माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ५

This Is A Love Story


भाग 5
आठ दिवस असेच निघून गेले.ऑफिसचे काम रोजच्या प्रमाणे सुरू होते. सुशांत संग्रामच्या केबीनमध्ये काही तरी डिस्कशन करत होता आणि तिथे अभिराज आला.

अभिराज,“मला आज ही कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर आहे. मी जातो आणि तासा भरात परत येतो.” तो म्हणाला. निघून गेला.

संग्रामने नुसती होकारार्थी मान हलवली आणि सुशांत बोलू लागला.

सुशांत,“ संग्र्या हा अभी आज काल सारखाच जातोय रे बच्चूच्या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर द्यायला.काही कळत नाही मला!”

संग्राम,“अरे तो त्याच कॉलेजमध्ये शिकला आहे त्यातून U. S मधून शिकून आला आहे. दोन वर्षे झालं चांगलं काम करतो कंपनीत आपल्या म्हणून बोलवत असतील त्याला लेक्चरला.” तो समजावत म्हणाला.

सुशांत,“याचा बाप आहे मी, याला चांगलं ओळखतो. बघ हा उगीच नाही जाणार सारखं कॉलेजमध्ये!नक्कीच काही तरी भानगड आहे.” तो संशयाने म्हणाला.

संग्राम,“काही असेल तर कळेलच की आपल्याला!” तो म्हणाला आणि सुशांतने ही त्याला दुजोरा दिला.
★★★

इकडे अभिराज कॉलेजमध्ये पोहोचला. नेहमीप्रमाणे सॉफ्टवेअर इंजरींयगच्या लास्ट इयर म्हणजेच डिग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लेक्चर द्यायला त्याला बोलवले होते. आदिराज देखील लास्ट इयरला होता. तो कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता अर्थात अभिराजने देखील कॉलेजमध्ये असताना कधीच टॉपची पोजिशन सोडली नव्हती.

अभिराज क्लासमध्ये आला आणि आदिराजने क्षितिजाला डोळ्यांनी खुणावले! क्षितिजाने त्याला लटक्या रागानेच डोळे वटारून पाहिले. क्षितिजा पाटील नाकीडोळी नीटस,मोठे चॉकलेटी डोळे, हनुवटीकडे निमुळता होत गेलेला चेहरा,सावळा रंग, काळे भोर लांब सडक केस आणि सडपातळ शरीरयष्टी! सावळी असली तरी अगदी आकर्षक व्यक्तिमत्त्वाची क्षितिजा तितकीच हुशार देखील होती. गेल्या सहा महिन्यांपासून अभिराज कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर द्यायला यायचा आणि तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायचा. त्यातून त्यांची नजरानजर झाली. दोघांना ही एकमेकांविषयी ओढ वाटायला लागली. दोघे ही एकमेकांना आवडत होते पण अजून तरी पुढे येऊन कोणीच तशी कबुली दिली नव्हती. जे काही दोघांमध्ये सुरू होत ते फक्त डोळ्यांनीच!

अभिराजने लेक्चर दिले आणि नेहमी प्रमाणे क्षितिजा तिची शंका विचारायला उठली. अभिराजने गालात हसत तिच्या शंकेचे निरसन केले. ती ही हसली दोघांची नजरानजर झाली. लेक्चर संपवून अभिराज निघून गेला. आदिराज मात्र क्षितिजाला चिडवत म्हणाला.

आदिराज,“ आँखों ही आँखों में इशारा हो गया! बैठे बैठे जिनका सहारा हो गया!क्षिती अग किती दिवस तुमच्या दोघांचे हे आँखों आँखों में चालणार आहे? गेल्या सहा महिन्यात हेच सुरू आहे? तूच प्रपोज कर आता भाईला!नाही तर मीच तुला प्रपोज करतो बघ.” तो हसून तिला चिडवत म्हणाला.

क्षितिजा,“ आदि अरे ते अभी सर भेटले तर पाहिजेत काही बोलले तर पाहिजेत त्या शिवाय मला कसं कळणार की त्यांच्या मनात काय आहे.” ती गंभीर होत म्हणाली.

आदिराज,“ एवढंच ना? मग हा चान्स तुला मी देतो. परवा आमच्या घरी पूजा आहे. & You are invited!बघा काय जमतंय का?” तो पुन्हा तिला चिडवत म्हणाला.

क्षितिजा,“ thanks! You are my best friend!” ती त्याचा गाल ओढत म्हणाली.
★★★

दुसरा दिवस उजाडला. गार्गीची मात्र सकाळ पासून लगबग सुरू होती. तिने सुशांत आणि समिधाला बोलावून घेतले होते. उद्या पूजा होती कारण 10 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे संग्रामला चोवीस वर्षांपूर्वी याच दिवशी गोळी लागली होती आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला होता. गार्गी याच दिवशी दर वर्षी महामृत्यजय यज्ञ करत असे तसेच संग्रामाच्या दीर्घ आयुष्यासाठी एक पूजा करून घेत असे. संग्रामच्या नावाने ती या दिवशी गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान देखील करत असे. त्याच संदर्भात बोलायला तिने दोघांना बोलावले होते. संग्राम, अभी आणि आदि, आई,बाबा सगळेच तिथे हजर होते.

