माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग २६

जर तमाशा झाला तर अभिराजच्या घरातील नात्यांवर याचा काय परिणाम होईल?


भाग 26

आज क्षितिजा नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आली. अभिराज मात्र आज प्रचंड चिडलेला वाटत होता. त्याने क्षितीजाला केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि महिना भराच काम एकदमच सांगितले. क्षितिजाच्या चेहऱ्यावर

‛यांना आता अजून काय झाले?’

असे भाव होते पण अभिराज तिला नुसती कामावर कामे सांगत होता. क्षितिजा सगळी कामं घेऊन निमूटपणे येऊन डेस्कवर बसली आणि तिच्या कामात मग्न झाली. अभिराज मात्र नुसता धुमसत होता. दुसऱ्या दिवशी पार्टी होती आणि सगळ्या स्टाफला हाफ डे देण्यात आला होता. क्षितिजा देखील घरी निघाली तर तिला अभिराजने अडवले आणि एक फाईल तिच्या हातात देत म्हणाला.

अभिराज,“ याचे सगळे डिटेल्स मला आजच्या आज मेल झाले पाहिजेत.”

क्षितिजा मात्र आता वैतागली होती पण त्याच ऐकण्याशिवाय तिच्याकडे पर्याय तरी कुठे होता. ती पुन्हा डेस्कवर जाऊन बसली. अभिराजचा तोपर्यंत फोन वाजला. फोन संग्रामचा होता. त्याने त्याला ताबडतोब घरी बोलावले होते. अभिराज गेला आणि क्षितिजा ही तिथून सटकली पण फाईल घेऊन.

पार्टी सहा वाजता सुरू होणार होती आणि आता पाच वाजले होते सगळे तयार होत होते. गार्गी ग्रे कलरची सिल्कची साडी नेसून तिच्या मेकअपला फायनल टच देत होती. संग्राम अंगावर ब्लेझर चढवत तिथे आला आणि गार्गीला पाहून त्याने तिला मागून मिठी मारली आणि तिच्या कानात कुजबुजला

संग्राम,“ यु आर लुकिंग सो गोर्जीयस!”

गार्गी,“ आज माझा कौतुक सोहळा नाही तर आपल्या लेकाचा कौतुक सोहळा आहे आणि संग्राम साहेब काही दिवसांनी आपल्याला सुना येतील आणि काही वर्षांनी नातवंडे! तरी तुम्हांला रोमान्स सुचतो का? नाही म्हणजे मी म्हातारी झाले.” ती त्याच्याकडे वळून त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.

संग्राम,“ गार्गी माणूस म्हातारा होत जातो पण प्रेम तर तसच असतं ना चिरतरुण टवटवीत!आणि बाय द वे आपण अजून म्हातारे झालो नाही ऑफिशली साठी नंतर म्हातारे होतात लोक कळलं तुला?” तो तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेत म्हणाला आणि खालून सुशांत ओरडला.

सुशांत,“ संग्राम रोमान्स झाला असेल तर खाली ये तुझ्या बायकोला घेऊन आपण गेस्ट नाही होस्ट आहोत तर लवकर जावे लागेल.

संग्राम,“ आलोच! (पूढे तो गार्गीला हळू आवाजात म्हणाला.) या सुशाला ना घरा शेजारी घर बांधू दिले ना ती चूक केली असं वाटत मला कधी कधी! हा माणूस ना माझ्या रोमान्सचा दुष्मन आहे.” तो लटक्या रागाने म्हणाला आणि गार्गी हसली. दोघे ही खाली गेले.

सगळे मिळून लवकरच पार्टी व्हेनूवर पोहोचले होते. पार्टी व्हेन्यू म्हणजे एका फाईव्ह स्टार हॉटेलचे लॉन होते जे सुंदर सजवण्यात आले होते. आज अभिराज आणि आदिराज दोघे ही सुटाबुटात खूपच हँडसम दिसत होते. गार्गी आणि संग्राम हसत मुखाने गेस्टचे स्वागत करत होते. क्षितिजा देखील पार्टीत पोहोचली. तिने रेडिश कलरचा गाऊन घातला होता.त्यावर नाजूक कानातले, तसेच नाजूक नेकलेस, हातात नाजूक ब्रेसलेट आणि घड्याळ,मोकळे केस आणि लाईट मेकअप ती सुंदर दिसत होती. अभिराजची नजर तिच्यावर पडली आणि त्याने नजर वळवून घेतली. ती मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात सामील झाली. सगळीकडे स्टार्टर आणि हार्ड-सॉफ्ट ड्रिंक घेऊन वेटर्स फिरत होते. संग्राम आदिराजची ओळख त्याच्या बिझनेस असोसिएट्स आणि बाकी लोकांशी करून देत होता. गार्गीने आदिराजला मधोमध बोलावले. तो आला आणि त्याने क्षितिजाला राज्ञीला, अभिराजला हाक मारली आणि केक कापला आणि शँम्पेनची बॉटल फोडली. आदिराज आणि क्षितिजा त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये सामील झाले. अभिराजचे सगळे लक्ष आता क्षितिजावरच होते. मंद सुरात गाणी वाजत होती. आदिराजच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही.

आदिराज,“ क्षिती भाई खूप वेळ झालं तुझ्याकडेच पाहत आहे.” तो तिला हळूच म्हणाला.

क्षितिजा,“ नाव पण नको घेऊ त्या खडूसच आज संग्राम सरांचा त्यांना फोन आला म्हणून मी पार्टीला येऊ शकले. नाही तर नसते येऊ शकले. दोन दिवस झालं हा माणूस माझ्यावर कशाचा राग काढत आहे काय माहित? सतत मला काही नाही ना नाही कामं देत आहे.”ती वैतागून म्हणाली.

