त्यानंतर लिफ्टमधून ऑफिसचे दार उघडून आत प्रवेश केला तो म्हणजे संग्रामने! संग्राम म्हणजे आपला तोच संग्राम सरनाईक हो! तेच सुंदर डोळे, अजून ही तितकाच हँडसम आणि थोडा प्रौढत्वाकडे झुकलेल्या व्यक्तिमत्त्वातील तोच रुबाब! तीच पिळदार शरीर यष्टी!तो स्मित हास्य करत सगळ्यांचे गुड मॉर्निंग हसत मुखाने स्वीकारत त्याच्या केबीनमध्ये गेला आणि मिताली मस्टरवर सही करण्यासाठी रिसेप्शनिष्ट स्वप्नजा जवळ आली.स्वप्नजा अजून ही संग्राम ज्या दिशेने गेला तिकडे पाहत होती.
स्वप्नजा,“ यार मला कायम S. S सरांकडे पाहून मी जन्माला यायला खूप उशीर केला असं वाटतं ग! कारण जर मी पंचवीस वर्षे आधी जन्मले असते तर नक्कीच त्यांना पटवले असते आणि लग्न केले असते त्यांच्याशी! यार काय माणूस आहे हँडसम, तितकाच नम्र, शांत,सयंमी आणि समजूतदार! आणि स्माईल तर एकदम किलर आहे त्यांची! आणि या वयात देखील फिटनेस तर कमालच ग!” ती बोलत होती.
मिताली,“ हो ग मला गार्गी मॅडमचा हेवा वाटतो कायम! मी तर आता सुद्धा त्यांच्यात आणि माझ्यात असलेले वीस वर्षांचे अंतर ऍडजेस्ट केले असते. पण आपलं इतकं नशीब कुठे! आमच्या पदरात पडले आहे ते गबाळे ध्यान!” ती नाक मुरडत म्हणाली
ती बोलत होती आणि इतका वेळ दोघींचे बोलणे शांतपणे ऐकणाऱ्या सुशांतकडे तिचे लक्ष केले आणि तिने आवंढा गिळला! पण स्वप्नजाचे मात्र सुशांतकडे लक्ष नव्हते ती आपल्याच धुंदीत बोलू लागली.
स्वप्नजा,“ हो ग असला नवरा मिळायला भाग्य लागत आणि आपलं ते भाग्य नाही! कसले कातील दिसतात S.Sसर! बरं दिसण्याने नाही तर असण्याने पण ते सुंदर आहेत!कर्तृत्ववान ही आहेत” ती म्हणाली. मितालीला मात्र घाम फुटला होता.
सुशांत,“ संग्राम सर राहू दे! पण अभिराज सर आहेत की त्यांना तर संग्राम सरांची सावली म्हणतात ना सगळे!” तो म्हणाला.
स्वप्नजा,“ हो पण सावली ती सावलीच ओरिजनची सर त्याला कुठे आणि त्यांना S. S सरांची सावली सगळे म्हणत असले तरी फरक आहे दोघांच्यामध्ये S.S सर शांत आणि समजूतदार आहेत तर अभिराज सर मात्र खडूस आहे!S.S सरांची स्माईल पाहिली की अख्खा दिवस मस्त जातो आणि हे अभिराज सर त्यांना हसताना तर मी कधीच पाहिले नाही!” ती अजून ही वेगळ्याच दुनियेत होती.
सुशांत,“ मिस स्वप्नजा! भानावर या आता! म्हणजे स्वप्नाच्या दुनियेतून सत्यात या!”तो टेबल वर हात आपटत बोलला आणि स्वप्नजा भानावर आली
स्वप्नजा,“ स ss सर तुम्ही कधी आलात!” ती घाबरून म्हणाली आणि मितालीकडे तिने एकदा पाहिले. तिची मान खाली गेली.
सुशांत,“नाही म्हणजे तुमच्या दोघींची संग्रामवर लाईन मारून झाली?त्याला पाहून उसासे टाकून झाले असेल तर कामं करा जरा! की सांगू गार्गी मॅडमला त्या आता येतीलच; त्यांना सांगू की अभिराजला सांगू?” त्याला खरं तर त्या दोघींची गंम्मत वाटत होती पण त्याने तसं न दाखवता त्यांना दम देत विचारले.
स्वप्नजा,“ नको नको !सॉरी सर पुन्हा अशी चूक नाही होणार माझ्याकडून!” ती घाबरून म्हणाली.
सुशांत,“खरं का? नाही म्हणलं तुझ्या एवढा मुलगा आहे संग्रामला आणि काय वो मिताली मॅडम तुम्हाला तर..” तो पुढे बोलणार तर मिताली घाबरून म्हणाली.
मिताली,“ सॉरी सर पुन्हा आम्ही असं वागणार नाही!”
सुशांत,“बरं बरं कामं करा आता!” तो म्हणाला आणि निघून गेला. त्याच्या पाठोपाठ गार्गी ही आली.
तिघे ही कॉम्फरंस हॉलमध्ये बसले होते.