गार्गी,“ समी जे दान करायचे आहे त्याची सगळी तयारी झाली आहे ना तू एकदा पाहून घे ना प्लिज!”ती म्हणाली.

समिधा,“ हो गार्गी सगळी तयारी झाली आहे. दर वर्षी आपण हे सगळं करतो ना? मी जेवण बनवायला आपल्या नेहमीच्या केटरर्सला सांगितले आहे. उद्या बरोबर दहा वाजता तो आपल्या आश्रमात जेवणाचे पॅकेट्स घेऊन येईल. हो कपडे देखील आले आहेत ग त्यात ब्लॅंकेट्स आणि साड्या, शर्ट पॅन्ट सगळं आहे मी चेक केलं आज! सगळं आश्रमात आहे. उद्या आश्रमातील काही मोठी मुले आणि काही लोक सगळं वाटतील व्यवस्थित तू नको काळजी करू.”तिने सगळं सांगितले.

गार्गी,“ बरं थँक्स समी! सुशांत पूजेची व्यवस्था झाली का?” तिने विचारले.

संग्राम,“दर वर्षी तेच प्रश्न विचारून तू बोर होत नाही का ग गार्गी? त्याने सगळी व्यवस्था केली आहे. दर वर्षी प्रमाणे सकाळी आठ वाजता गुरुजी येतील मग पूजा यज्ञ सगळं होईल आणि दर वर्षी प्रमाणे तू माझं काहीच न ऐकता निर्जळी उपवास करणार!उद्या मला ऑफिसला जायला बंदी, मी कुठेच बाहेर जायचे नाही एकून काय उद्या माझ्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा आहे.” तो वैतागून म्हणाला आणि सगळे हसू दाबून संग्रामकडे पाहत होते.

गार्गी,“ झालं तुझं बोलून? आता मी बोलू? (तिने रागाने विचारले आणि पुढे बोलू लागली) उद्या सगळे सकाळी मला हजर हवेत आणि राज्ञी कधी येणार आहे ग समी?”तिने विचारले.


समिधा,“ आज संध्याकाळी येईल ती!” ती म्हणाली.

गार्गी,“ बरं आई-बाबांचे रेग्युलर चेकअप होईलच. संग्रामचा बी.पी देखील तपासून घ्यायचा आहे.”ती म्हणाली.

संग्राम,“ माझा बी.पी आणि तो का चेक करायचा गार्गी?मी ठणठणीत आहे अगदी!” तो चिडून म्हणाला आणि निघून गेला.

मनीषाताई,“गार्गी अग चिडला ना तो बघ बाई!त्याला एक तर तू असा उपवास वगैरे करणे पटत नाही. त्यातून तू त्याला घरात बसवून ठेवतेस मग त्याची आणखीन चिडचिड होते. गार्गी मला मान्य तुझं प्रेम आहे त्याच्यावर आणि तुला त्याची काळजी वाटते पण ‘अति सर्वत्र वर्जते!’ या उक्ती प्रमाणे अति प्रेम आणि काळजी समोरच्या माणसाचा जीव गुदमरणार नाही याची काळजी घ्यावी. जा आता समजाव त्याला!” त्या तिला समजावत म्हणाल्या. गार्गी ज्यूस घेऊन रूममध्ये गेली.

संग्राम आरशात पाहून शर्ट घालत होता.त्याला गार्गी आरशातून येताना दिसली पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.गार्गीने ज्यूसचा ग्लास कॉर्नन पिसवर ठेवला आणि संग्रामाच्या जवळ गेली. त्याला तिने स्वतःकडे वळवून घेतले.संग्रामने शर्टच्या गुंड्या अर्धवटच लावल्या होत्या. त्यातून त्याची उघडी छाती दिसत होती. त्याच्या डाव्या छातीवर अजून ही गोळी लागलेला व्रण तसाच होता. गार्गीने त्याच्या व्रणावरून हळुवार हात फिरवला आणि तिने त्याच्या उघड्या छातीवर डोके ठेवले.

संग्राम,“ सोड बरं गार्गी मला उशीर होतोय.” तो थोडा रागानेच म्हणाला.

गार्गी,“ काही उशीर वगैरे होत नाही. इतकं चिडून तोंड फुगवायला काय झालं रे तुला?” ती त्याला आणखीन घट्ट मिठी मारत विचारत होती.

संग्राम,“ तुला माहीत नाही का? गार्गी अग ती घटना घडून चोवीस वर्षे लोटून गेली आहेत पण तू मात्र ती घटना स्वतः विसरत नाहीस आणि आम्हाला ही तुझ्या अशा वागण्याने ती विसरू देत नाहीस.अजून ही तू या दिवशी सैरभैर होतेस. पूजा पाठ सगळं ठीक आहे. मी तुला ते करू नको असे कधी म्हणालो का? पण तू गेले चोवीस वर्षे झाले स्वतःला त्रास करून घेतेस. निर्जल उपवास करतेस. दिवस भर रेस्टलेस असतेस. मी जरा नाही दिसलो की घर डोक्यावर घेतेस.मला काही ही झालं नाही गार्गी आणि होणार ही नाही मग इतका अट्टाहास कशासाठी? Let it go!” तो तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला समजावत होता.

