्वरूपी ही लग्ज कमकुवत होऊ शकतात. ते आपल्याला काही महिन्यांनंतर सांगता येईल. सध्या त्यांना आरामाची खूप गरज आहे. कमीत कमी महिनाभर त्यांना पूर्ण रेस्ट हवा. श्वसनाचा त्रास झाला की इंहेलरचा वापर करावा लागेल. कमीत कमी काही महिने तरी त्याला ते जवळ बाळगावे लागेल. पुढे त्रास कमी झाला तर प्रॉब्लेम नाही पण त्रास सुरूच राहिला तर मग मात्र कायम इंहेलर जवळ हवे.” त्यांनी सविस्तर माहिती दिली.

संग्राम,“ काय लग्ज कायम स्वरूपी कमकुवत असू शकतात? डॉक्टर माझा अभी फक्त पंचवीस वर्षांचा आहे आणि त्याला इतक्या लवकर असा त्रास?” त्याने कातर आवाजात विचारले.

राज्ञी,“ अंकू अरे काही महिने गेल्यावर ते कळेल आपल्याला की हे तात्पुरते आहे की कायमचे आणि इंहेलर जवळ बाळगून त्रास झाला तर वापरणे इतकी मोठी गोष्ट नाही. त्याला आजची रात्र I. C. U मध्येच ठेवावे लागेल. त्यानंतर चार दिवस रूममध्ये मग घरी घेऊन जाऊ. फक्त घरी त्याची महिना भर काळजी घ्यावी लागेल. तो ठीक आहे आता काळजी नका करू आणि गरज नाही लागणार पण लागलीच तर आपण सायकॉलॉजीस्टकडून त्याची ट्रिटमेंट करून घेऊ. तुम्ही सगळे त्याला भेटा आणि घरी जा मी आणि आदी आहोत इथे!” ती म्हणाली.

समिधा,“ बरं! मी आणि गार्गी भेटतो त्याला.”

डॉक्टरचे बोलणे ऐकून संग्राम मात्र काळजीत वाटत होता. आदिराज आणि सुशांतच्या ते लक्षात आले. ते पाहून सुशांत म्हणाला.

सुशांत,“ इतका विचार नको करुस संग्र्या! काही होणार नाही अभीला! तू उगाच टेन्शन नको घेऊस.”

संग्राम,“ हो!” तो इतकच म्हणाला.

अभिराज गार्गीच्या समजवण्यामुळे डिप्रेशन मधून बाहेर निघेल का? पण या काळात क्षितिजा कुठे होती?
©स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all