सुशांत,“ काय रे संग्र्या त्या स्वप्नजाला खंत आहे ती उशीरा जन्माला आली तेंव्हाच जन्माला आली असती तर तिने म्हणे तुला पटवलं असतं आणि ती मिताली तर वीस वर्षांचा फरक ऍडजस्ट करायला तयार आहे म्हणे! या पोरींवर काय जादू केली रे तू? की तरुण पोरांना ही कॉम्प्लेक्स देत आहेस. सगळ्या पोरी तुझ्यावरच लाईन मारतात!” तो बडबडत होता आणि संग्राम त्याला गप्प बस म्हणून खुणावत होता पण त्याच्याकडे सुशांतचे लक्ष नव्हते.संग्रामने गार्गीकडे एकदा घाबरून पाहिले.आणि सुशांत- गार्गी हसायला लागले. ते पाहून संग्राम देखील त्यांच्या हसण्यात सामील झाला.तोपर्यंत तिथे अभिराज एक फाईल आणि पेन ड्राइव्ह घेऊन आला.
अभिराज,“ झालं तुमचं हसून?डॅडा तुझ्यामुळे आंटी आणि अंकु बिघडले आहेत!” तो सुशांतकडे पाहत म्हणाला.
सुशांत,“ बघ संग्र्या इथे तर उलटी गंगा वाहत आहे!मी याला म्हणायचं पोरगा बिघडला म्हणून तर हाच मला म्हणत आहे की मी तुमच्या दोघांना बिघडवले म्हणून! माझा इथे असाच अपमान होणार असेल तर मी समी(समिधा)बरोबर आपल्या चॅरिटी ट्रस्टमध्ये जातो आता!” तो नाटकीपणे बोलत होता.
गार्गी,“ झाली का तुझी नौटंकी करून?” तिने हसून विचारले.
सुशांत,“ इथे कोणालाच माझी किंमत नाही मी आता येणारच नाही या ऑफिसमध्ये! हा तुझा पट्ट शिष्य आणि ही तुझी बायको काय तो गोंधळ घाला!” तो पुन्हा तोंड फुगवून म्हणाला.
संग्राम,“ अभी सुशा तुझा बाप आहे तर जरा भान ठेवत जा बाबा! नाही तर ही याची नौटंकी पाहून घ्यावी लागेल आपल्याला!” तो हसत म्हणाला आणि सगळेच हसायला लागले.
अभिराज,“ झालं का तुमचं? आता मी बोलू?” त्याने विचारले.
गार्गी,“ बोल!” ती म्हणाली.
अभिराज,“आपली कंपनी तशी आता ग्लोबल झाली आहेच आणि आपल्याला अमेरीकेमधील हेरीज सॉफ्टवेअर कडून आलेली पार्टनरशिपची ऑफर फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या महिन्यात त्या बाबत आपल्याला अमेरिकेत जावे लागणार आहे मिटिंगसाठी तर त्याच प्रोजेक्टवर आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून ही मिटिंग मी बोलावली आहे……” तो बोलला आणि बोलतच राहिला.
संग्राम,“ अभी तू म्हणतो तसंच आपण करू!” तो विचारपूर्वक म्हणाला.
अभिराज,“ ठीक आहे मी निघतो! मला कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर द्यायला जायचे आहे मी येतो!” तो हातातील घड्याळ पाहत म्हणाला आणि निघून गेला.
सुशांत,“संग्र्या आपल्याला मेहताकडे मिटींगला जायचे आहे त्याची तयारी करतो मी!” असं म्हणून तो ही निघून गेला.
आणि गार्गी मात्र संग्रामकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून तिच्या केबीनमध्ये निघून गेली. संग्राम मात्र आता थोडा घाबरला. तो त्याच्या केबीनमध्ये गेला आणि थोड्या वेळातच गार्गीच्या केबीनच्या दारात उभा राहिला. त्याने दारावर नॉक केले. गार्गी केबीनमध्ये लॅपटॉपवर काही तरी काम करत होती. ती लॅपटॉपवरून नजर न हटवता म्हणाली.
गार्गी,“येस!कम इन!”
संग्रामने केबीनचे दार लॉक केले आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला. गार्गीने त्याला एकदा मान वर करून पाहिले आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घालत ती म्हणाली.
गार्गी,“काय काम आहे संग्राम?”
संग्राम,“ का कामा शिवाय मी येऊ शकत नाही का?” त्याने विचारले
आणि तो तिच्याजवळ गेला. तिला त्याने जबरदस्तीने खुर्चीवरून उठवले. तो स्वतः खुर्चीवर बसला. त्याने तिला स्वतःच्या मांडीवर बसवून घेतले.तिने स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला पण संग्रामने तिला दोन्ही हाताने घट्ट मिठी मारली.
गार्गी,“ सोड संग्राम मला आपण ऑफिसमध्ये आहोत!” ती चिडून म्हणाली.
संग्राम,“ हो माहीत आहे मला पण हे ऑफिस माझे आहे आणि बायको ही माझी आहे!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
गार्गी,“ अच्छा! आणि त्या लाईन मारतात तुझ्यावर त्याच काय?आता काय बाबा जुन्या बायकोला कोण विचारणार म्हणा! इतक्या तरुण पोरी साहेबांच्या मागे लागल्या आहेत! ” ती त्याला चिडवत म्हणाली.
