माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ८८

This Is A Love Story


संग्रामने घातलेल्या या नवीन घोळामुळे दुपारी कोणालाच जेवायची इच्छा नव्हती. तरी सुशांतने बळेच सगळ्यांना जेवायला लावले होते आणि तो संग्रामसाठी जेवण घेऊन रूममध्ये गेला तर संग्राम बॅग भरत होता. खरं तर सुशांतला त्याचा खूप राग आला होता पण सुशांतने तो व्यक्त केला नव्हता.

सुशांत,“ जेवण करून घे संग्राम!” तो म्हणाला पण त्याच्या बोलण्यात नाराजी साफ दिसत होती.

संग्राम,“ हो जेवतो मी तू जेवलास का? आणि सगळे जेवले का?” त्याने बेडवर बसत विचारले

सुशांत,“ तुला काय रे कोण जेवले आणि नाही जेवले तरी! तू जेवण कर आणि मेडिसीन्स घे!” तो पुन्हा नाराजीने म्हणाला

संग्राम,“ ओ प्लिज सुशा तू तरी समजून घे ना मला!” तो चिडून म्हणाला.

सुशांत,“ झालं तू चिडला की आम्ही गप्प बसायचे कारण तुझी तब्बेत!तू इतका स्वार्थी कसा होऊ शकतोस रे? एक तर डॉक्टरांचे म्हणणे आहे की तुला इतका लांबचा प्रवास झेपणार नाही आणि तू आम्हाला धमाकातो आहेस की तुला आडवल तर तू काही…. !(तो मध्येच बोलायचा थांबला)आम्ही काय करायचं रे नेमकं सांग ना! काका-काकूंनी काय करायचं? तू त्यांना तर सरळ सरळ तोडून बोलून मोकळा झालास! आमच्या सगळ्यांचा काय दोष आहे ते तरी कळू दे की?” तो म्हणाला.

संग्राम,“ सुशा तुला मी स्वार्थी वाटतो तर आहे मी स्वार्थी आणि मी ठीक आहे आता काही होणार नाही मला आणि झालं तरी अमेरिकेत हॉस्पिटल्स आहेत जाईल मी! आणि आई-बाबांना मी असं बोललो कारण मी असं बोललो नसतो तर त्यांनी मला सोडलं नसतं आणि तिथं राहायची व्यवस्था झाली की मी त्यांना घेऊन जाणार आहे तिकडे तू नको काळजी करू!” तो त्याला समजावत म्हणाला.

सुशांत,“पण तुला जायचंच का आहे तिकडे? आणि गार्गीचे काय?” त्याने वैतागून विचारले.

संग्राम,“ कारण आता मला इथं राहणे अशक्य झाले आहे! मी नाही राहू शकणार आणि गार्गीच काय तीच ती पाहून घेईल असं ही तिला माझ्या बरोबर राहायचं नव्हतं मग तिचा विचार मी का करू?तिने जे माझ्या बरोबर केले ते मी कधीच विसरणार नाही!” तो डोळ्यातले पाणी लपवत म्हणाला.

सुशांत,“ हो का? काही नाही रे तू काय किंवा मी काय पुरुषच आणि पुरुष एकजात सारखेच ना! हीच का तुझ्या प्रेमातली मुक्तता? खूप मोठ्या तोंडाने बोलला होतास की ती जर कोणाच्या प्रेमात पडली तर मी तिला सोडायला तयार आहे प्रेम मुक्तता देते बांधून ठेवत नाही! त्याच काय झालं? मग तुझं प्रेम मुक्तता देत तर हा इतका तिचा राग कशासाठी रे?” त्याने विचारले.

