माझिया प्रियाला प्रीत कळेना पर्व २भाग १२

This Is A Love Story


भाग 12
दोन महिन्यांचा कालावधी पाखराचे पंख लावून उडून गेला होता. संग्राम,सुशांत, गार्गी आणि अभिराज त्यांच्या कामात गढून गेले होते. आदिराजचे ही लास्ट इअर संपत आले होते. त्यामुळे तो आणि क्षितिजा प्रोजेक्ट सबमिशनमध्ये गढून गेले होते. आठ दिवसात प्रोजेक्ट सबमिशन पूर्ण झाले. आता एक महिन्याने परीक्षा होती पण त्या आधी कँपस इंटरव्ह्यूज सुरू झाले. ट्रिपल एस कंपनी देखील कँपस इंटरव्ह्यूजसाठी येत असे. या वेळी संग्राम कंपनी तर्फे इंटरव्ह्यूव घ्यायला आला होता. क्षितिजा देखील इंटरव्ह्यूव देणार होती. मुळातच हुशार असलेली ती. सॉफ्टवेअर क्षेत्रातील चांगली जाण असलेली क्षितिजा ट्रिपल एस कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजबरोबर जॉबसाठी सिलेक्ट झाली.

पहिल्या प्रयत्नातच ट्रिपल एस सारख्या नामांकित कंपनीत क्षितिजा सिलेक्ट झाली. म्हणून तर ती आनंदी होतीच पण तिला आता अभिराजबरोबर काम करायला मिळणार. तो तिला रोज भेटणार याचा आनंद तिला जास्त होता. जेंव्हा अभिराजला कळले की क्षितिजाची निवड त्यांच्या कंपनीसाठी झाली आहे. त्याच्याच ब्रँचमध्ये ती कामाला येणार आहे तेंव्हा त्याला देखील खूप आनंद झाला कारण त्याला त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आता आपसूकच पुरेसा वेळ मिळणार होता.

आदिराजला ही हे माहीत होते की अभिराज आणि क्षितिजा दोघे ही आज खुश असणार. तो आज मुद्दाम झोपायला अभिराजकडे गेला. अभिराज बेडवर बसून लॅपटॉपवर काम करत होता.आदिराज त्याच्याजवळ जाऊन बसला.

आदिराज,“मग आज अभिराज सर खूप खुश असणार?” त्याने चिडवत विचारले.

अभिराज,“का? आज असे काय झाले की मी खुश असेन?” त्याने लॅपटॉपमधून डोकं न काढताच विचारले.

आदिराज,“हे भारी आहे आ भाई तुझं! मन में तो लड्डू फूट रहे है। पण दाखवायचं असं की काहीच फरक पडत नाही. मिस क्षितिजा पाटील आपल्याच कंपनीत जॉब करणार आहेत. ते ही इथल्याच ब्रँचमध्ये तुला तर लॉटरीच लागली की!” तो म्हणाला.

अभिराज,“लॉटरी वगैरे काही नाही. हा पण चांगलं आहे ती आपल्या कंपनीत जॉबला लागली.” तो त्याचा आनंद लपवत म्हणाला.

आदिराज,“ फक्त चांगलं आहे?” तो त्याला गुदगुल्या करत म्हणाला.

अभिराज,“आदी मोठा हो की आता! फक्त चांगलं नाही तर खूप चांगलं आहे मी खूप खुश आहे.” तो हसत म्हणाला.

आदिराज,“ आता कसं पोटातलं ओठावर आलं तुझ्या!”

अभिराज,“ हो का? ते सगळं सोड आता परीक्षा तोंडावर आली आहे. तर उंडारने बंद करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या.” तो म्हणाला.

आदिराज,“ हो भाई पण उद्या मी पार्टीला जाणार आहे. आतिषने त्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली आहे. त्याच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर! वेळ होणार आहे घरी यायला मला! डॅडाचे रुल्स माहीत आहेत ना तुला? मम्मा ही नाही पडत आमच्यात! भाई प्लिज तू सांग ना डॅडाला तुझं ऐकेल तो.” तो त्याला विनवणी करत बोलत होता.

