माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग६५

This Is A Love Story


संजयरावांची सर्जरी झाली आणि ती सक्सेसफुल झाल्यामुळे त्यांची बायपास सर्जरी करावी लागणार नाही हे डॉक्टरांनी सांगितले आणि संग्राम सहित सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. पण संजयरावांची काळजी आणि त्यांच्या बऱ्याच पथ्य पाण्याची काळजी घायला डॉक्टरांनी सांगितले आठ दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागले आणि नंतर डिस्चार्ज मिळाला. संग्रामचे काकू-काका आणि रौशन-रशमी संजयरावांना पाहायला आले आणि पाच-सहा दिवस राहून निघून गेले. संग्रामने मात्र पंधरा दिवसाची आणि गार्गीने देखील तितकीच रजा ऑफिसमधून काढली. हे सगळं घडल्यामुळे संग्रामाच्या बॉसने ही सुशांत करवी कामाचे सगळे रिपोर्ट संग्रामकडून मागवून घेतले. पण या सगळ्या धावपळीत संग्राम आणि गार्गीमध्ये म्हणावे तसे बोलने झाले नाही. आज आठ दिवसांनी संजयरावांना डिस्चार्ज मिळाला त्यामुळे सगळेच थोडे रिलॅक्स होते. संग्राम ही आता बराच निर्धास्त झाला होता. मनिषाताईनी संग्रामला त्या रात्री सगळी परिस्थिती गार्गीने किती चांगल्या प्रकारे हँडल केली हे सांगितले होते पण या सगळ्या रागाड्यात संग्रामला तिचे आभार मानायला देखील वेळ मिळाला नव्हता. आज घरी आल्या नंतर दिवस भर संजयरावांना कोणी ना कोणी भेटायला येतच होते.त्यामुळे संग्रामचा आणि गार्गीचा देखील सगळा वेळ त्यातच गेला होता.

आता संध्याकाळ झाली होती मनिषाताई आणि गार्गीने स्वयंपाक केला. मनिषाताई आधी संजयरावांना जेवायला घातले आणि मग ते तिघे जेवले. संग्राम संजयरावां जवळ थोडावेळ बसून रूममध्ये गेला.गार्गी मागची आवरा आवर करून रूममध्ये गेली तर संग्राम तिचीच वाट पाहत होता. त्याला पाहून गार्गी म्हणाली.

गार्गी,“ अजून झोपला नाहीस? दहा वाजून गेले की!”

संग्राम,“नाही! तुझीच वाट पाहत होतो मी! मला तुझ्याशी बोलायचे होते थोडे आणि तू मला महत्वाचं काय सांगणार होतीस?” त्याने विचारले.

गार्गी,“ तू सांग काय बोलायचे होते!” ती बेडवर बसत म्हणाली आणि संग्राम तिच्या मांडीवर झोपला आणि बोलू लागला.

संग्राम,“ गार्गी थँक्स! आईने मला सांगितले की त्या दिवशी सगळं कसं हँडल केलंस! खरंच तू जर वेळेवर बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली नसतीस तर हा विचार करूनच मला भीती वाटते. खरंच तुझे आभार मानावेत तेव्हढे कमी आहेत!” तो बोलत होता.

गार्गी,“ हो का? आता तू माझे आभार मानणार मला थँक्स म्हणणार का?मी कोणी परकी आहे का?” ती लटक्या रागाने म्हणाली.

संग्राम,“ तसं नाही पण खरंच मला तुला थँक्स म्हणावेसे वाटले.” तो म्हणाला.

गार्गी,“नको म्हणुस आणि नागपूरची ट्रिप कशी होती रे?आज निवांत वेळ मिळाला आपल्याला बोलायला!” ती म्हणाली.

संग्राम,“काही नाही नॉर्मलच होती. एक प्रोजेक्ट होते त्याचे डिटेलिंग करायचे होते...आणि” बोलता बोलता तो शांत झाला म्हणून गार्गीने त्याला पाहिले तर तो झोपला होता.गार्गी गालातल्या गालात हसली. त्याच्या केसातून हात फिरवला आणि त्याला व्यवस्थित झोपवले.स्वतःशी त्याला पाहत बोलू लागली.

