माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ४०

क्षितिजाचा निर्णय काय असेल?


भाग 40
कार्यक्रम संपला. काही वेळात लिफ्ट सुरू झाली. अभिराज रूमवर निघून गेला. त्याचा पाय अजून सुजला होता आणि जखम आणखीच ठणकत होती. मनाने माणूस किती ही स्ट्रॉंग असला तरी शरीरावर झालेला परिणाम आणि त्याची लक्षणे शरीर दाखवतच असतं. जखमेमुळे अभिराजला पुन्हा ताप भरला होता. तो रूममध्ये झोपला होता. तेवढ्यात सुजय आणि दिनेश तिथे आले. सुजय अभिराज जवळ गेला आणि काळजीने बोलू लागला

सुजय,“ राज पाय खूप दुखतोय का?(असं म्हणून त्याने त्याच्या हात धरला तर त्याला अभिराजला ताप आलेला जाणवला.) तुला तर खूप ताप आला आहे. दिनेश डॉक्टरांना बोलाव.” तो म्हणाला. दिनेशने फोन करून डॉक्टरांना बोलावले.

दिनेश,“ती क्षितिजा कोणत्या जन्माचा सूड घेत आहे काय माहीत?” तो चिडून म्हणाला.

अभिराज,“याच जन्मीचा!” तो पुटपुटला.

डॉक्टर आले. त्यांनी पायाला ड्रेसिंग केले. ताप ही बराच होता. मेडिसीन्स लिहून दिल्या आणि त्याला आराम करायला सांगून ते निघून गेले. दिनेश आणि सुजयने अभिराजला जबरदस्तीने दूध पाजले आणि मेडिसीन्स दिल्या.

इकडे पुन्हा क्षितिजाला गिल्टी वाटत होते. तिला वाटले होते की एकदा खाली जाऊन आल्या नंतर पायाला लागल्यामुळे अभिराज पुन्हा जायला नकार देईल पण तो पुन्हा खाली जाऊन आला होता आणि त्याला त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होत होता.अभिराज हार मानायला तयार नव्हता आणि क्षितिजा त्याला त्रास देऊन आता थकली होती. तिला कळत नव्हते की आता निर्णय काय घ्यावा. तिच्या मनातला अभिराज विषयीचा राग कुठे तरी आज निवळला होता.

‛अभी सर तुम्ही का वागताय असं? तुमच्या अशा वागण्याने माझं मन पुन्हा विचलित होत आहे. तुम्हाला आज किती त्रास झाला रादर मीच तो दिला पण तुम्ही मात्र स्वतःचा हट्ट सोडायला तयार नाही. तुम्हाला इथं रहायला परवानगी देऊन आणि ही अट घालून मी चूक केली असं वाटतंय मला! आता मी काय निर्णय घेऊ? पुढच्या दोन दिवसात माझं लग्न आहे. दिनेशने डॉक्टरला बोलावले होते म्हणजे तुमची तब्बेत बिघडली असणार. आज तर सुनयना माझ्याबरोबर झोपायला आली आहे त्यामुळे मी तुमची चौकशी देखील करायला येऊ शकत नाही. असो उद्या मी तुमची चौकशी करेन. दिनेश आणि सुजय आहेत तुमची काळजी घ्यायला ते एक बरं आहे त्यामुळे मला तुमची इतकी काळजी करायची गरज नाही. उद्या सकाळी आदी येणार आहे. त्याला ही नाही आवडणार मी त्याच्या भाईला असा त्रास दिलेला. काय करू मी काही कळत नाही. अभी सरांनी इथे येऊन सगळं अवघड करून टाकले आहे माझ्यासाठी! त्यांनी केलेल्या चुकीची ते कोणती ही तक्रार न करता निमूटपणे शिक्षा भोगत आहेत. उद्या सकाळी मी जाते त्यांना पहायला.’

या सगळ्या विचारात ती झोपली. सकाळी अकरा वाजता ती अभिराजला पहायला गेली तर दिनेशने दार उघडले आणि तो दार लावून घेत बाहेर आला.

