माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ५४

This Is A Love Story


भाग ५४

अर्धा तास होऊन गेला आणि डॉक्टर बाहेर आले. तोपर्यंत कोणाचे ही मन थाऱ्यावर नव्हते. तिथे उपस्थित प्रत्येकाला गार्गीच्या चिंतेने ग्रासले होते. संग्राम तर आतून पुरता हादरून गेला होता पण तो वरून शांत आहे असे दाखवत होता. डॉक्टर बाहेर आले आणि सगळ्यांनी त्यांच्या कडे पाहिले! प्रत्येकाच्या नजरेत चिंता आणि भीती स्पष्ट दिसत होती. ते पाहून डॉक्टर बोलू लागले.

डॉक्टर,“relax she is safe now! तिच्या कपाळाला खोलवर जखम झाली आहे त्यामुळे सहा स्टीचेस घालावे लागले आहेत आणि डाव्या हाताला बरीच मोठी जखम आहे. पण काळजी करण्या सारखे काही नाही. आम्ही तिला रूममध्ये शिफ्ट करत आहोत. थोड्या वेळाने शुद्धीवर येईल ती! डोक्याला मार लागल्याने आजची रात्र ओब्जर्वेशन मध्ये ठेवावं लागेल तिला! उद्या घेऊन जा घरी! तुम्ही तिला आता पाहू शकता आणि शुद्धीवर आल्यावर भेटू ही शकता!” डॉक्टर असे म्हणाले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

संग्राम,“डॉक्टर ओब्जर्वेशनमध्ये? म्हणजे घाबरण्यासारखे काही नाही ना?” त्याने आवंढा गिळत विचारले.

डॉक्टर,“नाही तसे काही नाही! पण डोक्याला जखम आहे म्हणून थोडं प्रिकॉशन घेतलेले बरे! काही फॉर्मेलिटी पूर्ण करायच्या आहेत तर तुमच्या पैकी कोणी माझ्या बरोबर…!” ते पुढे बोलणार तर संग्राम त्यांना म्हणाला.

संग्राम,“मी येतो! गौरव दादा तुम्ही जा गार्गी जवळ मी आलोच!” तो म्हणाला आणि कोणाच्या उत्तराची वाट न पाहता डॉक्टरच्या मागे गेला ही!

सगळे गार्गी जवळ गेले होते. तिच्या डोक्याला आणि डाव्या हाताला भली मोठी बँडेज बांधली होती. उजव्या हाताला ड्रीप लावली होती. थोड्याच वेळात तिला शुद्ध आली. तिला मीनाताई, संजयराव- मनिषाताई, गौरव आणि सुशांत सगळे भेटले. पण तिची नजर संग्रामला शोधत होती आणि तोच नेमका तिला दिसत नव्हता. संग्राम तिच्या रूम जवळ आला आणि रूममध्ये त्याने डोकावून गार्गीला पाहिले. ती मीनाताईशी बोलत होती. त्याने तिला पाहिले आणि रूम बाहेरच्या खुर्चीवर बसून राहिला. थोड्या वेळाने मनिषाताई तिच्या जवळ बसल्या आणि बाकी सगळे बाहेर आले.

मीनाताई, “मी थांबते आज तिच्या बरोबर आणि उद्या घरी घेऊन जाईन मी! बरी होई पर्यंत मी काही तिला सोडणार नाही!” त्या भावनिक होत बोलत होत्या.

संजयराव,“मी समजू शकतो मीनाताई पण घरी रागिणी प्रेग्नेंट आहे आणि गार्गीला पण तुम्ही घेऊन गेलात तर दोघींची काळजी तुम्ही कशी घेणार? त्या पेक्षा गार्गीला आमच्या बरोबर येऊदे ठाण्याला! तिची सगळी काळजी आम्ही घेऊ!” ती म्हणाले.

संग्राम,“हो मम्मा तुम्ही गार्गीची काळजी नका करू तुम्ही रागिणी वहिनीकडे लक्ष द्या! आम्ही आहोत गार्गीची काळजी घ्यायला!आणि खूप वेळ झाला आहे वहिनी एकट्याच आहेत घरी तुम्ही आणि दादा निघा आता! बाबा तुम्ही ही आईला घेऊन जा मी आहे इथे!” तो म्हणाला.

