माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २ भाग ३२

अभिराजचे पुढचे पाऊल काय असेल?


भाग 32
अभिराज त्याच्या रूममध्ये गेला. त्याला स्वतःच्याच वागण्याची आज लाज वाटत होती. त्याने क्षितिजा वर केलेले आरोप तिला सूनवलेले जहाल शब्द सगळं सगळं त्याला आठवत होतं. त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. सगळ्यात जास्त तर आज त्याने त्याच्या अंकुला दुखावले होते. त्याने संग्रामला आजपर्यंत कधीच इतकं हतबल आणि हरलेलं पाहिलं नव्हतं. जेंव्हा संग्राम त्याच्यामुळे सुशांतच्या समोर हात जोडून माफी मागत होता तेंव्हा त्याच्या काळजाला घरे पडत होते. त्याला स्वतःचाच प्रचंड राग येत होता. तो नुसता क्षितिजाचाच नाही तर आदिराज, संग्राम आणि बाकी सगळ्यांचा देखील गुन्हेगार झाला होता. त्याने एका स्त्रीचा आत्मसन्मान पायदळी तुडवला होता. स्वतःच्या टुकार गैरसमजामुळे आज तो स्वतःशीच नजर मिळवू शकत नव्हता.

स्वतःच्याच नजरेतून उतरला होता तो!आणि माणूस जेंव्हा स्वतःच्या नजरेतून उतरतो तेंव्हा स्वतःला संपवण्याचा विचार करतो. तोच विचार अभिराजच्या देखील मनात तरळून गेला. तितक्यात दारावर कोणी तरी थाप मारली. अभिराजने डोळे पुसून दार उघडले तर समोर सुशांत होता.

सुशांत,“ तू जे वागलास ना अभी त्यामुळे सगळ्यांच्याच नजरेतून उतरलास. तू स्वतःच्या पण नजरेतून उतरला असशील आणि माणूस जेंव्हा स्वतःच्या नजरेतून उतरतो तेंव्हा वेडेवाकडे पाऊल उचलण्याचा विचार करतो. पण एक लक्षात ठेव तू जर असा काही विचार करत असशील तर पहिल्यांदा संग्रामचा विचार कर. जो माणूस तुझ्या अशा वागण्यामुळे इतका खचला आहे. त्याचा दोष नसताना; स्वतःलाच दोष देत आहे. तो माणूस तू असं काही केलं तर काय करेल? सगळा सारासार विचार करून काय ते ठरव.” तो म्हणाला आणि त्याच्या उत्तराची वाट ही न पाहता निघून गेला.

इकडे संग्राम मात्र अस्वस्थ होता. त्याला अभिराजचा राग तर आला होता पण त्याची काळजी देखील वाटत होती. त्याने या सगळ्यातून काही वेडेवाकडे पाऊल चालले तर ही शंका त्याला सतावत होती म्हणून त्याने उठून टेबल लॅम्प लावला आणि सुशांतच्या मोबाईलवर फोन केला.

संग्राम,“ सुशा मला अभीची काळजी वाटते रे! अशा परिस्थितीत त्याने काही स्वतःचे बरे-वाईट करून घेतले तर?” त्याने कातर आवाजात विचारले.

सुशांत,“ तो असं काही करणार नाही. तू स्वतःला सावर संग्र्या!” तो त्याला समजावत म्हणाला.

संग्राम,“ बरं! पण लक्ष असू दे तुझं!” तो म्हणाला.

सुशांत,“ आदी कसा आहे? मला तर त्याच्यासमोर सुद्धा जाण्याची हिम्मत होत नाही. ” तो म्हणाला.

संग्राम,“ गार्गी गेली आहे त्याच्याजवळ!” तो म्हणाला.
★★★

इकडे आदिराजच्या रूममध्ये गार्गी गेली तर तिच्या आधी तिथे समिधा हजर होती. तसेच संजयराव आणि मनीषाताई देखील तिथे होते. आदिराज समिधाच्या कुशीत शिरून मुसमुसत होता. मनीषाताई आणि संजयराव त्याच्याजवळ बसले होते. त्याने गार्गीला पाहिले आणि तो उठून बसत म्हणाला.

आदिराज,“ मम्मा डॅडा कसा आहे? या सगळ्याचा सगळ्यात जास्त धक्का त्याला बसला आहे आणि सगळ्यात जास्त त्रास देखील त्यालाच झाला आहे.” तो काळजीने बोलत होता.

गार्गी,“ठीक आहे तो आता! तू काही खाल्लंस का?” तिने त्याच्याजवळ बसत विचारले.

समिधा,“ गार्गी तू संग्रामजवळ जा. मी त्याला दूध दिलं आहे. संग्रामला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे.” ती म्हणाली.

आदिराज,“ तुम्ही जा सगळे मी ठीक आहे आता. जाऊन झोपा!” तो म्हणाला आणि सगळे निघून गेले.
★★★

इकडे समिधा रूममध्ये आली तर सुशांत बेडवर शांत बसला होता. आज जे वादळ त्यांच्या घरात आले होते त्यामुळे खरं तर कोणालाच झोप लागणे केवळ अशक्य होते. समिधा त्याच्याजवळ येऊन बसली.

सुशांत,“बच्चू कसा आहे ग?”

