माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ९२

अभिराजसाठी दुसऱ्या मुली पाहणे योग्य आहे का?


अभिराज ऑफिसमध्ये गेला तर क्षितिजा तिच्या डेस्कवर नव्हती त्याने ते पाहिले आणि तो त्याच्या केबिनमध्ये गेला. त्याने त्याचे काम सुरू केले लंच ब्रेकमध्ये तो उठून बाहेर आला सगळे जेवायला निघून गेल्यामुळे ऑफिस तसे रिकामेच होते. क्षितिजा कदाचित लंच ब्रेकचीच वाट पाहत होती अभिराजशी बोलण्यासाठी ती त्याच्यासमोर आली आणि त्याला बोलू लागली.

क्षितिजा,“ सर काल काय झाले ते मला कळले आहे. तुम्ही प्लिज कुटुंबावर या सगळ्याचा राग काढू नका.” ती विनंती करत बोलत होती.

अभिराज,“ एक्स क्यूज मी! तू कोण आहेस हे मला सांगणारी? माझ्या कुटुंबाशी मी कसे वागायचे हे तू मला शिकवायची गरज नाही आणि या सगळ्या कटात तू पण सामील होतीस ना? माझ्यापासून दूर राहायचं कळलं तुला?” रागाने म्हणाला.

क्षितिजा,“ सर प्लिज मी तुमची असिस्टंट होते तीच पोस्ट मला कॅन्टीन्यू करू द्या ना. मी माझं काम निमूटपणे करेन.” ती त्याला विनंतीच्या सुरात म्हणाली.

अभिराज,“ माझे कुटुंब जे माझ्याशी वागले आहे ना त्याला तूच कुठे तरी जबाबदार आहेस क्षितिजा! जर पुन्हा तू अंकूला गळ घालून माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करशील तर मी इतका दूर निघून जाईल सगळ्यांपासूनच की पुन्हा काहीच तुला काय पण कोणालाच दिसणार देखील नाही.” तो तिला म्हणाला आणि निघून गेला क्षितिजा मात्र त्याच्या अशा बोलण्याने हतबल झाली होती.
★★★

त्या घटनेला घडून आज आठ दिवस झाले होते. अभिराज त्या दिवसापासून घरात कोणाशी एक शब्द देखील बोलला नव्हता ना त्याने घरात जेवण केले होते. तो सकाळी लवकरच ऑफिसला निघून जायचा ते रात्री बाराच्या पुढे घरी यायचा. संग्राम आणि बाकी सगळे त्याचे हे वागणे पाहत होते. आज ही तो बारानंतर घरी आला. अंधारात जिना चढून जाऊ लागला तर कोणी तरी लाईट लावली. त्याने मागे वळून पाहिले तर संग्राम, सुशांत, गार्गी आणि समिधा होते.

अभिराज,“ तुम्ही अजून जागे आहात?” त्याने विचारले.

संग्राम,“ मुलगा जेंव्हा आई बापाला टाळू लागतो तेंव्हा त्या आई-बापाला झोप कशी येईल?” तो म्हणाला.

अभिराज,“ मी जातो मला झोप येतेय.” तो म्हणाला आणि जिना चढू लागला.

संग्राम,“ थांब अभिराज मला तुझ्याशी बोलायचे आहे.(तो ते ऐकून थांबला. ) कुठे होतास तू इतका वेळ आणि जेवण केलंस का?” त्याने विचारले.

अभिराज,“ का तुला कळलं नाही अजून तुझ्याकडे तर किती गुप्त हेर आहेत त्यांनी सांगितले असेल की!” तो तिरकसपणे म्हणाला.

सुशांत,“ कसं बोलत आहेस तू संग्रामशी?” तो चिडून म्हणाला.

संग्राम,“ थांब सुशांत! हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही अभिराज.”तो पुन्हा म्हणाला.