सुशांत,“मी ही आहे इथे आई-बाबा आलेत काल गावा वरून त्यामुळे समिधाची काळजी नाही मला! मी फोन करून सांगितले आहे तिला!” तो म्हणाला.

संजयराव,“बरं ठीक आहे!”

इकडे गार्गीची नजर मात्र संग्रामला शोधत होती. मनिषाताईनी ते हेरले आणि त्या म्हणाल्या.

मनीषाताई, “संग्राम आहे बाहेर ग येईल इतक्यात!” त्यावर गार्गी काहीच बोलली नाही फक्त तिने होकारार्थी मान हलवली.

संजयराव, गौरव आणि मीनाताई रूममध्ये आले आणि मीनाताई गार्गीला म्हणाल्या.

मीनाताई, “मी उद्या येईन बेटा! खरं तर मला तुला असं सोडून जायचं नव्हतं पण रागिणी ही एकटी आहे. मी उद्या सकाळी येईन!” त्या डोळ्यात पाणी आणून तिच्या गालावरून मायेने हात फिरवत बोलत होत्या.

गार्गी,“मम्मा तुझं रडणं आधी थांबव बरं! मला काही झालेलं नाही मी ठीक आहे. तू आणि दादा जा आणि बाबा तुम्ही आणि आई ही जा! खूप वेळ झाला आहे! त्या डॉक्टरने मला उगीच अडकवून ठेवलं आहे इथे!” ती वैतागून म्हणाली.

सुशांत,“हो ना डॉक्टर वेडा आहे आपण फक्त शहाणे आहोत. फोन वर बोलत रोड क्रॉस करतो ना आपण!” तो थोडा चिडून पण काळजीने म्हणाला आणि गार्गीने त्याला रागाने पाहिले.

संजयराव,“बरं बेटा आम्ही निघतो संग्राम आणि सुशांत आहेत इथेच! तू काही तरी खा आणि आराम कर!” ते म्हणाले आणि गार्गी हो म्हणाली.

सगळे निघून गेले तरी संग्राम अजून देखील रूममध्ये आला नव्हता. तिला माहीत होतं की तो तिच्यावर चांगलाच चिडला असणार पण तिला त्याला भेटायचं होत म्हणून तिने सुशांतला विचारले.

गार्गी,“तुझा मित्र माझ्याशी बोलणार नाही वाटतं आणि भेटणार देखील नाही!”

सुशांत,“हो ना! तू खूप मोठा पराक्रम केलास ना म्हणून तो तुझा आदर सत्कार करायला येतोय ना!” तो खोचकपणे म्हणाला आणि संग्राम नर्सने दिलेला सूपचा ट्रे घेऊन आत आला.

गार्गीने त्याला पाहिले आणि तिने नजर खाली वळवली. तिचे डोळे काठोकाठ भरून आले होते. सुशांतने मी बाहेर आहे म्हणून इशारा केला आणि तो निघून गेला. संग्रामने एक शब्द ही न बोलता तिचा बेड अप पोजिशनमध्ये केला त्यामुळे ती आपोआपच बसती झाली आणि सूपचा बाऊल घेऊन तिच्या ओठा समोर सूपचा चमचा धरला. गार्गीने ते पाहिले आणि ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

गार्गी,“sorry ना gd मी पुन्हा अशी बेजबाबदार नाही वागणार! मी शुद्धीवर आल्या पासून तुला शोधत आहे. बोल ना काही तरी!” ती आता रडत बोलत होती.

संग्राम,“रडू नकोस त्रास होईल तुला! आधीच डोक्याला काय कमी लागलं आहे का? सूप घे आणि औषध घेऊन झोप!” तो तिला नाराजीने म्हणाला.

गार्गी,“नको आहे मला काही.... तुला माझ्याशी नाही बोलायचं ना तर ठीक आहे जा तू!” ती पुन्हा रडत म्हणाली.

