माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ७६

संग्रामचा क्षितिजाला भेटायला बोलावण्याचा उद्देश काय असेल?


भाग 76
सगळ्याची जेवणं झाली आणि सगळे झोपायला निघून गेले. गार्गी मागची आवराआवर करून रूममध्ये आली तर संग्राम बेडवर पुन्हा विचारांच्या तंद्रीत बसलेला तिला दिसला. तिने त्याची औषधं आणि पाणी हातात घेतले आणि त्याला देत थोडी चिडूनच म्हणाली.


गार्गी ,“ पुन्हा गेलास विचारात गढून? आता काय विचार करत आहेस? किती वेळा सांगितले तुला विचार करू नकोस जास्त म्हणून!”

संग्राम,“ इथे बस आणि इतकं चिडायला काय झालं गार्गी? अगं मी विचार करत होतो पण वेगळ्याच गोष्टीचा तुझ्या लक्षात आले की नाही माहीत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे थोड्या वेळापूर्वी!” तो तिचा हात धरून म्हणाला.

गार्गी,“ कोणती गोष्ट?” तिने आश्चर्याने विचारले.

संग्राम,“ गार्गी राजवीर आपल्याला उटीत भेटला आणि त्याने माझ्याशी हस्तांदोलन केले. महाराजांच्या म्हणण्यानुसार त्याने त्याच्या विद्येचा वापर करून माझ्या हाताची प्रतिकृती बनवली आणि तो त्या व्दारे आपल्याला पाहत होता बरोबर?” तो म्हणाला.

गार्गी,“हो पण त्यात तुझ्या काय लक्षात आहे आता?” तिने विचारले.

संग्राम,“ गार्गी अगं तो जर आपल्याला पाहत असेल तर त्याने ठेवलेल्या सत्संगाच्या रात्री त्याने आपल्याला पाहिले नसेल कशावरून? आणि पाहिले असेल तर त्याने आपल्याला कशा अवस्थेत पाहिले असेल येतय का तुझ्या लक्षात?” त्याने तिला विचारले. गार्गी थोडावेळ विचारात पडली आणि बोलू लागली.

गार्गी,“ तुला काय म्हणायचे ते आले माझ्या लक्षात! पण आपल्याला माहीत होतं का तो आपल्याला पाहत असेल म्हणून? समजा त्याने तशा अवस्थेत आपल्याला पाहिले ही असेल तर चूक त्याची आहे संग्राम आपली नाही. स्वतःला संन्यासी म्हणवतो कफनी घालून फिरतो आणि एखाद्या वैवाहिक जोडप्याच्या रूममध्ये त्याच्या सिद्धीचा वापर करून पाहतो त्याला लाज वाटायला पाहिजे आपल्याला नाही. एका अर्थी त्याने आपल्याला तसे पाहिले असेल तर बरेच आहे.” ती म्हणाली.

संग्राम,“ गार्गी अगं काय बोलतेस तू कळतंय का तुला?” त्याने आश्चर्याने विचारले

गार्गी,“ हो चांगलच कळतंय मला! त्याने जर आपल्याला तसे पाहिले असेल तर त्याच्या लक्षात यायला हवे की आपले एकमेकांवर इतके उत्कट प्रेम आहे की आपण इतकी वर्षे एकमेकांबरोबर संसार करून ही आणि आपले वय जास्त असून देखील इतके उत्कट सेक्स करू शकतो. त्याच्या हे लक्षात आले तर त्याने आपला नाद सोडून द्यावा. त्याला मी कधीच मिळणार नाही कधीच नाही.” ती म्हणाली आणि संग्राम तिच्याकडे पाहून हसत होता.

संग्राम,“ तू पण ना गार्गी काय विचार करशील सांगू शकत नाही कोणी! बरं ऐक ना दुपारी काय करत होती ते करूयात ना तो सुशामध्येच कडमडला.” तो तिला जवळ ओढत म्हणाला.

गार्गी,“ सुशांतला काही म्हणायचे नाही आ! आणि झोप आता!” ती म्हणाली.

संग्राम,“ हो ना काहीच म्हणायचे नाही त्याला! कायम आपल्या रोमान्सच्यामध्ये कडमडतो आणि दुपारी उतू जाणारे प्रेम आता आटले का तुझे?” तो तोंड वाकडं करत म्हणाला.

गार्गी,“ प्रेम तर अजून ही उतू जात आहे आणि तुला नाही म्हणून काय करणार ना! लव यु.” ती हसून म्हणाली.
★★★

दुसऱ्या दिवशी सगळ्यांचेच निवांत चालले होते. अभिराजला सुशांत आज ऑफिसला का येणार नाही याचे काय कारण सांगायचे हे कुणालाचं कळत नव्हते. सुशांत निवांत पेपर वाचत बसला होता. संग्रामही तिथेच होता. आदिराज केंव्हाच तयार होऊन नाष्टा करत होता. समिधाने मुद्दामच आज सगळ्यांना नाष्टा करायला बोलावले होते. गार्गी समिधाला मदत करत होती. अभिराज तयार होऊन आला आणि त्याने सुशांतला विचारले.

