माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग १८

क्षितिजाला पाहून अभिराज कसा रियाक्ट होईल?
भाग 18

बराच वेळ संग्राम गार्गीच्या मांडीवर डोकं ठेवून अश्रू ढाळत होता. गार्गीने ही त्याला रडू दिले. कारण भरलेले भावनांचे आभाळ मोकळे होणे खूप गरजेचे असते. भावनांचा निचरा अश्रू वाटे वेळच्या वेळी झाला तर माणसाचे मन हलके होते. संग्रामच्या मनात देखील आपल्याच मुलाचा अपराधी असल्याची भावना त्याला दुःखी करत होती. त्या दुःखाचा निचरा होणे खूप गरजेचे होते. ते ओळखून गार्गी शांत होती आणि त्याने विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे तेच तिला थोडावेळ कळत नव्हते. म्हणून ही ती शांत होती. ती त्याच्या केसातून हात फिरवत होती. संग्राम मुसमुसायचा शांत झाला.

गार्गी,“संग्राम तू ना काही ही विचार करत असतोस. वेडा आहेस का तू?या एका घटनेने तू आदीच्या मनातून उतरशील का?मूर्खा संध्याकाळपासून तो तुझी वाट पाहत होता. झोपायला ही तयार नव्हता तो. शेवटी मीच त्याला जबरदस्तीने झोपवले आणि मघाशी त्याच्या रूमच्या दारातूनच माघारी का फिरलास तू?” तिने त्याला विचारले.

संग्राम,“ मग तू फोन का केला नाहीस मला? मी आलो असतो आणि तूच म्हणाली ना काल रात्री की तो फक्त तुझा मुलगा आहे. मग माझी हिम्मत नाही झाली त्याच्याजवळ जायची!” तो उठून बसत म्हणाला.

गार्गी,“तू फोन उचलला का माझा? मी म्हणाले तो फक्त माझा मुलगा आहे. तू लगेच सिरियसली घेतलंस ते?” ती हसून म्हणाली.

संग्राम,“ आता हसू नकोस आ गार्गी! एक तर मला म्हणालीस की तो तुझ्यासारखा आहे वगैरे वगैरे… तो तुझ्या एकटी सारखा नाही कळलं तुला? तो माझ्यासारखा ही आहे. हा अभिला माझी सावली म्हणत असतील लोक पण आदी माझा बच्चू माझ्यासारखा आहे. त्याची स्माईल,त्याची चलण्या-बोलण्याची लकब,त्याची हुशारी सगळं माझ्या सारखं आहे कळलं. हा आता तो तुझ्यासारखा बोल घेवडा आहे. निर्लज्ज ही तुझ्याचसारखा आहे म्हणा पण परत नाही म्हणायचं की तो फक्त तुझा आहे.” तो तोंड फुगवून म्हणाला.

गार्गी,“ अच्छा म्हणजे त्याच्यातले सगळे चांगले गुण तुझे आणि वाईट तेवढे माझे का? आणि मी निर्लज्ज आहे का?”ती त्याची कॉलर धरत लटक्या रागाने त्याला म्हणाली.

संग्राम,“ नाही बाई तू तर माझी दि मिसेस सरनाईक आहेस. ट्रिपल एसची आणि माझी पण मालकीणबाई!” तो मिश्कीपणे हसत तिला मिठीत घेत म्हणाला. दोघे ही बराच वेळ शांत होते.

गार्गी,“ बरं चल कालपासून आदीला जवळून पाहिलं नाहीस ना तू? त्याला हात पण लावला नाहीस ना? उगीच मला पाप नको बाप-लेकामध्ये येण्याचं!” ती हसून म्हणाली.

संग्राम,“गार्गी रात्रीचे एक वाजले आहेत. झोपला आहे तो!आपल्या जाण्याने त्याची आणि बाबांची देखील झोपमोड होईल.” तो म्हणाला.

गार्गी,“ काही नाही होत.तू चल बरं!” असं म्हणून तिने जवळ जवळ ओढतच त्याला आदिराजच्या रूमकडे नेले. त्याच्या रूमचे दार उघडेच होते. संजयराव बेडला टेकून नाईट लँम्पच्या उजेडात पुस्तक वाचत होते तर आदिराज गाढ झोपला होता.गार्गी आणि संग्रामला येताना पाहून ते चष्म्यातून पाहत त्यांना म्हणाले.

संजयराव,“ मला माहित होतं तुम्ही दोघे ही येणार आहात ते!म्हणूच मी दार उघडच ठेवलं होतं.”

