माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग १५

This is a love Story
भाग १५
संग्राम गाडीत जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. संजयराव आणि मानिषाताई (संग्रामची आई) गाडीत मागे जाऊन बसले. ते दोघे ही शांत होते कारण आता गाडीत काही बोलणे त्यांना योग्य वाटले नाही. संग्रामने गाडी सुरू केली आणि ते घरी पोहोचले. संग्राम बेडरूममध्ये जात होता तर संजयराव त्याला थांबवत म्हणाले;

संजयराव,“तू असा का वागलास तिथे? अरे तुझी मैत्रीण होती ना ती?” त्यांनी रागानेच विचारले.

संग्राम,“हो बाबा ती माझी मैत्रीण होती आणि तुम्ही दोघे ही तिला ओळखता पण हे सगळं करण्याआधी तुम्हाला मला सांगावस वाटलं नाही की आपण ज्या मुलीला पाहायला जाणार आहोत ती मुलगी गार्गी आगाशे आहे?” त्याने नाराजीने विचारले.

आई,“तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता कि! बायोडाटा पण मी दाखवत होते पण तू ऐकून तरी घेतलास का?” त्या ही थोड्या रागानेच म्हणाल्या.

संग्राम,“हो माझच चुकलं!” असं म्हणून तो पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेला.

ना तो रात्री जेवला ना रूम मधून बाहेर आला. अचानक गार्गी त्याच्या समोर अशी उपवर मुलगी म्हणून आली त्यामुळे तो अस्वस्थ होता. कारण त्याने विचारच केला नव्हता की गार्गी अशी त्याच्या समोर येईल. तो गॅलरीत उभा राहून विचार करत होता.

“ही नियती माझ्या बरोबर कसला खेळ खेळत आहे. ज्या मुलीच्या पाहता क्षणी मी प्रेमात पडलो, जिला आजतागायत विसरू शकलो नाही, जी मला आयुष्यात पुन्हा कधी भेटेल असा विचारच मी केला नाही. तीच गार्गी आज माझ्या समोर अनपेक्षितपणे उपवर मुलगी म्हणून माझी होऊ घातलेली भावी वधू म्हणून यावी? असो कदाचित नियती मला संधी देत आहे माझे अर्धवट राहिलेले प्रेम पूर्ण करण्याची! छा ss मी उगीच असा तडकाफडकी निघून आलो. गार्गीला नक्कीच भेटावे लागेल!”

तो विचार करत होता आणि मागून कोणी तरी खांद्यावर हात ठेवला त्यामुळे त्याची तंद्री भंग झाली. त्याने मागे वळून पाहिले तर दुधाचा ग्लास घेऊन आई उभी होती.

आई,“हे घे दूध... तू जेवला नाही निदान दूध तरी घे!” त्या काळजीने म्हणाल्या.

संग्राम,“तुम्ही जेवलात? मला माहित आहे जेवला नसणार! चल जेवण करू! बाबांना बोलव!” तो म्हणाला.

आई,“ते नाहीत येणार!” त्या नाराजीने म्हणाल्या.

संग्राम,“मी गार्गीला पुन्हा भेटायला तयार असलो तरी ही!” तो डोळे मिचकावत म्हणाला.

आई,“म्हणजे तू गार्गीला भेटायला तयार आहेस?” त्या आनंदाने ओरडल्या.

संग्राम,“हो पण त्यांच्या किंवा आपल्या घरी नाही तर बाहेर कुठे तरी मला बोलायचे आहे तिच्याशी!” तो म्हणाला.

आई,“ठीक आहे मी उद्या फोन करते तसा तिच्या घरी!” त्या उत्साहाने म्हणाल्या.

संग्राम,“बरं चल ना मला भूक लागली आहे... मीच जाऊन बाबांना बोलवून आणतो! तू तो पर्यंत जेवायला घे जा!” तो म्हणाला आणि रूम मधून बाहेर पडला.
★★★★

तिकडे गार्गीच्या घरी.....

