माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ८२

This Is A Love Story


गार्गी बाहेरच बसून होती. तो पर्यंत मनीषाताई आणि संजयराव आले. गार्गीने त्यांना पाहिले आणि तिने त्यांना वाकून नमस्कार केला. तिच्या डोळ्यातले पाणी मात्र तिला लपवता आले नाही. ते पाहून संजयराव म्हणाले.

संजयराव,“ आयुष्यमान भव बेटा! आणि आजच्या दिवशी डोळ्यातून पाणी काढायचे नाही. आजचा दिवस आमच्यासाठी देखील खास आहे! तुझ्यासारखी सून म्हणण्या पेक्षा मुलगी आमच्या आयुष्यात आली. संग्रामला तुझ्या पेक्षा चांगली जोडीदार मिळाली नसती. मी आजचा दिवस मोठ्या प्रमाणात सेलिब्रिट करायचा ठेवले होते पण संग्रामच्या अशा अवस्थेत ते शक्य नाही असो आपण तो बरा झाल्या नंतर सेलिब्रेशन करू!” ते तिला समजावत म्हणाले.

मनीषाताई,“ मला कळते बेटा तुझ्या मनाची अवस्था! त्याच्या झालेल्या गैरसमजामुळे तू त्याच्या समोर ही जाऊ शकत नाहीस पण काळजी नको करून एक महिन्याचा तर प्रश्न आहे. होईल सगळं ठीक!” त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

गार्गी काही बोलणार तर सुशांत बाहेर आला.त्याला पाहून मनीषाताई म्हणाल्या.

मनीषाताई,“ सुशा चिनू झोपला का जागा आहे रे? त्याने काही खाल्ले का? नाही तर मी भरवेन त्याला काही तरी!”

सुशांत,“ काकू मी त्याला सूप पाजले आहे आणि स्पंचिंग ही केले त्याचे! मेडिसीन्स दिले आहेत तो जागा आहे पण आता झोपेल!तुम्ही जा त्याला भेटा त्या आधी! गार्गी आपण कॅन्टीनमध्ये जावू चल!” तो म्हणाला.

संजयराव,“ बरं”

असं म्हणून ते दोघे संग्राम जवळ गेले आणि गार्गी-सुशांत कॅन्टीनमध्ये गेले. सुशांतने दोन कॉफी मागवल्या.

गार्गी,“ संग्राम ठीक आहे ना!त्याला आज काय आहे ते न कळलेले बरे कारण तो कसा रियाक्ट होईल आणि स्वतःला कसा त्रास करून घेईल हे काही सांगता येणार नाही! त्या दिवशीचा त्याचा अवतार पाहून मला तर खूप भीती वाटते त्याची!” ती आवंढा गिळत म्हणाली.

सुशांत,“ गार्गी तू हे विसरत आहेत तो किती हुशार आहे त्याने आज तारीख किती आहे हे बरोबर ओळखले आहे!” तो म्हणाला.

गार्गी,“ अरे देवा मग काही बोलला का तो? त्याला टेन्शन तर नाही आले ना?” तिने काळजीने विचारले.

सुशांत,“ त्याने तू गेलीस का विचारले? मी त्याला काचेवरचे तावदान बाजूला करून तू बसलेली दाखवले आणि हे ही सांगितले की तू इथेच आहेस आपण हॉस्पिटलमध्ये आल्या पासून….!” तो पुढे बोलणार तर त्याचे बोलणे मध्येच थांबवत ती म्हणाली.

गार्गी,“ काय? अरे डॉक्टरांनी काय सांगितलंय सुशांत! त्याला काही झालं तर? तू का सांगितलंस त्याला?” ती काळजीने बोलत होती.

सुशांत,“ तू आधी शांत हो! काही नाही झाले त्याला पण मला खोटे बोलणे नाही जमले आणि विषय त्यानेच काढला आणि मी जर विषय टाळला असता तरी तो विचार करत राहिला असता म्हणून सांगितले.

