माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग ३

This Is A Love Story
भाग 3
गार्गी केंव्हाच संग्रामाच्या मिठीत गाढ झोपून गेली होती. संग्रामला मात्र झोप लागत नव्हती. आज वीस वर्षांपूर्वी सुशांतबद्दल घडलेल्या घटनेचा उल्लेख गार्गीने केला होता. तो त्याच्याही नकळत आपसूकच मनाने वीस वर्षे मागे त्यांच्या भूतकाळात गेला.

वीस वर्षांपूर्वी….

ऑफिसमध्ये संग्राम डोक्याला हात लावून बसला होता. त्याला काय करावे हेच कळत नव्हते.कारण ही तसेच होते. त्यांनी हाती घेतलेल्या एका प्रोजेक्टमध्ये लॉस झाला होता. हा लॉस त्यांच्या नव्याने उभारी घेत असलेल्या बिझनेससाठी परवडणारा नव्हता.सुशांत त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला.

सुशांत,“माझ्याचमुळे झाले हे सगळे तू नको म्हणत होतास तरी मी हट्टाने ते प्रोजेक्ट घेतले.” तो स्वतःलाच दोष देत बोलत होता.

संग्राम,“सुशा प्लिज मला एकटं सोड मला नाही बोलायचं या विषयावर! आता पुढे काय? हा प्रश्न आ वासून उभा आहे. तुला काय रे तुझ्याकडे नोकरी आहे त्यामुळे तुला या सगळ्याचा तितकासा फरक पडणार नाही पण माझं मात्र बिझनेसवरच अवलंबून होत सगळं!” तो वैतागून म्हणाला पण सुशांतला मात्र त्याचे बोलणे चांगलेच जिव्हारी लागले. तो काहीच न बोलता निघून गेला.


त्यानंतर दोन दिवस असेच निघून गेले. एक दिवस संग्राम घरी आल्यावर त्याला सुशांतच्या मोठ्या भावाचा फोन आला.

भाऊ,“तुला वेळ आहे का संग्राम?” त्यांनी विचारले.

संग्राम,“हो आहे ना, बोला ना भाऊ!”

भाऊ,“अरे त्या सुशाच काय चालले आहे? त्याने गावाकडची त्याच्या वाटणीला आलेली तीन एकर ऊसाची बागायती शेती विकायला काढ असे सांगितले आहे. मला गिऱ्हाईक पहा म्हणून सांगितले आहे त्याने, जमिनीचे भाव खूप जास्त झाले आहेत आणि त्याला वर्षा काठी चांगले उत्पन्न मिळते की जमिनीतून आता जर त्याने जमीन विकली तर त्याला पुन्हा जमीन घेणं जमणार आहे का? त्याला सांग जरा समजावून संग्राम आमचं तर तो काहीच ऐकून घ्यायला तयार नाही.” ते बोलत होते आणि संग्रामच्या सगळा प्रकार लक्षात आला.

संग्राम,“भाऊ तो नाही विकणार जमीन वगैरे काही मी समजावतो त्याला.” तो म्हणाला आणि सरळ समोर सुशांतच्या घरात गेला.

समिधा मुलांना भरवत होती तर सुशांत कसलेसे डॉक्युमेंट वाचत होता.सुशांतने संग्रामला पाहिले आणि ते डॉक्युमेंट एका फाईलमध्ये ठेवून दिले.

सुशांत,“संग्र्या ये की बस.”

संग्राम,“तुझं नेमकं काय चालले आहे सुशा? तू गावाकडची जमीन विकायला काढली आहे पण का?” त्याने थोडे रागानेच विचारले.

सुशांत,“भाऊनी फोन केला वाटतं तुला? हो मी जमीन विकायला काढली आहे कारण बिझनेसमध्ये लॉस माझ्या चुकीच्या निर्णयामुळे झाला आहे आणि तो मलाच भरून काढावा लागेल. एकूण एक कोटीचा लॉस झाला आहे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये तर माझ्या वाटणीची जमीन विकून सध्याच्या रेटनुसार मला पंचाहत्तर लाख मिळतील आणि उरलेल्या पंचवीस लाखाचे मी कर्ज काढत आहे पगारावर म्हणजे नुकसान भरून निघेल.” तो हिशोब करत बोलत होता. तो पर्यंत तिथे गार्गी आणि बाबा ही आले होते.

संग्राम,“डोकं फिरलय का तुझं? तुझ्यामुळे नुकसान झाले म्हणे आणि तू त्याची भरपाई करणार ती ही अशी? सुशा बिझनेस आपल्या दोघांचा आहे. आपण दोघे ही फायदा आणि नुकसान याला जबाबदार आहोत तर तू भरपाई करण्याचा प्रश्न येतोच कुठे?” तो चिडून म्हणाला.

सुशांत,“हो बिझनेस आपल्या दोघांचा आहे पण नुकसान तर माझ्यामुळेच झाले आहे ना?”तो अपराधीपणे म्हणाला.


