माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग १३

संग्रामला सत्य कळल्यावर तो कसा रियाक्ट होईल?


भाग13
आदिराज आणि क्षितिजा अभिराजला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचले. डॉक्टरांनी अभिराजला डायरेक्ट इमर्जन्सी रूममध्ये घेतले. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले.

आदिराज,“भाई कसा आहे डॉक्टर, तो ठीक तर आहे ना?” त्याने आवंढा गिळत विचारले.

डॉक्टर,“त्यांच्या पोटात चाकू घुसला आहे. म्हणजे त्यांच्यावर हल्ला झाला आहे. ही पोलीस केस आहे.मी पोलिसांना बोलावून घेतले आहे आणि हो त्यांची जखम बरीच मोठी आहे त्यामुळे त्यांना ऑपरेट करावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना बोलावून घ्या.” ते म्हणाले.

आदिराज,“ ऑपरेट करावे लागणार आहे? म्हणजे त्याला काही होणार तर नाही ना डॉक्टर?” त्याने भीतीयुक्त काळजीने विचारले.

डॉक्टर,“ don\"t worry!जखम मोठी आहे पण ती जास्त खोल नाही गेली. चाकू वरच्यावर लागला आहे. ब्लड लॉस झाला आहे. आम्ही स्टीचेस घालणार आहोत. तुम्ही फॉर्मेलिटीज पूर्ण करा आणि तुमच्या घरच्यांना बोलावून घ्या. तोपर्यंत पोलीस देखील येतील.”ते म्हणाले आणि निघून गेले.

ते ऐकून क्षितिजा मात्र आणखीन घाबरली.

क्षितिजा,“आदी पोलीस आले तर माझी अवस्था पाहून ते ओळखतील काय झाले आहे ते! मी तुमच्याबरोबर होते म्हणल्यावर मला ही उलट सुलट प्रश्न विचारतील. मला या सगळ्यात नाही पडायचं. माझ्या घरी जर आजचा प्रसंग कळला तर आई-बाबा मला इथे राहू देणार नाहीत आदी!” ती रडत बोलत होती.

आदिराज,“ ok ok! तू आधी शांत हो! तुझं नाव या सगळ्यात येणार नाही क्षिती,मी सगळं मॅनेज करेन. मी पंकजला फोन करतो. तो तुला पोलीस येण्याआधी होस्टेलवर सोडेल आणि स्वतःला सावर सुदैवाने काही विपरीत नाही घडलं तुझ्या बाबतीत!” तो तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेत बोलत होता.तर क्षितिजाला त्याच्या हाताला झालेली जखम दिसली. त्यातून रक्त येत होते.

क्षितिजा,“आदी किती लागलंय तुझ्या हाताला.तू दाखवून घे जखम आणि अभी सरांचे ऑपरेशन झाले की मला फोन कर.” ती काळजीने बोलत होती.

त्याने नुसती होकारार्थी मान हलवली. त्याने पहिल्यांदा त्याचा मित्र पंकजला फोन केला आणि नंतर संग्रामला फोन लावला.हे सगळं होईपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते. संग्राम अजून जागाच होता.त्याने आदिराजला बरेच फोन केले होते. पण त्याने ते उचलले नव्हते. इकडे सुशांत ही अभिराजला फोन करत होता. पण तो ही फोन उचलत नव्हता. आदिराजने फोन केला आणि त्याचे नाव पाहून संग्रामने फोन उचलला.

आदिराज, “ डॅडा! सुशा अंकलला घेऊन लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ये! भाई हॉस्पिटलमध्ये आहे.” तो रडत बोलत होता.

संग्राम,“ काय? हॉस्पिटलमध्ये? काय झाले आदी अभीला?” त्याने काळजीने विचारले.

आदिराज,“डॅडा तुम्ही या ना हॉस्पिटलमध्ये सगळं सांगतो.” तो म्हणाला.

संग्राम,“हो आम्ही लगेच निघत आहोत.गार्गी अग आदी हॉस्पिटलमधून बोलत होता.अभीला काही तरी झाले आहे म्हणत होता.” तो आवंढा गिळत जवळ बसलेल्या गार्गीला म्हणाला.

गार्गी,“हो मी ऐकले संग्राम चल आपण निघू. मी सुशांत आणि समिधाला घेऊन येते तू गाडी काढ.” ती म्हणाली.

सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तोपर्यंत पंकज ही क्षितिजाला घेऊन निघून गेला होता. पोलीस देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. डॉक्टर ओ. टी मधून बाहेर आले.आदिराज धावतच त्यांच्याजवळ गेला. त्याला पाहून हे चौघे देखील डॉक्टरांच्या जवळ गेले.

आदिराज,“ डॉक्टर भाई कसा आहे?” त्याने डोळ्यातले पाणी आडवत विचारले.

