माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग७१

This Is A Love Story


आज दिवस भर ती अपसेट होती.ती घरी आली मनीषाताईंनी तीचा पडलेला चेहरा पाहून संग्राम असा अचानक गेला म्हणून ती अपसेट आहे हे हेरले होते म्हणून त्यांनी तीच मन वळवण्यासाठी तिला किचनमध्ये बोलावून घेतले.जेवणं झाली आणि गार्गी रूममध्ये गेली आणि तिने संग्रामला फोन लावला.ती त्याच्यावर खूप चिडली होती पण त्या पेक्षा जास्त तिला त्याची काळजी वाटत होती.

इकडे संग्राम बेंगलोरमध्ये पोहोचला.हॉटेलमध्ये चेक इन करून समान ठेवून तो मिटींगला गेला होता.त्याची मिटींग संपायला सात वाजले.त्या आधीच मनीषाताईंच्या फोन येऊन गेला होता.त्याची विचारपूस संजयराव आणि मनीषाताईंनी केली होती. सुशांतने ही whs up करून त्याची चौकशी केली होती संग्रामला ही माहीत होत की सुशांत त्याच्यावर फुगला आहे तो स्वतः फोन नाही करणार तरी तो मेसेज करून त्याची विचारपूस करणार हे त्याला अपेक्षित होते आणि सुशांत तसाच वागला देखील होता. तो मनापासून वाट पाहत होता ती गार्गीच्या फोनची! आता नऊ वाजून गेले तरी तिचा फोन आला नाही म्हणून तो थोडा निराश होता.तरी त्याने स्वतःला समजावले जी व्यक्ती आपली नाही त्या व्यक्ती कडून कोणती ही अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे.तो जेवण करून नुकताच बेडवर उद्याच्या कामाची आखणी करत होता.तर त्याचा फोन वाजला.स्क्रीनवर गार्गीचे नाव फ्लॅश होत होते.त्याने फोन उचलला.

गार्गी,“ जेवलास का?” तिच्या आवाजात नाराजी आणि राग स्पष्ट जाणवत होता.

संग्राम,“ हो जेवलो आणि तू?” त्याने विचारले.

गार्गी,“ तुला काय रे मी जेवले काय किंवा नाही काय?असं ही मी कोणीच नाही तुझी मला न सांगता न कळवता निघून गेलास तिकडे! इथे काळजीने जीव जातोय माझा!कालच गुरुजींनी ते सांगितले आणि आज तू बेंगलोरला निघून गेलास?का वागतोस संग्राम अस?” ती रागाने विचारत होती.

संग्राम,“ काळजी! काळजी! काळजी! काल पासून हा शब्द मी ऐकून वैतागलो आहे गार्गी!तुला माझी काळजी करायची काहीच गरज नाही.माझा मी समर्थ आहे ती घ्यायला!आणि काल गुरुजींनी भविष्यवाणी केली की मी आज लगेच मरणार नाही आणि माझ्या नशिबात मरायचं असेल तर ते तुझ्या काळजी करण्याने टळणार नाही!” तो चिडून बोलत होता.तिकडून त्याला फक्त अस्पष्ट हुंदका ऐकू आला आणि फोन कट झाला.
संग्राम ही राजवीरचे बोलणे आणि प्रूफ दाखवणे या मुळे पुरता वैतागला होता.त्यात गार्गीच असं या सगळ्या विरुद्ध वागणे त्यामुळे तो विचार करून करून भंडावून गेला होता.त्या सगळ्या गोष्टींचा राग आज गार्गीवर निघाला होता.संग्राम बेडवर पालथा पडला आणि त्याने उशीवर तोंड ठेवून त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.खरं तर संग्राम असा खचणाऱ्यातला नव्हता पण या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर ताण आला होता.त्याचा कोंडमारा होत होता आणि राजवीरचे त्याला सतत मानसिक टॉर्चर करणे त्याला तो कसा प्रेमात पराभूत झाला आहे सांगणे आणि दाखवणे या मुळे तो मानसिक दृष्टीने खचत चालला होता.त्यात गार्गी त्याच्याशी का असे दुट्टपी वागते असा त्याला प्रश्न पडला होता.