संग्राम,“त्या दिवशी मी बोललो त्याचा राग आला आहे का तुला? अरे मी टेन्शनमध्ये बोलून गेलो. आय एम सॉरी!” तो खाली मान घालून म्हणाला.

संजयराव,“हे काय चालले आहे तुमच्या दोघांचे?माझ्यामुळे तुझ्यामुळे अरे बिझनेस करायचा म्हणल्यावर नफा-तोटा होणारच आणि सुशा तू कसा काय जबाबदार रे या सगळ्याला? चिनू देखील त्या प्रोजेक्टमध्ये तुझ्या बरोबर सामील होता ना? मग भरपाईचा प्रश्न येतोच कुठे? झाले ते झाले पुढे एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये नफा होईल आणि भरून निघेल की नुकसान इतकं काय त्यात? तू जमीन वगैरे विकणार नाहीस आणि कर्ज तर त्याहुन काढणार नाहीस कळले तुला?” ते त्याला बजावत म्हणाले.

संजयराव यात पडल्याने सुशांतला त्यांचे ऐकणे भाग पडले. त्याला सगळे कॅन्सल करावे लागले. पण त्यानंतर संग्राम आणि त्याची मैत्री पहिल्या सारखी राहिली नाही. सुशांत अगदी गप्प गप्प राहू लागला. ऑफिसमध्ये देखील एकदा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर तो काहीच बोलत नसे. संग्राम जो निर्णय घेईल त्याला तो मूक संमती देत असे. संग्राम मात्र त्याच्या अशा वागण्यामुळे अस्वस्थ होता. त्याला त्याचा हसरा आणि त्याच्यावर हक्क गाजवणारा मित्र परत हवा होता पण कसा ते मात्र त्याला कळत नव्हते.

असेच चार महिने निघून गेले. एक दिवस ऑफिसमध्ये काम करताना सुशांत त्याच्या जवळ आला आणि म्हणाला.

सुशांत,“संग्राम मी घरी जातो. माझं पोट खूप दुखत आहे.” तो चेहरा बारीक करून बोलत होता.

संग्राम,“घरी कशाला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ मग घरी जाऊ मी तुझ्या बरोबर येतो चल!” तो काळजीने म्हणाला.

सुशांत,“इतकं ही काही नाही झालं.माझ्याकडे पेन किलर आहे. मी घेईन आणि आराम करेन थोडा म्हणजे बरं वाटेल मला!” तो म्हणाला.

संग्राम,“नक्की का?” त्याने पुन्हा काळजीने विचारले.

सुशांत,“ हो! मी जातो.” तो म्हणाला आणि निघून गेला.

संग्राम संध्याकाळी घरी गेला. त्याने समिधाकडे त्याच्या तब्बेतीची चौकशी केली.


समिधा,“आजकाल त्याचे पोट दुखत आहे सारखं; तो डॉक्टरकडे जाऊन आला होता. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली आहे पण याने अजून या बिझनेसच्या गोंधळात करून घेतली नाही. घरी आणि तुम्हाला ही कुणाला मला सांगू दिले नाही. पेनकिलर घेऊन झोपला आहे तो!” ती काळजीने म्हणाली.

संग्राम,“ काय? या सुशाने ना आता तर कहरच केला आहे. मूर्ख कुठला! तू काळजी करू नकोस समिधा मी उद्या घेऊन जातो त्याला हॉस्पिटलमध्ये!” तो समिधाला समजावत म्हणाला आणि निघून गेला.

संग्रामला मात्र सुशांतची चिंता वाटू लागली होती.बिझनेसच्या गोंधळात त्याने स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष केले होते. मनात गिल्ट असल्याने तो संग्रामशी देखील फटकून वागत होता.त्याला उद्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. कसा येत नाही ते पाहतोच त्याला? हाच विचार करत तो झोपला आणि त्याला जाग आली ती दाराची बेल कोणी तरी सारखं वाजवत असल्याच्या आवाजाने, गार्गी ही त्या आवाजाने जागी झाली. दोघे हॉलमध्ये आले तो पर्यंत संजयरावांनी दार उघडले होते. मनीषाताई देखील तिथेच होत्या. दारात घाबरलेली समिधा होती. ती घाबरून रडत बोलत होती.

समिधा,“काका! सुशांतच्या पोटात खूप दुखत आहे. त्याला धड उठून बसता पण येत नाही. तो एखाद्या मासळी सारखा तडफडत आहे. मला खूप भीती वाटतेय.”

संजयराव,“समी बेटा अग घाबरू नकोस. आपण आहोत ना चल त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ; चिनू गाडी काढ खाली जाऊन मनीषा पोरांना इकडे घेऊन ये, गार्गी तू चल आमच्या बरोबर!” ते म्हणाले.