संग्राम,“झालं! एक तर काही ही बोलत सुटायचं! दुसरं बेजबाबदारपणे वागायचं आणि वरून हे असं रडून दुसऱ्याला छळायच!” तो सूपचा बाऊल टेबलावर आपटत रागाने म्हणाला आणि गार्गीने उजव्या हाताने त्याचा हात धरला.

गार्गी,“sorry ना मी नाही वागणार परत असं!” ती रडत बोलत होती.

ते पाहून संग्रामने धरून ठेवलेला त्याचा धीर आता सुटला आणि त्याने बेडवर बसत तिला मिठी मारली आणि तो ही रडायला लागला. थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला.

संग्राम,“झालं तुझ्या मना सारख? खूप हौस होती ना तुला अपघाताची! झाला एकदाचा? पण तुझा अपघात झाला हे ऐकून मला काय वाटेल याचा विचार केलास का तू?” तो रागाने म्हणाला.

गार्गी, “अरे मी त्या दिवशी सहज बोलून गेले होते एका उदाहरणा दाखल! पण आज जेव्हा मला त्या कारने ठोकरले आणि माझी शुद्ध हरपू लागली तेंव्हा मला असं वाटलं की संपलं सगळं! मी आता तुला कधीच भेटू शकणार नाही!” ती त्याला बिलगून डोळ्यात पाणी आणून बोलत होती पण बोलता ना तिला होणारा त्रास संग्रामला जाणवला.

संग्राम,“बास झाले! आता शांत बस आणि सूप पी, मेडिसीन्स घे आणि झोप आता! तू घरी चल जरा बरी हो मग तुला सांगतो काय ते!” तो तिचे डोळे पुसत म्हणाला.

गार्गी,“sorry ना आता किती वेळा म्हणू मी!” ती बारीक तोंड करून म्हणाली.

संग्राम,“सांगितले ना मी काही बोलू नकोस हे घे पी लवकर!” तो म्हणाला.

गार्गीने मान हलवली आणि सूप पीत ती म्हणाली.

गार्गी,“तू आणि सुशांत ही जेवून या खाली कॅन्टीन असेलच की!”

संग्राम,“तू तुझी काळजी कर दुसऱ्याची नको!” तो तिला दम देत म्हणाला आणि सुशांत तिथे आला.

सुशांत,“संग्र्या मी जेवून आलो रे! तू तिला सूप पाजून जेवून ये! मी आहे तिच्या जवळ!” तो म्हणाला.

संग्रामने तिला पाणी आणि मेडिसीन्स दिले. तिने ते घेतले आणि संग्राम जेवण करायला निघून गेला. तो गेलेला पाहून सुशांत गार्गीशी बोलू लागला.

सुशांत,“काय गार्गी? किती बेजबाबदारपणा? आणि काय ग तू काही दिवस आधी संग्रामला काय म्हणाली होतीस? सुखासुखी कशाला असलं बोलायचं गार्गी! तो किती घाबरला होता. वरून जरी खूप स्ट्रॉंग आहे असं दाखवत असला तरी आतून खूप हळवा आहे ग तो! तुला असं पाहून तो कोलमडला होता आतून!”

गार्गी,“हुंम! माहीत आहे मला! मला वाटलंच नाही सुशांत की मी बोलेन आणि काही दिवसाने असे काही घडेल!” ती म्हणाली.

सुशांत,“बरं इथून पुढे जरा जपून आणि झोप आता!” तो म्हणाला.

संग्राम जेवण करून आला तर गार्गी झोपली होती. संग्रामला सुशांतने खुर्चीवर बसायचा इशारा केला आणि तो बाहेर निघून गेला. संग्राम तिथेच गार्गीच्या बेड जवळ बसून होता. तो ही खुर्चीवर बसून आता पेंगत होता आणि रात्रीचे दोन वाजले असतील गार्गी ओरडत झोपेतून उठली. कदाचित आज झालेल्या अपघाताची तिला भीती वाटली असावी. तिचा आवाज ऐकून संग्रामने तिचा हात धरला. गार्गी घाबरून घामाघुम झाली होती. त्याने तिच्या कपाळावरील घाम त्याच्या रूमालाने पुसला आणि तिला पाणी दिले.


