माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ७०

This Is A Love Story


संग्राम विचारात गढला होता आणि संजयरावांनी त्याला हाक मारली तसा तो तंद्रीतुन बाहेर आला. संजयराव त्याच्या जवळ येत त्याला बोलू लागले.

संजयराव,“ चिनू कुठे हरवलास? किती वेळ झाले मी हाक मारतोय!चल जेवायला!” ते म्हणाले.

संग्राम,“इतक्यात जेवायची वेळ झाली देखील?”त्याने आश्चर्याने विचारले.

संजयराव,“ अरे नऊ वाजले की! बरं चल सगळे थांबले आहेत तुझ्यासाठी!” ते म्हणाले आणि दोघे जेवायला आत निघून गेले.


दुपार पेक्षा आता वातावरण जरा निवळले होते.त्यामुळे सगळे गप्पा मारत जेवले आणि झोपायला निघून गेले. आज रशमी आणि रौनक गेल्यामुळे संग्राम रूममध्ये झोपायला गेला. गार्गी मनीषाताई आणि काकूं बरोबर थोडावेळ गप्पा मारायला बसली.तो पर्यंत राधाने सगळे आवरले. गार्गी रूममध्ये गेली तर संग्राम तिला काही तरी शोधत असलेला दिसला. तो शोधून शोधून वैतागला आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.ते पाहून गार्गीने विचारले.

गार्गी,“ काय शोधत आहेस तू?”

संग्राम,“ फस्ट एड बॉक्स कुठे ठेवला आहे?मला सापडत नाही!” तो वैतागून म्हणाला.

गार्गी,“ फस्ट एड कशाला हव तुला?”तिने विचारले.

संग्राम,“ माझे डोकं खूप दुखत आहे! डोकेदुखीची गोळी हवी होती!” तो डोक्याला हात लावून बोलत होता.

गार्गी,“मग त्यासाठी गोळी कशाला मी तेल लावून मालिश करून आणि डोकं चेपून देते ना! थांबेल डोकं दुखायचे आणि झोप ही छान लागेल तुला!” तिने असं म्हणून ड्रेसिंग टेबल मधून तेलाची बाटली हातात घेतली आणि ती बेडवर येऊन बसली.

संग्राम,“ त्याची काही गरज नाही! मी गोळी घेईन!” तो म्हणाला.

गार्गी,“ बसतो का आता खाली? डोकं दुखतंय ना!मग जास्त बोलू नकोस!” ती त्याला हात धरून समोर बसवत म्हणाली. संग्रामला माहीत होतं की गार्गी त्याच काहीच ऐकून घेणार नाही म्हणून तो निमूटपणे तिच्या पुढ्यात बसला.


गार्गीने त्याला मस्त चंपी करून दिली आणि डोकं देखील चेपून दिलं. त्यामुळे संग्राम थोड्याच वेळात झोपून गेला. गार्गी मात्र बेडला टेकून बसली होती. ती टेबल लँपच्या प्रकाशात झोपलेल्या संग्रामचा चेहरा निहाळत मनात बोलत होती.

कसं सांगू रे मी तुला?
तू माझ्यासाठी काय आहेस?
तू माझा श्वास आहेस
तू माझा ध्यास आहेस
माझ्या जगण्याचे कारण
आणि माझं सगळं जग आहेस!

कसं सांगू रे मी तुला?
तू माझ्यासाठी कोण आहेस?
माझ्या ओठांवरचे हसू
माझ्या डोळ्यातले आसू
माझं सर्वस्व ही तूच
आणि माझ्या जीवनाचे सार ही तूच आहेस!

का समजत नाही रे तुला?
तू माझ्यासाठी काय आहेस?
तू माझे अस्तित्व
तू माझा प्राण
तू माझे सौभाग्य
आणि तूच तर माझा मान आहेस!

तिने डोळे पुसले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले.तिचा स्पर्श होताच त्याच्या ओठावर झोपेत ही आपसूकच हसू पसरले. ते पाहून डोळ्यात अश्रू असून देखील गार्गीचे ही ओठ रुंदवले आणि ती त्याच्या कुशीत शिरली. संग्रामने ही झोपेतच तिला जवळ घेतले.
★★★★

गार्गीला रात्री लवकर झोप लागली नाही त्यामुळे तिला जरा उशिराच जाग आली. तर संग्राम ऑफिसला जायला तयार होत होता. तिने घड्याळ पाहिले तर नऊच वाजले होते. आपण इतक्या वेळ कसे झोपलो ती स्वतःलाच दोष देत उठली पण संग्राम इतक्या लवकर ऑफिसला जायला तयार का होत आहे? हा प्रश्न तिला पडला.

