माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग १३

This is a love story
दहा वर्षांनंतर......

“आई तू डबा देणार आहेस की नाही? का जाऊ मी?” संग्राम हॉलमध्ये बसून शूज घालता घालता ओरडत होता.

सकाळची वेळ होती. संजयराव पेपर वाचत बसले होते आणि नेहमी प्रमाणे संग्रामची ऑफिसला जाण्यासाठी आरडा-ओरड चालली होती. तसा तो वीकएंडलाच घरी शनिवार रविवार येत असे कारण, त्याला ठाण्यातून त्याचे ऑफिस लांब पडत होते म्हणून मग त्याने पारल्यामध्ये पहिल्यांदा भाड्याने आणि नंतर emi वर स्वतःचा एक वन बी.एच. के. फ्लॅट घेतला होता. नेहमी प्रमाणे तो शनिवारी दुपारी आला होता आणि आज सोमवार होता आणि तो पुन्हा ऑफिसला निघाला होता.

तो पर्यंत संग्रामच्या आई डबा आणि एक बॅग घेऊन आल्या.
आई,“ हा घे डबा आणि या बॅगेत सुशांतसाठी आणि समिधासाठी डबा आणि लोणचे-पापड आहेत त्याला दे!” त्या बॅग आणि डबा त्याच्या हातात देत म्हणाल्या.

संग्राम,“ हे बरं आहे तुझं! तुमचं काकू-पुतण्या-सून यांचे प्रेम उतू जाते आणि मी मधल्यामधी हमाली करत बसतो!” तो वैतागून म्हणाला.

आई,“ चिन्या जास्त बोलू नकोस काय! जेव्हढे सांगितले तेव्हढे कर!आणि तुझ्या आवडीची सुरळीची वडी दिली आहे. जास्तच दिली आहे जरा! एकटा खाऊ नकोस सुशांतला ही दे!” त्या दटावत बोलत होत्या.

संग्राम,“ अच्छा! माझ्या आवडीची सुरळीची वडी केलीस मग त्या सुशाच्या डब्यात कोथिंबीर वडी नक्कीच असणार आणि तरी मी त्याला माझा डबा शेअर करू?” त्याने विचारले.

आई,“ हो! बिचारी पोरं घरा पासून लांब राहतात! त्यांना कोण देणार रे!” त्या त्याच्या हातावर फटका मारत म्हणाल्या.

संग्राम,“ हो मातोश्री भावना पोहोचल्या!” तो हसून हात चोळत म्हणाला.

आई,“ संग्राम तुझ्याशी बोलायचे होते!” त्या त्याला गोड बोलत म्हणाल्या

संग्रामाच्या लक्षात आले की आई काय बोलणार आहे. म्हणून तो म्हणाला.

संग्राम,“ माहीत आहे मला! मॅरेज ब्युरो मधून तू नवीन बायोडाटा आणला आहेस! बरोबर का?” त्याने वैतागून विचारले

कारण त्याला माहित होतं जेव्हा त्याच्या आईला त्याच्या लग्नाचा विषय काढायचा असायचा तेंव्हा त्या त्याला संग्राम म्हणत नाही तर इतर वेळी चिनू! त्यांची खोड त्याला चांगलीच माहीत होती.

आई,“हो तुझ्या लग्न विषयीच बोलायचे आहे मला! तीस वर्षाचा होऊन गेलास तू अरे घोड नवरा झालास आता... अजून किती मुली पाहणार? आत्ता पर्यंत 20 मुली पाहून झाल्या आणि त्यांना नकार देऊन ही! बरं तुला कोण आवडत असेल तर ते सांग म्हणले तर ते ही नाही! अरे म्हातारे झालो आम्ही आता तुला किती दिवस पुरणार!” त्या रागाने तणतणत होत्या. त्यांना हाताला धरून सोफ्यावर बसवत तो म्हणाला;

संग्राम, “शांत हो तू आधी. तुझं बी. पी. वाढेल आणि मुली पाहायला मी नाही म्हणालो का कधी?” तो म्हणाला.