अभिराज,“ डॅड आज ऑफिसला येणार नाहीस का तू?” सुशांत काही बोलणार तर समिधा काही तरी डायनींग टेबलवर ठेवत त्याला म्हणाली.

समिधा,“ आरे आज संग्राम आणि सुशांतच्या एका जुन्या मित्राच्या घरी कार्यक्रम आहे. त्याच्या मुलीचा साखरपुडा आहे आज म्हणून आम्ही चौघे जाणार आहोत त्यामुळे सुशांत नाही येणार आज ऑफिसला! तू आणि आदी सांभाळा आज कसं तरी!”

सुशांत,“ आणि हो उद्यापासून संग्राम ऑफिसला येणार आहे तर त्याची केबीन तू स्वतः उभं राहून स्वच्छ करून घे स्टाफकडून! तो आत्ताच आजारातून उठला आहे तर काळजी तर घ्यावीच लागेल ना!” तो म्हणाला.

अभिराज,“ बरं तुम्ही जा आणि डॅड मी घेतो अंकुची आणि आंटीची ही केबीन साफ करून तू नको काळजी करू.” असं म्हणून त्याने नाष्टा केला आणि आदिराज बरोबर तो ऑफिसला निघून केला.
★★★

संग्राम, गार्गी आणि सुशांत, समिधा अकरा वाजता. संग्रामच्या जुन्या फ्लॅटवर पोहोचले. क्षितिजा साडे अकरापर्यंत तिथे येणार होती. केयर टेकर बाईला आधीच गार्गीने फोन केला होता त्यामुळे तिने सगळी तयारी करून ठेवली होती. सगळे फ्लॅटमध्ये गेले आणि गार्गी फ्लॅटच्या भिंतींवर प्रेमाने हात फिरवू लागली. ती किचनमध्ये गेली आणि नंतर बेडरुममध्ये जणू ती त्या निर्जीव भिंतीना सांगत होती मी आले आहे. ते पाहून सुशांत आणि संग्राम हसत होते.

संग्राम,“ या बायका पण ना कशात जीव गुंतवून बसतील सांगता येत नाही सुशा! जेंव्हा बिल्डिंग रिनव्हेटला निघाली तेंव्हा मी म्हणालो होतो की एक तर हा फ्लॅट विकू नाही तर कोणाला तरी देऊन टाकू पण नाही गार्गीने हट्टाने तो ठेवून घेतला आणि पुन्हा पहिला होता तसाच रिनोव्हेट करून घेतला. बघ एखाद्या मुलाला गोंजारावे तशी गोंजारत आहे या निर्जीव भिंती!”तो बोलत होता आणि गार्गी त्याच बोलणं ऐकत बाहेर आली.

गार्गी,“ संग्राम तुझ्यासाठी ही फक्त प्रॉपर्टी आहे पण हे छोटंसं घर माझ्यासाठी खूप काही आहे. तुझं कमाईच पहिल घर! माझं पहिल हक्काच घर इथेच तर आपण पहिल्यांदा संसार थाटला होता. या भिंतींनी आपल्या आयुष्याचे सुरुवातीचे आंबट गोड क्षण पाहिले आहेत. इथेच तर तू दारूच्या नशेत मला पहिल्यांदा तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगितले होतेस. हे माझ्यासाठी नुसतं घर नाही तर माझ्या-तुझ्या प्रेमाचे साक्षीदार आहे हे!” ती भावुक होत म्हणाली.

समिधा,“ गार्गी या पुरुषांना नाहीत कळत गं आपल्या भावना आपण यांच्यावर प्रेम करतो आणि आपसूकच यांच्या प्रत्येक वस्तूला आणि वास्तूला जीव लावतो पण हे आपल्याला वेड्यात काढतात.” ती नाराजीने म्हणाली.

सुशांत,“ ये बाबा संग्र्या गप्प बस की जरा, तू इथे अभीच जुळवायला आला की आपलं तोडायला?” तो त्याला मिश्कीलपणे म्हणाला.

गार्गी,“झालं तुमचं! तो बघा चहा आणला बाईंनी घ्या तो!” ती म्हणाली.

आणि दाराची बेल वाजली. खरं तर क्षितिजा मनातून खूप घाबरली होती की आता संग्राम तिच्याशी काय बोलेल? अभिराजशी ती जे वागली त्याचा जाब विचारेल का? तिने हॉस्पिटलमध्ये संग्रामचे उग्र रूप तिच्या मामाशी बोलताना पाहिले होते पण भेटायला येणे तर भागच होते. तिने आवंढा गिळून स्वतःला सावरत बेल वाजवली. दार जाऊन गार्गीने उघडले.

