माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग 31

हे आलेले वादळ सगळ्यांच्या नात्यांवर काय परिणाम करणार होते?


भाग 31
आदिराज त्याच्याकडे जळजळीत नेत्र कटाक्ष टाकत म्हणाला.

आदिराज,“ सांगतो सगळं सांगतो तुला स्पष्टीकरण द्यायचे आहे म्हणून नाही तर इथे प्रश्न एका मुलीच्या एका चारित्र्याचा, स्त्रीच्या मानसन्मानाचा आहे म्हणून! त्या दिवशी लोणावळ्यावरून येताना क्षितिजाला एकटीला गाठून चार गुंडांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मी तिथे तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून पोहोचलो आणि तिला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले पण क्षितिजा खूप घाबरली होती. मी तिला पाणी प्यायला दिले आणि तिचे कपडे जागोजागी फाटले होते म्हणून शाल पांघरली. ती मला घाबरून बिलगली. तू तिथे पोहोचलास आणि आम्हाला रागावलास. मी तिला धीर देत होतो. तू समजतो तसं किस नव्हतो करत रे! किती घाणेरडे विचार रे तुझे! तितक्यात त्यातल्याच एका गुंडाने माझ्यावर लपून चाकु भिरकावला आणि तू मध्ये आलास. मला हाताला लागले होते ना ते गाडीच्या दारात हात अडकला म्हणून नाही तर गुंडांशी लढताना चाकू लागला होता मला! खोटं वाटत असेल तर विचार मम्मा-डॅड आणि आजी-आजोबांना!” तो अजून ही रागाने बोलत होता.

अभिराज,“ मग हे पोलिसांना का नाही सांगितले आणि हे सगळं आम्हाला कोणालाच कसं माहीत नाही?” त्याने आश्चर्याने विचारले.

गार्गी,“ हो खरं आहे हे आणि क्षितिजाला पोलीस वगैरेच्या फंद्यात पडायचं नव्हतं म्हणून पोलिसात तक्रार नाही केली आणि अशा गोष्टी जितक्या कमी लोकांना माहीत असतील तेच बरं असतं. आदिने ही आम्हा सगळ्यांना बजावलं होत की ही गोष्ट उंबरठ्याच्या बाहेर न्यायची नाही. आदि पण या सगळ्याचा त्या रात्रीच्या पार्टीशी काय संबंध?” तिने विचारले.

आदिराज,“ त्याचाच तर संबंध आहे ना मम्मा!अगं या माणसाला त्या रात्री शाल पांघरून ही क्षितिजाच्या हातांवर दिसत असणारे ओरखे नाही दिसले. तिच्या चेहऱ्यावरची जखम नाही दिसली तर दिसलं ते फक्त तिचं आणि माझं जवळ असणं! शी किती कोत्या मनाचा आहे हा! याने मला त्यानंतर अनेक वेळा अडून अडून विचारले क्षितिजा आणि माझ्यात काही आहे का म्हणून? ते का हे आज लक्षात आले माझ्या! आहे ना क्षिती आणि माझ्यात नाते कृष्ण आणि द्रौपदीचे इतके पवित्र आहे ते; ती माझी सखी आहे आणि मी तिचा सखा! तिचा भाऊ इतकं पवित्र नातं आहे आमच्यात! पण तुझ्यासारख्या नीच विचार करणाऱ्या माणसाला ते पवित्र नाते कसे कळणार म्हणा!”त्याचे बोलणे ऐकून अभिराज पायातून त्राण गेल्या सारखा सोफ्यावर आदळला. तो स्तब्ध होता.

सुशांत,“ काय? अभी काय बोलतोय बच्चू? तू इतका खालचा विचार केलासच कसा रे?” त्याने रागाने विचारले पण अभिराज मात्र स्तब्ध होता.