दिनेश,“ काय काम आहे मॅडम तुमचे इथे?” त्याने रागाने विचारले.

क्षितिजा,“ राज कसा आहे?” तिने आवंढा गिळत विचारले.

दिनेश,“ तो झोपला आहे अजून! नाही म्हणजे आणखीन काही त्रास द्यायचा बाकी आहे का त्याला? म्हणून इथे आल्या आहात!” त्याने चिडून विचारले.

क्षितिजा,“ मी फक्त त्याची चौकशी करायला आले आहे. कसा आहे तो?”ती म्हणाली.

दिनेश,“ तुमच्या कृपेने काल पुन्हा त्याच्या पायाची जखम ताजी झाली आणि जखमेमुळे त्याला काल ताप आला होता. ताप कमी झाला आहे त्याचा पण अजून ग्लानीत आहे. डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे. मॅडम कोणाशी इतकं माणुसकी सोडून वागणे बरं नाही आणि तो मूर्ख तुम्ही जे सांगाल ते निमूटपणे करतो स्वतःला किती ही त्रास झाला तरी! प्लिज मॅडम आजचा दिवस त्याला आराम करू द्या!” तो तिला हात जोडून म्हणाला आणि क्षितिजा डोळ्यातले पाणी पुसत काहीच न बोलता निघून गेली.

रिसॉर्टमध्ये आली तर समोर आदिराज हजर होता. क्षितिजाला पाहून तो म्हणाला.

आदिराज,“ मी इथे तू आग्रह केला म्हणून आलो तर मॅडम तुम्ही गायब! कुठे होता? किती वेळ झालं शोधतोय!” तो हाताची घडी घालून तोंड फुगवून म्हणाला.

क्षितिजा,“ कुठे असणार इथेच तर होते. चल तुला तुझी रूम दाखवते.”

समोर हॉलमध्ये रात्रीच्या संगीताची तयारी चालली होती. आदिराजची नजर अभिराजला तिथे शोधत होती पण त्याला तो तिथे दिसला नव्हता. आदिराजने ही क्षितिजाला काही विचारणे टाळले. क्षितिजाने आदिराजला त्याची रूम दाखवली.

आदिराज,“ क्षिती तू या लग्नाच्या निर्णयाने खुश तर आहेस ना?” त्याने तिला रोखून पाहत विचारले.

क्षितिजा,“ हो आहे ना! तनय इंजिनिअर आहे. पुण्यात चांगली नोकरी आहे स्वतःचा फ्लॅट आहे अजून काय हवं ना!” ती ओठांवर खोटं हसू आणत म्हणाली.

आदिराज,“क्षिती तुला खोटं बोलता येत नाही. तू लग्नाचा डिसीजन घ्यायला खूप घाई केली असे वाटते मला! आणि त्यात तो इथेच आला आहे ना? मला सुशा अंकलने सांगितले. त्यामुळे तुला हे सगळे आणखीन जड जात असेल. पण कुठं आहे तो खाली तयारी सुरू आहे तिथे तर दिसला नाही.” त्याने न राहवून शेवटी विचारलेच.

क्षितिजा,“आदी खरंच हे सगळं खूप अवघड होऊन बसले आहे माझ्यासाठी! आणि अभी सर त्यांचा हट्ट सोडायला तयार नाहीत त्यामुळे माझी मनःस्थिती आणखीनच विचित्र होत चालली आहे. बुद्धी आणि मन यात सतत युद्ध सुरू असते! त्यांची तब्बेत ठीक नाही. ते झोपले आहेत अजून मागे सर्व्हन्ट कॉर्टरमध्ये!”ती आवंढा गिळत म्हणाली.

आदिराज,“ क्षिती तो खूप हट्टी आहे. इतक्या सहजासहजी हार नाही मानणार! अच्छा म्हणून तू मागे गेली होतीस का? आणि तू ही कुठे कमी आहेस म्हणा. तुही खूप हट्टी आहेस तुम्हा दोघांना ही मी चांगलंच ओळखून आहे. तो जे वागला ते चुकीचं होतं पण क्षिती हट्टीपणा करून कोणता ही निर्णय घेऊ नकोस. तुझं मन जे सांगते तेच कर. काय झालं त्याला की तूच काही खुरापत केलीस. तुला चार वर्षांपासून ओळखतो मी?”त्याने तिला समजावून सांगून विचारले.

