माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ४६

पुढे क्षितिराजची लव स्टोरी कोणते वळण घेणार होती?


भाग 46

गार्गी त्याच्या जवळ बसली आणि त्याला विचारले
गार्गी,“कसं वाटतंय तुला अभी?”

अभिराज,“ मी ठीक आहे आंटी पण हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलात तुम्ही? घरात राज्ञी होती ना!” तो वैतागून म्हणाला.

गार्गी,“ ती काही अजून डॉक्टर नाही झाली कळलं तुला? अजून तिची डिग्री पूर्ण व्हायची आहे.” ती म्हणाली.

अभिराज,“ हुंम बरोबर आहे तुझं!”

गार्गी,“ अभी तुला मी एक गोष्ट सांगणार आहे. एका सामान्य मुलीची आणि एका राजकुमाराची. एक सामान्य मुलगी होती. जी शिकायला हॉस्टेलमध्ये गेली. ती जिथं शिकत होती तिथे राजकुमार देखील शिकत होता पण एक सामान्य मुलगा बनून. तिथेच एक राजकुमाराच्या वेशात असलेला राक्षस देखील होता. त्या राक्षसाला ती मुलगी आवडली. तशीच ती राजकुमाराला देखील आवडत होती. पण आपला राजकुमार लाजरा-बुजरा होता. राजकुमार तर त्या मुलीच्या खिजगणतीतही नव्हता. याचाच फायदा घेऊन राक्षसाने त्या मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. राजकुमार मात्र सगळं पाहत होता. राक्षसाला राजकुमाराला ती मुलगी आवडते त्याच तिच्यावर प्रेम आहे हे माहीत होतं म्हणून मग त्या मुलीचा वापर करून राक्षसाने राजकुमाराचा अपमान केला आणि राजकुमार तो अपमान सहन करू शकला नाही. तो निघून गेला. इकडे राक्षसाला चेव चढला आणि त्या मुलीवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी कशी बशी त्याच्या तावडीतून सुटली पण तिने प्रेम हा शब्दच टाकून दिला. पुढे योगायोगाने राजकुमाराचेच स्थळ तिला सांगून आले. मुलगी ही लग्नाला तयार झाली कारण तिचे वडील मरणाच्या दारात होते आणि त्यांची शेवटी इच्छा होती की मुलीने लग्न करावे. मुलीने राजकुमारा समोर अटी ठेवल्या की ती कधीच त्याच्यावर प्रेम करू शकणार नाही. त्याची बायको होऊ शकणार नाही. राजकुमाराने तिच्या अटी मान्य करून त्या सामान्य मुलीशी लग्न केले. मुलगी मात्र हळूहळू राजकुमाराच्या त्याच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडली.

राजकुमाराने मात्र अजून ही त्याचे प्रेम व्यक्त केले नव्हते आणि मुलगी तिचे प्रेम व्यक्त करण्याच्या तयारीत होती पण अचानक पुन्हा राक्षस त्यांच्या आयुष्यात आला. त्याने राजकुमाराला बरबाद करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि ते त्या मुलीला कळले म्हणून तिने त्या राक्षसाशी प्रेमाचे नाटक सुरू केले त्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी पण राक्षसाने मात्र राजकुमाराला मुलीबद्दल चुकीचे काही बाही सांगितले. एवढेच नाही त्याला बोलावून मुलगी आणि तो कसे भेटतात आणि ती मुलगी कशी त्याच्या प्रेमात आहे हे देखील दाखवून दिले. राजकुमार मात्र आतल्या आत खचू लागला पण तो मुलीला काहीच बोलला नाही. मुलीने मात्र राक्षसा विरुद्ध पुरावे गोळा केले कारण तिला तिच्या राजकुमाराला वाचवायचे होते. एका समारंभात मुलगी राक्षसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार होती. त्या समारंभात तिने राक्षसाचा खरा चेहरा समोर आणण्याच्या आधीच राजकुमार मात्र तिच्यावर रुसून तिथून निघून गेला. राजकुमाराच्या मित्राने मात्र सगळं मोबाईलमध्ये शूट केलं होतं. मुलगी राजकुमाराच्या मागोमाग जाणार पण तिच्या दुर्दैवाने शत्रूंनी हल्ला केला. राजकुमार बाहेर आणि मुलगी आत अडकले. राजकुमार हार मानणाऱ्यातला थोडीच होता. तो शत्रूच्या गोठात घुसला शत्रूशी लढला आणि मुली बरोबर सगळ्यांचेच प्राण वाचवले पण मुलीला वाचवताना त्याला मात्र गोळी लागली. तो मृत्यूच्या दारात पोहोचला. तो कसा बसा वाचला पण मुली विषयी त्याच्या मनात गैरसमज होते.

तो मुलीला डोळ्यासमोर देखील उभा करत नव्हता. त्यातच राजकुमाराने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला पण मुलगी देखील खमकी होती. तिने आधीच तिच्या प्रेमाची परीक्षा दिलेली होती. तिने राजकुमाराला फरपटत परत आणले आणि त्याला तिने त्याच्याचसाठी राक्षसाचा पाडाव कसा केला ते दाखवले. तरी मुलीला भीती होती की राजकुमार तिला माफ करेल का? पण राजकुमार मोठ्या मनाचा होता. त्याने नुसतं मुलीला माफ नाही केलं तर तिला त्याची पट्टराणी देखील बनवलं! यातला राजकुमार आणि ती सामान्य मुलगी कोण आहे माहीत आहे का?” तिने विचारले.