आता इतका वेळ शांतपणे पेपर वाचत बसलेले संजयराव बोलू लागले.

संजयराव,“ तू मुली पाहायला नाही कधीच म्हणत नाही पण तू कोणत्याच मुलीला होकार ही देत नाहीस चिनू! मग आम्ही काय समजायचे आणि तुझी आई बरोबर बोलत आहे. आम्ही किती दिवस पुरणार तुला! मी इतके दिवस तुला काही बोललो नाही but it\"s high time now! तुला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल! नाही तर तुला काय करायचे ते कर आम्ही सांगलीला निघून जातो गावाकडे!असं ही मी आता रिटायर्ड झालो आहे. तुझ्यासाठी आम्ही इथे राहत आहोत पण तू आता मोठा झालास कमावता झालास तुला आमचं काही ऐकायची गरज नाही राहिली मग उगीच तुझ्या आयुष्यात आमची लुडबुड कशाला? जातो आम्ही सांगलीला तिथे इतका मोठा परिवार आहे त्यांच्यात मन रमवतो दोघे!” ते गंभीरपणे बोलत होते.

संग्राम,“ प्लिज बाबा असं काय बोलताय? मला एकट्याला सोडून जाणार तुम्ही? ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं होईल! तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे!” तो आवंढा गिळत म्हणाला.

आई,“ खरंच ना पण या वेळी मी नाही हो आणला बायोडाटा मॅरेजब्युरो मधून त्यांनी मुलीकडच्यानी पाठवला आहे मुलीचा बायोडाटा! मुलगी…….!” त्या पुढे बोलणार तर संग्राम त्यांचे बोलणे थांबवत त्यांना म्हणाला.

संग्राम,“ ठीक आहे पुढच्या संडेला आपण मुलगी पाहायला जात आहोत मुलीकडच्यांना कळव तसं!” तो म्हणाला आणि बॅग उचलून निघून गेला. त्याचा चेहरा क्षणार्धात पडला. खरं तर त्याला संजयरावांच बोलणं लागलं होतं.

आई,“ अरे बायोडाटा तरी पहा मुलीचा तुला whs up करू का?” त्या मागून ओरडत होत्या.

संग्राम,“ काही गरज नाही तू whs up केलं तरी मी पाहणार नाही.” तो म्हणाला आणि कारमध्ये बसला.

आई,“ नीट जा गाडी भरधाव पळवू नकोस!” त्या अंगणात येत म्हणाल्या. संग्रामने होकारार्थी मान हलवली आणि तो निघून गेला.

त्या आत आल्या आणि संजयरावांकडे पाहून रागाने म्हणाल्या.

आई,“ काय हो काय गरज होती चिनूला असं तोडून बोलायची! लागलं तुमचं बोलणं त्याच्या मनाला! तो कसा आहे तुम्हाला माहीत आहे ना त्याला असं बोललेलं लगेच जिव्हारी लागत. तो बोलत नाही घडाघडा पण आत कुढत राहतो. माझ्या लेकराचा चेहरा उतरला!” त्या नाराजीने बोलत होत्या.

संजयराव,“ मी जे बोललो त्याच्या चांगल्यासाठीच बोललो आहे. तो ऐकतच नाही मनीषा! आपण कमी प्रयत्न केले का या आधी पण तो मुली आपल्या समाधानासाठी पाहतो आणि नकार देतो आणि चिनूसाठी आलेलं हे स्थळ मला हातच घालवायचे नाही. मुलगी आपल्या ओळखीतली आहे. माणसं चांगली आहेत. बास झाले आता मला त्याला लग्न करून सेटल झालेले पहायचे आहे! आणि जाऊ आपण उद्या तुमच्या मुलाचा रुसवा काढायला. त्याचा रुसवा कसा काढायचा मला माहित आहे!” ते हसून म्हणाले.