अभिराज,“ मी ऑफिसमध्येच होतो आणि जेवण करून आलो आहे! मिळाले उत्तर आता जाऊ?” त्याने विचारले.

गार्गी,“ अभी गेले आठ दिवस झालं तू घरी जेवत नाहीस. बेटा तुला बाहेरच्या खाण्याचा त्रास होतो. उगीच का म्हणून तू तब्बेतीशी खेळत आहेस स्वतःच्या?” तिने काळजीने विचारले.

अभिराज,“ आपले म्हणवणारे लोक ज्यांच्यावर माझी प्रचंड विश्वास म्हणण्यापेक्षा श्रद्धा होती त्यांनी भावनांशी आणि मनाशी खेळले तर चालते मग मी चार दिवस बाहेर खाल्ले तर मरणार नाही लगेच.” तो संग्रामला तिरकस पाहत म्हणाला.

संग्राम,“ ठीक आहे तुला जर वाटत असेल की मी चुकीचा वागलो तर आय एम सॉरी! माझं चुकलं.” तो हात जोडून म्हणाला.

समिधा,“ संग्राम तू प्लिज असलं काही करून आम्हाला लाजवू नकोस. तू ज्याला चालायला बोलायला शिकवलं त्याची माफी मागणार का?” ती डोळे पुसत म्हणाली.

अभिराज,“ झाले तुमच्या लोकांचे ड्रामे करून तर मी जातो.” तो निर्विकारपणे म्हणाला आणि निघाला.

संग्राम,“ तुझ्या आयुष्यात माझे काय स्थान आहे? की माझ्या एका कृत्यामुळे मी तुझा आता कोणीच नाही? याचे उत्तर दे आणि जा मी तुला इथून पुढे कधीच बोलणार नाही आणि विचारणार ही नाही.” तो आवंढा गिळत म्हणाला. त्याच्या अशा प्रश्नाने अभिराज तिथेच थबकला आणि वळून खाली आला.

अभिराज,“ हा प्रश्न मला विचारायला तुला काहीच वाटत नाही ना अंकू? माझ्या आयुष्यातील तुझे स्थान एका घटनेने डळमळीत होईल इतके तकलादू वाटले का तुला? मी नाराज आहे तुमच्या सगळ्यांवर पण याचा अर्थ असा होतो का की तुमची आणि माझी नाती बदलतील? की मला नाराज होण्याचा देखील हक्क नाही आता?” तो कातर आवाजत म्हणाला.

संग्राम,“ बरं! आणि नाराज होण्याचा रुसून बसण्याचा तुला हक्क आहे पण तुला मनवण्याचा माझ्याकडे वेळ आहे की नाही मला माहित नाही. तू मला गुरू मानतोस ना?” त्याने विचारले.

अभिराज,“ तू माझ्यासाठी गुरुच नाही तर त्या ही पेक्षा जास्त आहे तुला नाही समजणार ते आणि असलं काही तरी बोलून तू मला इमोशनल ब्लॅकमेल नको करुस आ अजून!” तो त्याला पाहत म्हणाला.

संग्राम,“ ठीक आहे इमोशनल ब्लॅकमेल नाही करत तुला तर व्यवहारीकच बोलतो. मला तुझ्याकडून गुरूदक्षिणा हवी आहे.” तो त्याला रोखून पाहत म्हणाला.

अभिराज,“ गुरूदक्षिणा? तू जर मला गुरूदक्षिणेच्या रुपात क्षितिजाशी लग्न कर म्हणणार आसशील तर ते जमणार नाही. बाकी माझा जीव माग मी देईन.” तो ठामपणे म्हणाला.

संग्राम,“ तुझं क्षितिजावर प्रेम आहे की नाही?मला खरं उत्तर हवं आहे.” त्याने त्याला पाहत विचारले.