गार्गी,“ बरं मग काय म्हणाला तो?” तिने विचारले.

सुशांत,“ हेच की त्याने तुझ्यावर तुला वाचवून उपकार केले आहेत असं समजून थांबली असशील तर निघून जायला सांग तुला आणि वकिलांना फोन कर म्हणत होता! मी रागवुन शांत केले त्याला! आणि सांगितले की तू बरा झाल्यावर तुम्ही दोघे काय ते बघून घ्या पण सध्या कोणताच विचार करायचा नाही!” तो म्हणाला.

गार्गी,“ काय करू मी या माणसाचे सुशांत? याने इतका गैरसमज त्याच्या मनात असून ही माझ्या बद्दल राग असून ही मला वाचवायला जाऊन नसते संकट स्वतःवर घेतले! त्याला काही झाले असते तर? पण आता त्याच्या राग शिगेला पोहोचला आहे म्हणून तो हे सगळं बोलत आहे आणि त्याने डीव्होर्स बद्दलचे माझे आणि त्या नीच माणसाचे बोलणे ऐकले म्हणून तो वकिलाला बोलव म्हणत आहे!माझीच तर चूक आहे सगळी पण या सगळ्याचा त्रास मात्र त्याला होतो आहे! तो मला जी शिक्षा देईल ती मी निमुटपणे मान्य करेन फक्त मला एकदा त्याच्याशी बोलायचे आहे!”ती रडत बोलत होती.

सुशांत,“ शांत हो गार्गी! एवढं सगळं होऊन ही तो आज आपल्या बरोबर आहे हे काय कमी आहे का? तुला तर माहीतच आहे की या सगळ्या गैरसमजातून तो ट्रीटमेंटला सुद्धा रिस्पॉन्स करत नव्हता. आपलं दैव बलवत्तर म्हणून तो आज आपल्यात आहे! त्याला आलेला राग हा गैरसमजातून आहे गार्गी आणि तू ही चुकली आहेसच की! तू त्याला अंधारात ठेवायला नको होतंस! त्याचा गैरसमज दूर झाला तरी तो या गोष्टीमुळे तुझ्यावर चिडणारच आहे पण तू एक विसरत आहेस गार्गी! त्याच तुझ्यावर खूप प्रेम आहे अगदी जीवापाड कारण एवढं सगळं होऊन त्याचा इतका मोठा गैरसमज असून देखील त्याने तुला वाचण्यासाठी स्वतःची पर्वा केली नाही! त्यामुळे तो किती ही चिडला तरी तो तुला माफ करेल! मी ओळखतो ना त्याला! एक महिन्याचा तर प्रश्न आहे होईल सगळं नीट!” तो म्हणाला.

गार्गी,“ I hope so!” ती म्हणाली.

★★★★★

ती घटना घडून आज दहा दिवस होऊन गेले होते. या दहा दिवसा दरम्यान त्याला गृह राज्य मंत्री आणि मुख्यमंत्री देखील भेटून गेले होते. अजून ही त्याच्या सिक्युरिटीसाठी पोलीस तैनात होते. डॉक्टर्स त्याच्या तब्बेतीची माहिती वेळोवेळी मीडियाला देत होते.

रोज संग्राम बद्दल पेपर, न्यूज चॅनल्स आणि मासिकांमध्ये काही ना काही छपून येत होते. सोशल मीडियावर देखील त्याचीच चर्चा होती. मीडियावाले संग्रामाच्या कुटुंबातील लोकांचा इंटर व्ह्यूव घेण्यासाठी धडपडत होते पण कोणीच मीडिया समोर अजून तरी गेले नव्हते. त्या दिवशी रिसॉर्टमध्ये ओलीस असलेल्या आणि संग्रामने सोडवलेल्या लोकांचे इंटर व्ह्यू मात्र सतत येत होते आणि ते लोक संग्रामाच्या शौर्याचे गुणगान गाताना थकत नव्हते. पूर्ण देश भर संग्रामाच्या शौर्याचा डंका वाजत होता. राज्य शासनाने त्याला वीरश्री पुरस्कार जाहीर केला होता. तो बरा झाल्यावर त्याला तो पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार होता. गार्गी रोज मासिकांतून आणि पेपर मधून त्याच्या फोटो सहित येणाऱ्या बातम्याचे कटिंक्स एका सुंदर अशा फोर्डर मध्ये चिटकवून ठेवत होती. पाहता पाहता संग्राम नॅशनल हिरो बनला होता.