गार्गीची आई म्हणजे मीनाताई तिला सूनावत होत्या.

मीनाताई,“असं वागतात का पाहायला आलेल्या लोकां बरोबर गार्गी?” त्या रागाने म्हणाल्या.

गार्गी,“मग कसं वागायचे ग? तुम्ही सांगितलेत मला कोण मुलगा पाहायला येणार आहे ते?” ती रागाने तणतणत म्हणाली.

मीनाताई,“घ्या याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! तुला बायोडाटा दाखवला तर न पाहताच म्हणालीस त्याची काही गरज नाही तुम्ही योग्य तेच कराल!” त्या म्हणाल्या आणि गार्गी रागाने निघून गेली.

गार्गी तोंड फुगवून बेडवर बसली होती. तेव्हढ्यात तिची वहिनी रागिणी तेथे आली. ती येऊन बेडवर तीच्या जवळ बसली. तिला पाहून गार्गी म्हणाली;
गार्गी,“वहिनी तू मला समजवायला आली असशील तर प्लिज जा तू!” ती रागाने म्हणाली.

रागिणी,“मी तुला समजवायला वगैरे नाही आले गार्गी! पण, आज तू जे वागलीस ते चुकीचे होते. अगं आपण त्यांना आमंत्रण दिले होते तुला पाहायला! आणि गौरव सांगत होता की…!” ती पुढे बोलणार तर गार्गीने तिला थांबले आणि ती बोलू लागली;

गार्गी, “एक मिनिटं मला स्थळं पाहायला आई आणि दाद्या गेले होते त्या मॅरेज ब्युरोमध्ये आणि दादा संग्रामला ओळखतो आणि त्यानेच हा सगळा उद्योग केला सगळं माहीत असून ही? येऊ दे त्याला सांगते!” ती रागाने म्हणाली.

रागिणी,“हो संग्रामचा बायोडाटा तिथे दिसला आणि गौरवाने तुझ्यासाठी त्याची निवड केली कारण तो संग्रामला ओळखत होता. तो तुझा मित्र होता आणि आता ही गौरवने त्याची चौकशी केली आहे. तो एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे शिवाय त्याने स्वतःचा स्टार्ट अप बिझनेस सुरू केला आहे. दिसायला छान आहे. आणि सुस्वभावी आणि सुसंस्कृत आहे. सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय माहीत आहे? तू त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना आधी पासून ओळखतेस!” ती म्हणाली.

गार्गी,“हो चांगलंच ओळखते मी त्याला... आखडू आहे एक नंबरचा तो!” ती फंकणऱ्याने म्हणाली.

रागिणी,“हो का? नाही म्हणजे त्यावेळी तुझी काहीच चूक नव्हती का? मला गौरवने तेव्हाच सांगितले होते सगळे! हे बघ गार्गी तुला लग्न तर करायचेच आहे मग अनोळखी मुलाशी लग्न करून अनोळखी लोकांमध्ये जाण्यापेक्षा ओळखीच्या लोकांत गेली तर बरं नाही का? माणसं चांगली आहेत! विचार कर जरा आणि जेवायला चल पप्पा उपाशी आहेत अजून आणि तुला माहीत आहे ते जेवणार नाहीत तुझ्या शिवाय! त्यांना मेडिसीन्स घ्यायची आहेत. उगीच त्यांच्या तब्बेतीशी खेळ नको... चल पानं घेतली आहेत!” ती म्हणाली आणि निघून गेली.

रागिणी कडून हे सगळं ऐकून ती विचारात पडली. जेवण करून ती येऊन बेडवर पडली पण झोप काही केल्या येत नव्हती. ती रागिणीच्या बोलण्यावर विचार करत होती.