गार्गी,“संग्राम इतक्या लवकर तयार का होत आहेस तू?आणि मला का नाही उठवलेस?”तिने बेडवरून उठत विचारले.

संग्राम,“ काल रडून रडून थकली असशील ना म्हणून नाही उठवले तुला!” तो हसून लॅपटॉप बॅग मध्ये ठेवत म्हणाला.

गार्गी,“ तुला हसू येत आहे का? पण इतक्या लवकर कुठे निघालास तू?” तिने विचारले.

संग्राम,“ हसू नको तर काय करू? काल रडून रडून सगळं घर डोक्यावर घेतलंस तू!आणि मेहतामध्ये आज मिटिंग आहे ग आपल्या ट्रिपल एसच्या प्रोजेक्टची म्हणून जातोय मी लवकर तिथूनच ऑफिसला ही जाईन! तू कॅबने जा आज ऑफिसला प्लिज!” तो घड्याळ, व्हॉलेट, गाडीची चावी सगळं गोळा करत इकडे तिकडे फिरत तिच्याशी बोलत होता.

गार्गी,“जस्ती हसू नकोस तू!तुला नाही कळणार आणि नाष्टा करून जा! मी आलेच माझं आवरून!आणि जाईन मी कॅबने!” ती त्याला एका जागी थांबवत त्याच्या गळ्या भोवती हात गुंफून बोलत होती.

संग्राम,“ बरं मी नाष्टा करतोय तू ये!” तो स्वतःला सोडवून घेत म्हणाला.

गार्गी,“तुझं डोकं दुखायचे थांबले का?” तिने विचारले.

संग्राम,“ हो थांबले. मी आहे तू ये!” तो असं म्हणाला आणि बॅग घेऊन निघून गेला.

गार्गी त्याला जाताना पाहून स्वतःशीच मनात बडबडत होती.

“ आज तुला काय नखरे करायचे ते करून घे gd! मी संध्याकाळी तुला प्रपोज करून मिठीत घेते की नाही बघच तू माझे हात काढलेस ना! याचा चांगला बदला घेणार मी!” ती लटक्या रागाने म्हणाली आणि स्वतःशीच हसून आवरायला निघून गेली.

संग्रामचा नाष्टा झाला तो पर्यंत ती आली. तो सगळ्यांना बाय करून निघून गेला. गार्गी ही कॅब करून ऑफिसला निघून गेली. काका-काकू आज दुपारी जाणार होते.

★★★★

संग्राम डारेक्ट मेहतांच्या ऑफसला पोहोचला आणि मिटिंग झाली. तो आज एकटाच मिटिंगसाठी आला होता सुशांत काही काम आहे म्हणून नव्हता आला. मिटिंग संपली आणि संग्राम निघाला तर समोर राजवीर त्याला दिसला. त्याने पाहून न पाहिल्या सारखे केले आणि तो पार्किंगमध्ये आला तर राजवीर त्याच्या मागे तिथे पोहचला आणि बोलू लागला.

राजवीर,“ ये थांब कुठे निघाला? आणि काय रे ये तू गार्गीला त्रास देतोयस का? काल ती बरीच अपसेट होती! झालं दहा दिवस त्या नंतर ती कायमची माझी होईल असं ही ती माझीच आहे. तू मात्र या दहा दिवसांत तिला त्रास दिलास ना तर याद राख!” त्याने गार्गीवरचा सगळा राग संग्रामवर काढला. तो रागाने त्याला बोलत होता.

संग्राम,“मुळात मी तिला त्रास दिला नाही आणि मी तिच्या बरोबर काय करतो हे विचारण्याचा तुला कोणता ही अधिकार नाही. गार्गी माझी अजून ही बायको आहे दहा दिवसां नंतरच आपण नंतर पाहू!” तो ही रागात म्हणाला आणि निघून गेला.

संग्रामने राजवीरला चोख प्रतिउत्तर दिले होते. तरी राजवीरचे बोलणे त्याच्या मनाला लागले होते.गार्गीचे असे त्याला वाटणारे दुटप्पी वागणे! राजवीरचे सतत त्याला डिवचने! त्याला सतत तो प्रेमात कसा हरला आहे हे दाखवणे! या सगळ्यामुळे त्याची गेल्या दीड महिन्या पासून खूपच घुसमट होत होती. तो हे सगळं कोणाला म्हणजे अगदी सुशांतला देखील सांगू इच्छित नव्हता. तो आता मानसिक दृष्ट्या खूपच थकला होता. त्याला या सर्वा पासून कुठे तरी लांब पळून जावे वाटत होते. हे सगळं अजून दहा दिवस सहन करायचे होते पण आता त्याची तितकी सहनशीलता राहिली नव्हती.त्याला गाडी चालवता चालवता काही तरी आठवले आणि तो ऑफिसमध्ये गेल्यावर त्याच्या डेस्कवर न जाता योगेश त्याचा कलीग आणि टीम मेंबर त्याच्या जवळ गेला.

