माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ७७

This Is A Love Story


भाग 77
राजवीरची गार्गीने चांगलीच लायकी काढली होती आणि स्वतःला शहाणा समजणारा राजवीर आज चांगलाच तोंडावर पडला होता.त्याला कुठे तोंड लपवू असे झाले होते. सगळ्या हॉलमध्ये आता फक्त त्याचीच चर्चा होती. असोसिएशनने तर तिथल्या तिथे त्याला दिलेले अवॉर्ड काढून घेतले होते आणि तीन वर्षांसाठी मोरे अँड सन्सला बायकॉट केले होते. तसेच बिझनेस वर्डमध्ये आज त्यांची बदनामी झाली होती ती वेगळीच. त्यामुळे त्याचे काका त्याच्यावर चांगलेच चिडले होते. अवॉर्ड द्यायचे संपले आणि आता जेवण खाणे तिथे सुरू झाले होते. सुशांत मात्र आज खूपच खुश होता.जसे काही त्यालाच खुप मोठे काही मिळाले आहे असा त्याचा आनंद गगणात मावत नव्हता कारण गार्गीने संग्रामवर तिचे प्रेम आहे हे आज जग जाहीर केले होते आणि तिने जो संग्रामसाठी राजवीरला धडा शिकवला होता ती देखील सामान्य गोष्ट नव्हती. पण दुर्दैवाने हे सगळं पाहायला ऐकायला संग्राम मात्र तिथे नव्हता. त्याने आनंदातच संजयरावांना फोन लावला.

सुशांत,“ काका आज मी लय म्हंजी लय खुश आहे बघा!” तो खुश होऊन म्हणाला.

संजयराव,“ आपल्या कंपनीला जास्त अवॉर्ड मिळालेले दिसतात!” ते हसून म्हणाले.

सुशांत,“ ते तर आहेच पण आपल्या झाशीच्या राणीने काय केलंय तुम्हाला कळलं ना तर तुम्ही पण खुश व्हाल!” तो म्हणाला आणि संजयरावांनी फोन स्पीकरवर टाकला मनीषाताईंना ही ऐकण्यासाठी!

संजयराव,“ कोण गार्गीने का? काय केलं असं?” त्यांनी उत्सुकतेने विचारले.

सुशांत,“ ऐकण्यात नाही पाहण्यात मजा आहे काका मी तुम्हाला व्हिडीओ पाठवतो आणि तुमची संग्रामसाठी गार्गीची निवड अगदी योग्य होती हे आज सिद्ध झाले! तिच्या इतकं प्रेम कोणी करू नाही शकणार आपल्या संग्र्यावर!” तो म्हणाला.

संजयराव,“ अच्छा असं काय केलं बरं माझ्या सुनेने पाहतो मी आणि मनीषा!” ते कौतुकाने म्हणाले.

त्यांनी व्हिडीओ पाहिला दोघे ही व्हिडीओ पाहून चकित झाले. गार्गी संग्रामसाठी योग्य निवड आहे हे अजून एकदा अधोरेखित झाले होते.

संजयराव,“ काय म्हणावं या पोरीला ही आपल्या चिनुसाठी काही ही करू शकते ग मनीषा! इतकं प्रेम करते ही आपल्या लेकावर!” ते म्हणाले.

मनीषाताई,“ तुम्हाला अशीच खमकी सून हवी होती ना! त्या राजवीरची चांगलीच लायकी काढली पोरीने! माझी तर चिनू बद्दलची सगळी काळजीच मिटली!” त्या आनंदाने म्हणाल्या.
★★★

इकडे गार्गी हॉल मधून धावतच पायऱ्या उतरत होती आणि संग्रामला फोन करत होती पण संग्रामचा फोनच लागत नव्हता. ती चार पायऱ्या उतरून रिसॉर्टच्या गेटकडे जाणार तर समोरून ब्लॅंकेट पांघरूण येणाऱ्या पन्नास साठ माणसाच्या विचित्र घोळक्यातल्या एकाने तिचा हात धरला. ती चांगलीच चिडली आणि ती त्या माणसाला कानाखाली लावणार तर त्या माणसाने तिच्या हातातून फोन घेऊन फोडला आणि दुसऱ्याने तिच्या पोटाला बंदूक लावली आणि तिला आत चल म्हणून इशारा केला. गार्गी घाबरून ना इलाजाने त्यांच्या बरोबर हॉलमध्ये गेली. त्यातील त्याच्या म्होरक्याने हवेत गोळीबार केला आणि त्या आवाजाने एकच गलका उडाला. त्या घोळक्यातली सगळी माणसे हॉलमध्ये A K 407 घेऊन पसरली आणि एकाने हॉलचे मेन दार लावून घेतले.

