माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ३८

अभिराजला पळवून लावण्यासाठी क्षितिजा अजून काय करणार होती?


भाग 38
खरं तर क्षितिजाने अभिराजला उघड उघड चॅलेंज केले होते पण तिला माहीत नव्हतं की अभिराज किती जिद्दी आहे ते! क्षितिजा देखील कुठे सहजासहजी हार मानणाऱ्यातली होती. आज तसा अभिराजच्या टीमला आराम होता कारण आज संध्याकाळी चुडा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता. त्याची काही फारसी तयारी करायची नव्हती. दोन्ही वेळचा मेन्यू आधीच ठरला होता आणि विशेष कार्यक्रम नसल्याने प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सवडीने जेवणार होता. सुजय आणि दिनेशने मात्र अभिराजला आज सकाळपासून रूममधून बाहेर पडू दिले नव्हते. अभिराजला ही खूप थकवा आला होता त्यामुळे तो ही झोपून होता. तितक्यात क्षितिजाचा त्याला फोन आला.

क्षितिजा,“ माझं काम आहे रिसॉर्टच्या बाहेर या!”

अभिराज,“ ठीक आहे आलोच!”

एक वाजत आले होते आणि अभिराजने नुकतेच जेवण केले होते. दिनेश बाहेर गेला होता तर सुजय तिथेच होता. अभिराज उठून तयार होऊ लागला. त्याला तयार होताना पाहून सुजयने विचारले.

सुजय,आता कुठे निघालास राज?”

अभिराज,“ थोड्याच वेळात येतो. थोडं काम आहे रे!”तो शर्ट घालत म्हणाला.

सुजय,“डॉक्टरने तुला पायावर ट्रेस देऊ नको म्हणून सांगितले आहे ना? अरे एक दिवस तरी आराम कर की!” तो वैतागून म्हणाला.

अभिराज,“ अरे मी ठीक आहे आता आणि मी काळजी घेईन पायाची तू नको काळजी करू. थँक्स फॉर युवर कंसर्न!” तो हसून म्हणाला आणि निघाला.

सुजय,“ सांभाळून जा रे!”तो म्हणाला आणि अभिराजने होकारार्थी मान हलवली.

रिसॉर्टच्या बाहेर क्षितिजा उभी होती. अभिराज आला आणि ती कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसली.

अभिराज,“ तुला गाडी चालवायला येते?”त्याने आश्चर्याने विचारले.

क्षितिजा,“ हो! बसा आता!”ती म्हणाली.

अभिराज,“ कुठं जायचं आहे?” त्याने गाडीत बसत विचारले.

क्षितिजा,“कळेल की!” ती म्हणाली.

अभिराज,“बरं”

क्षितिजाने गाडी एका तळ्यापासून काही अंतरावर उभी केली. ती आणि अभिराज गाडीतून उतरले. दोघे चालत थोडे पुढे गेले. अभिराज चालताना लंगडत होता. त्या तळ्यात खूप सारी कमळे होती. पांढरी, गुलाबी, पिवळी अशी वेगवेगळ्या रंगांची! क्षितिजा अजून थोडी पुढे गेली आणि पांढऱ्या कामळाकडे बोट दाखवत ती अभिराजला म्हणाली.

क्षितिजा,“ आज संध्याकाळी माझा चुडा आहे. मी साडी नेसणार आहे आणि मला आज कमळ घालून हेअर स्टाईल करायची आहे. सर तळ्यात उतरून ते पांढर कमळ मला आणून द्या.

अभिराज तळे पाहत होता. तळे तसे बरेच विस्तिर्ण आणि खोल देखील वाटत होते. तो मनात स्वतःशीच बोलत होता.