अभिराज,“ असं आहे होय! तरी साहेब आज आमच्याकडे कसे आले म्हणलं? एक तर काही तरी कांड करून किंवा कांड करायच्या आधी तू माझ्याकडे येतो. मी सांगतो अंकुला. इतका मस्का मारायची गरज नाही पण रात्री बारापर्यंत घरी यायचं आणि नो अल्कोहोल!” तो त्याचे केस विस्कटत लाडाने म्हणाला.

आदिराज,“हो थँक्स ब्रो!” तो आनंदाने म्हणाला.
★★★
आदिराज नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला. संध्याकाळी सहा वाजता तो आणि त्याचे मित्र लोणावळ्याला आतिषच्या फार्म हाऊसवर गेले. क्षितिजा देखील तिच्या मैत्रिणीबरोबर तिथे आली होती. आतिषने केक कापला. पार्टी चांगलीच रंगली होती. तोपर्यंत क्षितिजाची रूममेट मोनिकाचा फोन वाजला. तिने फोन घेतला. ती फोनवर बोलून क्षितिजाजवळ आली.

मोनिका,“क्षिती अग रिमाला ताप आला आहे. तिचाच फोन आला होता.” ती म्हणाली.(रिमा मोनिका आणि क्षितिजाची रूममेट होती.)

क्षितिजा,“अरे देवा! तरी मी म्हणाले होते तिला तुला बरं नाही वाटत तर मी थांबते. तर मला म्हणाली की एक गोळी घेऊन झोपेन बरं वाटेल. आता बघ आला ना ताप!बरं चल मग आपण दोघी निघुयात.” ती काळजीने म्हणाली.

मोनिका,“अजून जेवण वगैरे व्हायच आहे ना? आतिष ही नाराज होईल. आपण दोघी ही अशा निघून गेलो तर! सुभाष आणि नितीन काही तरी आणायला मुंबईला निघाले आहेत. मी त्यांच्याबरोबर जाते. तू जेवण वगैरे करून स्कुटी घेऊन ये.” ती म्हणाली.

क्षितिजा,“ ठीक आहे. मी ही जेवण झालं की लगेच निघते.” ती म्हणाली.

पण मित्र-मैत्रिणीमध्ये गप्पा मारण्यात वेळ कसा गेला क्षितिजाला कळलेच नाही. दहा वाजून गेल्यावर तिने घड्याळ पाहिले. ती घाईतच निघाली. आदिराज आणि बाकी सगळे एन्जॉय करत होते. आता मुलांनी हार्ड ड्रिंकचा कार्यक्रम सुरू केला होता. आदिराजला ही त्याचे मित्र ड्रिंक घेण्याचा आग्रह करू लागले. म्हणून मग आदिराजने तिथून काढता पाय घेतला.

आता रात्रीचे अकरा वाजत आले होते. आदिराज कोणालाच न सांगता एकटाच सटकला होता. त्यामुळे तो एकटाच होता. रस्ता तसा सुमसानच होता. वाहने ही तुरळकच होती. रस्त्याच्या दुतर्फा मोठी मोठी झाडे आणि जंगल होते आणि रस्त्यावर अधेमधे लाईट होत्या.बाकी सगळा किर्रर्र अंधार!आदिराज गाणी लावून गाडी चालवत होता. तो काही अंतर ड्राइव्ह करत गेला असेल. तोच त्याला एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. कोणी तरी मुलगी मदतीसाठी हेल्प हेल्प म्हणून ओरडत होती. तो आवाज ऐकून आदिराजने गाडी थांबली. तो गाडीतून उतरला. त्याला आवाज पुन्हा आला. त्याला आवाज ओळखीचा वाटत होता. तो आवाज जंगलातून येत होता. तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला तर त्याला रस्त्याच्याकडेला स्कुटी पडलेली दिसली. स्कुटी क्षितिजाची होती. स्कुटी पाहून तो पळतच आवाजाच्या दिशेने गेला तर आत जंगलात एका झाडाखाली चार आडदांड लोक क्षितिजावर तुटून पडले होते. दोघांनी तिचे हात-पाय करकचून पकडले होते. एक तिच्या अंगावर होता तर एक कोण आले तर त्यावर हल्ला करण्यासाठी चाकू घेऊन उभा होता. क्षितिजा रडत ओरड हात पाय झाडण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला ते शक्य होत नव्हते.