संग्राम मात्र आदिराजजवळ जाऊन बसला. त्याने आदिराजचा पट्टी बांधलेला हात हळुवार स्वतःच्या हातात घेतला. त्यावर मायेने दुसरा हात फिरवला. हे करताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने आदिराजचा हात अलगद खाली ठेवला. त्याच्या केसातून आणि चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्याला अजून ही आदिराजचे अंग गरम लागत होते. संग्रामाच्या स्पर्शाने आदिराजची झोप चाळवली. तो डोळे उघडून त्याला झोपेतच म्हणाला.

आदिराज,“डॅडा तू कधी आलास?मी तुझी वाट पाहत होतो.”

संग्राम,“ हुंम!मला वेळ झाला बच्चा यायला! तुला कसं वाटतंय आता? जखम खूप दुखतेय का?” त्याने आवंढा गिळत घोगऱ्या आवाजात त्याला विचारले.

आदिराज,“दुखतंय पण इतकं नाही. डॅडा मी नव्हतं बोलावलं भाईला तिथे ते…..” तो पुढे बोलणार तर संग्रामने त्याच्या ओठांवर बोट ठेवले.तो रडत बोलू लागला.

संग्राम,“ शू ss काही सांगायची गरज नाही. सगळं कळलं आहे मला! I am sorry bachcha!मी तुझ्यावर उगीचच हात उचलला. तुला विनाकारण बोललो. तुझ्या डॅडाला माफ करशील ना?”

हे बोलताना संग्रामच्या डोळ्यातून कढ वाहत होते. ते पाहून आदिराज उठून बसला. संग्रामचे डोळे पुसत तो बोलू लागला.

आदिराज,“ काही ही काय बोलतोयस डॅडा!तुला त्या वेळी जे योग्य वाटले ते तू केलंस आणि बाबा कधी मुलाची माफी मागत नसतात. रडतोयस काय असा?You are my superhero! हिरो कधी रडत असतो का?” असं म्हणून त्याने संग्रामला मिठी मारली. गार्गी आणि संजयराव दोघांकडे पाहत होते. दोघांच्या ही डोळ्यात पाणी पण ओठावर स्मित हास्य होते.

संग्राम,“I am proud of you beta!”तो म्हणाला.


संजयराव,“ बघ बाई गार्गी!ज्याच त्याला आणि गाढव ओझ्याला अशी गत झाली आपली!कालपासून या बच्चूसाठी आपण या नालायक चिनूला भांड भांड भांडलो आणि इथे बाप-लेक लगेच गळ्यात गळे घालायला लागले. मला वाटलं होतं. हा आदी कमीत कमी तोंड तर फुगवून बसेल तर कशाच काय?” ते नाटकीपणे म्हणाले.

गार्गी,“ हो ना! बाबा आपण किती जरी केलं ना या आदीसाठी तरी याचा डॅडाच याचा सुपर हिरो राहणार.”ती संजयरावांची री ओढत म्हणाली.

संग्राम,“ नाही म्हणजे झालं का तुमचं आमची खेचून?झालं असेल तर झोपुया का? रात्र खूप झाली आहे.” तो दोघांच्याकडे पाहत हसून म्हणाला.

संजयराव,“हो जातो मी आता!या आद्याचा बाप आला की लगेच आजोबाला विसरला ना!” ते आदिराजकडे पाहत नाटकीपणे म्हणाले.

आदिराज,“ काय ओ आजोबा? तुमची झाली का नौटंकी सुरू?आपण ना यावर उद्या बोलू; मला झोप येतेय खूप!” तो संग्रामच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला.

संजयराव,“ तू ये बच्चू उद्या माझ्याकडे मग पाहतो तुला! बरं मी जातो.” ते हसून म्हणाले आणि गार्गीला अंगठा दाखवून निघून गेले.
★★★
दोन दिवस असेच निघून गेले. आदिराज आणि अभिराजची सगळेच सर्वोतोपरी काळजी घेत होते. राज्ञी ही आठ दिवस घरीच थांबणार होती. गार्गी ही आठ दिवस ऑफिसला जाणार नव्हती. सकाळची वेळ टळून गेली होती. संग्राम ऑफिसला निघून गेला होता. आदिराज नाष्टा करून औषधं घेऊन अभिराजकडे गेला होता. तोपर्यंत इंटर कॉमवर गार्गीला क्षितिजा आल्याचा फोन आला. गार्गीने सिक्युरिटीला तिला लगेच आत पाठवून द्यायला सांगितले.

क्षितिजा हॉलमध्ये आली. गार्गी तिचीच वाट पाहत होती. क्षितिजा अवघडून अंग चोरून उभी होती. तिचा चेहरा पडलेला दिसत होता.तिने फुल्ल स्लिव्हज असलेला चुडीदार घातला होता. ओढणी अगदी व्यवस्थित पिन अप केली होती. तिने तिच्या शरीरावर दोन दिवसांपूर्वी उठलेले ओरखडे कोणाच्या ही नजरेस पडू नयेत याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसत होती. पण मनावरच्या ओरखड्यांच काय? तिचा चेहरा मनावर उठलेले ओरखडे लपवू शकत नव्हता. गार्गीला तिला असे पाहून गलबलून आले.

