माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग २

This Is A Love Story


भाग 2
अभिराज,संग्राम आणि सुशांत ऑफिसमध्ये होते. गार्गी सहा वाजता ऑफिस सुटल्यावर घरी पोहोचली. ती आज काल सहा वाजताच घरी येत असे तिचे रुटीन ठरलेले होते. ती गाडीतून उतरली आणि ड्रायव्हरने गाडी पार्किंगमध्ये पार्क केली.
दोन सेम टू सेम असणारे दोन मजली टुमदार बंगले. जणू दोन जुळे भाऊ शेजारी शेजारी उभे आहेत.रंग पोर्च,गॅलऱ्या अगदी सगळं सारखेच दोन्ही बंगल्याचे मिळून एकच मोठे कंपाऊंड होते आणि एकच गार्डन! दोन्ही बंगले वेगळे असले तरी दोन्हीमध्ये ये जा करण्यासाठी खाली एक टनल सारखी वाट होती आणि वर ही एक टनल सारखी वाट होती. त्यातून दोन माणूसे दोन्हीकडे एकाच वेळी सहज ये जा करू शकतील अशी व्यवस्था म्हणजेच दोन घरं आतल्या आत एकमेकांनाशी जोडली गेली होती. बंगले आतून देखील सारखेच होते अगदी इंटरियर पासून ते रंग वगैरे सगळं एक!

गार्गी पोर्चमध्ये गेली तर मनीषाताई झोपाळ्यावर वाती वळत बसल्या होत्या तर संजयराव आराम खुर्चीत कसलेसे पुस्तक वाचत बसले होते. मनिषाताईंनी गार्गीला पाहिले आणि त्या म्हणाल्या

मनीषाताई,“जा बेटा फ्रेश होऊन ये, मी कॉफी करायला सांगते सखू बाईंना!”

गार्गी,“नको आई मी सखुला सांगून फ्रेश व्हायला जाते आणि अदू कुठे आहे? कॉलेजमधून आला का तो?”

मनीषाताई,“ आला होता तो कॉलेजमधून पण कुठे तरी निघून गेला बाई! समीला विचार तिला माहीत असेल.” त्या म्हणाल्या.

गार्गी,“बरं!” म्हणून ती घरात गेली.

बंगल्यात गेले की मोठासा प्रशस्त हॉल,मधोमध मोठाले झुंबर, उंची फर्निचर, पडदे, हॉल मधून वर जाणारा नागमोडी जीना, हॉलच्या डाव्या बाजूला प्रशस्त किचन आणि त्याला लागून डायनिंग हॉल आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम,स्टडी रूम! वर प्रशस्त चार बेडरूम आणि एका बाजूला भली मोठी जीम! पदोपदी समृद्धीची साक्ष देणारे एकूण डौलदार घर!

गार्गी सखुला कॉफी करायला सांगून बेडरूममध्ये निघून गेली. ती फ्रेश होऊन हॉलमध्ये आली. ती कॉफी घेत मोबाईल पाहत होती तर समिधा तिला मधल्या रस्त्याने काही तरी घेऊन येताना दिसली.समिधा हॉलमध्ये आली आणि सखुला बोलावून एक बाऊल तिच्या हातात दिला.ती गार्गी जवळ येऊन बसली.

गार्गी,“ आज काय घेऊन आलीस तू?” तिने हसून विचारले.

समिधा,“ गाजराचा हलवा केला होता. संग्राम आणि बाबांना ही आवडतो ना म्हणून घेऊन आले गं,आजचा दिवस कसा होता?” तिने विचारले.

गार्गी,“ काही विशेष नाही रोजचेच पण आदी कुठे गेला आहे? आई म्हणाल्या तुला माहीत असेल!” ती म्हणाली.

समिधा,“ तो मित्रांच्या बरोबर गेला आहे. येतो म्हणाला दहा वाजेपर्यंत!” तिने सांगितले.

गार्गी,“बरं समी आपल्या आश्रमात नवीन आलेल्या आजी कशा आहेत गं? गेल्या वेळी भेटले तर खूप उदास दिसत होत्या!” तिने विचारले.

