माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ४५

गार्गी अभिराजला कशी समजावेल?


भाग 45
अभिराजने आदिराजच्या मदतीने त्याच सगळं आवरलं होतं आणि त्याच्या रूममध्ये संग्राम त्याला आवडतो म्हणून त्याच्यासाठी पास्ता घेऊन आला होता. आदिराजने ते पाहिले आणि तो काम आहे म्हणून तिथून निघून गेला.

अभिराज,“ अंकू तू आज माझ्यासाठी चक्क पास्ता घेऊन आलास?” त्याने विचारले. त्याला अधून मधून अजून ही ठसका लागत होता. त्यामुळे त्याला ठसका लागला आणि संग्राम त्याला पाणी देत म्हणाला.

संग्राम,“ आता तुला आवडतो म्हणून आणणारच ना!” तो त्याला म्हणाला.

अभिराज, “थँक्स!” तो म्हणाला.

संग्राम,“ देवू का रट्टा तुला आता अंकुला थँक्स म्हणणार तू?खा आता!” तो लटक्या रागाने म्हणाला.

अभिराज, “अंकु तू आदीने आणि बाकी सगळ्यांनी मला मनापासून माफ केलं आहे का रे?” त्याने विचारले.

संग्राम,“तुला काय वाटतं?” त्याने उलट त्यालाच विचारले.

कदाचित हाच प्रश्न अभिराजला सतावत असावा आणि संग्राम विषय काढणार तर त्यानेच विषय छेडला होता.

अभिराज,“ तुम्ही मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझी तब्बेत ठीक नाही म्हणून कदाचित मला माफ केले आहे. मी तर क्षितिजाची माफी नाही मिळवू शकलो. तिचे प्रेम तिचा विश्वास मी नाही मिळवू शकलो अंकु मी हरलो. मला वाटले होते की कदाचित ती मला माफ करेल पण तिने तरी मला माफ का करावे? मी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले! तिच्या बरोबर आदीच्या देखील चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तुझ्या आणि आंटीच्या संस्कारांचा अपमान केला. खरं तर मी कशाच्याच लायक नाही. क्षितिजा म्हणाली ते बरोबर आहे. मला असं वाटतं की तुम्हाला माझ तोंड दाखवण्यापेक्षा त्या आगीत मी होरपळून मेलो असतो तर बरं झालं असतं. मी तुमच्या प्रेमाच्या लायक नाही.” तो बडबडत होता आणि त्याला श्वास घेताना त्रास होत होता.

संग्राम,“ उगीच काही तरी बरळू नको अभी!तू तुझ्या चुकीचे प्रायश्चित्त घेतले आहेस म्हणूनच आम्ही तुला माफ केले आहे आणि उगीच अभद्र काही तरी मी ऐकून नाही घेणार. तू शांत हो बघ तुला त्रास होतोय. तिथून ही हट्ट करून आलास. इथे हॉस्पिटलमध्ये जावू म्हणाल तर ऐकल नाहीस. उगीच मनात गिल्ट घेऊन बसू नकोस.”तो त्याला समजावत बोलत होता.

अभिराज,“ अंकु माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. मी आहेच नालायक. मी हरलो आहे आय एम लुझर! मी सगळ्याच परीक्षेत हरलो प्रेमाच्या, नात्यांच्या, विश्वासाच्या, मी कशाच्याच लायक नाही. ना तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या! ना सहानुभूतीच्या!” तो बोलत होता आणि त्याला आता श्वास देखील घेणे जड जात होते.

संग्राम,“ तू शांत हो! राज्ञी ss!” तो घाबरून हाक मारत होता. तिथेच जवळपास असणारी राज्ञी पळत आली. बाकी सगळे ही आले.

राज्ञीने सगळ्यांना बाहेर उभं केलं. तिने अभिराजला तिने घरात आधीच आणून ठेवलेलं ऑक्सिजन लावले आणि कसले तरी इंजेक्शन दिले. ती बाहेर आली.

राज्ञी,“ आपल्याला भाईला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. त्याला पुन्हा श्वसनाचा त्रास होत आहे आणि त्याचा बी.पी ही वाढला आहे. कदाचित त्याच्या मनात असलेली सल त्याच्या शरीरावर परिणाम करत आहे. मी झोपेचे इंजेक्शन दिले आहे. त्यामुळे काही काळ त्याचे विचार थांबतील. आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ.” ती म्हणाली.

सुशांत,“ राज्ञी त्याला काही होणार तर नाही ना?” त्याने आवंढा गिळत विचारले.

राज्ञी,“ नाही डॅड त्याच्या जीवाला असा काही खूप मोठा धोका नाही पण मला भीती वाटते की तो डिप्रेशनमध्ये जाईल. त्याला त्या आधी आपल्याला या मनःस्थितीतुन बाहेर काढावे लागेल.” ती म्हणाली.

आदिराज,“ पण त्याला श्वसनाचा त्रास कशामुळे होतो आहे रादी?” त्याने विचारले.

