माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ५३

This Is A Love Story


भाग ५३

संग्राम ही सकाळी गार्गीने विचारलेल्या प्रश्नांच्या विचारातच ऑफिसला पोहोचला. त्याने आज कशी तरी वेळ मारून नेली होती पण गार्गीचे त्याच्या उत्तराने समाधान झाले नाही हे तिच्या डोळ्यात साफ दिसत होते. त्याला तिला कडकडून मिठी मारून हे सांगावे वाटत होते की, गार्गी माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि मी तुला काही ही झालेले सहन नाही करू शकणार! तुझ्यावर कोणते ही संकट येण्या आधी त्या संकटाला माझा सामना करावा लागेल पण तो प्रत्येक्षात असं करू शकत नव्हता.

माणसाचे मन खूपच वेडे असते! ते सतत प्रेमाच्या मागे धावत असते पण कधी कधी प्रेम समोर असून देखील त्या व्यक्ती समोर त्याच्या भावना नाही व्यक्त करू शकत आणि प्रेम असणारी व्यक्ती समोर असून देखील त्या व्यक्तीला ते सांगता येत नसल्यामुळे माणसाचा मानसिक आणि भावनिक कोंडमारा होतो. संग्राम एकीकडे सध्या त्याच मनःस्थितीतुन जात होता तर दुसरीकडे राजवीर त्याच्या हात धुवून मागे लागला होता. संग्रामला चांगलंच माहीत होतं की राजवीर एवढ्यावर थांबणार नाही तर तो आता आणखीन काही तरी नक्की करेल. या सगळ्या विचारात लंच ब्रेक कधी झाला त्याला कळले देखील नाही आणि त्याच्या विचारांची तंद्री मोबाईल वाजल्यामुळे भंग झाली फोन गार्गीचाच होता. त्याने हसून फोन घेतला.

संग्राम,“बोला मॅडम आत्ता कसा काय फोन केलात?” तो हसून म्हणाला.

गार्गी,“मी रोज याच वेळी फोन करते संग्राम लंच टाईम झाला आहे. जेवायला बसलास ना?” तिने विचारले.

संग्राम,“काय लंच टाईम झाला? माझ्या तर लक्षातच नाही आले! बरं मी जेवतो!” तो मनगटी घड्याळ पाहत म्हणाला.

गार्गी,“संग्राम तुला आपण ना चांगल्या सायकोलॉजिस्टला दाखवून घेऊ! जेवण कर आता!” ती हसून म्हणली.

गार्गीला असे हसताना पाहून श्रद्धाने तिला विचारले.

श्रध्दा,“इतकं हसायला काय झालं मॅडम?”

गार्गी,“हा संग्राम पण ना त्याला लंच ब्रेक झालेला पण कळला नाही म्हणे!”

श्रद्धा,“होतं ग असं कधी कधी माणूस कामात गढून गेला की नाही कळत वेळ!”

गार्गी,“खरं आहे तुझं पण ताई मला तुझ्याशी काही बोलायचे आहे!”

श्रद्धा,“बोल ना!”

गार्गी,“काल रविवार होता ना तर आम्ही ठाण्याला गेलो होतो. आई-बाबांकडे! तिकडेच लंच केला संध्याकाळी संग्राम आणि मी डिनरला गेलो हे बघ त्याने मला गिफ्ट दिले!” ती हातातले ब्रेसलेट दाखवत म्हणाली.

श्रद्धा,“wow किती सुंदर आहे ग आणि किस करणारे बाहुला-बाहुली how romantic!” ती हसून म्हणाली.

गार्गी,“हुंम! त्या नंतर आम्ही लॉंग ड्राइव्हला गेलो तेंव्हा मला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळाच पैलू पाहायला मिळाला ग!” ती गंभीर होत म्हणाली.

श्रद्धा,“म्हणजे?”