गार्गी,“ मला सगळं कळतं पण वळत नाही संग्राम! तुला नाही माहीत तो प्रसंग अजून ही आठवला तरी माझ्या जीवाचा थरकाप होतो. खूप काळ लोटला आहे त्या घटनेला पण मला मात्र 10 फेब्रुवारीची भीती वाटते. पूजा पाठ तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी आहे कळलं तुला आणि मी उपवास करते माझ्या समाधानासाठी! एक दिवस घरात राहिलास माझ्या समोर तर काय फरक पडतो रे? मला भीती वाटते की या दिवशी तुला काही झालं तर कारण 10 फेब्रुवारी ही तारीख आपल्यासाठी चांगली नाही. कळलं तुला?माझ्या समाधानासाठी ऐकत जा ना माझं प्लिज! You are my life! Everything for me! I love you!” ती त्याचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.

संग्राम,“ मी ना तुला समजावून थकलो आहे गार्गी आता! तुला काय करायचं ते कर तू, & I know you love me and I am also love you darling!”असं म्हणून त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.

गार्गी,“ बरं ज्यूस पी, आला लगेच तोंड फुगवून नाष्टा अर्धवट सोडून.” तिने त्याच्या शर्टची कॉलर सरळ करून त्याच्या शर्टची बटणे लावून दिली. त्याच्या हातात ज्यूसचा ग्लास देत म्हणाली आणि कपाटातून कसला तरी बॉक्स आणि एक मोठे बदामाच्या आकाराचे फोल्डर काढले.

तिने बेडवर बसत ते फोल्डर उघडले तर त्यात व्हेल्वेटच्या मखमली कपड्याचे बरेच लाल चुटुक गुलाब होते. तिने तिच्या जवळचा बॉक्स उघडला आणि त्यातला एक लाल गुलाब काढला आणि त्या फोल्डरमध्ये खोवला.हसून त्या फोल्डरवर प्रेमाने हात फिरवत तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

“189 झाले हे!”

ते पाहून संग्राम तिच्या जवळ टाय बांधत गेला आणि हसून तिला विचारले.

संग्राम,“ वेडी आहेस तू गार्गी! किती झाले गुलाब?”

गार्गी,“ आज 189!” ती हसून म्हणाली.

संग्राम,“ फक्त? म्हणजे मी गेल्या चोवीस वर्षात तुला फक्त 189 वेळा love you म्हणालो आहे. बाप रे!मला तुझ्या सारखं व्यक्त होता येत नाही गार्गी शब्दात! मला वाटतं तुझंच माझ्यावर जास्त प्रेम आहे. माझं तुझ्यावर..” तो पुढे बोलणार तर गार्गीने त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि त्याच्या आणखीन जवळ जात बोलू लागली.

गार्गी,“ शू sss उगीच काही तरी बोलू नकोस. तुला शब्दात तुझं प्रेम व्यक्त करण्याची गरज केंव्हा पासून पडू लागली? मला माझ्यावरचे तुझे प्रेम जाणून घेण्यासाठी तुझे हे डोळेच बास आहेत. तुझ्या डोळ्यात मला ते प्रत्येक क्षणाला दिसतं पण जेंव्हा तू ते असे शब्दात व्यक्त करतोस ना तो क्षण माझ्यासाठी अमूल्य असतो म्हणून मी ते क्षण असे जपून ठेवते.” ती हसून म्हणाली आणि संग्राम ही गोड हसला.

संग्राम,“ मला ना जगावेगळी बायको मिळाली आहे.बरं मी येतो आता आणि हो आपल्या राजकुमाराकडे लक्ष ठेवा जरा! आज असं ही तू ऑफिसला येणार नाहीस.” तो ब्लेजर चढवत म्हणाला.

गार्गी,“ हो! मी ड्रायव्हरकडून डबा पाठवून देते लंचचा.” ती म्हणाली आणि दोघे ही खाली आले.

संग्राम ऑफिसला निघून गेला. आदिराज कॉलेजमध्ये आणि गार्गी उद्याच्या बाकी तयारीमध्ये गर्क झाली. संग्राम-गार्गीचा सुखी संसार गेल्या पंचवीस वर्षापासून आनंदाने सुरू होता. दोघे ही एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते आणि त्याच्या प्रेमाचे जिवंत प्रतीक आदिराजच्या रुपात त्यांच्या संसाराला चार चांद लावत होते.पण चोवीस वर्षांचा हा काळ त्यांच्यासाठी इतका सहज सोपा गेला असेल का?

अभिराज आणि क्षितीजाची ही आँखों आँखोंवाली लव स्टोरी पुढे कधी आणि कशी सरकणार होती?
©स्वामिनी चौगुले






🎭 Series Post

View all