समिधा,“ तो ठीक आहे. रडत होता खूप पण मी आणि काका-काकूंनी त्याला सांभाळले आहे पण मला या सगळ्यात जास्त चिंता संग्रामची वाटते सुशांत! सगळ्यात जास्त तो दुखावला गेला आहे आज त्याने तुझ्यासमोर हात जोडले आपल्याच मुलाच्या वागणुकीमुळे; मला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले. अभीसाठी काय नाही केले रे त्याने आणि गार्गीने! तो तीन वर्षांचा असताना राज्ञीची चाहूल लागली आणि दोघांनी याची सगळी जबाबदारी घेतली अगदी आज तागायत! पण अभीने असं वागून सगळ्यांना दुखावले आहे.” ती डोळ्यातले पाणी पुसत बोलत होती.

सुशांत,“ खरं आहे तुझं समी! मला ही संग्रामचा असं हात जोडणे आवडले नाही. तो स्वतःलाच दोष देत बसला. त्याची चोवीस वर्षांपूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली. खरं तर त्याचा तेंव्हा ही दोष नव्हता आणि आज जी नाही पण तो किती सेन्सिटिव्ह आहे तुला तर माहीतच आहे. त्यातून ही अजून अभीची काळजी आहेच. फोन आला होता त्याचा म्हणे अभीने या सगळ्यातून काही बरे वाईट करून घेतले तर?मी काय करू या माणसाचे तेच कळत नाही समी मला?” तो कातर आवाजात म्हणाला.

समिधा,“ काही नको करू होईल सगळं नीट थोडा वेळ जाऊ दे.” ती त्याला समजावत म्हणाली.
★★★

दुसऱ्या दिवशी दोन्ही घरातील वातावरण शांत होते. संग्राम, आदिराज आणि बाकी सगळे नाष्टा करत होते. तर तिथे अभिराज आला.

अभिराज,“आदि मला माहित आहे मी तुझा आणि क्षितिजाचा गुन्हेगार आहे. मी तुला मला माफ कर असं नाही म्हणणार आणि तू मला काल दिलेली शिक्षा मला मान्य आहे. मी खरंच तुझा भाई होण्याच्या लायकीचा नाही. अंकू या सगळ्यात मी तुला आणि आंटीला सगळ्यात जास्त दुखावले आहे. मला माफ करा. मला स्वतःलाच स्वतःची लाज वाटते.” तो खाली मान घालून कातर आवाजात बोलत होता.

संग्राम,“ गार्गी याला सांग याने मला अंकू म्हणायचा अधिकार काल गमावला आहे आणि मला याच्याशी बोलायचे नाही. याने हीच याची शिक्षा समजावी.” तो म्हणाला आणि निघून गेला. आदिराज देखील त्याच्या पाठोपाठ निघून गेला. संजयराव आणि मनीषाताई तिथेच होते.

अभिराज,“आंटी आय एम सॉरी!” तो म्हणाला. तोपर्यंत तिथे समिधा आली.

समिधा,“ पहिल्यांदा सगळ्यांना दुखावलेस तू आणि आता माफ करण्याची अपेक्षा करतोस? अभी तू तुझ्या वागणुकीने लाज आणलीस, तू तर सगळ्यांच्या नजरेत उतरलास आम्ही ही स्वतःच्याच नजरेतून उतरलो रे! तू आदिची, संग्रामची, गार्गीची माफी मागितलीस पण जीचा तू खरा गुन्हेगार आहेस तीच काय? तिची माफी कशी आणि कधी मागणार?” तिने त्याला रोखून पाहत विचारले.

गार्गी,“ तुला जर आमच्या सगळ्यांकडून माफी हवी असेल आणि तुझे पूर्वीचे स्थान परत हवे असेल तर जाऊन क्षितिजाची माफी घेऊन ये! प्रेम होतं ना तुझं तिच्यावर? आणि प्रेम हे विश्वासाच्या भक्कम पायावर उभं असतं. विश्वास नसेल तर प्रेम देखील टिकत नाही. तू तोच विश्वास क्षितिजावर ठेवला नाहीस. मी अनुभवले आहे आपल्या प्रेमाचा विश्वास गमावणे काय असते ते? तो पुन्हा मिळवायला खूप वेळ लागतो अभी. इथे तू तर तुझ्या सगळ्याच माणसांचा विश्वास गमावला आहेस! तो विश्वास परत मिळवायचा असेल तर तुला आधी क्षितिजावर विश्वास ठेवून तिचा विश्वास मिळवायला हवा. तिने तुला माफ केले तर आपसूकच सगळेच तुला माफ करतील आणि दुसरी गोष्ट तुझं जर तिच्यावर प्रेम होतं तर तिला असंच जाऊ देणार का? तिचा विश्वास मिळवण्याचा, तिचे प्रेम परत मिळवण्याचा एकदा ही प्रयत्न करणार नाहीस?” ती म्हणाली.


समिधा,“ खरं आहे गार्गी तुझं! कोणती ही समस्या सोडवताना तिच्या मुळाशी आपल्याला जावं लागतं तेंव्हाच ती समस्या दूर होते. अभी तुझ्या चुकीच्या वागणुकीच मूळ तुझं क्षितिजावर असणारा अविश्वास आहे. तू तिचा गुन्हेगार आहेस!” तिने गार्गीच्या बोलण्याला दुजोरा दिला.

संजयराव, “बघ अभी या गोष्टींचा सारासार विचार कर आणि निर्णय घे.”ते म्हणाले.

अभिराज विचारात पडला होता. त्याच विचारात तो ऑफिसला गेला.

अभिराजचे पुढचे पाऊल काय असेल?
© स्वामिनी चौगुले




🎭 Series Post

View all