आई,“ हो! अहो पण त्याने मुलीचा बायोडाटा नाही पाहिला आणि आता तो whs up करून ही पाहणार नाही.” त्या म्हणाल्या.

संजयराव,“ राहू दे तुम्ही नका करू whs up त्याला बायोडाटा आता! मुलगी पाहायला गेल्यावर कळेल की सगळं त्याला! पण या मुलीशी मात्र चिनूच लग्न मी करणारच” ते निर्धाराने म्हणाले.

तर संग्राम आता तीस वर्षाचा झाला होता आणि त्याचे करिअर देखील उत्तम ग्रो करत होते. तो एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डिझायनर म्हणून कार्यरत होता आणि टीम लीडर म्हणून काम पाहत होता. संग्रामने सुशांत बरोबर मिळून एक स्टार्टअप बिझनेस ही सुरू केला होता. तो आणि सुशांत दोघे मिळून तो जॉब करत करत तो चालवत होते. सुशांत ही योगायोगने त्याच्याच बरोबर त्याच कंपनीत काम करत होता. सुशांतचे गेल्या वर्षीच समिधाशी लग्न झाले होते. संग्राम मात्र काही केल्या लग्नाला तयार होत नव्हता म्हणून आज संजयरावांनी ब्रम्हास्त्र उपसले होते आणि संग्राम त्या अस्त्राने पुरता घायाळ झाला होता.

★★★

संग्राम ऑफिसमध्ये गेला. सुशांत त्याचीच वाट पाहत होता. संग्राम त्याच्या डेस्कवर जाऊन बसतो ना बसतो तो पर्यंत सुशांत दात काढत त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला.

सुशांत,“ काकूने मला डबा पाठवला ना दे तो इकडे!”

संग्राम,“ हा घे!” त्याने वैतागून त्याच्या हातात डबा दिला.

पण एकूणच संग्रामाच्या हावभावा वरून आणि त्याचा पडलेला चेहरा पाहून आज त्याचे काही तरी बिनसले आहे हे सुशांतच्या लक्षात आले आणि तो जास्त काहीच न बोलता त्याच्या जागेवर बॅग घेऊन जाऊन बसला. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने वर्कलोड ही जास्त होता त्यामुळे दोघांचे फारसे असे बोलणे झाले नाही. लंच ब्रेकमध्ये ही संग्राम शांत शांत होता. तो त्याच्याच विचारात मग्न होता. ऑफिस सुटल्यावर घरी जाताना सुशांत संग्रामला म्हणाला;
सुशांत, “संग्र्या मी संध्याकाळी तुझ्यासाठी डबा घेऊन येतो नीना बाईला सांग स्वयंपाक करू नका म्हणून! संध्याकाळी बसू जरा आपण काय!” तो डोळा मारत म्हणाला.

संग्राम,“ बरं”

दोघे ही आपापल्या घरी निघून गेले. संध्याकाळी सुशांत ठरल्या प्रमाणे संग्रामाच्या फ्लॅटवर हजर झाला. त्याने बेल वाजवली संग्रामने दार उघडले. समिधाने जेवण तयार करून पाठवले होते. सुशांत जेवणा बरोबर बिअरच्या दोन बाटल्या आणि कबाब घेऊन आला होता. दोघे ही जेवले तरी संग्राम शांतच होता. जेवणा नंतर सुशांतनेच बेडरूमच्या गॅलरीत दोन खुर्च्यां लावल्या आणि हॉल मधला टीपॉय तिथे नेऊन ठेवला. संग्रामने थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेल्या बियरच्या बाटल्या आणि ओव्हन मधून गरम करून कबाब नेऊन टीपॉयवर ठेवले आणि तो शांतपणे खुर्चीवर बसला. सुशांतने बिअरच्या बाटल्या ओपन केल्या आणि तो बिअरचा एक घोट घेत म्हणाला;

सुशांत, “आता बोलतो का संग्र्या? दिवभर तुझं पडलेलं तोंड पाहून कंटाळा आला. काय झालं रे?” त्याने वैतागून विचारले.