सगळे रिसॉर्ट असोसिएशनने बुक केल्यामुळे तिथे जास्तीत जास्त सॉफ्टवेअर क्षेत्रातील बिझनेसमन होते. सगळे मिळून 2500 लोक आणि हॉटेलचा सगळा स्टाफ मिळून 3000ते 3500 लोक रिसॉर्टमध्ये होते.एका आतंकवादी संघटनेतील ते लोक होते आणि त्यांच्या एका म्होरक्याला जेल मधून सोडवण्यासाठी ते अशाच एका फंक्शनची वाट पाहत होते. जे शहरापासून दूर असेल आणि जिथे समाजातील आणि बिझनेस क्षेत्रातील मान्यवर लोक उपस्थित असतील म्हणून त्यांनी या सॉफ्टवेअर असोसिएशनच्या फंक्शनला टार्गेट केले होते. त्यांना माहीत होतं सगळ्या लोकांकडे मोबाईल आणि टॅब वगैरे असणार आणि हे लोक टेक्निकली खूप पुढारलेले असणार त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदतीसाठी तिथली माहिती पाठवू शकतात म्हणूनच त्यांनी इंटरनेट आणि कॉलिंग जामर तिथे काही वेळ आधीच बसवले होते.त्यातल्या त्या 100-120 लोकांनी तिथल्या सगळ्या लोकांचे 100-150 लोक असे गृप बनवले आणि प्रत्येक ग्रुपला हत्यार धारी एक एक आतंकवादी कमांड करत होता. गार्गीला मात्र त्याच्या म्होरक्याने त्याच्या बरोबर स्टेजवर एका खुर्ची बसवले त्या स्टेजवर देखील दहा बारा हत्यार धारी आतंकवादी होते.सुशांत नेमका त्यावेळी वॉशरूमला गेला होता आणि त्याला तिथल्याच एका ग्रुप बरोबर ठेवण्यात आले होते. त्या म्होरक्याने हातात माईक घेतला आणि तो बोलू

“ मेरी आप लोगों से कोई दुश्मनी नही हैं! मैं बस आपकी सरकारसे हमारे सिपेसालर जनाब को छुड़वाना चाहता हूँ!”तो म्हणाला


त्याला रिसेप्शन जवळचा लँड लाईन फोन त्याच्या एका माणसाने ओढून आणून दिला. त्याने मुंबईमध्ये कमिशनरला फोन लावून आम्ही रिसॉर्टला ताब्यात घेतले असून इथे जवळ जवळ 3500लोक आणि त्यातले बरेच लोक सॉफ्टवेअर क्षेत्रातील मोठे प्रतिष्ठित व्यापारी आहेत आणि ते सगळे सुखरूप परत हवे असतील तर आमच्या माणसाला सोडा आणि एक विमान तसेच 100कोटींची व्यवस्था करा असे सांगितले.

कमिशनरने फोनची शहानिशा केली आणि खरंच माथेरान येथील रिसॉर्ट जिथे सॉफ्टवेअर क्षेत्रातील अवॉर्ड फंक्शन चालू होता. ते रिसॉर्ट आतंकवाद्यानी ताब्यात घेऊन लोकांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आणि यंत्रणेची चक्रे फिरू लागली. पोलिसांचे ताफे तसेच C. R. P. F. च्या जवानांचे ताफे माथेरानच्या त्या रिसॉर्टच्या बाहेर जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला.

तिकडे रिसॉर्ट पासून काही अंतरावर दरीला लागून असलेल्या बागेत संग्राम विमस्क अवस्थेत बसला होता.पण या सगळ्या गोंधळामुळे तो भानावर आला आणि रिसॉर्ट जवळ पोहोचला तर त्याला तिथून काही फूट अंतरावरच पोलिसांनी अडवले. आता पर्यंत ही बातमी वाऱ्या सारखी पसरली आणि मीडिया देखील तिथे जमा झाली. टिव्हीच्या माध्यमातून ही बातमी संग्राम, गार्गी आणि सुशांतच्या घरी देखील पोहोचली पण कोणीच काहीच करू शकत नव्हते. मनीषाताई आणि संजयराव मात्र गार्गीच्या घरी पोहोचले होते. सगळ्यांनाच चिंतेने ग्रासले होते.

संग्राम पहिल्यांदा जरा या सगळ्यामुळे बावरला त्याला गार्गी आणि सुशांतची काळजी सतावू लागली पण अचानक त्याला दुपारी पाहिलेल्या खिडकीची आठवण आली ती खिडकी सहजा सहजी त्या अतिरेक्यांच्या देखील नजरेस पडणार नाही हे त्याला माहित होतं आणि त्या खिडकीतून आत शिरकाव करून ओलीस असलेल्या सगळ्या लोकांचे जीव वाचवता येऊ शकतात हे ही त्याला माहित होतं. म्हणून तो तिथल्या पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला मीडियाचा एखादा रिपोर्टर समजून पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. एक एक मिनिट महत्वाचा होता आणि संग्रामला आता असे हातावर हात धरून बसने शक्य नव्हते म्हणून मग त्याने एक धाडसी निर्णय घेतला.