त्याने थोड्या वेळाने स्वतःला सावरले आणि आपण उगीच गार्गीला बोललो असे त्याला वाटले म्हणून त्याने तिला पुन्हा फोन केला.गार्गी ही तिकडे संग्रामच्या अशा बोलण्याने दुखावली होती.ती बराच वेळ रडत होती.तिने संग्रामचे नाव पाहून फोन उचलला.

संग्राम,“ sorry गार्गी मी उगीच तुझ्यावर रागावलो!” हे बोलताना त्याचा ही आवाज कातर झाला होता हे गार्गीला जाणवले.पण ती काहीच बोलत नव्हती फक्त तिचे हुंदके संग्रामला ऐकू येत होते.म्हणून तोच पुन्हा बोलू लागला.

“ प्लिज गार्गी रडणं थांबव तुझं!आणि sorry म्हणत आहे ना प्लिज समजून घे जरा!अग त्या योगेशच्या बायकोला त्याची गरज होती म्हणून आलो मी! तुला फोन करायला मला वेळच नाही मिळाला!” तो तिला समजावत होता पण त्याचे ही डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते आवाज कातर होत होता.

गार्गी,“हो ना सगळ्या जागाचा मक्ता तर तूच घेतला आहेस ना?त्याच्या बायकोला गरज होती त्याची आणि मला तुझी गरज नाही का?का वागतोस संग्राम तू असा?मी तुला किती दिवस झाले काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण तुला माझी काहीच पडलेली नाही!गेलास ना बेंगलोरला बरं झालं आता मी तुला फोन करून नाही देणार त्रास आणि तुझी काळजी वाटते असे ही म्हणणार नाही!तुला काय करायचे! कसे वागायचं तसं तू वागू शकतोस!” ती रडतच बोलत होती आणि संग्राम तीच बोलणं ऐकून घेत होता.

संग्राम,“तू रडू नकोस बरं!sorry मी तुला न सांगता न विचारता असा निघून आलो!आता मी काम अर्धवट सोडून येऊ शकत नाही ना! मी येईन पाच दिवसांनी तेंव्हा नक्की बोलू आपण तुला काय सांगायचे ते सांग मला!” तो तिला समजावत होता.

गार्गी,“ हुंम!sorry म्हणून काही नाही होणार समजलं तुला शिक्षा मिळणार अशा वागण्याची!झोप आता आणि जास्त दगदग करू नकोस तुला नाही सहन होत आणि जेवण ऑर्डर करताना मशरूमची ऍलर्जी आहे म्हणून सांगत जा कळलं का तुला?” ती त्याला इन्स्ट्रक्शन देत होती.हे सगळं ऐकून संग्रामचे ओठ आपसूकच रुंदावले आणि तो म्हणाला.

संग्राम,“ हो माते तुमच्या सगळ्या अज्ञांचे पालन केले जाईल!आणि शिक्षा तर मला मिळणारच आहे(पुढचे वाक्य तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला)”

गार्गी,“ काय पुटपुटला तू पुन्हा बोल? आणि माते काय माते?” ती हसून म्हणाली.

संग्राम,“ That\"s like a good girl! आणि काही पुटपुटलो नाही मी झोप आता good night!” तो म्हणाला.

गार्गी,“ good night आणि सकाळी फोन करेन मी!”

संग्राम,“ आत्ता तर म्हणालीस फोन करणार नाही म्हणून?” तो नाटकीपणे म्हणाला.