संग्राम,“हुंम म्हणजे जेलस झाल्या तर आमच्या मॅडम? आणि त्या लाईन मारतात तर त्यात माझा काय दोष गं? आणि बायको जुन्या दारू सारखी असते तिची नशा या आजकालच्या छोकऱ्यांमध्ये कुठून येणार!” तो तिला हसून म्हणाला.
गार्गी,“मी का जेलस होऊ?आणि जास्त लाडीगोडी नको लावूस तू! तसं ही दोष तुझाच आहे! माणसाने इतकं हँडसम का दिसावे बरं? त्यातून हा अनियन पिंक सूट आणि कातील स्माईल!” ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याच्या गालावरून बोट फिरवत लाडिकपणे म्हणाली.
संग्राम,“अच्छा जी! म्हणून मॅडम नाराज का? पण आमच्या मॅडम ही कमी नाहीत बरका! सुंदर आहेत खूप आणि या लेव्हेंडर पंजाबी सूटमध्ये तर कमाल दिसत आहेत! मग कोणाला पहायची गरज काय?आणि गार्गी माझ्यावर विश्वास नाही का तुझा?” त्याने तिला आणखीन जवळ घेत विचारले.
गार्गी,“ जी. डी तुझ्यावर विश्वास स्वतः पेक्षा जास्त आहे माझा पण ही प्रॉपर्टी फक्त माझी आहे कळलं तुला! माझ्या पप्पांनी पंचवीस वर्षा पूर्वी ही प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे ती ही विधिवत कळले तुला?” ती त्याला पाहत दम देत म्हणाली.
संग्राम,“हो मॅडम! ही प्रॉपर्टी तुमचीच आहे कायम पण विनाकारण मनधरणी करायला लागली त्याचे काही तरी बक्षीस मिळायला हवे ना!”
त्याने असं म्हणून तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन तिच्या ओठांचा ताबा घेतला. ती ही त्याच्यात विरघळत होती आणि दारावर थाप पडली.
सुशांत,“ गार्गी संग्राम आहे काय गं तुझ्या केबीनमध्ये? उशीर होतोय ना मेहताच्या ऑफिसमध्ये जायला!”
गार्गी,“ हो संग्राम आहे इथेच!” ती हसून संग्रामच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.
संग्राम,“ हा सुशा ना माझा दोस्त नाही दुष्मन आहे!” तो वैतागत हळूच तिच्या कानात म्हणाला.
गार्गी,“ त्याची काय चूक आहे जी.डी.!उगीच चिडचिड नको करुस आणि जा आता मिटिंगला!” ती त्याला समजावत त्याच्या ओठांची लिपस्टिक तिच्या ओढणीने पुसत म्हणाली आणि उठली.
संग्राम,“हुंम!नाही करत चिडचिड पण अर्धवट राहिलेले काम..” तो तिला पुन्हा जवळ ओढत तिच्या कानात हळूच म्हणाला आणि गार्गी त्याचे बोलणे मध्येच तोडत म्हणाली.
गार्गी,“ साहेब आपल्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली आता! हे सांगायची गरज आहे का? Love you gd!”ती डोळे मिचकावून त्याच्या कानात म्हणाली आणि संग्राम गोड हसला! पण बाहेरून मात्र सुशांतने पुन्हा दार वाजवले.
तिने जाऊन केबीनचे दार उघडले तोपर्यंत संग्राम देखील उठून उभा राहिली.
सुशांत,“ दार उघडायला इतका वेळ लागतो का?तुम्ही दोघे म्हणजे ना! बरं ते जाऊ दे गार्गी मी आणि संग्र्या मिटींगला जात आहोत आणि अभी पण बाहेर गेला आहे.तू एकटीच आहेस ऑफिसमध्ये!” तो पुढे बोलणार तर संग्राम त्यालामध्येच म्हणाला.
संग्राम,“ हे तिला माहीत आहे की तू सांगायची गरज नाही सुशा!चल!”
सुशांत,“ हो माहीत आहे तिला पण काय आहे ना ही सगळं विसरून जायची आणि हिच्या जी.डीची दिवा स्वप्न पाहत बसायची! एक तर मी डिस्टर्ब केलेलं दिसतंय…!”तो पुढे बोलणार तर संग्रामने त्याचे तोंड दाबले आणि त्याला ओढतच बाहेर नेले आणि जाता जाता तो गार्गीला म्हणाला.
संग्राम,“ ते खत्रीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच काम कुठे पर्यंत आले ते बघ गार्गी!”
गार्गीने मात्र लाजून मान खाली घातली होती. तिने त्याच स्थितीत होकारार्थी मान हलवली.ती बराच वेळ गालातल्या गालात हसत राहिली.
★★★★
★★★★
तर आजपासून तुमच्या भेटीला पुन्हा येत आहेत. तुमचे लाडके संग्राम आणि गार्गी प्रेमाचे एक नवीन पर्व घेऊन तर वाचत राहा माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २!फक्त इरावर
©स्वामिनी चौगुले