संग्राम,“ हो म्हणालो ना मी प्रेम मुक्तता देते आणि माझ्या मतावर मी ठाम आहे! तिने मला सोडून दुसरं कोणाला तरी निवडलं याचा राग कधीच नव्हता मला आणि नसणार आहे सुशा! पण मी तिला स्पष्ट सांगून की तुला जर कोणी आवडलं तर तू मला सांग मी तुला माझ्या नात्यातून मुक्त करायला तयार आहे तरी ही तिने मला अंधारात ठेवले. ती माझ्याशी खोटं बोलून मला न सांगता राजवीरशी भेटत राहिली. तिने मला कोणतीच कल्पना न देता त्या दिवशी अवॉर्ड फंक्शनमध्ये आमचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणले!का सुशा सांग ना माझ्यावर एका वर्षात इतका ही विश्वस ठेवावासा वाटला नाही तिला? असो हरलेल्या डावाबद्दल कशाला बोलायचे! मला या विषयावर अजून नाही बोलायचे! मला खूप कामं आहेत पॅकिंग करायचे आहे अजून कागदपत्रे गोळा करायची आहेत! तू ही जेव आणि सगळ्यांना जेवायला सांग आई-बाबा तर माझं आता काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये असणार नाहीत!” तो म्हणाला.

सुशांत,“ संग्राम तू चुकतो आहेस आणि मित्र म्हणून तुला योग्य मार्ग दाखवणे माझे कर्तव्य आहे. तू समजतोस तसं गार्गीने काही केले…..!” तो पुढे बोलणार तर संग्राम त्याच्यावर भडकला.

संग्राम,“ तुला किती वेळा सांगायचे मी की मला तिच्या विषयी काही बोलायचे नाही! तू मित्र आहेस ना मग मित्रच राहा कळलं तुला! मैत्रीच्या ही सीमा असतात आणि त्या ओलांडू नकोस सुशांत! माझ्या खाजगी आयुष्य आणि नात्यात तुला बोलण्याचा अधिकार नाही समजलं तुला?” तो रागाने त्याच्यावर ओरडला.

सुशांत,“बरं केलंस संग्राम मला माझी हद्द तू दाखवून दिलीस! Sorry!” तो डोळ्यातले पाणी पुसत रूम मधून निघून गेला.

संग्राम बेडवर बसला. त्याला कळले होते की त्याने असं बोलून सुशांतला दुखावले आहे. तो बोलून तर गेला पण आता त्याला तो सुशांतला जे काही बोलला त्याचा पश्चात्ताप होत होता.

आपण खूप वेळा असं वागत असतो. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखवतो. त्यांचे बोलणे न ऐकून घेता त्यांना वाट्टेल तसं बोलून मोकळं होतो. ते आपल्या सुखासाठी झटत असतात पण आपल्याला ते कळत नाही. संग्राम देखील सुशांतशी आज तसंच वागला होता आणि त्याने सुशांतला दुखावले होते. सुशांतने संग्रामचा गार्गी विषयी त्याचा झालेला गैरसमज दूर करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता. आज देखील सुशांत तेच करत होता पण संग्रामने आज देखील सुशांतचे बोलणे ऐकून घेतले नव्हते. उलट त्याने सुशांतला दुखावले होते.

संग्राम उठून बाहेर आला तर सुशांतचे त्याला हॉलमध्ये संजयरावां बरोबरचे बोलणे ऐकू आले.

सुशांत,“ काका आता संग्रामला माझी गरज नाही तर मी जातो आता माझ्या घरी! असं ही मी किती दिवस अशी तुमच्या घरात आणि नात्यांमध्ये लुडबुड करणार!” तो त्याच्या डोळ्यातील पाणी लपवत बोलत होता.

संजयराव,“ सुशांत बेटा काय झालं? तू असं का बोलत आहेस परक्या सारखं मला जसा चिनू आहे तसाच तू देखील आहेस! तुला कोणी काही बोलले का?” त्यांनी विचारले.

सुशांत,“ नाही काका पण आता जातो मी!” तो म्हणाला.त्याचे बोलणे ऐकून संग्राम तिथे आला.

संग्राम,“ sorry ना सुशा! माझं चुकलं पण तू असं तोडून बोलू नकोस ना प्लिज!” तो आवंढा गिळत म्हणाला.

सुशांत,“ नाही संग्राम sorry मीच म्हणायला हवं तुला! मीच माझ्या लिमिटच्या बाहेर गेलो तू बरं केलंस मला माझ्या लिमिटेशन्स दाखवून दिल्या. असं ही तूच म्हणालास ना तू आता ठीक आहे! आणि उद्या तू अमेरिकेला जाणार आहेस! माझं इथलं काम संपलं आहे माझी गरज तुला नाही आता so मी जातो समिधा ही उद्या येणार आहेच!” तो म्हणाला.त्यांचं बोलणं किचनच्या दारातून ऐकत असणाऱ्या मनिषाताई आता हॉलमध्ये आल्या आणि बोलू लागल्या.