संग्राम,“काय झालं गार्गी इतकी का घाबरलीस? आपण डॉक्टरांना बोलूया का?” त्याने काळजीने विचारले.

गार्गी,“काही नाही रे अचानक त्या कारचा आवाज कानात आला आणि मला ठोकरले ते सगळे स्वप्नात दिसले!” ती त्याचा हात घट्ट धरत म्हणाली.

संग्राम,“बरं झोप आता!”

गार्गी,“संग्राम तू माझ्या जवळ रहा मला खूप भीती वाटते आहे.” ती घाबरून बोलत होती.

संग्राम,“मी इथेच आहे गार्गी! तुला सोडून कुठे नाही जाणार आणि घाबरायला काय झालं तुला काही नाही होणार!”

तो बेडवर तिच्या जवळ बसत म्हणाला आणि गार्गीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. ती त्याला सोडून झोपायला तयार होईना मग शेवटी तोच बेडवर तिच्या जवळ झोपला आणि गार्गी त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपली. त्याला ही कधी तरी रात्री झोप लागली. सकाळी साधारण सात वाजता त्याला जाग आली तर गार्गी त्याच्या हातावर डोके ठेवून तिच्या जखम झालेल्या हाताने शर्टाला घट्ट धरून झोपली होती. त्याने तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा अगदी मलूल दिसत होता. ते पाहून त्याला कसेतरी वाटले. तो तिच्या चेहऱ्यावरून हळुवारपणे हात फिरवणार तर तेव्हढ्यात त्याला नर्स आत येताना दिसली आणि त्याने गार्गीचे डोके अगदी सांभाळून उशीवर ठेवले आणि तिचा हात त्याच्या शर्ट मधून सोडवून त्याने हळूच बेडवर ठेवला आणि घाईने उठून उभा राहिला. ते पाहून ड्रीप बदलायला आलेली नर्स हसून म्हणाली.

नर्स, “एवढं काय सर त्यात?”

संग्राम,“नाही म्हणजे ती रात्री खूप घाबरून उठली होती. त्यामुळे मी…!” त्याने लाजून मान खाली घातली होती.

नर्स, “मी समजू शकते! एवढा अपघात झाल्यावर माणूस घाबरणारच ना आणि अशा वेळी त्याला आपल्या माणसाची साथ हवीच असते की!” त्या म्हणाल्या आणि ड्रीप बदलून निघून ही गेल्या! पण संग्राम मात्र लाजून चूर झाला होता. तो गार्गीकडे पाहून डोक्याला हात लावून मनातच म्हणाला.


“मॅडम तुमच्यासाठी अजून काय काय करावे लागणार आहे देव जाणे!”

तो पर्यंत सुशांत, मीनाताई आणि गौरव रूममध्ये आले. संग्रामने गार्गीला उठवले. ती डोळे चोळत उठली आणि गौरव तिला हसून म्हणाला.

गौरव,“काय ग हॉस्पिटलची रूम खूप आवडली का तुला? उठा तासा भरात डिस्चार्ज मिळेल तुला! डॉक्टरला भेटून आलो आत्ताच ही ड्रीप संपली की आपण निघणार आहोत!”

मीनाताई, “काय रे! तिला फ्रेश तरी होउदे!” त्या म्हणाल्या.

गार्गी,“नाही मम्मा मी घरी जाऊन आवरेन माझं! आणि दादा मला अजिबात ही रूम आवडलेली नाही!” ती तोंड वाकड करत म्हणाली.

संग्रामला सगळ्या फॉर्मेलिटी पूर्ण करायला आणि बाकी इन्स्ट्रक्शन्स द्यायला एका नर्सने डॉक्टर बोलत आहेत म्हणून बोलावून नेले! संग्रामने फॉर्मेलिटी पूर्ण केल्या. सुशांत त्याच्या घरी गेला आणि संग्राम, मीनाताई, गौरव गार्गीला घेऊन घरी गेले.


गार्गी या संकटातून तर वाचली होती पण राजवीरच्या रुपात खूप मोठे संकट तिच्या समोर येणार होते. त्याचा सामना ती कसा करणार होती?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all