आदिराज,“ हे तर खूप कमी आहे अंकल अरे हा पार्टीत बॅक यार्डमध्ये का होता माहीत आहे का?त्याने क्षितिजाला तिथे नेले तिच्यावर मला आणि त्याला पैशासाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप केला. दोघां पैकी एक पटला तरी ती आयुष्य भर ऐश करेल म्हणे! तिला गोल्ड डिगर म्हणाला. वरून माझ्यापासून लांब रहा म्हणून धमकी दिली. अरे मूर्खा आम्ही दोघांनी कपल डान्स तुला जळवण्यासाठी केला आणि तू तिच्यावर असलेले प्रेम कबूल करशील म्हणून केला होता. इतकंच नाही गेल्या सात-आठ महिन्यांपासून हा तिला तिची नसलेली कामे देऊन छळत होता. ती बिचारी नोकरी सोडू शकत नव्हती कारण तिला गरज होती नोकरीची! म्हणून तिने डॅडकडून तिची बदली पुण्यात करून घेतली. याने क्षितिजाबरोबर अप्रत्यक्षपणे माझ्या ही चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. एका स्त्रीच्या स्त्रीत्वाचा, एका मुलीच्या प्रेमाचा, तिच्यात आणि माझ्यात असलेल्या पवित्र नात्याचा आणि मॉम-डॅडच्याच नाही तर तुमच्या सगळ्यांच्या संस्कारांचा अपमान केला आहे. त्याला भाई म्हणायला आज मला लाज वाटते. मिस्टर अभिराज सुशांत माळी मी आदिराज संग्राम सरनाईक आहे. गार्गी सरनाईकचा मुलगा संजय आणि मनीषा सरनाईकचा नातू त्यांचे रक्त वाहते माझ्या नसानसात आणि हो सुशांत माळी आणि समिधा माळीच्या संस्कारात वाढलो आहे मी! एखाद्या मुलीच्या चारित्र्याशी मी नाही खेळणार! आजपासून तू माझा कोणी नाहीस. मी तुला भाई म्हणायची तुझी लायकी नाही.” तो रागाने तणतणत होता.

हे सगळं ऐकून संग्राम मात्र स्तब्ध होता. त्याला ज्या मुलावर गर्व होता ज्या मुलावर विश्वास होता. ज्याला त्याने स्वतःच्या हाताखाली वाढवले होते तो मुलगा आज एका मुलीशी असं वागला होता. हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. संग्राम हात जोडून सुशांत पुढे उभा राहिला आणि डोळ्यात पाणी आणून बोलू लागला.

संग्राम,“ सुशांत मला माफ कर मी तुझ्या मुलाची जबाबदारी घेतली पण ती योग्य प्रकारे नाही निभावू शकलो. अभिराज आज क्षितिजा आणि आदिशी जो काही वागला आहे त्याला कुठे तरी मीच जबाबदार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली सुशांत तुझ्या मुलाला माझी सावली म्हणतात खरंच तो माझी सावली झाला. मी खरं तर त्याला माझ्या सावलीपासून ही लांब ठेवायला हवं होतं. मी चुकलो! मी हरलो सुशांत!मला माफ कर.” तो हात जोडून बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातून कढ वाहत होते. सुशांतने त्याचे हात हातात घेतले आणि तो त्याला मिठी मारून बोलू लागला.

सुशांत,“संग्र्या प्लिज असं बोलू नकोस. तुझं काही चुकलं नाही. तू तर एका छोट्या रोपट्याला योग्य आणि पोषक ते सगळं दिलं. त्याला वाढवलंस पण त्याने ते घेतलं नाही त्याला तू तरी काय करणार. तुझी जबाबदारी तू योग्य पध्दतीने पार पाडलीस आणि उगीच मागच्या गोष्टींचा या गोष्टीशी संबंध जोडू नकोस. तू तेंव्हा ही चुकला नव्हतास आणि आज ही चुकला नाहीस आणि अभिराजची तुझी सावलीच काय पण तुझी चप्पल सुद्धा बनायची लायकी नाही. जर नाणेच खोटे निघाले तर त्यात तुझा काय दोष?” तो त्याला समजावत होता. हे सगळं पाहून अभिराज उठला आणि तो संग्रामला म्हणाला.

अभिराज,“ अंकू माझं चुकलं तू….” रडत बोलत होता आणि संग्राम त्याच्यावर ओरडला.

संग्राम,“ खबरदार मला अंकू म्हणशील तर तुझी काय चूक म्हणा मी कमी पडलो कुठे तरी; इतिहासाची पुनरावृत्ती झाली …..” तो बडबड तिथून निघून गेला.