“वहिनी म्हणते ते बरोबर आहे. पण, हा कसा वागला आपल्याशी पण आपण तर कुठं बरोबर होतो तेंव्हा. मी त्याच्या आई-बाबांना ओळखते चांगले आहेत ते! हा तरी कुठे वाईट आहे म्हणा! पण एक नंबर आखडू आहे! त्याला भेटायला हवं एकदा आपल्या अटी मान्य असतील त्याला तर काय हरकत आहे? अनोळखी माणसात जाऊन पडण्या पेक्षा हे बरं! पप्पा तुम्ही मला पुरतं अडकवले आहे. उद्या मम्माला फोन करायला सांगून भेट बाहेर कुठे तरी म्हणून त्याला निरोप देते.” ती याच विचारत झोपली.
★★★★

दुसऱ्या दिवशी मनीषा ताईंनी मीनाताईना फोन करून संग्रामला गार्गीला भेटायचे आहे असा निरोप दिला आणि मीनाताईंनी गार्गीला विचारून लगेच फोन करते असे सांगितले. गार्गी तयार होऊन नाष्टा करायला आली आणि काही तरी विचार करून ती म्हणाली;
गार्गी,“मला काही तरी बोलायचे आहे मम्मा!”

मीनाताई,“त्या आधी माझं ऐक मनीषाताईंचा फोन आला होता आत्ता संग्रामला तुला भेटायचे आहे पण बाहेर कुठे तरी! काय करणार आहेस तू?” त्या रुक्षपणे म्हणाल्या.

गार्गी,“ठीक आहे. मी आज ऑफिस सुटल्यावर भेटेन त्याला तू माझा मोबाईल नंबर त्यांना दे आणि संग्रामला द्यायला सांग. ऑफिस नंतर भेटते मी!” ती म्हणाली.

मीनाताई,“ठीक आहे.” त्या मनातून खुश होत्या पण तसं न दाखवता शांतपणे म्हणाल्या.

गार्गी विचारातच ऑफिसला निघाली बरं झालं त्यांच्या कडूनच निरोप आला. मी म्हणाले असते तर आखडूने आढे-वेढे घेतले असते.
★★★

इकडे संग्राम विचारातच ऑफीसमध्ये पोहचला आणि सुशांत एकदम त्याच्या समोर आल्यामुळे तो दचकला.

सुशांत, “कुठे हरवलास मित्रा? कालची पोरगी इतकी पसंत पडली की काय?” तो मस्करी करत म्हणाला.

संग्राम, “एक दिवस ना तुझ्यामुळे मी हार्ट अट्याकने मरणार आहे!” तो चिडून त्याच्या डेस्कवर बसत म्हणाला.

सुशांत, “मरे तेरे दुष्मन! तू का मरशील? असं ही आमच्या सारख थोडीच आहे तुझं रोज जिमला जातोस व्यायाम करतोस! बॉडी बीडी बनवतोस! बरं काय झालं काल?” त्याने डोळे मिचकावत विचारले.

संग्राम, “सुशा ती मुलगी कोण आहे माहीत आहे का? गार्गी आगाशे!” तो म्हणाला.

सुशांत, “काय?" हे ऐकून सुशांत उडालाच

संग्राम, “हळू की जरा! सगळे आपल्यालाच पाहत आहेत!” तो वैतागून म्हणाला

सुशांत, “म्हणजे काका-काकूंना हे आधीच माहीत असणार! पण गार्गी अजून बिन लग्नाची? खरं तर तू गेलास आणि गार्गी ही दोनच महिन्यात कॉलेज सोडून निघून गेली... सगळे म्हणाले की तिच्यात आणि राजवीरमध्ये काही तरी झाले म्हणून ती निघून गेली पण काय झाले काय घडले हे कोणालाच माहीत नाही आणि गेल्या दहा वर्षात तिच्या बद्दल काही कळले ही नाही! पण तुझी तर लॉटरी लागली की!” तो तिला कोपराने कोचत म्हणाला.

संग्राम, “कसली लॉटरी रे! मी काल खूप विचित्र रियाक्ट झालो आणि तिला पाहून सरळ घरी निघून आलो! आता निरोप दिला आहे भेटू म्हणून पण ती भेटेल की नाही शंकाच आहे!” तो उदास होत म्हणाला.