गार्गी,“ अरे वा असा कसा सोडीन तुला मोकळा!तुला पिडनं माझा हक्क आहे!आणि ते मी रागाने म्हणाले होते तू जास्त मनावर नको घेऊन!झोप आता!” ती हसून म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

गार्गीने फोन ठेवला आणि ती टेबलवर असलेला संग्रामचा फोटो हातात घेऊन बोलू लागली.
“ gd आई म्हणाल्या तसं तू आता माझ्या डोक्यावर बसला आहेस!तुला ना आता ताळ्यावर आणायला पाहिजे!तू येच मग तुला मी सांगते.तू ना खूप मनमानी करायला लागला आहेस!but I love you! तू आला की मी तुला कुठेच जाऊ देणार नाही!”ती लटक्या रागाने बोलत त्याचा फोटो घेऊन झोपी गेली.

संग्राम मात्र विचार करत होता.
“तू पण ना संग्राम उगीच चिडलास तिच्यावर! त्या राजवीरचा राग तिच्यावर काढायची काय गरज होती.ती पुढचे काहीच दिवस तर तुझ्या बरोबर आहे.नंतर ती निघून जाईल तिच्या प्रेमा बरोबर कायमची!पण ती मला का नाही सांगत की ती राजवीर बरोबर जाणार आहे? का तिने मला अंधारात ठेवलं आहे?कदाचित तिला हेच बोलायचं असेल!पण तिला माझी इतकी काळजी का वाटत असावी? काल ही तिने रडून घर डोक्यावर घेतले!तिच्या मनात माझ्यासाठी कुठे तरी इतक्या दिवसात सॉफ्ट कॉर्नर तयार झाला असेल!तिला आमचे हे नाते पुढे न्यायचे होते.त्यासाठी तिने काही दिवस मागितले होते पण त्या आधीच राजवीर तिच्या समोर आला आणि राजवीर तिचे पहिले प्रेम आहे आता त्याला पाहून तिला त्याच्याकडे जावेसे वाटत असेल तर त्यात तिची काय चूक?मी देखील तिला दहा वर्षात कुठे विसरू शकलो कारण ती माझं पहिलं प्रेम आहे मग ती वागते त्याच्यात चुकीचं काय?मी फक्त तिच्यासाठी पर्याय होतो एक स्टेपनी जी कधीच मूळ चाकाची जागा घेऊ शकत नाही.वाईट एकाच गोष्टीचे वाटतं की तिने मला अंधारात ठेवले.मला चोरून ती राजवीरशी भेटते!बोलते!असो तिच्याकडून कोणतीच अपेक्षा न केलेली बरी!” याच विचारात त्याला रात्री कधी तरी झोप लागली.
★★★★

दुसऱ्या दिवशी गार्गी,संजयराव आणि मनीषाताई नाष्टा करत होते. संजयराव गार्गीला पाहून बोलू लागले.

संजयराव,“गार्गी बेटा संग्रामने असे अचानक तुला काहीच न सांगता बेंगलोरला जाणे मला आणि मनीषाला देखील आवडले नाही. तो आल्यावर त्याची चांगलीच कान उघाडणी करणार आहे मी!” ते थोड्याशा रागात म्हणाले.

गार्गी,“ बाबा तो बेंगलोरला गेलाय आपल्याला पूर्व सूचना न देता पण त्याच्या मागे कारण ही तसेच आहे! त्याच्या टीम मधील योगेशची बायको तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि तिला खूप त्रास होतोय तिची तब्बेत ठीक नाही म्हणून संग्राम गेलाय त्याच्या ऐवजी!” ती त्याच्या बाजूने सारवासारव करत बोलली आणि संजयराव आणि मनीषाताई हसायला लागले.

मनिषाताई,“ पाहिलंत का नवरा चुकला तरी त्याची बाजू घेणं कसं सुरू आहे!गार्गी तुला मी सांगते कर्ट्याला ताब्यात ठेव नाही तर तो तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार! मग परत यायचं नाही आ आमच्याकडे रडत आणि काय ग किती ती काळजी किती ते प्रेम!” त्या नाटकीपणे तिला चिडवत बोलत होत्या गार्गीच्या मात्र गालावर लाजेने गुलाब फुलले होते.ती नजर झुकवून लाजतच म्हणाली.