अभिराज,“ खोटं नाही बोलणार हो आहे माझं तिच्यावर प्रेम पण प्रेम आणि लग्न यात खूप फरक आहे. ती आपल्या घरासाठी योग्य मुलगी नाही. ती नाही समजू शकणार आपली नाती, आपल्या भावना त्यामुळे मी तिच्याशी लग्न नाही करू शकत आणि तुला जर गुरुदक्षिणाच हवी असेल तर दुसरं काही ही माग.” तो म्हणाला.

संग्राम,“ ठीक आहे. मला तुझं लग्न पहायचं आहे ही माझी गुरुदक्षिणा आणि शेवटची इच्छा समज कारण राज्ञीने त्या दिवशी जे सांगितले ते सगळं खरं होत फक्त त्यातलं एकच वाक्य खोटं होतं. मला माझा भरवसा आता वाटत नाही. तुझी जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मला मी या जगातून जाण्याआधी पूर्ण करायची आहे.” तो म्हणाला.

अभिराज त्याच बोलणं ऐकून स्तब्ध झाला. खरं तर त्याला संग्रामच्या अशा बोलण्याचा थोडा राग आला होता आणि दुःख ही झाले होते. त्याला संग्रामला कडकडून मिठी मारावी आणि असं काही पुन्हा बोलशील तर यादराख असं म्हणून दम द्यावा वाटत होते पण त्याने स्वतःला कसेबसे सावरले होते.

अभिराज,“ पहिले तर उगीच काही ही बरळू नकोस तू, काही होणार नाही तुला आणि अंकू लग्न करायला मुलगी लागते ती मिळायला हवी ना?” तो म्हणाला.

संग्राम,“ तू माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार का? मला गुरुदक्षिणा देऊन का ते सांग आधी?” त्याने विचारले.

अभिराज,“ पुन्हा तेच मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला तयार आहे आणि गुरुदक्षिणा ही द्यायला तयार आहे.” तो म्हणाला.

संग्राम,“ तुला क्षितिजाशी लग्न नाही ना करायचं तर ठीक आहे. तुझ्यासाठी मी मुलगी पाहीन तू लग्न करशील का?हीच माझी गुरुदक्षिणा असेल असं समज.” त्याने विचारले.

अभिराज,“ ठीक आहे क्षितिजा सोडून तू सांगशील त्या मुलीशी मी लग्न करेन.” तो म्हणाला आणि निघून गेला.

गार्गी,“ हे काय केलंस तू संग्राम अरे तो मूर्ख त्याला कळत नाही की प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्याबरोबर असं केलं तर माणूस आयुष्यात सुखी नाही राहू शकत त्यात या मूर्ख मुलाचे प्रेम याच्यासमोर आहे तरी हा मनात अढी घेऊन बसला आहे आणि तू त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न कर म्हणत आहेस?”ती रागाने विचारले.

संग्राम,“ गार्गी तो हट्टी आहे. तो नाही करणार आता क्षितिजाशी लग्न आणि आत्ता त्याचे लग्न आपण नाही केले तर तो असाच राहील बिनलग्नाचा! सुशांत त्याच्यासाठी योग्य मुलगी पाहून आपण त्याचे लग्न करून द्यावे असे मला वाटते. तुला काय वाटतं?” त्याने विचारले.

सुशांत,“ संग्राम माझ्यापेक्षा अभीवर तुझा जास्त अधिकार आहे आणि त्याच्या बाबतीत तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल.” तो म्हणाला.

संग्राम,“ ठरलं तर मग उद्यापासून अभीसाठी मुली पहायला सुरुवात करू.” तो म्हणाला आणि सुशांतने होकारार्थी मान हलवली आणि सगळे झोपायला निघून गेले.

अभिराज हट्टाला पेटून क्षितिजाशी लग्न करायला तयार नाही. त्यामुळे संग्रामने त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार केले ते योग्य आहे का? आणि पुढे या निर्णयाचा यांच्या नातेसंबंधावर काय परिणाम होणार होता?

©स्वामिनी चौगुले




🎭 Series Post

View all