मनीषाताई,“चिनू काय बोलतोय हे सुशांत? तू काय बोललास त्याला?”त्यांनी जाब विचारण्याच्या सुरात विचारले आणि संग्राम काही बोलणार तर सुशांतच म्हणाला.

सुशांत,“ काही नाही काकू मी घरी जाण्याचा विचार करतच होतो. मी कॅब बोलवली आहे. माझी बॅग भरायची अजून!” तो म्हणाला आणि संग्रामाच्या रूममध्ये बॅग भरायला गेला.त्याच्या मागोमाग संग्राम ही रूममध्ये गेला. सुशांत त्याचे कपडे बॅगमध्ये भरत होता.

संग्राम,“सुशा ऐक ना माझं चुकलं रे! मी तुला असं बोलायला नको होतं. प्लिज नको जाऊस ना तू!” तो रडकुंडीला येऊन बोलत होता.

सुशांत,“तुझं काहीच चुकलं नाही संग्राम! आणि राहून तर मी काय करणार आहे तू तर अमेरिकेला जाणार आहेस की उद्या!आणि असं ही तुला माझी गरज नाही आता! आणि आज नाही तर उद्या मला माझ्या घरी जायलाच हवं ना!” तो म्हणाला आणि बॅग घेऊन निघाला.

संग्राम,“ सुशा मला सगळं मान्य असलं तरी ही तू असं नाराज होऊन जाऊ नकोस ना आणि मला तुझी गरज आयुष्यभर आहे कळलं तुला!” आता त्याने सुशांतचा हात धरला होता आणि आता त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.

सुशांत,“ मी तुला कुठेच सोडून चाललो नाही संग्राम! तूच निघाला आहेस अमेरिकेला! बरं मी जातो आता!” सुशांतने त्याला न पाहतच स्वतःचा हात सोडवून घेतला आणि तो निघून गेला.

तो सुशांतला हतबलपणे जाताना पाहत राहिला.घरातल्या बाकी लोकांना दोघांमध्ये काही तरी झालं आहे हे कळतं होते पण दोघांमध्ये नेमकं काय झालं आहे हे कळत नव्हतं. काही तरी मोठं झाल्या शिवाय सुशांत असं वागणार नाही हे देखील सगळ्यांना माहीत होतं पण संग्रामला कोणीच काही विचारले नाही!सगळा दिवस असाच निघून गेला. संध्याकाळ झाली संग्राम पोर्चमध्ये उदास बसून होता. त्याला तो सुशांतशी जो बोलला वागला त्यासाठी स्वतःचाच राग येत होता. घरात मात्र अमर पासून ते मनिषाताई पर्यंत कोणीच त्याच्याशी काही बोलत नव्हतं.घरातील वातावरण अगदी कुंद झालं होतं. एक तणावपूर्ण शांतता पसरली होती.तो दुपारी ही जेवला नव्हता म्हणून जेवायची वेळ झाल्यावर संजयराव त्याला जेवायला बोलवायला आले. त्याला जेवायची इच्छा नव्हती तरी ही सगळे अजून नाराज व्हायला नको म्हणून त्याने कसे बसे चार घास पोटात ढकलले होते.

संग्रामने त्याची बॅग भरायला घेतली आणि न सांगताच अमरने त्याची मदत बॅग भरायला केली होती. संग्रामने न राहवून सुशांतला फोन लावला पण सुशांतने त्याचा फोन उचलला नाही.मनीषाताई सगळं आवरून रूममध्ये गेल्या आणि त्यांनी गार्गीला फोन केला.

गार्गी,“ हा आई बोला ना तुम्ही नका काळजी करू मी नाही जाऊ देणार त्याला अमेरिकेला!” ती त्या काही बोलायच्या आधीच बोलली.