‛बाप रे आता काय करणार अभिराज तू? अरे तुला तर वॉटर फोबिया आहे. पाणी पाहिलं की भीती वाटते आणि पोहता येणे तर लांबीचीच गोष्ट! म्हणून तर अंकूनी बाहेर इतकी जागा असताना सुद्धा स्वीमिंग पूल बनवून घेतले नाही आणि क्षितिजा मला कमळ मागत आहे. ते ही इतक्या खोल पाण्यात पोहत जाऊन आणावे लागेल. क्षितिजा यार तुला हीच परीक्षा घ्यायची होती का माझी? काल तर हीचं चॅलेंज तावातावाने एक्सेप्ट केले आणि आज हे! नाही म्हणालो तर बॅग भरावी लागेल म्हणजे तिकडून मरण आणि तळ्यात गेलो तर ही मरणारच कारण पाणी पाहूनच हातपाय लटलट करतात तर हातपाय मारणार काय? म्हणजे आत्महत्याच म्हणायची. काय करू मी आता?’ तो विचार करत होता. अभिराज बराच वेळ काही बोलत नाही हे पाहून पुन्हा क्षितिजाच म्हणाली.

क्षितिजा,“ काय झालं सर? काल तर निखाऱ्यावरून ही चालायला तयार होतात आणि आज पाण्यात उतरायला इतका विचार करताय? जिममध्ये जाता म्हणजे स्वीमिंग पण येतच असेल ना? हा म्हणा स्वीमिंग पूलमध्ये पोहणे आणि इतक्या मोठ्या तळ्यात उतरणे फरक आहे म्हणा! भीती वाटत असेल तर चला आपण जाऊ.” ती विजयी मुद्रेने बोलत होती

अभिराज,“ नाही असं कसं घाबरेन मी! मी आणतो कमळ तुझ्यासाठी!” तो आवंढा गिळत म्हणाला.

‛अभिराज आज काही तू जगत नाहीस. अंकू सॉरी पण हे मला करावच लागेल. जर नाही केलं तर मी हरेन म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या नजरेत क्षितिजाच्या नजरेत पुन्हा तेच स्थान मिळवू शकणार नाही. त्यापेक्षा मरण परवडले. मला माहित आहे तुम्हा सगळ्यांना माझा खूप राग येईल पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.’


तो विचार करत करत पुढे पाऊले टाकत होता. भीतीने त्याच्या हातापायांना कंप सुटला होता. डोळ्याच्या कडा पाण्याने भरल्या होत्या. काळीज धडधडत होते आणि इतके पाणी पाहून त्याला गरगरत होते. तरी त्याने हाताच्या मुठी वळल्या आणि तो पाण्यात उडी मारणार तर त्याला कोणी तरी झटक्याने मागे खेचले!ते पाहून क्षितिजा ही तिथे आली. अभिराजने मान वर करून पाहिले तर सत्तरीकडे झुकलेला केसांची चांदी झालेला,एक सावळा वृद्ध त्याच्याकडे रागाने पाहत बोलू लागला.

“ याड लागलंय काय पोरा तुला? जीव लय जड झालाय व्हय. काय करत हुतास?”

अभिराज,“ कमळ हवं होतं.” तो आवंढा गिळत म्हणाला.

“कमळ पायजे अरे या तळ्यात मगरी हायत्या! तू उडी मारली असती म्हंजी जित्ता सोडला असता का मगरीनी तुला? आणि काय गं ये पोरी! आपल्याला इथली जास्त म्हायती नाय तर कशाला नसता हट्ट करायचा म्हणतु मी! तुझा नवरा गेला असता की ढगात!” ते तावातावाने बोलत होते.

क्षितिजा,“ मगरी? बरं चला सर तुम्ही आणि हे माझा नवरा वगैरे नाहीत.” ती थोडी घाबरून पण टेचात म्हणाली.

“ये पोरा चल मी देतो कमळ तुला! दे तुझ्या मैतरणीला! मैतरण तर हायस नव्ह याची! तुमी आज कालची पोरं बी ना!” ते बडबडत पुढे गेले आणि त्यांनी त्यांच्या टोपलीत असलेल्या कमळां पैकी तीन कमळं त्याला दिली.

अभिराज,“ पांढर कमळ असलं तर द्या काका आणि तळ्यात मगरी आहेत तर तुम्ही कमळं कशी आणली.” त्याने विचारले.

“ घे पांढर कमळ आणि एक गुलाबी, पिवळ आणि जा आता! माझी होडी हाय ती बघ असं बी मगर नसली तरी बी केंदाळात उतरनं म्हंजी जीवावर उदार होणं बाबा ह्यो काय तुमचा तो पवायचा हौद हाय व्हय? जा आता!” ते त्याच्या हातात कमळं ठेवत म्हणाले.