समिधा,“आता त्या रुळल्या आहेत. आपल्या आश्रमातील मुलां बरोबर. कोणाला आपले कुटुंब सोडून यावे वाटत नाही ग गार्गी मग त्या वनिता आजी त्याला अपवाद कशा असतील? पण आता त्यांनी आश्रमातले आयुष्य स्वीकारले आहे. लहान मुलांच्यात आता चांगल्या रमल्या आहेत त्या! संग्रामची कल्पना खरंच छानच आहे. हे वृध्द लोक अनाथ मुलांमध्ये रमतात आणि मुलांना देखील माया प्रेम मिळते. आश्रमातली अनेक मुले अगदी आवर्जून भेटीला येतात या वृध्दांना! तुला तर माहीतच आहे काही मुलांनी तर चक्क बऱ्याच वृद्धांची जबाबदारी उचलून घरी नेले आहे स्वतःच्या!” ती भरभरून बोलत होती.

गार्गी,“समी अग कल्पना संग्रामची होती पण तू गेल्या वीस वर्षांत त्याला मूर्त रूप दिले. स्वतःचे करिअर सोडून तू समाजसेवेत उतरलीस आणि हा डोलारा सांभाळला. वाढवलास देखील!” ती कौतुकाने म्हणाली.

समिधा,“ ये बाई इतकं कौतुक नको करुस माझ! मला पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड होती. बरं जाते मी आता, थोडं काम आहे!” ती म्हणाली आणि निघून गेली.

गार्गीने आज डिनरसाठी काय करायचे त्या सूचना कुकला दिल्या. ती थोडावेळ संजयराव आणि मनीषाताईशी गप्पा मारत बसली. हे सगळं होई पर्यंत नऊ वाजले आणि संग्राम ऑफिसमधून घरी आला.सगळ्यांनी जेवण केले. संग्राम रूममध्ये निघून गेला. तोपर्यंत गार्गी तिथे आली. संग्राम तिचीच वाट पाहत होता.

संग्राम,“ गार्गी आदी कुठे आहे? आज तो जेवायला ही नव्हता?” त्याने विचारले.

गार्गी,“मित्रांच्या बरोबर बाहेर गेला आहे तो, मी फोन ही केला होता येईल तो दहा पर्यंत! तुझा रुल ब्रेक नाही होणार” ती त्याला समजावत त्याच्या जवळ जाऊन बसत म्हणाली

संग्राम,“प्रश्न रूलचा नाही गार्गी. मला बच्चूची काळजी वाटते!” तो म्हणाला.

गार्गी,“नको करुस मग काळजी त्याची, आता तो लहान नाही राहिला.”

संग्राम,“तो लहान नाही राहिला म्हणूनच जास्त काळजी वाटते. आज काल कॉलेजेसमध्ये कसे वातावरण असते माहीत आहे ना तुला?” तो चिंतीत होत म्हणाला.

गार्गी,“हो माहीत आहे मला पण तू ना त्याची जास्तच काळजी करतोस आणि आपली नजर असते ना त्याच्यावर मला माहित आहे तू तो घरी आल्या शिवाय झोपणार तर नाहीसच!” ती म्हणाली आणि संग्रामचा फोन वाजला.

संग्राम,“ हा बोल सुशा”

सुशांत,“बच्चू आला आहे रे तो अभीच्या रूममध्ये गेलाय झोपायला. जेवण करून आला आहे म्हणे. तू झोपत नाहीस तो आल्या शिवाय म्हणून सांगितले तुला!”तो म्हणाला.

संग्राम,“तो तुझ्याकडे आला आणि अभी जवळ झोपायला गेला म्हणजे नक्कीच कार्ट्याने काही तरी कांड केला असणार!” तो थोडा चिडून म्हणाला.

सुशांत,“उगीच काही पण नाही बोलायचं हा माझ्या बच्चूला त्याला यावं वाटलं इकडे तो आला. तू झोप आता!” तो दम देत म्हणाला.