“ तुझं हे कायमचंच आहे संग्राम स्वतः बोलून मोकळा होतोस पण दुसऱ्याचे बोलणे ऐकत नाहीस तू! जाऊदे आठ दिवस झाले नीट झोपला नाही. आज चांगली झोप लागली आहे याला!”ती विचार करत झोपून गेली.
★★★★

दुसऱ्या दिवशी गार्गीला जरा उशिराच जाग आली तर तिने डोळे उघडून पाहिले. आठ वाजून गेले होते आणि संग्राम फॉर्मल कपड्यामध्ये आरशा समोर उभा राहून केस विंचरताना तिला दिसला.ती उठली आणि त्याच्या जवळ जाऊन बोलू लागली.

गार्गी,“ कुठे निघालास तू?”

संग्राम,“ अग ऑफिसला निघालो आहे मी ते नागपूरला गेलो होतो ना त्या प्रोजेक्ट संदर्भात मिटिंग आहे आज md साहेब येणार आहेत तर त्यांना रिपोर्टिंग करायचे आहे!” तो हाताच्या भायांची बटणे लावत म्हणाला.

गार्गी,“पण तू तर रजा काढली आहेस ना मग!” त्याचा हात हातात घेऊन बटन लावायला त्याला मदत करत तिने काहीशा नाराजीनेच विचारले.

संग्राम,“हो रजाच आहे माझी पण सुशांतचा ऑफिस मधून फोन आला होता. मिटिंग आहे आज म्हणून तर जावे लागेल मला! मी लंच टाईम पर्यंत घरी येईन मग मनसोक्त गप्पा मारू आणि तुला मला काय सांगायचे होते ते देखील सांग!” तो तिला समजावत म्हणाला.

गार्गी,“ मग मला का उठवलं नाहीस तू?” ती तोंड फुगवून म्हणाली.

संग्राम,“ तुझी पण केल्या आठ दिवसांत किती धावपळ झाली गार्गी म्हणून नाही उठवलं!बरं मी निघतो आईने नाष्टा बनवला आहे खातो आणि जातो!” तो म्हणाला.

गार्गी,“जा तुझं कायमच हेच ठरलेलं असतं!मला काहीच सांगायचं नाही तुला तू कामंच करत बस आयुष्यभर!” ती चिडून म्हणाला.

संग्राम,“ इतकं चिडायला काय झालं?काय करणार गार्गी सिच्युएशन अशी क्रिएट होते की मला तुला वेळच देता येत नाही पण लवकरच होईल सगळं नीट!” तो तिला समजावत म्हणाला.

गार्गी,“बरं जाता जाता बाबांना भेटून जा आणि लवकर ये!” ती म्हणाली.

संग्राम,“ हो पण काही तरी मिसिंग आहे ग!” तो इकडे तिकडे शोधत म्हणाला.

गार्गी,“ काय हवं तुला? मी शोधून देते सांग!” ती म्हणाली.

संग्राम,“ तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल!” तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला आणि गार्गीचे ओठ तिच्या ही न कळत रुंदवले.

गार्गी,“ जा आता शब्दाचे खेळ करून दुसऱ्याला हसवण चांगलं जमत तुला!” ती म्हणाली.

आणि संग्राम हसून निघून गेला. गार्गी तयार होऊन किचनमध्ये गेली. मनिषाताई स्वयंपाक करत होत्या. तिने नाष्टा केला आणि त्यांना मदत केली. ती संग्रामची वाट आज आतुरतेने पाहत होती. तिला आज त्याला तिच्या मनातील सगळं सांगायचे होते. लंच टाईम होऊन गेला तरी तो अजून आला नव्हता. गार्गी त्याच्यासाठी जेवायची थांबली होती. मनीषाताई आणि संजयराव जेवण करून त्यांच्या रूममध्ये अराम करत होते आता दोन वाजले होते. म्हणून गार्गीने त्याला फोन केला तर संग्रामचा मेसेज आला की तो मिटिंगमध्ये आहे त्याला यायला वेळ होईल. गार्गी तो मेसेज वाचून मनातून खट्टू झाली. ती हॉलच दार लावून तिच्या रूममध्ये जाऊन लोळत पडली आणि तिला कधी तरी झोप लागली. ती मोबाईलच्या आवाजाने जागी झाली. तिला वाटले संग्रामचा फोन असेल तिने घड्याळात पाहिले तर तीन वाजून गेले होते आणि फोन राजवीरचा होता.इकडे संग्राम कोणाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून बेल न वाजवता त्याच्या जवळ असलेल्या कीने दार उघडून घरात आला. तो त्याच्या रूममध्ये जाणार तर गार्गीचा आवाज ऐकून दारातच थबकला.गार्गी फोनवर राजवीरशी बोलत होती.