क्षितिजा,“ माझ्याचमुळे बिघडली आहे त्यांची तब्बेत किती ही त्रास द्या ते मागे हटतच नाहीत. मला वाटलं होतं जातील दोन दिवसात पण मी ओळखायला चुकले त्यांना ते खूप हट्टी आणि हेकेखोर आहेत. असो तू आराम कर मी जेवण पाठवून देते. ट्रिप वरून माझ्या बोलण्यामुळे डायरेक्ट इकडेच आलास!” ती डोळे पुसत म्हणाली.

आदिराजने नुसती होकारार्थी मान हलवली.तो फ्रेश झाला आणि जेवण केले.आदिराज झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला सतत अभिराजला पाहावे असे वाटत होते तरी स्वतःच्या मनाला आवरले. अभिराज दिवस भर झोपून होता. तो संध्याकाळच्या वेळी उठला. त्याला आता थोडं बरं वाटत असले तरी अजून थकवा होता आणि पाय ही बराच दुखत होता. तरी तो आवरून हॉलमध्ये गेला तर सगळी तयारी झाली होती. संगीत सुरू होण्यापूर्वी माईक आणि साऊंडचे चेकिंग सुरू होते. तिथे कालच आलेले क्षितिजाचे मामा लुडबुड करत होते.

अभिराज लगंडत जाऊन एका खुर्चीवर बसला तर तिथे त्याला आदिराज कोणाशी तरी बोलत असलेला दिसला. अभिराज त्याच्या जवळ गेला.

अभिराज,“ आदी तू कधी आलास?” त्याने आश्चर्याने विचारले. आदिराजने त्याला बोलत असलेल्या व्यक्तीला घालवून दिले आणि तो रुक्षपणे अभिराजला म्हणाला

आदिराज,“ मला तुझ्याशी नाही बोलायचे. मी इथे माझ्या बेस्ट फ्रेंडचे लग्न अटेंड करायला आलो आहे.”

अभिराज,“ हे लग्न होणारच नाही. मला माहित आहे आदी मी तुला आणि क्षितिजाला ही खूप दुखावले आहे पण तुझ्या भाईला एकदा माफ करशील का?” तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

आदिराज,“ माझा भाई कुठे तरी हरवला आहे. जो समोर आहे ना त्या व्यक्तीला मी ओळखत नाही.” तो म्हणाला.

अभिराज,“ कदाचित तो इथेच कुठे तरी असेल आणि तुला दिसत नसेल पण दिसेल तुला तुझा भाई लवकरच!” तो म्हणाला आणि निघून गेला.


संगीताचा कार्यक्रम सुरू झाला. ज्याला जसे जमेल तसे त्याने डान्स केला. क्षितिजाचे मात्र आज कशातच लक्ष नव्हते. ती खूपच शांत होती. कार्यक्रम झाला आणि सगळे जेवायला गेले. आदिराज, क्षितिजा आणि बाकी सगळे लोक जेवत होते.अभिराज आणि त्याची टीम सगळी व्यवस्था पाहत होते. अभिराज वॉशरूमकडे निघाला होता आणि क्षितिजाची मामे बहीण श्रद्धा समोरून मोबाईल पाहत येत होती. तिचे लक्ष नव्हते आणि ती अभिराजला धडकली. तिचा पाय त्याच्या जखम असलेल्या पायावर पडला तो चांगलाच कळवळला.

अभिराज,“ आई गं ss!”त्याच्या कळवळण्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. श्रद्धा मात्र त्याच्यावरच भडकली.

श्रध्दा,“ तुला दिसत नाही का रे? की दिसली सुंदर मुलगी की लगेच चान्स मारायचा!”ती तणतणत होती.