गार्गी,“ काय ओ आई तुम्ही पण!” तिला असं पाहून ते दोघे पुन्हा हसले.

संजयराव,“ मनीषा आपलं कार्टच नालायक आहे बघ! इतकी चांगली बायको असताना काम काम करत बोंबलत फिरत असतंय!” ते म्हणाले.

गार्गी,“ काय बाबा तुम्ही पण तो खूप intelligent & focused आहे आणि या वयात काम नाही करणार तर कधी करणार!” तिने पुन्हा त्याची बाजू घेतली.

मनीषाताई,“ अग्गो बाई मिसेस संग्राम सरनाईकांना राग आला का? मिस्टर संग्राम विषयी असं बोलल्यावर!” त्या गालावर हात ठेवून नाटकीपणे म्हणाल्या. हे ऐकून गार्गी लाजून गोरीमोरी झाली

गार्गी,“तसं नाही आई! मी निघते!”ती असं म्हणून निघून गेली आणि ते दोघे मोठ्याने हसले.

इकडे संग्राम त्याच्या कामात व्यस्त होता.गार्गी त्याला रोज दोन तीन फोन करून त्याची चौकशी करत होती.आज संग्रामला बेंगलोरला जाऊन चौथा दिवस उजडला होता.गार्गी आता राजवीरला टाळू लागली होती कारण तीच काम आता झालं होतं ती फक्त योग्य संधीची वाट पाहत होती राजवीरचा पडदा फाश करण्यासाठी!

राजवीर मात्र तिला सतत फोन करून आणि मेसेज करून पीडत होता.आज ही त्याने लंच ब्रेकमध्ये तिला फोन केला तर गार्गीचा फोन बिझी लागत होता.ती संग्रामशी बोलत होती.तिने संग्रामशी बोलून फोन ठेवला आणि राजवीरचे मिस कॉल दिसले.तिने नाखुषीनेच त्याला फोन केला कारण त्याचे कारनामे सगळ्यां समोर ती आणत नाही तो पर्यंत त्याला गाफील ठेवणे गरजेचे होते.

गार्गी,“ बोल फोन केला होतास?”

राजवीर,“ हो पण इतका वेळ कोणाशी बोलत होती?” त्याने तिरकसपणे विचारले.

गार्गी,“ मम्माशी!” तिने उत्तर दिले खरं पण त्याच्या असं विचारण्याचा तिला राग आला.हा कोण मला हे विचारणारा ती मानत म्हणाली.

राजवीर,“ आज आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट ना!तुझी खूप आठवण येते आहे!” तो लाडिकपणे म्हणाला आणि गार्गीच्या डोक्याची आळी पुन्हा हलली!तरी तिने स्वतःच्या रागावर कंट्रोल करत त्याला उत्तर दिले.

गार्गी,“ नाही जमणार रे! तुला तर माहीतच आहे संग्राम बेंगलोरला गेला आहे!बाबांची तब्बेत ठीक नसते त्यामुळे मला घरी लवकर जावे लागते!” ती म्हणाली.

राजवीर,“ तो संग्राम आणि त्याच्या घरचे my god!कस सहन करते तू या लोकांना काय माहीत?असो अजून थोडेच दिवस मग तो संग्राम आणि त्याचे आई-बाप केले उडत!” तो कुत्सितपणे हसून म्हणाला आणि गार्गीचा राग शिगेला पोहोचला.तिने स्वतःच्या रागावर कसाबसा ताबा ठेवत फोन ठेवला.ती मनात बोलत होती.

“ नालायक माणसा मी त्यांना नाही!तुला कसं सहन करते ते माझं मला माहित आलाय मोठा!माझ्या संग्रामच्या पायाजवळ देखील उभं राहायची तुझी लायकी नाही!थोडे दिवस थांब तुला तुझी लायकी दाखवून देते!”

ती विचार करत जेवली आणि तिच्या कामात गढून गेली.

गार्गीला राजवीरची त्याची लायकी दाखवण्याची संधी कधी मिळेल?
©स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all