संग्राम,“तुझ्याच लाडामुळे तो शेफारत चालला आहे. सुशा उद्या त्याने काय केलं ते समजू दे मग दाखवतो त्यालाही आणि तुलाही!” तो धमकावत म्हणाला.

सुशांत,“जा नाय भीती तुझ्या धमकावण्याला झोप!” तो हसून म्हणाला आणि फोन ठेवला.

गार्गी,“तो तिकडे गेला आहे झोपायला?जाऊदे आला ना वेळेवर मग झालं तर!” ती म्हणाली.

संग्राम,“हो पण त्याने नक्कीच काही तरी माती खाल्ली असणार गार्गी म्हणूनच तो गेला आहे सुशाकडे!” तो संशयाने म्हणाला.

गार्गी,“उद्या पाहू ना आणि उगीच त्याच्यावर काय संशय घेतो रे सारखा? बरं मला तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचे आहे.” ती म्हणाली.

संग्राम,“बोल!”

गार्गी,“ आज अभी सुशांतशी ज्या प्रकारे बोलला ते मला आवडलेले नाही! ती गोष्ट आपण मस्करीत घेतली खरं पण सुशांत अभीचा बाप आहे आणि अभी त्याच्याशी असं बोलू शकत नाही. सुशांत जितका जॉली आहे तितकाच मनस्वी देखील; याचा चांगलाच अनुभव आपण वीस वर्षांपूर्वी घेतला आहे संग्राम!” ती बोलत होती.

संग्राम,“हो बाई वीस वर्षांपूर्वीच कशाला? गेल्या वर्षी तो मिसेस राणेशी कसा वागला आहे? तू त्या बाईला झापलीस सगळी कोडिंग चुकवली म्हणून आणि ती बाई तिच्या डेस्कवर जाऊन नाही नाही ते बरळली तुझ्या बद्दल! त्याचे व्हिडीओ शूटिंग या सुशाच्या पंटरने करून त्याला पाठवले आणि याने त्या बाईला सरळ कामावरून हकलवून दिले.” तो म्हणाला.

गार्गी,“हो ना वरून त्या राणे बाईच्या पेपर्सवर रेड मार्क देत होता. काय तर म्हणे माझ्या बहिणी बद्दल ती असं कसं बोलू शकते? मीच त्याला समजावलं पण त्याने त्या बाईला नोकरी नाही मिळू दिली किती तरी दिवस त्यामुळे सगळ्या ब्रँचेसचा स्टाफ त्याला वचकून असतो.” ती हसून म्हणाली.

संग्राम,“आणि वीस वर्षांपूर्वी तो जे वागला आहे ना ते तर मी विसरूच शकत नाही. तू म्हणते ते बरोबर आहे. अभी नाही बोलू शकत त्याच्याशी असं मी उद्याच त्याचे कान धरतो बरं पण हेच बोलत बसायचं का आपण आता?दुपारचं प्रॉमिस विसरलीस का?” तो लाडिकपणे तिच्या जवळ जात म्हणाला.

गार्गी,“ मी लाख विसरीन पण तू मला विसरू देणार आहेस का?” ती सुचकपणे हसून म्हणाली.

संग्राम आणि सुशांतने सुरू केलेला ट्रिपल एस नावाचा स्टार्टअप बिझनेस आज एक वटवृक्ष बनला होता. आज ट्रिपल एस सॉफ्टवेअर कंपनीच्या शाखा वेगवेगळ्या शहरात पसरल्या होत्या. एवढंच नाही तर परदेशात देखील त्यांचे काम जाऊन पोहोचले होते. पण हे सगळं उभ करायला पंचवीस वर्षे लागली होती. त्यात अनेक अडचणी आणि चढ उतार देखील आले होते.हे सगळं त्यांना इतकं सहज मिळालं नव्हतं.

सुशांतने वीस वर्षांपूर्वी असे काय केले होते की ते आठवून आज ही संग्राम-गार्गी घाबरत होते? आणि हा बच्चू उर्फ आदी आहे तरी कोण आणि कसा?

©स्वामिनी चौगुले




🎭 Series Post

View all