गार्गी,“अगं तो तीन महिने झाले नुसतं काम काम करतो आहे त्याने ना मला वेळ दिला ना आई-बाबांना! म्हणून मी त्याला सहज म्हणाले की माणसाचे काही सांगू शकत नाही कदाचित माझा अपघात होईल आणि मी जाईन! तू वेळ देत जा! माणसांची कदर कर! तर त्याला राग आला त्याने माझा हात पिरगाळला आणि मला म्हणाला की तू नसण्या आधी मी या जगात नसेन कारण मी तुझी ढाल आहे. मी सॉरी म्हणाले त्याला पण माझ्या मनातून त्याचे शब्द जात नाहीत ग! मी आज देखील विचारले त्याला त्या बाबत तर मला म्हणाला की तू माझी जबाबदारी आहेस आता! ताई मला खरंच कळत नाही की तो असं का म्हणाला असेल?मला काल पासून सतत वाटत आहे की तो माझ्या पासून काही तरी लपवत आहे!” ती गंभीर होत म्हणाली.

श्रद्धा,“वेडी आहेस गार्गी तू! अगं संग्राम तुझ्या बाबतीत ओहर प्रोटेक्टिव्ह आहे. याचा अर्थ तुला कळतो का? तो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि तू भलताच विचार करत आहेस!” ती हसून म्हणाली

आणि तन्वी सुतार गार्गीला त्यांच्याकडे येताना दिसली. तन्वी सुतार गार्गीच्या कंपनी मध्ये नुकतीच ट्रेनी म्हणून जॉईन झाली होती. ती येताना दिसली आणि दोघींनी विषय बदलला.
★★★
इकडे संग्रामचा अंदाज खरा ठरणार होता कारण राजवीराने प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सोळंखीला अपॉइंट केले होते आणि त्याला संग्राम बद्दलची सगळी पर्सनल माहिती गोळा करायला सांगितली होती. ठरल्या प्रमाणे ऑफिस सुटल्यावर तो त्या डिटेक्टिव्हला आज भेटणार होता. त्याचे ऑफिस सुटले आणि तो सरळ सोळंखीला भेटायला ठरलेल्या स्नॅक्स कॅफेमध्ये जाऊन बसला. त्याला त्या सोळंखीची जास्त वाट पहावी लागली नाही.

राजवीर,“तू कॉफी घेणार ना?” त्याने विचारले.

सोळंखी,“हो ब्लॅक कॉफी!” तो त्याचा टॅब काढत म्हणाला आणि राजवीराने एक ब्लॅक कॉफी आणि एक कॅफेचीनो ऑर्डर केली.

राजवीर,“मग काय माहिती मिळाली संग्राम सरनाईक विषयी?” त्याने विचारले.

सोळंखी,“हो आज डिटेल माहिती घेऊन आलो आहे मी संग्राम सरनाईकची! संग्राम संजय सरनाईक! आई मनीषा सरनाईक! संजय सरनाईक इंजिनिअर होते रिटायर झाले आहेत ते! त्यांचा ठाण्यात प्रशस्त बंगला आहे. बऱ्याच ठिकाणी प्लॉटस आहेत. एकूण काय भरपूर पैसा आहे आणि या सगळ्याचा एकलुता एक वारस संग्राम आहे! त्याने ही स्वतःचा पार्ल्यात फ्लॅट घेतला आहे आणि बिझनेस आणि जॉब करतो आहे... !” तो पुढे बोलणार तर राजवीर चिडून म्हणाला.

राजवीर,“यातली कोणतीच माहिती माझ्या उपयोगाची नाही!”

सोळंखी, “सर सगळी माहिती डिटेल मध्ये पुरवणे माझे काम आहे! त्याचं लग्न सात-आठ महिन्यांन पूर्वी गार्गी सुमित आगाशे हिच्याशी झाले आहे. ते ही अरेंज मॅरेज!” तो बोलत होता.

राजवीर,“काय म्हणालास तू? गार्गी सुमित आगाशे!” तो आश्चर्याने म्हणाला.

सोळंखी,“हो गार्गी सुमित आगाशे! जी पार्ल्यातील आदीज सॉफ्टवेअर मध्ये जॉब करते.” तो टॅब वर गार्गीचा फोटो दाखवत म्हणाला.