पण स्वतः संग्राम मात्र या सगळ्या गोष्टीं पासून अनभिज्ञ होता आणि कोणीच त्याला हे सांगितले देखील नव्हते कारण सध्या सगळ्यांनाच त्याची तब्बेत सुधारणे गरजेचे वाटत होते. त्याची तब्बेत आता बरीच सुधारली होती त्यामुळे आज त्याला I. C. U. मधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करणार होते. त्यामुळे सगळेच खुश होते.संजयराव आणि मनिषाताई मंदिरात जाऊन गरिबांना दान-धर्म करून आले. गार्गी ही संग्रामनेच तिला घेऊन गेला होता त्या बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना आणि पूजा करून आली होती.तिने मनीषाताई कडून संग्रामला प्रसाद पाठवून दिला. रौनक आणि रश्मी फक्त सांगलीला निघून गेले.अमर आणि काका-काकू मुंबईतच राहिले होते.

आज सगळेच खुश होते कारण संग्रामला I. C. U. मधून बाहेर काढले गेले होते. हॉस्पिटल मधून सुट्टी मिळायला त्याला अजून वेळ लागणार होता पण तो I. C. U. मधून बाहेर आला म्हणजे तो आता स्टेबल होता. त्याला अजून नीट उठता बसता ही येत नव्हते. डाव्या छातीला गोळी लागल्यामुळे डाव्या हाताची जास्त हालचाल होऊ नये म्हणून त्याचा हात गळ्यात बांधण्यात आला होता. ब्लड लॉस जास्त झाल्यामुळे तो अजून ही बराच अशक्त होता पण तरी ही तो आता स्टेबल होता आणि काही दिवसांनी तो पूर्ण बरा होईल म्हणून सगळ्यांनाच आनंद होणे साहजिक होते.
त्याला सकाळचा डॉक्टरांचा राउंड होऊन गेल्या नंतर शिफ्ट करण्यात आले होते.अमर लवकरच घरी निघून गेला होता आणि सुशांत नुकताच संग्राम जवळ येऊन बसला होता. संजयराव आणि मनीषाताई अजून आले नव्हते तर गार्गी रूम बाहेर बसून होती.संग्रामने कोणी नाही पाहून सुशांतशी बोलायचे ठरवले.

संग्राम,“ सुशा इतके दिवस झाले तू हॉस्पिटलमध्येच असतोस दिवस भर जॉब सोडलास की काय? आणि आपल्या कंपनीला आता टाळं लागणार बहुतेक!”तो सुशांतला तिरकस पाहत म्हणाला.

सुशांत,“ संग्र्या तुला आराम कर म्हणून सांगितलेलं कळत नाही का रे ? आणि मी रजा घेतली आहे एक महिन्यांची बॉसला सांगितले तसं ते ही होतेच की रिसॉर्टमध्ये! आणि समजा नसती दिली रजा तर मी सोडली असती नोकरी तुझ्या पेक्षा नोकरी महत्त्वाची नाही आणि असं कसं टाळं लागेल आपल्या कंपनीला सुरू आहेत प्रोजेक्ट आपले मी करतो मॅनेज! मेहतानी सांगितले आहे की प्रोजेक्ट पूर्ण करायला वेळ झाला तरी चालेल म्हणून!तर तू स्वतःची काळजी कर बाकी कोणतीच नको!” सुशांत त्याला समजावत म्हणाला.

त्याच बोलणे ऐकून संग्राम थोडावेळ गप्प बसला आणि काही तरी विचार करून पुन्हा बोलू लागला.