अभिराज मात्र खाली बसून त्याचा पाय पाहत होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते. आदिराजचे सगळे लक्ष आल्यापासून अभिराजकडेच होते. तो लंगडताना त्याने पाहिले होते आणि आता ही त्याची काहीच चूक नाही हे देखील त्याला माहित होते.

श्रद्धा,“ आता सॉरी म्हणतोस का? इss माझ्या सॅंडेलला हे काय लागले? (तिने खाली वाकून पाहिले तर अभिराजच्या पायाची पट्टी सुटून त्या पट्टीचे औषध तिच्या सॅंडेलला लागले होते.) हे साफ करून हवं मला आत्ताच्या आत्ता” ती रागाने ओरडली.

अभिराज,“ सॉरी मॅडम! मी साफ करतो.” तो म्हणाला आणि स्वतःचा रुमाल त्याने काढला तर आदिराज तिथे आला.

आदिराज,“ काय तुम्ही पण जा तुमचं काम करा!(तो अभिराजकडे पाहत म्हणाला. श्रध्दा ही आदिराजला पाहून शांत झाली आणि अभिराज निघून गेला. आदिराज क्षितिजा जवळ आला.) क्षिती हे माझ्या भावाच काय करून ठेवलं आहे तुम्ही?” त्याने आश्चर्याने विचारले.

क्षितिजा,“ तो तुझा भाऊ अभिराज नाही इथे तो राज आहे फक्त! इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमधून आलेला असिस्टंट मॅनेजर! आणि प्रायश्चित्त घेतोय ना तो! तू बरं केलंस मध्ये गेलास ते! ही श्रद्धा म्हणजे ना विचारू नकोस.” ती म्हणाली.

आदिराज,“ जर आज राज ऐवजी अभिराज इथे असता ना तर तुझ्या या श्रद्धाची वाट लावली असती क्षिती! तो किती खडूस आहे माहीत आहे ना तुला?” तो म्हणाला.

क्षितिजा,“ माहीत आहे? मी अनुभवले आहे त्यांचे खडूसपण! आदी प्लिज ते कुठं आहेत पहा त्यांचा आधीच जखमी पाय अजून दुखावला गेला आहे. किती कळवळले ते!” ती काळजीने म्हणाली.

आदिराज,“ ते त्याच्या आवाजावरून आले लक्षात मी पाहतो.


अभिराज तिथून जाऊन मागे असलेल्या दरी लगतच्या बेंचवर बसला होता. आदिराज त्याला शोधत फस्ट एड घेऊन तिथे गेला. अभिराजचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. आदिराज त्याच्या जवळ बसला आणि म्हणाला.

आदिराज,“ पाय वर कर.”

अभिराजने गुपचूप पाय वर घेतला. आदिराजने अभिराजच्या पायाला पट्टी केली. त्याला अभिराजचे अंग गरम लागत होते.

आदिराज,“ तुला तर ताप आहे आणि तू इथे काय करत आहेस. मेडिसीन्स घेतले का?की डॉक्टरला बोलावू मी?” त्याने त्याच्या कपाळाला हात लावत काळजीने विचारले.

अभिराज,“ नको डॉक्टरांना दाखवले आहे कालच आणि मेडिसीन्स ही आहेत माझ्याकडे!” तो म्हणाला.

आदिराज,“ मग जा आणि काही तरी खाऊन मेडिसीन्स घेऊन झोप आता!” तो उठून जात म्हणाला.

अभिराज,“ थँक्स आदी!” तो म्हणाला.

आदिराज,“ गैरसमज नको करून घेऊस तू! मी जे केले त्याचा अर्थ मी तुला माफ केले असा होत नाही. मी माणुसकीच्या नात्याने हे केले.” त्याने जाता जाता त्याला सुनावले आणि तो निघून गेला.

अभिराज मात्र हसत होता. अभिराजला आता उद्याचे टेन्शन आले होते कारण उद्या हळद होती आणि क्षितिजा तिचा डिसीजन उद्या सांगणार होती.

क्षितिजा काय निर्णय घेईल?
© स्वामिनी चौगुले











🎭 Series Post

View all