संग्राम,“ योगेश तू आज बेंगलोरला जाणार आहेस ना ऑफिसच्या कामा निमित्त?” त्याने विचारले.

योगेश,“ हो सर जायचं आहे ही काय त्याचीच तर तयारी करत आहे! खरं तर मला जायचं नव्हतं कारण स्मिताला तिसरा महिना आहे आणि तिला खूप त्रास होत आहे. पण काय करणार काम पण महत्वाचे आहे ना!” तो तोंड पाडून बोलत होता.

संग्राम,“ तू असं कर तू नको जाऊ तुझ्या जागी मी जाईन! तू स्मिता वहिनीची काळजी घे त्यांना तुझी जास्त गरज आहे!” तो त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

योगेश,“ खरंच सर तुम्ही जाल माझ्या ऐवजी?” त्याने विचारले. विचारताना त्याचा चेहरा खुलला होता.

संग्राम,“ हो! चल बॉसकडे मी बोलतो त्यांना आणि मला प्रोजेक्ट डिटेल्स दे असं ही हे प्रोजेक्ट तर तू माझ्याच अंडर तयार केले आहेस ना! त्यामुळे काही अडचण येणार नाही!” तो म्हणाला आणि दोघे बॉसच्या केबीनमध्ये गेले.


सुशांत ऑफिसमध्ये नुकताच आला होता आणि त्याने योगेश आणि संग्रामला बॉसच्या केबीन मधून बाहेर पडताना पाहिले.संग्रामने योगेशच्या डेस्क जवळ जाऊन फाईल, pd आणि बरेच काही त्याच्याकडून घेतले. योगेश त्याला सतत thanks म्हणत होता. सुशांत त्या दोघांकडे पाहत होता. संग्रामने डेस्कवर येऊन सगळं समान त्याच्या बॅगेत भरले व तो सुशांत जवळ आला.

संग्राम,“ मी पाच दिवसांसाठी बंगलोरला जात आहे! तर ट्रिपल एसच काम नीट बघ!”

सुशांत,“ योगेशच्या जागी तुला कोण जायला सांगितले रे! तू समाजसेवा कर आणि मी करतो तुझी कामे!” तो नाराजीने म्हणाला.

संग्राम,“ इथे कोणालाच माझी पडलेली नाही. मला काय वाटते काय नाही हे कोणालाच काही देणे घेणे नाही. ठीक आहे तुला नाही करायचे ना माझे काम तर मी तिथून सगळं हँडल करीन!” तो चिडचिडत म्हणाला आणि निघून ही गेला.सुशांत मात्र त्याचे बोलणे न कळल्यामुळे त्याच्याकडे पाहतच राहिला.

एवढ सगळं होई पर्यंत बारा वाजले होते. संग्राम घरी केला आणि बॅग करून मनिषाताई आणि संजयरावांना सांगून घाईतच एअर पोर्टवर पोहोचला. इकडे सुशांत गार्गीला फोन लावून दमला पण गार्गी फोन उचलत नव्हती. ती मिटिंग मध्ये असल्याने तिचा फोन सायलेंटवर होता. तिने फोन पाहिला तर सुशांतच बरेच मिस कॉल होते. तिने त्याला फोन केला.

गार्गी,“ सुशांत संग्राम ठीक आहे ना रे?” तिने काळजीने विचारले.

सुशांत,“ तेच सांगायला फोन केला आहे मी तुझा नवरा वेडा झाला आहे!” तो रागाने तणतणला.

गार्गी,“ काय झालं सुशांत? असं का बोलत आहेस?”

सुशांत,“ तो समाज सेवा करायला बेंगलोरला गेला पाच दिवसासाठी! हेच सांगायला फोन करत होतो तुला तर फोन उचलला नाहीस आता तो फ्लाईटमध्ये असेल!” तो वैतागून बोलत होता.

गार्गी,“ काय संग्राम बंगलोरला गेला? का? नीट सांग ना जरा!” ती काळजीने बोलत होती.