संग्राम,“ सुशा! माझं एक काम कर ना तेवढं! आपल्या वकिलांना फोन लावून बोलवून घे ना हॉस्पिटलमध्ये!” तो थोडा कचरत म्हणाला.

सुशांत,“ आराम कर तू आजच I. C. U मधून बाहेर निघालास ना! आपण नंतर बोलू या विषयावर!” तो त्याला समजावत म्हणाला आणि संग्राम मात्र आता चिडला.

संग्राम,“ काय रे सारख आराम कर आराम कर! मी काय लगेच मरणार नाही कळलं का तुला? एक अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करायचे आहे!” तो चिडून बोलत होता.

सुशांत,“ थोबाड फोडीन आ संग्र्या तुझं असं काही बोललास तर! गप्प पडून राहायचं! अजून नीट बसता उठता येत नाही आणि साहेब निघाले कोर्ट कचेरी करायला!” सुशांत ही चिडून म्हणाला.

संग्राम,“ घ्या सगळेच मिळून माझा फायदा घ्या! आधी तिने …….(तो मध्येच बोलायचा थांबला) आता तुम्ही सगळे छळा मला त्या पेक्षा मी गेलो असतो तर सुटलो तरी असतो सगळ्यातून पण तुम्ही लोकांनी ते ही होऊ दिले नाही!” तो चिडून पण भावुक होत म्हणाला आणि हे ऐकून सुशांतने त्याला मिठी मारली.

सुशांत,“ संग्र्या परत असलं काही बोलशील तर याद राख ! तुला काय माहीत रे आम्ही सगळ्यांनी हे दिवस कसे काढले आहेत! तू खूप महत्त्वाचा आहेस आमच्यासाठी रादर माझ्यासाठी I love you!” तो डोळ्यात पाणी आणून त्याला अलगद मिठी मारून बोलत होता आणि तेवढ्यात समिधा तिथे आली आणि संग्राम तिला पाहून थोडासा हसत म्हणाला.

संग्राम,“ सोड मला सुशा समिधा आली आहे! ती आपल्या बद्दल काही भलतंच समजेल की!”

सुशांतने डोळे पुसले आणि तो खुर्चीवर बसला समिधाने कसली तरी छोटी पिशवी टेबलवर ठेवली आणि बोलू लागली.

समिधा,“ घाबरू नको संग्राम! मी काही भलतं सलतं नाही समजणार! बरं मी तुझ्यासाठी खीर आणली आहे! सुशांत भरतोस का त्याला?की भरवू?” तिने खीर बाऊल मध्ये काढत विचारलं.

सुशांत,“ मी भरवतो आन!” असं म्हणून सुशांतने तिच्या हातातून बाऊल घेतला.

संग्राम,“ sorry मी उगीचच चिडचिड केली!तू माझ्यासाठी इतकं करतोस आणि मी….” तो पुढे बोलणार तर सुशांतने त्याला मध्येच थांबवले आणि स्वतः बोलू लागला

सुशांत,“आता तर खरंच तुझं थोबाड फोडीन संग्र्या! खीर खा आणि शांत झोप आता!” सुशांत त्याला दटावत म्हणाला

संग्राम,“ समिधा अग हा दहा दिवस झालं नुसतं मला दम देत असतो! घेऊन जा बरं याला!” तो समिधाकडे पाहून लटक्या रागाने म्हणाला.

समिधा,“ संग्राम तू माझा सवत्या आहेस आणि मी सुशांतची बायको तर मी बापडी तर तुमच्या मध्ये नाही पडू शकत!” ती असं म्हणाली आणि तिघे ही हसायला लागले.

बाहेर दाराच्या आडोशाला उभी राहून त्यांना पाहत आणि ऐकत असलेली गार्गी ही हसायला लागली आणि एकदम तिचे डोळे वाहू लागले.


संग्राम आणि गार्गीमध्ये निर्माण झालेला दुरावा कधी दूर होणार होता?

©स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all