अभिराज,“नाही.”

गार्गी,“यातला राजकुमार म्हणजे तुझा अंकू म्हणजेच संग्राम आहे आणि ती सामान्य मुलगी म्हणजे मी आहे. संग्रामने माझ्यावर मनापासून प्रेम केले आणि मी देखील त्याच्या प्रेमात वेडी झाले पण माझ्या एका चुकीच्या पावलामुळे संग्राम मृत्यूच्या खाईत लोटला गेला. मी चूक केली त्याला अंधारात ठेवून त्या राक्षसाला धडा शिकवायला गेले आणि त्या राक्षसाने त्याचाच फायदा घेतला. पण मी हार मानली नाही अभी! मी माझ्या प्रेमाची परीक्षा दिली आणि माझ्या राजकुमाराला मिळवले. माणसं आहोत आपण चुकणारच पण त्या चुकांची जाणीव होऊन त्याचे प्रायश्चित्त घेणे महत्त्वाचे असते. तू ही चुकलास पण त्याचे प्रायश्चित्त घेतलेस ना! क्षितिजाने तू महाबळेश्वर मधून निघून जावेस! हार मानावी म्हणून तुला किती आणि काय काय त्रास दिला हे सगळं आम्हाला माहीत आहे. तुझ्या अंकूने तुझ्यासाठी बॉडिगार्ड पाठवले होते ना दिनेश आणि सुजय ते रोज आम्हाला सगळं कळत होते.तू तुझ्या प्रेमाची परीक्षा दिलीस त्यासाठी तुझे शंभर नाही तर एकशे एक टक्के दिलेस ही आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण प्रेमाच्या परीक्षेची गमंत काय असते तुला माहीत आहे का? ” तिने त्याचा हातात हात घेऊन हसून विचारले.

अभिराज,“ काय?”

गार्गी,“ तुम्ही प्रेमाचा पेपर किती ही चांगला सोडवा पण तुम्ही पास होणार की फेल हे सर्वस्वी तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता तो ठरवत असतो बेटा! त्या दिवशी क्षितिजा तुला बोलली पण ती रागाच्या भरात बोलली कारण तू तिच्या मामाच्या कॉलरला हात घातलास. तिच्या दृष्टीने ते चूक होते. पण तिला जेंव्हा सत्य कळले तेंव्हा तिची तिलाच लाज वाटली. इतकं सगळं होऊन ही तू तिच्या वडिलांना स्वतःच्या जीवाची बाजी लावून वाचवलेस हे ही तिला चांगलच माहीत आहे. म्हणून ती तुझी माफी मागायला आणि आभार मानायला आली होती पण तू तिचे काहीच ऐकून घेतले नाही आणि तुझी कंडिशन पाहून आम्ही ही तुला काही बोललो नाही. आणि आमचा सगळ्यांचा तुझ्या अंकलचा, आदीचा राग तुझ्यावर कधीच नव्हता बेटा! तो होता तुझ्या चुकीच्या वागणुकीवर! जी चूक तू सुधारली आहेस. मग या सगळ्यात तू हारलास की जिंकला बेटा? विचार कर.”ती म्हणाली आणि जाऊ लागली तर अभिराजने तिचा हात धरला.

अभिराज,“ तुला काय म्हणायचे आहे ते आले माझ्या लक्षात आंटी! सॉरी मी आता नाही घेणार गिल्ट आणि चुकीचे देखील नाही वागणार.” तो म्हणाला

गार्गी,“ दॅट्स लाईक अ माय सन!” ती त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत त्याच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाली.

अभिराज,“ अंकूला सहसा राग येत नाही आणि चिडला तर तो कसा वागू शकतो मी अनुभवले आहे. म्हणजे तो तुझ्याशी तर कसा वागला असेल आंटी बापरे कल्पना पण करवत नाही.” तो म्हणाला.

गार्गी,“ हुंम तो दिसतो तसा नाही आ शांत सोज्वळ वगैरे खूप खतरनाक आहे तो!” ती हसून म्हणाली आणि त्यांचे बोलणे ऐकत सुशांत आत आला.

सुशांत,“ये माझ्या संग्र्याला काही बोलायचे नाही आ! परिणाम चांगले होणार नाहीत.” तो धमकी देण्याचे नाटक करत म्हणाला.

गार्गी,“ आले वकील संग्रामचे! नाही बोलत बाबा तुझ्या संग्रामला काही!”ती हसून म्हणाली.

अभिराज,“ पण आंटी तुमच्या लव स्टोरी मधला तो राक्षस कोण होता?” त्याने विचारले.

गार्गी,“ होता रे कोणी तरी सोड आता आणि आता बरं व्हा लवकर तुझा अंकू बसला आहे बाहेर तोंड पाडून आणि मी सांगितले त्यावर विचार नक्की कर बेटा!” ती म्हणाली.

पुढे क्षितिराजची लव स्टोरी कोणते वळण घेणार होती?
©स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all