सुशांत, “भेटेल रे!” तो म्हणाला आणि संग्रामचा फोन वाजला. त्याने फोन रिसिव्ह केला फोन मनीषाताईंचा होता.

संग्राम, “हा बोल आई!”

आई,“अरे त्या आगाशेचे उत्तर आले आहे गार्गी तुला भेटायला तयार आहे. तुला तिचा मोबाईल नंबर मी whs up करते. तिला फोन कर आणि कोठे भेटायचे ते ठरव!” त्या फोनवर सांगत होत्या.

संग्राम, “ठीक आहे मी करतो फोन!” तो म्हणाला आणि फोन ठेवला त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू होते ते पाहून सुशांतच्या सगळं लक्षात आले आणि तो म्हणाला.

सुशांत, अरे वा वा! म्हणजे आज “उनसे मिलने की तम्मना है प्यार का इरादा है और एक वादा है जानम!” तो बेसूर गाणं म्हणत होता आणि संग्रामने त्याचे तोंड दाबले. समोरून बॉसला येताना पाहून दोघे ही त्यांना गुड मॉर्निंग म्हणून त्यांच्या-त्यांच्या डेस्कवर जाऊन बसले.

संग्रामचा सगळा दिवस कामात गेला त्याला कोणता विचार करायला ही वेळ नाही मिळाला. संध्याकाळी पाच वाजता ऑफिस सुटले आणि संग्रामने गार्गीला फोन लावला.

संग्राम, “हॅलो मी संग्राम बोलतो आहे!” तो म्हणाला आणि त्याच काळीज धडधडायला लागलं.

गार्गी,“हो भेटू आपण माझं आत्ताच ऑफिस सुटलं आहे एका तासाने आपण ब्लु व्हेल कॅफे मध्ये भेटू मी तिथला पत्ता whs up करते!” ती म्हणाली.

संग्राम,“ठीक आहे by!” तो म्हणाला आणि फोन ठेवला.

★★★

संग्राम फ्लॅटवर गेला आणि तयार झाला. आज जिमला दांडीच होती. कारण त्याच रुटीन होतं त्याला सकाळी जिमला जायला वेळ मिळत नसायचा म्हणून तो संध्याकाळी 6 वाजता जिमला जात असे. त्यामुळे त्याचे शरीर ही पिळदार बनले होते. त्याने त्याच्या आवडीचा नेव्ही ब्ल्यू शर्ट आणि डार्क ब्ल्यू जीन घातली. संजयरावांनी नुकतेच गिफ्ट दिलेले रोलेक्स घड्याळ घातले. एंगेजचा डिओ फवारला आणि केस जेल लावून सेट केले. आधीच हँडसम असणारा तो आणखीनच हँडसम दिसत होता. तो आज मुद्दाम त्याची स्पोर्ट बाईक घेऊन निघाला. गार्गीने whs up केलेल्या पत्त्यावरच्या कॅफे मध्ये तो पंधरा मिनिटे आधीच पोहोचला. गार्गी त्याला लांबून येताना दिसली आणि तिला पाहून त्याचे काळीज मोठ्याने धडधडू लागले. तो लांबूनच गार्गीला येताना पाहत होता.

गार्गीने रेड कलरचा त्यात ब्ल्यू चेक्स असलेला ऍपल कटचा शर्ट आणि त्यावर ब्ल्यू जीन घातली होती. केसांची पोनी कानात टायमंड टॉप्स! चेहऱ्यावर अगदी लाईट मेकअप! हातात नाजूक घड्याळ! साईड पर्स सावरत ती ओळखीचे स्माईल करत त्याच्याकडे येत होती. संग्राम मात्र तिला पाहण्यात गढून गेला होता.

गार्गी आणि राजवीरमध्ये असे काय घडले होते की कॉलेज सोडून गेली होती? संग्राम आणि गार्गीची ही भेट एका नवीन नात्याची नांदी तर नव्हती?

कथेचे सगळे अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.
सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा.
©स्वामिनी चौगुले
क्रमशः

🎭 Series Post

View all