संग्राम,“ नेहमीचच लग्न लग्न लग्न आणि काय?” तो बिअरचा एक घोट घेत म्हणाला.

सुशांत,“ हाट तिच्या! मला वाटलं अजून काय झालं! कर की बाबा एकदाच लग्न किती मुली बघणार अजून?” तो म्हणाला.

संग्राम,“ एव्हढच नाही रे.... बाबा आज खूप बोलले मला! ते म्हणाले की मी मोठा झालो कमावता झालो त्यांचं ऐकत नाही म्हणून ते गावाकडे जाणार आहेत सांगलीला आईला घेऊन! मी जर लग्न नाही केलं तर!” तो तोंड पाडून सांगत होता.

सुशांत,“ अरे देवा आता गोष्टी या थराला पोहोचल्या का? संग्र्या तुझ्यासाठी हे रेड सिग्नल आहे!” तो कबाब टूथ पिकने तोंडात घालत म्हणाला.

संग्राम,“हो आता माझं लग्न केल्या शिवाय ते गप्प बसणार नाहीत या संडेला पुन्हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे या वेळी मात्र मी हो म्हणणार कारण मी बाबांना चांगले ओळखतो ते म्हणाले तसं करू शकतात यार!” तो काळजीने बोलत होता.

सुशांत,“ तू इतक्या पोरी पाहिल्यास एक ही पोरगी तुला पसंत नाही पडली आज पर्यंत?”त्याने विचारले

संग्राम,“ नाही रे मी आज पर्यंत कोणत्याच मुलीला त्या दृष्टीने पाहिले नाही!” तो म्हणाला

सुशांत,“ एक विचारू तुला?” तो साशंकपणे म्हणाला.

संग्राम,“तू माझी परवानगी केंव्हा पासून घायला लागलास!” तो हसून म्हणाला.

सुशांत, “संग्र्या तू गार्गीला विसरला नाहीस ना अजून?” त्याने तिला पाहत विचारले.

संग्राम,“ तिच्या नंतर मला कोणतीच मुलगी आवडली नाही सुश्या! आता लग्न म्हणजे फक्त तडजोड आहे माझ्यासाठी!” त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लकेर उमटली आणि ती सुशांतच्या लक्षात आली.

सुशांत,“ लग्ना नंतर होत रे प्रेम आता माझंच बघ मी आणि समिधाने अरेंज मॅरेज केलं पण, आपलं एकमेकांवर लग्ना नंतर प्रेम जडलं!” तो त्याला समजावत म्हणाला.

संग्राम,“ तुमची गोष्टी वेगळी आहे सुश्या! तुमचं लग्ना आधी कोणा तिसऱ्यावर प्रेम नव्हतं पण गार्गी माझं पहिलं प्रेम आहे मी नाही विसरू शकत तिला!” तो भावुक होत म्हणाला.

सुशांत,“ अरे काय माहीत तू तडजोड म्हणून लग्न करशील आणि तू त्या मुलीच्या प्रेमात पडशील! प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकत संग्र्या तू इतका विचार करू नकोस आणि मुलगी पाहून ये तू तुला आवडली तर हो म्हण! चल आता मी निघतो तू ही झोप! समिधा माझी वाट पाहत असेल!” तो म्हणाला.

संग्राम,“ ठीक आहे नीट जा रे! good night!” तो राहिलेली बिअरची बाटली तोंडाला लावत म्हणाला.

सुशांत निघून गेला आणि संग्राम झोपला.


संग्राम ज्या मुलीला पाहायला जाणार होता ती मुलगी कोण असेल? आणि आता गार्गी कुठे असेल?

कथेचे सगळे अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.
सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार, दररोज दुपारी 3 वाजता. वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा.
©स्वामिनी चौगुले
क्रमशः

🎭 Series Post

View all