मनीषाताई,“ हो हो अग मी वेगळ्याच कारणासाठी फोन केला आहे.गार्गी अग आज सुशांत निघून गेला तो दुखवलेला वाटत होता. कदाचित संग्राम त्याला काही तरी बोलला आहे पण त्याने आणि संग्रामने ही दोघात काय झाले ते सांगितले नाही ग! तू सुशांतला विचार ना काय झाले ते! आता चिनू बरोबर मला त्याची देखील काळजी वाटते ग!” त्या काळजीने बोलत होत्या.

गार्गी,“हो आई मी सुशांतला फोन करते तुम्ही नका काळजी करू!” ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला आणि लगेच तिने सुशांतला फोन लावला.सुशांतने तिचे नाव पाहून फोन उचलला.

गार्गी,“ काय झालं सुशांत तू असा तडकाफडकी निघून का आलास ठाण्याहून?”

सुशांत,“गार्गी तुझा नवरा येडा झाला आहे! तो कोणाच काहीच ऐकून घ्यायला तयार नाही त्याने स्वतःच गैरसमज करून घेतले आहेत आणि ते दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याने मला माझी मैत्रीची हद्द दाखवली आज!मूर्ख माणूस अमेरिकेला निघाला आहे डॉक्टरांचे म्हणणे झुगारून! त्याला आता माझी गरज नाही मग कशाला थांबू मी तिथे एका अर्थी बरच झालं त्याने आज मला माझी हद्द दाखवून दिली!” तो कातर आवाजात बोलत होता.

गार्गी,“सुशांत तू शांत हो आधी! आणि त्याची मनस्थिती माहीत आहे ना तुला? त्याच्या वतीने मी sorry म्हणते तुला पण प्लिज तू त्याच्या विषयी गैरसमज करून घेऊ नकोस ना! आणि तो नाही जाणार कुठे मी नाही जाऊ देणार त्याला!तो प्रत्येक गोष्टीत स्वतःची मनमानी नाही करू शकत आणि उद्या तो स्वतः तुझी माफी मागेल!” ती त्याला समजावत होती.

सुशांत,“ गार्गी तू माफी मागण्याची काही गरज नाही आणि त्याने मला आधीच खूप वेळा sorry म्हणून झाले आहे आणि मी घरी आल्या पासून खूप वेळा फोन आले आहेत त्याचे मी नाही घेतले. त्याच्या बद्दल गैरसमज करून घ्यायला मी आज ओळखतो का त्याला! पण या महिन्या भरात तो खूप शेफारला आहे आणि आत्मकेंद्री झाला आहे!आपल्या सगळ्यांना गृहीत धरतोय तो आणि त्याच्या या गृहितकांना कुठे तरी तडा देणे! स्वतःचा सोडून दुसऱ्याचा विचार करायला लावणे! त्याला या एक प्रकारच्या झोपेतून जागे करणे खरंच गरजेचे होते म्हणून मी निघून आलो! मी त्याच्यावर नाराज नाही तर दुखावलो गेलो आहे आणि तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला दुखवल्यावर त्याचे परिणाम काय होतात हे त्याला कळायला हवं! म्हणून मी आलो बाकी काही नाही आणि मला खात्री आहे तू त्याला नाही जाऊ देणार कुठे!” तो म्हणाला.

गार्गी,“ thanks सुशांत आणि त्याला आपण त्याच्या काळजी पोटी जपले पण तो आता डोक्यावर बसायला लागला आहे. त्याला आता ताळ्यावर आणायला हवेच पहातेच मी तो कसा जातो ते!” ती म्हणाली आणि फोन ठेवला.

खरं तर आजची रात्र सगळ्यांसाठीच खूप जड होती. एकीकडे गार्गी संग्रामच्या विचाराने जागी होती! दुसरीकडे संग्रामला सुशांतला आणि बाकी सगळ्यांनाच दुखवल्याची बोच त्याला झोपू देत नव्हती.तर सुशांतला संग्राम आणि गार्गीच्या नात्याची काळजी झोपू देत नव्हती. संजयराव-मनिषाताई, काकू-काका आणि अमर या सगळ्यांना या घटनाक्रमातून उद्या काय घडणार आहे याची काळजी सतावत होती.
©स्वामिनी चौगुले



🎭 Series Post

View all