गार्गी,“क्षितिजा वर माझ्या रूममध्ये चल!सखू दोन कप कॉफी आणि स्नॅक्स पाठवून दे वर!” असं म्हणून ती निघाली क्षितिजा खाली मान घालून तिच्या मागे जिना चढून वर गार्गीच्या रूममध्ये गेली.

क्षितिजा एका खुर्चीत अवघडून बसली होती. तिच्या समोरच्या खुर्चीत गार्गी बसली होती. थोडा वेळ शांततेत गेला आणि गार्गीने बोलायला सुरुवात केली.

गार्गी,“ कशी आहेस क्षितिजा?” तिने आपुलकीने विचारले.तिच्या आपुलकीच्या चौकशीने मात्र क्षितिजाला भरून आले. तिचा बांध फुटला.

क्षितिजा,“ I am sorry kaku! माझ्यामुळे आदीला इतके लागले. अभी सर देखील माझ्यामुळे जखमी झाले. तुम्हा सगळ्यांनाच माझ्यामुळे खूप त्रास झाला.” ती रडत बोलत होती.

गार्गी,“ क्षिती अगं तुला त्या दिवशी ही मी फोन वर सांगितले आणि आज ही सांगत आहे. बेटा तुझ्यामुळे काही नाही झालं.उलट मला आदीचा अभिमानच वाटतो.तू प्लिज रडणं बंद कर. मी समजू शकते तुला मुलगी म्हणून काय वाटत असेल ते? मी या सगळ्यातून गेले आहे.त्यामुळे तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते.” ती क्षितिजाचे डोळे पुसत मायेने बोलत होती.


क्षितिजाने मात्र गार्गीला मिठी मारली. ती बराच वेळ रडत होती आणि गार्गी आईच्या मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. क्षितिजाला मात्र या बिकट प्रसंगी आईची आठवण येत होती. तिला आईच्या कुशीत शिरून मनसोक्त रडायचे होते पण तिला तसे करता येत नव्हते. गार्गीच्या रुपात मात्र तिला तिची आई भेटली होती.गार्गीने देखील तिला आईच्या मायेने जवळ घेतले होते.शेवटी आई ही आईच असते. मग ती कोणाची का असे ना? ती तिच्या मायेची पाखरण करताना आपले परके असा भेद करत नाही.क्षितिजा तिच्या कुशीत रडून थोड्या वेळाने शांत झाली. तिने स्वतःला सावरले.

क्षितिजा,“thanks काकू!मला तुमच्या कुशीत शिरून माझ्या आईच्या प्रेमाची ऊब मिळाली.” डोळे पुसून खुर्चीवर बसत म्हणाली.

गार्गी,“ क्षिती अग थँक्स काय म्हणतेस बेटा?तू मला माझ्या मुली सारखीच आहेस.आणि आता बास झाली ही रडारड!सुदैवाने त्या रात्री विपरीत काही घातले नाही.आता सगळं विसरून अभ्यासाला लागा.ट्रिपल एसमध्ये कामाला यायचे आहे ना?” ती हसून म्हणाली. तोपर्यंत सखू कॉफी आणि स्नॅक्स ठेवून निघून गेली.

क्षितिजा,“ हो काकू!ही शाल त्या दिवशी आदीने मला पांघरली होती.” ती तिच्या पर्स मधून शाल काढून टीपॉयवर ठेवत म्हणाली.

गार्गी,“ही शाल तर माझी आहे.राहू दे तुझ्याकडे ही माझी आठवण म्हणून!” ती हसून म्हणाली.

क्षितिजा,“बरं!आणि ही शाल मी कायम सांभाळून ठेवेन.मला इथे भेटलेल्या आईची आठवण म्हणून!” ती भावून होत म्हणाली.

गार्गी,“हुंम! तुला जेंव्हा तुझ्या आईची आठवण येईल तेंव्हा तू माझ्याकडे येऊ शकतेस. मला आणखीन एक मुलगी मिळाली राज्ञी सारखी!” ती तिच्या हातावर प्रेमाने हात ठेवत म्हणाली.

क्षितिजा,“हो!आदी कुठे आहे काकू?मला भेटायचे आहे त्याला!” तिने विचारले.

गार्गी,“ चल तो त्याच्या भाईकडे बसला आहे.”

ती म्हणाली आणि दोघी मधल्या रस्त्याने अभिराजच्या रूममध्ये गेल्या.

क्षितिजाला पाहून अभिराज कसा रियाक्ट होईल?
©स्वामिनी चौगुले








🎭 Series Post

View all