सुशांत,“ हो गेला तो बेंगलोरला! त्या योगेशने त्याला काय गळ घातली माहीत नाही त्याच्या ऐवजी हे साहेब गेले! मी बोललो तर मलाच काय काय म्हणून चिडून गेला!काय झालं आहे त्याला काही कळत नाही हल्ली खूप विचित्र वागतो.असंबद्ध बोलतो आणि चिडचिड करतो!” तो बोलत होता पण संग्राम बेंगलोरला गेला याच्या पुढे गार्गीला मात्र काहीच ऐकू जात नव्हते. ती खुर्चीवर बसली डोळ्यातून मात्र गंगा-जमुना वाहत होत्या.

गार्गी,“ काय करू मी या माणसाचे सुशांत? अरे एक तर काल त्या गुरुजींनी याच्यावर प्राण घातक संकट येणार आहे म्हणून भविष्यवाणी केली आहे! त्या विचाराने मी रात्र भर झोपले नाही आणि हा आज बेंगलोरला गेला! याचा इतका राग येतोय ना मला!” ती बोलत होती.

सुशांत,“ बघ आला ना तुला ही राग! आता आल्यावर त्याच्याशी चांगलं भांड मी तर भांडणारच आहे! आणि तू पण कसली भविष्यवाणी घेऊन बसलीस! काही होत नाही त्याला! असं कुठं असत का?” तो तिला समजावत म्हणाला.

गार्गी,“सुशांत अरे ते आईचे गुरुजी आहेत खूप सिध्द पुरुष आहेत ते! त्यांनी आज पर्यंत ज्या भविष्यवाण्या केल्या त्या खऱ्या ठरल्या आहेत! मला काळजी वाटते रे संग्रामची!” ती रडत बोलत होती.

सुशांत,“ बरं तू रडणं थांबावं आधी!मी त्याच्या मागे गेलो असतो पण आता तो नाही म्हणल्यावर ट्रिपल एसचे सगळं मलाच पाहावं लागेल आणि तू ही नाही जाऊ शकणार कारण काका आणि काकुला तू एकटं सोडू शकत नाहीस आणि त्यांना बरोबर घेऊन ही जाऊ शकत नाहीस कारण काकांना प्रवास करू नका म्हणून डॉक्टरांनी सांगितले आहे. तू काळजी नको करून काही होत नाही त्याला पाच दिवसांनी येईल तो! तो पर्यंत त्याला फोन करून पिडू आपण!” तो गार्गीला हसवण्यासाठी म्हणाला.

गार्गी,“ हुंम! तो येऊच दे त्याला दाखवते मी! खूप मनमानी करायला लागला आहे आजकाल!”ती चिडून म्हणाली.

सुशांत,“ आता कसं good girl!बरं ठेवतो मी!” तो म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.
तिने फोन ठेवला आणि ती डेस्कवर डोकं ठेवून रडायला लागली श्रध्दा तिला पाहत होती.

श्रद्धा,“ अग काय झालंय गार्गी इतकं रडायला कोणाचा फोन होता?सगळं ठीक आहे ना?” तिने काळजीने विचारले.

गार्गी,“सुशांतचा फोन होता.संग्राम बंगलोरला गेला अचानक कोणाच्या तरी ऐवजी आता पाच दिवस येणार नाही! मी किती दिवस झाले ताई त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.पण सतत अडचणी येतात.कालच तर तुला सांगितलेच की सगळा दिवस असाच गेला.रात्री डोकं दुखत होत त्याच! काल गुरुजींनी ते सांगतल्या पासून मला त्याची काळजी वाटते आहे आणि हा गेला तोंड वर करून मला न सांगता बेंगलोरला! आज मी त्याला सांगणार होते की माझं प्रेम आहे त्याच्यावर तो बाहेर हॉटेलमध्ये आला तर ठीक नाही तर घरीच त्याला प्रपोज करायचे होते.माझं खूप प्रेम आहे ग त्याच्यावर!पण त्याला का समजत नाही हे!” ती रडत बोलत होती.

श्रध्दा,“ तू शांत हो आधी!हे पाणी घे!अग होईल सगळं नीट आणि तो काय कायमचा नाही गेला तिकडे पाच दिवसांनी येणार आहे तेंव्हा सांग की!” ती तिची समजूत काढत होती.

गार्गी तिच्या समजवण्याने शांत झाली खरी पण तिला संग्रामचा खूप राग आला होता.

गार्गीला राजवीर संग्रामला तिचे नाव घेऊन तिचे त्याचे बोलणे, भेटीचे फोटो पाठवून मानसिक त्रास देतोय हे केंव्हा कळेल? गार्गी संग्राम समोर तिचे प्रेम कधी व्यक्त करू शकेल?

©स्वामिनी चौगुले






🎭 Series Post

View all