क्षितिजा आत आली आणि चौघांनासमोर पाहून अजून जरा घाबरली. तिच्या हातापायांना घाम फुटला. तिच्या चेहऱ्यावरून ते दिसत होते. ते पाहून गार्गी तिला घरात घेत म्हणाली.

गार्गी,“ रिलॅक्स क्षितिजा इतकं घाबरू नकोस. तुला आम्ही जाब विचारायला नाही बोलावले. ये बस पाणी घे तुला बरं वाटेल.” ती म्हणाली आणि क्षितिजा येऊन खुर्चीवर बसली तिने ग्लासभर पाणी पिले. ते पाहून समिधा तिला हसून म्हणाली.

समिधा,“ अगं आम्ही काय वाघ आहोत का? तुला खायला इतकी घाबरीस ती!”

क्षितिजा,“ तसं नाही मला अचानक तुम्ही भेटायला बोलावले तेही ऑफिस, घर सोडून इथे म्हणून..” ती पुढे बोलायची थांबली.

संग्राम,“ अगं हे पण आपलेच घर आहे आणि इथे तुला भेटायला बोलावले आहे कारण अभीला आम्ही तुला भेटणार आहोत हे कळू द्यायचे नव्हते. तुझ्या बाबांची तब्बेत कशी आहे आता?” त्याने तिला विचारले.

क्षितिजा,“ ते ठीक आहेत आता!तुम्ही कसे आहात संग्राम सर? मला माहित आहे माझ्यामुळे तुमच्या कुटुंबाला खूप त्रास झाला आहे. मी त्यासाठी तुमची हात जोडून माफी मागते. खरं तर माझ्या माफी मागण्याने तुम्ही जे भोगले ते परत येणार नाही तरी ही शक्य झाल्यास मला माफ करा.” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

सुशांत,“ क्षितिजा आपण इथे घडून गेलेल्या गोष्टींवर चर्चा करायला नाही आलो तर पुढे काय करायचे ते बोलायला जमलो आहोत.” तो म्हणाला आणि त्याने संग्रामला तू बोल म्हणून खुणावले.


क्षितिजा,“ म्हणजे?” तिने विचारले.

संग्राम,“ म्हणजे तुला एकच प्रश्न विचारतो क्षितिजा त्याच न संकोचता खरं उत्तर आम्हाला हवं आहे.”तो तिला पाहत म्हणाला

क्षितिजा,“ विचारा ना सर.” ती म्हणाली.

संग्राम,“ तुझं अभिराजवर प्रेम आहे का?” त्याने तिला रोखून पाहत विचारले.

क्षितिजा,“ हो माझं अभी सरांवर मनापासून प्रेम आहे पण या सगळ्याला आता काहीच अर्थ नाही. त्यांनी मला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की ते मला कधीच माफ करणार नाही.” ती रडत म्हणाली.

गार्गी,“ तो म्हणाला आणि तू मान्य करून हार मानलीस? क्षितिजा काही वर्षापूर्वी जर मी ही अशीच हार मानली असती ना तर मी तुझ्याशी इथे आत्ता बोलत नसते गं. तुला जी आमची परफेक्ट जोडी दिसते ना ती दिसली नसती. अगं अभीने तुझे म्हणणे कमीत कमी ऐकून तरी घेतले संग्राम तर मला त्याच्यासमोर ही उभा राहू देत नव्हता विचार सुशांत आणि समिधाला! अर्थात चूक माझीच होती. आज तू जिथे उभी आहेस तिथे मी उभी होते एकेकाळी पण मी हार नाही मानली. आपलं प्रेम असच जाऊ द्यायचं नसतं. तो म्हणाला तुला आणि तू लगेच त्याच्या आयुष्यातून निघून जाणार का? त्याच मन जिंकायचा त्याचे प्रेम जिंकायचा प्रयत्न सुध्दा नाही करणार का? अगं तो चुकला तर त्याने तुझी माफी मिळवण्यासाठी आणि तुला परत मिळवण्यासाठी काय काय नाही केले आणि तू लगेच हार मानून बसलीस?” तिने तिला विचारले.


क्षितिजा,“ मग मी काय करू काकू? मला अजून तुम्हाला कुणालाच त्रास नाही द्यायचा खास करून अभीसरांना आधीच त्यांना माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे इतकंच काय संग्रामसरांना देखील!” ती अपराधीपणे रडत बोलत म्हणाली.

आणि चौघांना ही कळत नव्हते की क्षितिजाला कसे समजवावे?

संग्रामचा क्षितिजाला भेटायला बोलावण्याचा उद्देश काय होता?

ही कथा काल्पनिक असून या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि धार्मिक बाबींना ठेस पोहोचवण्याचा उद्देश लेखिकेचा नाही. बाकी लेखिकेने लिहलेला मजकूर हा तिने केलेल्या अभ्यासावर आणि कल्पनेवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.
© स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all