आदिराजने तिला तसे पाहिले. तो पळतच तिथे गेला तर चाकु घेऊन उभा असलेल्या गुंडाने त्याच्यावर हल्ला केला पण आदिराजने मात्र कराटेची टेक्निक वापरून त्याला लोळवले. ते पाहून बाकी तिघे चिडले आणि क्षितिजाला सोडून त्याच्यावर धावून आले. आदिराज मात्र तयारीत होता. तो ज्यूडो-कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट होता. त्यामुळे त्याच्यासमोर त्या तिघांचे देखील काही चालले नाही. त्यामुळे ते चौघे ही पळून गेले. आदिराज आता क्षितिजाकडे वळला. क्षितिजा तिथेच झाडाखाली बसली होती. तिचे कपडे जागोजागी फाटले होते. तिच्या हातांवर पायांवर ओरखडे होते. चेहऱ्याला देखील थोडे फार लागले होते. ती घाबरून अंग चोरून रडत होती. आदिराज तिच्याजवळ गेला तर ती घाबरली.

आदिराज,“क्षिती अग मी आदिराज आहे. घाबरू नकोस गेले ते. तुला काही नाही होणार.” तो तिला आश्वस्त करत बोलत होता.


क्षितिजा भानावर आली आणि त्याला पाहून ती त्याला मिठी मारून रडू लागली. आदिराजच्या आश्वस्त स्पर्शाने तिला बरं वाटलं. आदिराज तिला घेऊन रोडवर आला. त्याने पहिल्यांदा क्षितिजाला त्याच्या गाडीत असलेली शॉल पांघरली. तिला पाणी पाजले. ती अजून ही घाबरलेली होती. तिच्यावर ओढवलेला प्रसंग खूपच भयंकर होता. एक मुलगी म्हणून ती अजून सावरली नव्हती. जे काही घडले त्याचा तिला मानसिक धक्का बसला होता. तिने रडत पुन्हा आदिराजला मिठी मारली. आदिराज तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला धीर देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या स्पर्शात आपुलकी आणि माया होती.

अभिराजला आज अचानक एका मिटिंग निमित्त लोणावळ्याला जावे लागले होते. त्याला ही आज घरी जायला उशीरच झाला होता. तो त्याच रस्त्याने निघाला होता. तर त्याला लांबूनच आदिराजची गाडी रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसली. त्याने गाडी थांबवली तर आदिराज गाडीकडे तोंड करून कोणाला तरी मिठी मारून उभा असलेला त्याला दिसला. ते पाहून तो गाडी थांबवून बाहेर आला.


अभिराज,“आदी रस्त्यात इतक्या रात्री तू काय करतो आहेस?तुला माहीत आहे ना या रोडवर लुटीच्या किती घटना घडत असतात?” तो रागाने ओरडला आणि आदिराजने क्षितिजाला सोडले. तो अभिरजकडे वळला तर ती मुलगी क्षितिजा आहे हे पाहून तो अजून चिडला.

आदिराज,“ भाई ते…” तो पुढे बोलणार तर अभिराज त्याला चिडून म्हणाला.

अभिराज,“ एक शब्द ही बोलू नकोस. गाडीत बसा आणि निघा इथून.” तो ओरडला.

आदिराज आणि क्षितिजा गाडीत बसणार तर कुठून तरी कोणी तरी भिरकावलेला एक मोठा आणि धारदार चाकू सनकत आदिराजकडे येत होता. आदिराजचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. पण अभिराजने ते पाहिले आणि त्याने अचानक आदिराजला धक्का दिला. त्या धक्क्याने आदिराज खाली पडला. चाकू मात्र अभिराजच्या पोटात घुसला. ते पाहून क्षितिजा ओरडली. आदिराज उठला. त्याने पडणाऱ्या अभिराजला सावरले. आदिराज अभिराजच्या पोटात घुसलेला चाकू हाताने काढणार तर क्षितिजा त्याला म्हणाली.

क्षितिजा,“ आदी नको काढुस चाकू तू जर चाकू काढलास तर रक्ताची धार लागेल आणि ब्लड लॉस जास्त होईल. आपण असेच अभी सरांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. चल लवकर!” ती घाबरून म्हणाली.

आदिराजने आणि क्षितिजाने त्याला गाडीत बसवले. क्षितिजा मागे अभिराजजवळ बसली.आदिराजने गाडी सुसाट सोडली. दोघे ही अभिराजला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.


पुढे काय होणार होते?

©स्वामिनी चौगुले.






🎭 Series Post

View all