अभिराज,“ काका याचे पैसे?” त्याने अडखळत विचारले.

“निगतो का आता! लय आला पैसंवाला आरं माझा नातू तुझ्या येवडा हाय जा आता!” ते लटक्या रागाने म्हणाले.

अभिराज क्षितिजा जवळ गेला आणि त्याने ती फुले तिच्या हातात ठेवली. तिने गपचूप फुले घेतली आणि दोघे ही गाडीत बसले. दोघे ही आपापल्या विचारात हरवले होते.

‛ बाप रे त्या काकांच्या रुपात देवच अवतरला म्हणायचा अंकू कायम म्हणतो तुम्ही संकटात अडकलात आणि बाहेर येण्याचा मार्ग दिसत नसेल तर तुमची तुमच्या, कुटुंबाची पुण्याई कामाला येते आणि देव कोणाच्या ही रुपात धावून येतो. आज तर माझं दोन्ही बाजूने मरणच माघार घेतली तर लौकिक अर्थाने आणि नाही घेतली तर भौतिक अर्थाने! आज कदाचित माझ्या कुटुंबाचे पुण्य कामाला आले माझ्या! खूप मोठ्या संकटातून वाचलो मी!’ तो विचार करत होता.

तर क्षितिजा गाडी चालवत तिच्या विचारत मग्न होती.

‛ अरे देवा! क्षिती काय चाललं आहे तुझं हे सगळं!अभी सरांना हरवायच्या नादात त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलायला निघाली होतीस, आज त्यांना काही झालं असतं तर त्यांच्या कुटुंबाला तू काय उत्तर देणार होतीस?अभी सर पण ना खूप हट्टी आहेत. ते सहजासहजी हार नाही मानणार. बरं झालं ते वृद्धगृहस्थ तिथे आले नाही तर! असो इथून पुढे असं काही करताना विचार करून पूर्ण माहिती घेऊन करावं लागेल. चला आता चुडा भरला की कुठे ही बाहेर पडता येणार नाही. तनयला मी कमळाची फुले मागितली असती तर त्याने मला आणून दिली असती का? काय माहीत? मी तर त्याला नीट ओळखत देखील नाही. लग्न ठरल्यापासून असं कितीस बोलणं झालं आमच्यात म्हणा! तो आणि त्याच काम इतकच पाहत आले मी! अशा अनोळखी माणसा बरोबर मी आयुष्य कसं घालवणार?एकीकडे तनय आणि दुसरीकडे अभी सर! पारडे सतत अभी सरांकडे झुकतं! इतक्या मोठ्या बिझनेस अँपयरचा मालक पण माझ्यासाठी ड्रायव्हर झाला अगदी वेटर देखील झाला. मी अपमान केला त्यांचा ते रागाने निघून जातील म्हणून तर कशाच काय? काल तर मुद्दाम मीच ते देवक टाकून दिलं आणि खोटं सांगून त्यांना ते आणायला पाठवलं. मला वाटलं नव्हतं ते खरंच बिन चपलीचे जातील. पण खरंच ते बिनचपलीचे गेले. किती लागलं आहे पायाला त्यांच्या(तिचे लक्ष त्याच्या पट्टी बांधलेल्या पायाकडे गेले.)क्षिती तू अशी आता कंमकुवत नाही होऊ शकत. या श्रीमंत लोकांचं काय सांगावे कधी कोणाला डोक्यावर घेतील आणि पुन्हा त्यालाच पायदळी तुडवतील. एकदा घेतला आहे ना यांचा अनुभव! बास झाला. त्यांचा विचार आता घेतला आहे ना निर्णय तनयशी लग्न करण्याचा मग मागे हटायचे नाही. उद्याची योजना रेडी आहे उद्या अभिराज सर नक्कीच निघून जाणार!’ या सगळ्या विचारात तिला रिसॉर्ट आलेले ही कळले नाही.

क्षितिजाने अभिराजला पळवून लावायला काय करायचे ठरवले असेल?
© स्वामिनी चौगुले







🎭 Series Post

View all