सगळे संग्रामच्या मागे गेले. संग्रामने स्वतःला त्याच्या रूममध्ये कोंडून घेतले.

संजयराव,“ चिनू दार उघड रे! उगीच आमच्या जीवाला घोर नको लावू बाबा!” ते कातर आवाजात बोलत होते.

गार्गी,“ दार उघड संग्राम प्लिज!” ती रडत म्हणाली.

अभिराज,“ अंकू ऐक ना रे माझं चुकलं.”तो घाबरून रडत बोलत होता.

संग्राम,“ बाबा मी ठीक आहे मला एकट्याला राहायचे आहे तुम्ही सगळे जा.” तो आतून म्हणाला.

मनीषाताई,“ ठीक आहे. आम्ही जातो पण गार्गीला तर येऊ दे ना रे आत!” त्या म्हणाल्या.

आदिराज,“ डॅड ऐक ना रे मम्माला तरी येऊ दे ना! तिने काय बाहेर झोपायचं काय?” तो दार वाजवत म्हणाला आणि संग्रामने दार उघडले.

गार्गीने सगळ्यांना डोळ्यांनीच आश्वस्त केले आणि जा म्हणून सांगितले. सगळे निघून गेले. गार्गी रूममध्ये गेली. तर संग्राम शून्यात नजर लावून आराम खुर्ची वर बसला होता. गार्गी त्याच्याजवळ गेली. त्याने गार्गीच्या कमरेला हाताने विळखा घातला आणि तो रडत बोलू लागला.

संग्राम,“ गार्गी अभीला माझ्यापासून दूर ठेवायला हवं होतं. मी त्याची जबाबदारी घ्यायला नको होती. माझ्याचमुळे तो क्षितिजाशी असा वागला. मी काही वर्षांपूर्वी तुझ्याशी जसा वागलो तसाच तो वागला. पण मी त्याला खूप चांगले संस्कार दिले गं! खूप चांगलं शिकवलं त्याला, आदि पेक्षा जास्त मी त्याच्यावर प्रेम, माया केली. मी कमी पडलो गार्गी त्याने एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि माझीच मान शरमेने झुकली.” तो हुंदके देत लहान मुलासारखं तिच्या कुशीत शिरून बोलत होता.

गार्गी,“ पहिलं तर तू स्वतःला दोष देणं बंद कर संग्राम! तेंव्हा ही तुझी चूक नव्हती चूक माझी होती आणि आज ही चूक तुझी नाही तर अभीची आहे. तू प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला गुन्हेगार ठरवणे बंद कर. आणि अभिराज चुकला आहेच. तो रस्ता चुकला आहे त्याला सरळ रस्त्यावर घेऊन येणे आपलेच काम आहे ना? मग असं खचून कसं चालेल. उठ आणि झोप चल खूप रात्र झाली आहे. उद्या आपण या विषयावर बोलू. मी आदिकडे जाते. तो जेवला ही नसेल.” ती त्याचे डोळे पुसत म्हणाली आणि संग्रामने होकारार्थी मान हलवली.

संग्राम,“ हो जा त्याला ही आज कोणाच्या तरी आधाराची खूप गरज आहे. मी येऊ का?” त्याने विचारले.

गार्गी,“ नको. तू झोप!” ती म्हणाली आणि गेली.

आपण बऱ्याचदा आपल्या मुलांवर खूप विश्वास ठेवतो. त्याला चांगल्या गोष्टी शिकवतो. चांगले संस्कार करतो. आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो. पण त्याच मुलाने चुकीचे पाऊल उचलले तर आपल्याला धक्का बसतो. तो असा का वागला असेल? आपण कुठे कमी पडलो? असे प्रश्न आपल्याला पडतात. याच मनःस्थितीतुन संग्राम जात होता. अभिराज त्याचा मान अभिमान होता पण तो आज चुकला होता आणि त्याचा धक्का मात्र संग्रामला बसला होता.

आलेले हे वादळ आता इतक्या वर्षांपासून जोपासलेली अनोखी नाती स्वतः बरोबर उडवून नेणार होतं का? की ही सगळी नाती घट्ट मूळ धरून तग धरून राहतील या वादळात ही?
© स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all