डॉक्टर,“पेशंट ठीक आहे आता, सुदैवाने चाकू लागून ही कोणतेच इंटर्नल नुकसान झाले नाही.आम्ही त्यांना I. C. Uमध्ये शिफ्ट करत आहोत. पुढचे सहा तास ते ओब्जर्वेशनमध्ये राहतील.”

डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून चौघांना ही धक्का बसला. त्यांना कळतच नव्हते की अभिराजला चाकू कसा लागला? डॉक्टरांचे बोलणे ऐकून मात्र संग्राम चांगलाच चिडला. त्याने आदिराजला एक वाजवून दिली आणि त्याची कॉलर धरून त्याला जोरात हलवत तो बोलू लागला.

संग्राम,“ आदी अभीवर चाकू हल्ला झाला? नक्कीच तूच काही तरी उचापत्या केल्या असणार! प्रकरण तुला झेपलं नाही. म्हणून तू अभिला बोलावलेस ना? अरे बोल ना!” तो ओरडत होता.

आदिराज मात्र काहीच बोलत नव्हता. तो फक्त रडत होता. तेवढ्यात सुशांतमध्ये पडला. त्याने आदिराजला संग्रामपासून सोडवून घेतले.

सुशांत,“ उगीच काही ही बोलू नकोस संग्राम!जरा शांत हो!” तो त्याला समजावत म्हणाला.

संग्राम,“ घाल याला तू पाठीशी अजून, याच्यामुळे अभीच्या जीवावर बेतले आहे.” तो पुन्हा रागाने म्हणाला.

सुशांत,“संग्राम काही ही बोलू नकोस उगीच!गार्गी तुम्ही अभीला पाहून या आणि बच्चूला घेऊन घरी जा.” तो म्हणाला आणि पोलिसांकडे वळला. त्याचे सोर्सेस वापरून त्याने पोलिसांना उद्या जाब नोंदवून घ्या म्हणून घालवून दिले.

संग्राम, समिधा, आदिराज आणि गार्गीने अभिराजला पाहिले. गार्गी आदिराजला घेऊन घरी निघाली. आदिराजने गार्गीला मिठी मारली.

आदिराज,“ मम्मा मी काही नाही केलं. माझ्यावर चाकू भिरकावला गेला आणि भाई मध्ये आला. चुकून चाकू भाईला लागला.” तो रडत बोलत होता.

गार्गी,“काय तुझ्यावर चाकू हल्ला झाला?बरं तू शांत हो बच्चा! पाणी पी आपण घरी गेल्यावर बोलू.” ती त्याला समजावत म्हणाली.

घरी संजयराव आणि मनीषाताई ही जागेच होते. गार्गी आणि आदिराजला आलेलं पाहून त्यांनी काळजीने विचारले.

संजयराव,“ काय झालं आहे अभीला गार्गी?”

गार्गी,“चाकू हल्ला झाला आहे. अभिराजला लागलं आहे बाबा पण तो आता ठीक आहे.”

मनीषाताई,“ काय?चाकू हल्ला पण कोण आणि का करेल आपल्या पोरावर हल्ला?” त्यांनी आश्चर्याने विचारले.

गार्गी,“ ते तर आता आदीच सांगू शकेल.” ती आदिराजला तिरकस पाहत म्हणाली.

आदिराज,“सांगतो मी सगळं! मी पार्टीमधून अकरा वाजता निघालो होतो लोणावळ्यावरून तर रस्त्यात जंगलातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी गाडीच्या बाहेर येऊन आवाज ऐकला तर आवाज ओळखीचा वाटला. म्हणून मी पुढे गेलो तर क्षितिजाची स्कुटी पडली होती. जंगलात काही अंतरावर एका झाडाखाली चार गुंड क्षितिजावर जबरदस्ती करत होते. मी त्यांच्याशी लढून कस बस क्षितिजाला सोडवून घेतलं. ते चौघे गुंड मात्र पळून गेले. क्षितिजा खूप घाबरली होती. म्हणून मी तिला गाडीजवळ आणून शांत करत होतो तर भाई तिथे कुठून तरी आला. तो आम्हाला इतक्या रात्री इथे काय करत आहात म्हणून रागवत होता तर कुठून तरी त्याला माझ्या दिशेने भिरकावलेला चाकू दिसला. तो मध्ये आला आणि चाकू त्याला लागला मम्मा! कदाचित त्या गुंडांपैकी कोणी तरी तो चाकू भिरकावला असेल, डॅडा समजतो तसे मी काही केले नाही.” तो रडत बोलत होता.

गार्गी,“ अरे देवा! मग क्षितिजा कुठे आहे आता?आणि तू हे पोलिसांसमोर का सांगितले नाही आदी?”तिने विचारले.