तो सगळ्यांची नजर चुकवून रिसॉर्टच्या बाहेरील बाजूने मागच्या बाजूस पोहोचला जिथे ती मोकळी खिडकी होती त्या ठिकाणी तो पोहोचला. सुदैवाने रिसॉर्टच्याकडेने असलेले वॉल कंपाऊंडच्या भिंती खूप उंच नव्हत्या! तो भिंतीवरून उडी मारून रिसॉर्टच्या त्या खडकी पर्यंत लपत छपत पोहोचला पण त्याला त्या मोकळ्या खिडकी जवळ हत्यारधारी एक आतंकवादी पहारा देत असलेला दिसला. त्याने मुद्दामहुन जवळच असलेल्या दुसऱ्या बंद खिडकीवर एक दगड मारला आणि तो आतंकवादी आवाज ऐकून त्या बंद खिडकी जवळ गेला आणि तो पर्यंत संग्राम त्या मोकळ्या खिडकीतुन उडी मारून रिसॉर्टमध्ये घुसला! तो आतंकवादी येऊ पर्यंत दबा धरला आणि त्या आतंकवाद्याचे मागून तोंड दाबून त्याची मान त्याने त्याला माहित असलेली ज्यूडो कराटेची टेक्निक वापरून विशिष्ट प्रकारे फिरवली त्यामुळे कसला ही आवाज न करता तो आतंकवादी जागीच गत प्राण झाला. त्याने त्या आतंकवाद्याची बंदूक स्वतः जवळ ठेवून घेतली आणि हळूच त्या अतंकवाद्याची बॉडी तिथून जवळच असलेल्या मागच्या जिन्याखाली लपवली जेणे करून कोणाला काही कळणार नाही.

तो तिथून सावध आणि हळूहळू पावले टाकत पिलर्सच्या आडोशाने पुढे गेला तर तिथे 100ते 150 लोकांच्या मॉबला मागच्याबाजूने डोक्यावर हात ठेवून गुडघ्यांवर बसवण्यात आले होते आणि तिथे एक बंदूकधारी आतंकवादी त्यांच्यावर पहारा देत होता. तो मागच्या बाजूने हळूच त्या आतंकवाद्याच्या मागे पोहोचला सगळे लोक त्याला पाहत होते पण त्याने तोंडावर बोट ठेवून गप्प राहा असे त्यांना सांगितले आणि त्या ही आतंकवाद्याचे तोंड दाबून कसला ही आवाज न होऊ देता त्याला यमसदनी पाठवले. लोकांना इशाऱ्याने त्याच्या मागे यायला सांगितले आणि त्या मोकळ्या खिडकी पाशी नेऊन एका-एकाला हात धरून खिडकीतून
बाहेर सोडतच सांगितले.

संग्राम,“ इथून भिंतीवरून उडी मारली की तुम्ही बाहेर पोहोचाल पण सगळे एकदम पुढे जाऊ नका त्यामुळे तुम्ही मीडियाच्या नजरेत याल आणि आत असलेल्या आतंकवाद्यांना समजेल की तुमची सुटका झाली आणि ते सावध होतील तुमच्या पैकी एक जण पुढे जा आणि बाकी तिथेच थांबा आणि पोलिसांना किंवा C. R. P. F. च्या जवानांना ही खिडकी दाखवून सिव्हिल ड्रेसमध्ये यायला सांगा मी इथेच आहे त्यांना मदत करेन!” तो हळूहळू सांगत एक एक करून सगळ्यांना बाहेर सोडत होता आणि त्या मॉब मधील राजवीर त्याच्या समोर आला. राजवीरची मान शरमेने झुकली होती आणि संग्राम त्याला सोडेल का इथून ही शंका त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती. संग्रामने त्याला पाहिले आणि काहीच न बोलता त्याला ही हात देऊन खिडकी बाहेर सोडले.

लोक हळूहळू भिंतीवरून उड्या मारून रिसॉर्टच्या बाहेर मागच्या बाजूस पोहोचले त्यातील एका वयस्क भुंकर साहेबांनी (जे सॉफ्टवेअर क्षेत्रातील नावाजलेले बिझनेसमन होते) सगळ्यांना तिथेच थांबवले आणि ते पुढे गेले त्यांना बरेच पोलीस ओळखत होते आणि त्यांना माहीत होतं की भुंकर साहेब आत अडकले आहेत. त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला बाजूला घेऊन ती खिडकी दाखवली . तिथून बाहेर पडलेले लोक आणि संग्राम बद्दल सांगितले. त्या पोलीस अधिकाऱ्याने कमिशनरच्या कानात जाऊन काही तरी सांगितले आणि मागच्या बाजूच्या लोकांना तिकडूनच गाड्या पाठवून कोणाच्या ही नजरेस न पडू देता सुरक्षित स्थळी हलवले आणि C.R.P.F. आणि पोलिसांची 150 लोकांची हत्यारधारी सिव्हल ड्रेस मधील एक तुकडी तयार करून त्या खिडकीच्या दिशेने पाठवण्यात आली.