गार्गी,“ हे बघ राजवीर मी तुला आता कमीत कमी दहा दिवस तरी भेटायला येऊ शकत नाही. संग्रामाच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता. म्हणून मी रजा काढली आहे आणि मला फोन पण करू नकोस संग्राम आला आहे नागपूरहून! मी त्याच्या समोर तुला बोलू शकत नाही so try to understand!मीच तुला वेळ मिळाला की फोन करत जाईल!” ती बोलत होती.


संग्रामच्या डोळ्यात मात्र हे गार्गीचे बोलणे ऐकून पाणी साचले होते. तिचा एक एक शब्द त्याच्या काळजावर घाव घालत होता.त्याची पावलं तशीच माघारी फिरली आणि तो आल्या पावली निघून गेला. त्याला आता एकांत हवा होता.म्हणून तो सरळ फ्लॅटवर गेला.त्याने फ्लॅटचे दार लावले आणि तो सोफ्यावर जाऊन बसला.तो मनाशीच बोलत होता.

“ मी राजवीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले कारण गार्गी माझा तुझ्यावर विश्वास होता. आपल्यात नवरा बायकोचे नाते अजून म्हणावे तसे निर्माण झाले नसले तरी मला वाटत होतं की आपण चांगले मित्र आहोत पण तसं नाही. कदाचित माझ्याकडूनच काही तरी कमी राहिली असेल नाते निभावण्यात म्हणून मी तुझा विश्वास जिंकू शकलो नाही.पण तुला राजवीर आणि तुझ्याबद्दल माझ्या पासून लपवण्याची काहीच गरज नव्हती ग! कारण मी तुला आधी ही बऱ्याच वेळा सांगितले आहे अगदी तू आपले नाते पुढे घेऊन जाण्यास तयार झालीस तेंव्हा देखील सांगितले होते मी तुला की जर तुला दुसरे कोणी आवडले किंवा दुसऱ्या बरोबर जावेसे वाटले तर तू सगळ्यात आधी मला सांग. मी तुला आपल्या या नात्यातून मुक्त करायला तयार आहे. पण तू माझ्या पासून हे सगळं लपवले आणि हे सगळे मला कोणाकडून कळले तर राजवीरकडून!मला मान्य की राजवीर तुझे पहिले प्रेम आहे आणि त्याच्या बद्दल तुला ओढ वाटणे स्वाभाविक आहे पण मी…...मी तुझा कोणीच नाही का ग? तू मला साधा मित्र ही मानत नाहीस याच खरंच मला खूप वाईट वाटतय!आज पर्यंत अगदी आठ दिवसा पूर्वी पर्यंत तू माझ्याशी जे काही वागत होतीस ते काय होते? मला खरंच कळत नाही! पण मी तुला स्वतःहून आता काहीच विचारणार नाही! जेंव्हा तुला योग्य वाटेल तेंव्हा तू मला सांगशीलस त्या क्षणाची मी वाट पाहीन आणि तुला मुक्त करेन या नकोशा वाटणाऱ्या आपल्या नात्याच्या जोखडातून!”
त्याचे डोळ्यातून कढ वाहत होते. या सगळ्या विचारात तो इतका गढून गेला होता की त्याला त्याचा मोबाईल वाजलेला देखील कळला नव्हता. त्याने मोबाईल पाहिला तर गार्गीचे सहा-सात मिस कॉल होते.गार्गीला त्याने मी येतोय असा मेसेज टाकला कारण त्याने उत्तर दिले नसते तर तिने सुशांतला फोन केला असता. त्याने घड्याळ पाहिले तर सहा वाजत आले होते. तो भानावर आला फ्रेश झाला आणि घरी निघून आला.तो डारेक्ट संजयरावां जवळ जाऊन बसला. गार्गीला तर तो आल्याचे देखील माहीत पडले नाही. ती रूम मधून बाहेर आली तर मनीषाताईंनी तिला संग्राम आल्याचं आणि तो संजयरावां बरोबर असल्याचे सांगितले. गार्गी खरं तर हिरमुसली तिला संग्रामचा राग देखील आला होता पण तसं काही न दाखवता ती स्वयंपाकात मनिषाताई मदत करू लागली.