ते सगळे गेले तर सुशांत खरंच पोटात दुखत असल्याने लोळत होता. त्याला उठून बसने ही शक्य होत नव्हते.संजयराव, समिधा आणि गार्गीने त्याला कसे बसे उठवले. लिफ्ट मधून खाली नेले. संग्रामने गाडीचे दार उघडेच ठेवले होते. संजयरावांनी सुशांतला कसे बसे गाडीत बसवले. ते सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी त्याला लागलीच इमर्जन्सी रूममध्ये घेतले. हे सगळं होई पर्यंत रात्रीचे एक वाजून गेले होते.डॉक्टर बाहेर येताना दिसले. ते खूप चिंतीत दिसत होते.

डॉक्टर,“आम्ही पेशंटची सोनोग्राफी केली आहे.त्यांना अपेंडिस्क आहे. बऱ्याच दिवसापासून दुर्लक्ष केल्यामुळे ते पोटात चिघळून फुटले आहे. त्याचे विष पूर्ण शरीरात पसरण्याच्या आधी आपल्याला त्यांची सर्जरी करावी लागेल. नाही तर पेशंटला वाचवणे अशक्य होईल.” हे ऐकून समिधा रडायला लागली. तिला गार्गीने सांभाळले.

संजयराव आणि संग्रामने सर्जरीची सगळी फॉर्मेलिटी पूर्ण केली. सुशांतला सर्जरीसाठी डॉक्टरांनी नेले.बाहेर सगळे चिंतीत बसून होते. संग्रामला सुशांतची काळजी ही वाटत होती आणि त्याने केलेल्या निष्काळजीपणाचा राग देखील येत होता.दोन वाजता सुरू झालेली सर्जरी पहाटे चार वाजता पूर्ण झाली. डॉक्टर ओ.टी मधून बाहेर आले.

समिधा,“ डॉक्टर सुशांत कसा आहे?” तिने रडतच विचारले.

डॉक्टर,“आम्ही अपेंडिस्क काढलं आहे. सुदैवाने अपेंडिस्क फुटले असले तरी ते पोटात जास्त पसरले नव्हते. नाही तर परिस्थिती अवघड झाली असती. तरी देखील आम्हाला त्यांना चोवीस तासासाठी I. C. Uमध्ये ऑब्जरर्वेशनमध्ये ठेवावे लागेल.कारण अशा केसेस मध्ये पेशंटला कधी त्रास होईल सांगू शकत नाही. त्यांना शुद्ध आल्यावरच आपण काय ते सांगू शकू.” ते म्हणाले.

संग्राम,“म्हणजे? डॉक्टर तो सेफ तर आहे ना?” त्याने आवंढा गिळत विचारले.

डॉक्टर,“ ते पेशंटला शुद्ध आल्यावरच सांगता येईल. ” ते म्हणाले.

सुशांतला I. C. U.मध्ये शिफ्ट केले आणि समिधा त्याला पाहून आली. बाकी सगळ्यांनी त्याला बाहेरूनच पाहिले. सगळेच खूप टेंन्शनमध्ये होते. रात्र अशीच उजाडली आणि साधारण सकाळी नऊच्या सुमारास सुशांतला शुद्ध आली. डॉक्टरांनी त्याला चेक केले.तो सेफ असल्याचे सांगितले. तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. संजयरावांनी त्याच्या मोठ्या भावाला आणि आई-वडिलांना फोन करून सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. त्यांनी दुपारपर्यंत पोहोचतो असे सांगितले.समिधा त्याला भेटली आणि संग्रामने सगळ्यांना घरी पाठवून दिले. सुशांत अजून ही गुंगीत होता. त्याला दुपारनंतर बऱ्या पैकी शुद्ध आली. त्याने डोळे उघडले तर संग्राम त्याच्या शेजारी स्टूलवर बसला होता.

सुशांत,“आपण हॉस्पिटलमध्ये कधी आलो आणि समी कुठे आहे?” त्याने हळू आवाजात विचारले.

संग्राम,“ रात्रीच आलो आहोत आपण हॉस्पिटलमध्ये;समिधा घरी गेली आहे.तुला काय हवं का?” त्याने विचारले.

सुशांत,“पाणी दे ना थोडं!” तो म्हणाला.

संग्रामने बेड अप पोजिशनमध्ये केला. त्याला पाणी पाजले. दुपारी सुशांतचे आई-बाबा आणि समिधा देखील आले. त्याला चोवीस तासानंतर रूममध्ये शिफ्ट केले. संग्राम शक्य इतका वेळ सुशांत जवळ असायचा पण तो त्याला जास्त बोलत नव्हता.सुशांतच्या ही ते लक्षात आले होते तरी तो गप्प राहिला.सात दिवसांनंतर सुशांतला महिना भर बेड रेस्ट आणि काही पथ्य सांगून घरी सोडण्यात आले.

संग्रामाच्या मात्र मनात या दिवसात बरीच उलथापालथ सुरू होती. त्याने बराच विचार केला आणि एका निर्णयापर्यंत पोहोचला होता.


संग्रामने काय निर्णय घेतला असेल? सुशांत आणि संग्रामची मैत्री पुन्हा पूर्ववत कशी झाली असेल?
©स्वामिनी चौगुले







🎭 Series Post

View all