राज्ञी,“ त्याच्या लंग्जमध्ये दोन दिवसापूर्वी जे विषारी वायू गेले आहेत त्यामुळे होतो आहे त्याला त्रास! त्यात हा हॉस्पिटलमध्ये राहिला नाही. हट्टाने आला घरी इथे हॉस्पिटलमध्ये चल म्हणलं तर ते ही नाही. त्याच्या पायाची जखम ही बरीच खोल आहे. त्याच्या शरीराला प्रॉपर ट्रीटमेंटची गरज आहे आणि मनाला उभारीची! दोन्हीचा परिणाम त्याच्यावर होत आहे असच सुरू राहिलं तर तो मनाने आणि शरीराने देखील खचेल आधीच त्याला कमालीचा विकनेस आहे. त्याच्या जीवाला धोका नसला तरी मला भीती आहे की त्याची प्रकृती खालावत जाईल.” ती काळजीने बोलत होती.

संग्राम,“ त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. मी गाडी काढतो.” तो म्हणाला.

गार्गी,“ संग्राम, राज्ञी तू आणि आदी तुम्ही तिघे अभीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला मी, सुशांत आणि समिधा तुमच्या मागे पोहोचतोय!”

ती म्हणाली आणि सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. राज्ञीने तिथल्या डॉक्टरांना आधीच सगळी कल्पना दिली होती त्यामुळे I. C. U रेडी होते. डॉक्टरांशी चर्चा करून राज्ञीने अभिराजची ट्रीटमेंट सुरू केली. त्याची ती अवस्था पाहून सगळ्यांनाच गलबलून येत होते. संग्राम मात्र अस्वस्थ होता. गार्गीच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने संग्रामला हात धरून बाजूला नेले.

गार्गी,“ संग्राम काय चालले आहे तुझ्या मनात?”तिने विचारले

संग्राम,“ काही नाही अभीची काळजी वाटते.”तो नजर चोरत म्हणाला.

गार्गी,“संग्राम मी तुला आज ओळखते का? काय चालले आहे तुझ्या मनात नक्की खरं खरं सांग आता?” ती त्याला रोखून पाहत म्हणाली.

संग्राम,“ गार्गी मी आदीच्या बाबतीत जी चूक केली तीच चूक अभीच्या बाबतीत केली. मी कमी पडलो त्याला समजून घ्यायला. त्याच्याशी खूप कठोर वागलो. त्याला मी जाताना आशीर्वाद देखील दिला नाही. तो चुकलाच होता पण त्याला समजून घेऊन समजवायला हवं होतं मी पण ते मला नाही जमलं. मला रोज दिनेश आणि सुजय त्याच्या विषयी अपडेट देत होते. मी मनात आणले असते तर क्षितिजाला त्याला त्रास देण्यापासून रोखू शकलो असतो पण मला वाटले ही त्याची लढाई आहे त्याची त्याने लढावी कदाचित मी चुकलो इथे ही! त्याला वाटतं की तो प्रेमाच्या परीक्षेत अपयशी झाला. आपण सगळ्यांनी त्याला माफ केले कारण तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याला मी महाबळेश्वरमध्ये ही समजावले होते आज ही समजावले की असे काही नाही पण तो मानायला तयार नाही. राज्ञी काय म्हणाली ऐकलेस ना? तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. प्रत्येक वेळी मीच का कमी पडतो गार्गी?” तो डोळ्यातले पाणी आडवत बोलत होता.

गार्गी,“ प्रत्येक वेळी कोणती ही वाईट गोष्ट तुझ्यामुळेच घडली असे का वाटत असते रे तुला? आदी आणि अभीच्या बाबतीत घडलेल्या दोन वेगळ्या घटना आहेत त्यांची सरमिसळ तू करू नकोस आणि तू अभीच्या बाबतीत वागलास ते योग्यच होतं. कोणत्या ही बापाला आपला मुलगा चुकला आहे म्हणल्यावर कठोर होणे भागच असते आणि तू देखील तेच केलंस. अभी आणि क्षितिजामध्ये तू हस्तक्षेप केला नाही ते देखील योग्यच होते. ती लढाईच अभीची होती आणि तो ती लढला. असो आता तुम्ही कोणीच त्याच्याशी बोलू नका. मी बोलते त्याच्याशी! तो डिप्रेशनमध्ये जाणार नाही याची गॅरेंटी माझी आणि तू भलता सलता विचार करून स्वतःला दोष देणे बंद कर. मूर्ख कुठला माणसाने सेन्सेटिव्ह असावे पण इतके ही नाही की सतत स्वतःला त्रास व्हावा. हा विषय इथेच बंद कळलं तुला!” ती त्याला दम देत म्हणाली.

संध्याकाळी चारच्या सुमारास अभिराजची तब्बेत सावरली.

राज्ञी,“ भाई आता ठीक आहे पण तीन-चार दिवस त्याला हॉस्पिटलमध्येच रहावे लागेल. आपण त्याला भेटू शकतो.”

गार्गी,“ राज्ञी मला त्याला एकट्याला भेटायचे आहे मी भेटू शकते ना?” तिने विचारले.

राज्ञी,“ हो जा तू भेट!” ती म्हणाली.

समिधा,“ गार्गी तूच त्याला या सिच्युएशनमधून बाहेर काढू शकतेस.” ती म्हणाली.

गार्गी,“ समिधा काळजी नको करुस. अभिशी काय बोलायचं ते मी बोलेन. तो लवकरच नॉर्मल होईल.” ती तिला आश्वस्थ करत म्हणाली आणि अभिराजला भेटायला गेली.

अभिराज छताकडे डोळे लावून शांत पडून होता. गार्गी त्याच्या जवळ खुर्चीवर जाऊन बसली.

गार्गी अभिराजला आता कशी समजावणार होती?
© स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all