आदिराज,“ क्षितिजाला पंकजबरोबर होस्टेलवर पाठवले मम्मा! तिला या सगळ्यात पडायचे नाही. ती म्हणाली की जर तिच्या घरी हे कळलं तर ते तिला इथे राहू देणार नाहीत म्हणून मी शांत राहिलो. तुम्ही ही या विषयी कोणाला बोलू नका.” तो हात जोडत म्हणाला.


गार्गीचे लक्ष त्याच्या हाताकडे गेले. तिने त्याचा हात धरून जखम पाहिली जखम बरीच खोल दिसत होती. त्यातून बरेच रक्त ही वाहत होते. त्याचे अंग ही तापाने चांगलेच भाजत असलेले तिच्या लक्षात आले.

गार्गी,“ बच्चा अरे किती लागलंय तुला ही आणि ताप पण खूप आला आहे. बाबा डॉक्टरांना फोन करून बोलावून घ्या. मी याला रूममध्ये घेऊन जाते.”ती म्हणाली आणि आदिराजला घेऊन त्याच्या रूममध्ये गेली.

संजयरावांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. हे सगळं होई पर्यंत पहाटेचे चार वाजले होते. डॉक्टर पुढच्या पंधरा मिनिटात आले. त्यांनी आदिराजला तपासले त्याची जखम पाहिली आणि ते म्हणाले.

डॉक्टर,“जखम खूप खोल आणि बरीच मोठी ही आहे. स्टीचेस घालावे लागतील.तुम्ही सगळे बाहेर जा.” ते म्हणाले.

गार्गी,“बाबा-आई तुम्ही बाहेर थांबा. डॉक्टर मी आदीला सोडून कुठे ही जाणार नाही. तुम्ही घाला स्टीचेस!”

डॉक्टर,“ ठीक आहे.”

डॉक्टरांनी पहिल्यांदा त्याला कसलेसे इंजेक्शन दिले आणि जखम साफ करून त्याच्या डाव्या हाताच्या तळव्याच्यावरच्या बाजूला स्टीचेस घालायला सुरुवात केली तशी आदिराज चुळबूळ करू लागला.गार्गीने त्याचा हात घट्ट धरून ठेवला आणि तोंड फिरवून घेतले. तिच्या डोळ्यातून मात्र कढ वाहत होते. डॉक्टरांनी स्टीचेस घालून पट्टी बांधली. गार्गीने संजयराव आणि मनीषाताईना हाक मारून बोलवून घेतले.

मनीषाताई,“ डॉक्टर कसा आहे बच्चू आता?” त्यांनी रडतच विचारले.

डॉक्टर,“ आपण त्याच्या हाताला चार स्टीचेस घातले आहेत. जखमेमुळे आणि स्ट्रेसमुळे त्याला शंभरच्या वर ताप आहे. जर उद्या सकाळपर्यंत ताप नाही उतरला तर त्याला हॉस्पिटलाईज्ड करावे लागेल. ताप उतरला तर काही प्रॉब्लेम नाही. मी उद्या येईन सकाळी मग ठरवू काय करायचे ते!गार पाण्याच्या पट्ट्या ठेवा त्याच्या कपाळावर, मिसेस सरनाईक त्याचा ताप उतरायला हवा.” ते काळजीने बोलत होते.

गार्गी,“ठीक आहे डॉक्टर!” ती डोळे पुसत म्हणाली. मनीषाताई आदिराजजवळ जाऊन बसल्या.डॉक्टर निघून गेले.

संजयराव,“गार्गी अग सुशांतचा फोन आला होता. आम्ही बाहेर उभे होतो तेंव्हा तो बच्चू कसा आहे विचारत होता. संग्रामने बच्चूवर हात उचलला हॉस्पिटलमध्ये?तू का शांत राहीलीस गार्गी?संग्रामने त्याच काहीच ऐकून नाही घेतलं सुशाने सगळं सांगितलं मला!”ते रागाने बोलत होते.

गार्गी,“ बाबा ती वेळ नव्हती काही बोलण्याची, एक तर अभीची काळजी वाटत होती म्हणून मी शांत राहिले. बरं तुम्ही दोघे जा आराम करा. पाहटेचे चार वाजून गेले आहेत.” ती म्हणाली.

संजयराव,“बच्चू अशा अवस्थेत आहे. अभी हॉस्पिटलमध्ये आहे. या सगळ्यात झोप येईल का गार्गी?मी आणि मनीषा आहोत खाली, काही लागलं तर हाक मार.” असं म्हणून ते निघून गेले.

मनीषाताई आणि संजयराव हॉलमध्ये बसून होते. दोघांची ही झोप उडाली होती. वर गार्गी आदिराजच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. साधारण पाच वाजता संग्राम घरी आला. तो रागातच होता.

संग्रामला सत्य कळल्यावर तो कसा रियाक्ट होईल?
©स्वामिनी चौगुले










🎭 Series Post

View all