अभिराज दोघांना ही लांबून अगदी जवळ येऊन बोलताना पाहत होता आणि त्याचा पारा अजूनच चढत होता.

आदिराज,“ आज भाईच तुझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही त्याची परीक्षा घेऊ आपण क्षिती!” तो तिच्या कानात कुजबुजला.

क्षितिजा,“ ती कशी?”

आदिराज,“ चल दाखवतोच तुला!(असं म्हणून तो क्षितिजाला घेऊन संग्राम आणि गार्गी जवळ गेला.) मोम-डॅड एक कपल डान्स तो बनता है आज!” तो म्हणाला.

संग्राम,“ आता हे वय आहे का आमचं कपल डान्स करायचं!” तो संकोचून म्हणाला.

आदिराज,“ कम ऑन डॅड! तू असं म्हणतोयस! आमच्या पेक्षा आज ही मुली तुला जास्त पाहतात. मॉम प्लिज यार!” तो तोंड बारीक करून म्हणाला.

गार्गी,“ बरं चल संग्राम आणि सुशांत-समिधा तुम्ही ही!” ती हसून म्हणाली.

आदिराजने डीजेला गाणं लावायला सांगितलं आणि हळूहळू कपल्स डान्स फ्लोव्हरवर येऊ लागले. गाणं वाजत होत.


अजीब दास्तां है ये
कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िलें है कौन सी
न वो समझ सके न हम
अजीब दास्तां...

(ये रोशनी के साथ क्यों
धुआँ उठा चिराग से)
ये ख़्वाब देखती हूँ मैं
के जग पड़ी हूँ ख़्वाब से
अजीब दास्तां…

क्षितिजा बाजूला उभी होती. आदिराज तिच्याजवळ गेला आणि त्याने डान्ससाठी त्याचा हात पुढे केला. क्षितिजाने हसून त्याच्या हातात हात दिला आणि दोघे डान्स फ्लोअरवर आले. आदिराजने त्याचा एक हात तिच्या हातात गुंफला होता तर त्याचा एक हात तिच्या कंबरेत होता. तिचा एक हात त्याच्या हातात आणि एक हात त्याच्या खांद्यावर. दोघे ही डान्स करत होते आणि अभिराज त्यांना पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा राग उफाळून येत होता पण त्याने स्वतःला सावरले होते. तो राग कंट्रोल करण्यासाठी ड्रिंकवर ड्रिंक रिचवत होता. आदिराजचे देखील लक्ष त्याच्याकडे होते. तो हळूच क्षितिजाच्या कानात म्हणाला.

आदिराज,“ लूक एट हिम! ही इस जलस!”

क्षितिजा,“तुला खरंच असं वाटतं?” तिने डोळ्याच्या कोनाड्यातून अभिराजला पाहत विचारले.

आदिराज,“ हो! मी त्याला आज नाही ओळखत क्षिती! जेंव्हा त्याला स्वतःचे इमोशन्स कंट्रोल करायचे असतात तेंव्हा तो प्रमाणाच्या बाहेर ड्रिंक करतो.” तो म्हणाला.

थोड्या वेळाने डान्स संपला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. क्षितिजा एकटीच वॉशरूमकडे गेलेली अभिराजने पाहिले आणि तो तिच्या मागे गेला. तिचा हात त्याने धरला आणि तिला लॉनच्या मागच्या बाजूला नेले जिथे कोणीच नव्हते.

अभिराज,“ काय चालले आहे गं तुझे मिस क्षितिजा पाटील?” त्याने तिचा हात करकचून दाबत तिला विचारले.

क्षितिजा,“ मी काय केलं सर? सोडा मला!” ती स्वतःचा हात सोडवून घेत म्हणाली.

अभिराज,“ खरंच तुला माहीत नाही?” त्याने पुन्हा विचारले.

क्षितिजा,“समजेल असं बोलाल का प्लिज.” ती चिडून म्हणाली.

अभिराज,“ तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो मिस क्षितिजा पाटील! श्रीमंत मुलं फसवायची त्यांचीशी लग्न करायचं आणि स्वतःच आयुष्य ऐशो आरामात घालवायचे. तुमचं माणसावर प्रेम नसते तर त्याच्या जवळ असलेल्या पैशावर असते. एकाच वेळी मला आणि आदिला ही स्वतःच्या जाळ्यात ओढलेस तू! कारण आमच्या दोघांमधील एक जरी फसला तर तुझा फायदाच होता. माझ्याबरोबर ही प्रेमाचं नाटक केलंस आणि आदिबरोबर देखील त्या दिवशी लोणावळ्यावरून येताना रोड वर पाहिलं ना मी तू….” तो बोलत होता आणि त्याचे शब्द शिशाचा रस कानात ओतावा तसे क्षितिजाच्या कानात जात होते आणि तिचे काळीज होरपळून निघत होते. तिने त्याचे बोलणेमध्येच तोडले आणि बोलू लागली.

क्षितिजा,“ शी sss किती घाण आहे तुमच्या मनात. तुमच्या बद्दल वाटणारा आदर एका मिनिटात संपला. प्रेम तर लांबीचीच गोष्ट आहे. तुम्ही माझ्याच काय पण कोणत्याच मुलीच्या प्रेमाच्या लायक नाही आहात. हाऊ चिप यु आर!” ती रागाने बोलत होती.

आणि ती निघून जाऊ लागली. क्षितिजा गपचूप निघून जाईल की अभिराज सगळ्यांसमोर तमाशा करेल? जर तमाशा झाला तर याचा अभिराज आणि बाकी सगळ्यांच्या नात्यांवर काय परिणाम होईल?
©स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all