तो पर्यंत आत संग्राम दुसऱ्या लोकांच्या मॉब जवळ पोहोचला होता त्याने तिथल्या आतंकवाद्याला ही त्याच टेक्निकने मारण्याचा प्रयत्न केला पण तो आतंकवादी सावध होता त्याच्यात आणि संग्राममध्ये झटपट झाली पण तो सावध होण्याआधीच संग्रामने त्याच्या हातातील बंदूक हिसकावली होती आणि झटापटीत त्या आतंकवाद्याच्या मानेवर हाताने वार करून त्याला बेशुद्ध केले. तिथल्या लोकांच्या मदतीने त्या जिन्याखाली त्याला ही नेऊन टाकले तिथल्या त्या मॉब मधील 150 लोकांना त्याने खिडकीतून बाहेर सोडले आणि पोलीस आणि C. R. P. F. च्या जवानांना आत घेतले. हळूहळू ते 150 जवान हॉल भर पसरले तो पर्यंत आतंकवाद्यांच्या म्होरक्याला कमिशनरने फोनवर बोलण्यात गुंतवले आणि सगळे जवान योग्य ठिकाणी पोहचले आणि त्यांनी एकदमच सगळ्या आतंकवाद्यांच्या मुसक्या बांधल्या. तो पर्यंत संग्रामने हॉलचे दार उघडले आणि बाकी फैजफाटा हॉलमध्ये घुसला. लोक बाहेर पडत होते.संग्राम गार्गी आणि सुशांतला शोधत होता तर गार्गी त्याला स्टेजवर दिसली. तो धावत तिच्या जवळ गेला तर गार्गी घाबरून त्याला बिलगली! तिला तो शांत करत होता आणि कमिशनर आणि बाकी पोलीस त्या आतंकवाद्यांचा मोरक्या आणि बाकी आतंकवाद्यांना घेऊन जात होते. पोलिसांनी त्या जिन्या खालून दोन बॉड्या आणि आता शुद्धीवर आलेला एक आतंकवादी त्याला ही हस्तगत केले होते. पोलीस त्या आतंकवाद्याच्या म्होरक्याला बेड्या घालून स्टेजवरून उतरवत होते तर संग्रामने बेशुद्ध केलेला तो आतंकवादी त्यांच्या म्होरक्याला पाहून संग्रामकडे बोट दाखवून ओरडला.

“ जनाब यही है ओ लड़का जिसकी वजह से हमारा मिशन आज फेल हो गया हैं!”

त्या म्होरक्याने संग्रामवर एक जळजळीत कटाक्ष टाकला.कोणाला ही काही कळायच्या आत त्या म्होरक्याने एका इन्सपेक्टरच्या कमरेची बंदूक घेतली आणि निशाणा मात्र संग्रामवर न लावता गार्गीवर लावला तेवढ्यात C R P F च्या एका जवानाने समोरून त्याच्या पायावर आणि त्याने गार्गीवर गोळी झाडली दोन गोळ्या झाडल्याचा आवाज एकदमच हॉलमध्ये घुमला पण कोणाला काही कळायच्या आतच डोळ्यांची पाते लवते ना लवते तोच संग्राम गार्गीच्या समोर येऊन उभा राहिला होता आणि गोळी गार्गीला न लागता संग्रामाच्या छातीच्या डाव्या बाजूला घुसली होती. गरम रक्ताची एक चिळकांडी गार्गीच्या तोंडावर उडाली आणि गार्गी संग्राम म्हणून मोठ्याने ओरडली. तो पर्यंत वॉशरूममध्ये अडकलेला सुशांत त्या दोघांना शोधत स्टेज समोर येऊन उभा होता. समोरचे दृश्य पाहून तो एक क्षण जागीच थिजला आणि दुसऱ्या क्षाणाला संग्रामकडे धाव घेतली. संग्राम मागे कोसळणार तर गार्गीने त्याला दोन्ही हाताने तोलून धरले आणि ती त्याला तसाच मांडीवर घेऊन खाली बसली.

पायाला गोळी लागल्याने तो म्होरक्या खाली पडला आणि पोलिसांनी त्या सगळ्यांना फरपडत नेले.

संग्रामला गोळी लागली होती! तो या जीवघेण्या संकटातून वाचू शकेल का?
©स्वामिनी चौगुले




🎭 Series Post

View all