सगळे जेवले आणि संग्राम गार्गीशी एक शब्द ही न बोलता रूम मध्ये निघून गेला. गार्गी रूममध्ये आली तर तो तिला झोपलेला दिसला. तिला संग्रामचा चांगलाच राग आला होता.

“तुला माझ्यासाठी वेळ नाही ना ठीक आहे मग मी ही तुझ्या आता मागे मागे फिरणार नाही.जो पर्यंत तुझी चूक तुझ्या लक्षात येत नाही तो पर्यंत!”

तिने झोपलेल्या संग्रामला पाहून विचार केला आणि ती देखील झोपली.दुसऱ्या दिवशी ही संग्राम गार्गीच्या आधीच उठून गेला होता. गार्गी तीच आवरून आली तर मनीषाताई तिला पाहून म्हणाल्या.

मनीषाताई,“ गार्गी ये नाष्टा कर ग!”

संग्राम,“ मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचे आहे! मी आता इथेच राहणार आहे आणि हो मी आजच नीनाताईला फोन करून सांगितले आहे एक जोडपे चोवीस तासासाठी आपल्या घरात काम करण्यासाठी पहा म्हणून त्यांच्या विश्वासातील एखादे जोडपे दोन-तीन दिवसातच आपल्याला मिळेल म्हणजे मला ही चिंता राहणार नाही.मला निर्धास्तपणे कामाला जाता येईल! गार्गी तू तुझे ऑफिस वाटल्यास आजच जॉईन करू शकतेस मी दोन दिवस आहेच घरी तुझ्या कामाचा खोळंबा नको व्हायला आधीच तू खूप काही केलं आहेस!” तो म्हणाला.

संजयराव,“ अरे जोडपं वगैरे कामाला ठेवायची काय गरज आणि मी ठीक आहे आता तुम्ही ही आठ दिवस राहा आणि जा पुन्हा फ्लॅटवर!” ते म्हणाले.

संग्राम,“ का?आता तुम्हाला पण माझी अडचण होत आहे का?” तो चिडून म्हणाला.

मनीषाताई,“ इतकं चिडायला काय झालं चिनू अरे तुम्हा दोघांना दगदग होते ना म्हणून तुझे बाबा म्हणत होते! तुला वाटतं ना मग राहा इथेच!” त्या त्याला समजावत म्हणाल्या.

संग्राम,“ ठीक आहे!मी कंपनी ऑफिसला जात आहे काम आहे थोडं नीनाताईंनी कोणाला पाठवले तर सगळी चौकशी करून आधार कार्ड वगैरे घेऊन ठेवा बाकी पैशाचे मी पाहतो!” तो म्हणाला आणि बॅग आणायला रूममध्ये गेला.

गार्गी मात्र त्याला काहीच न बोलता आश्चर्याने पाहतच राहिली त्याच्या अशा तोडून बोलण्याने ती आणखीनच दुखावली गेली आणि तिने ही संग्रामशी बोलायचे नाही असे आता पक्के केले.

संग्रामने गार्गीचे फोन वरील बोलणे ऐकले होते आणि त्यामुळे त्याचा गैरसमज झाला होता? दुसरीकडे गार्गीला मात्र त्याची यत्किंचितही कल्पना नव्हती पण याचा गार्गी आणि संग्रामाच्या नात्यावर आणि एकूणच आयुष्यावर काय परिणाम होणार होता?
©स्वामिनी चौगुले














🎭 Series Post

View all