राजवीर,“ये हुई ना बात! ही माझ्या कामाची माहिती आहे. मिस्टर संग्राम सरनाईक आता तू हरलास म्हणून समज! सोळंखी मला गार्गी आगाशेच्या सगळ्या डिटेल्स हव्या आहेत. अगदी तिच्या मोबाईल नंबर सहित! तिच्या ऑफिसमध्ये कोण कोण काम करते, तिच्या मित्र-मैत्रिणी अगदी खडानखडा माहिती हवी तिची!” तो कसल्या तरी असुरी आनंदाने बोलत होता.

सोळंखी,“ठीक आहे सर!” असं म्हणून तो निघून गेला.

राजवीरला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्याच आनंदात तो विचार करत होता.

राजवीर,“संग्राम! संग्राम अरे तुला लग्न करायला गार्गीच मिळाली? आता तू बघच तुला कसा खेळवतो ते! मला हरवून कॉन्ट्रॅक्टवर कॉन्ट्रॅक्ट मिळवत आहेस ना पण आता माझ्या हातात हुकुमाची राणी लागली आहे! नाही तुला मी या खेळात मात दिली तर मी ही राजवीर मोरे नाही!” तो असा विचार करून हसत होता.

जे वादळ आत्ता पर्यंत लांब घोंघावत होत ते आता गार्गी आणि संग्रामच्या दारात येऊन पोहोचले होते. पण गार्गी आणि संग्राम या वादळा पासून अनभिज्ञ होते. आता हे वादळ संग्राम आणि गार्गीला तसेच त्यांच्या नात्याला उध्वस्त करणार होते की त्या दोघांचे नाते अधिकच घट्ट होणार होते हे येणारा काळच ठरवणार होता!”
★★★
संग्राम आणि गार्गीचे रोजचेच रुटीन सुरू होते. दोघे ही त्यांच्या कामात व्यस्त होते. गार्गीचे ऑफिस सुटले. श्रद्धा आणि बाकी लोक ही हळूहळू निघून गेले होते. गार्गीने नेहमी प्रमाणे घरी जाण्या आधी भाजी घेतली. तर मीनाताईचा फोन तिच्या मोबाईलवर आला. तिने फोन पर्स मधून काढून घेतला आणि ती फोनवर बोलत रोड क्रॉस करत होती. ती फोनवर बोलण्यात गुंगली होती. समोरून एक कार तिच्या दिशेने येत होती पण त्या कारकडे तिचे लक्ष नव्हते. त्या कार मधील चालकाने बराच हॉर्न वाजवला पण गार्गीचे त्याकडे लक्षच नव्हते. ती फोनवर बोलण्यात बिझी होती. शेवटी चालकाला कार कंट्रोल झाली नाही आणि कार गार्गीला जाऊन धडकली. गार्गी खाली पडली. तिच्या हातातील मोबाईल खाली पडला पण फोन सुरू होता. झालेल्या मोठ्या आवाजामुळे मीनाताई घाबरल्या आणि फोन वर मोठ्याने ओरडू लागल्या.

मीनाताई, “गार्गी अगं कसला आवाज होता बाळा? बोल ना तू बोलत का नाहीस?” त्यांचा आवाज ऐकून गौरव आणि रागिणी पळत आले.

गौरव,“काय झालं मम्मा अशी ओरडत का आहेस?” त्याने घाबरून विचारले.

मीनाताई, “गौरव! अरे मी गार्गीशी फोनवर बोलत होते पण कसला तरी मोठा आवाज झाला आणि ती बोलायची बंद झाली! मला खूप भीती वाटते आहे रे!” त्या रडत बोलत होत्या आणि ते ऐकून गौरवने त्यांच्या हातातून फोन घेतला आणि कानाला लावला तर समोर एक अनोळखी व्यक्ती बोलत होती.

व्यक्ती,“आपण मॅडमचे कोण आहात?”

गौरव,“मी तिचा भाऊ आहे! गार्गी कुठे आहे तिच्याकडे फोन द्या?” तो काळजीने म्हणाला.

व्यक्ती,“मॅडमचा इथे अपघात झाला आहे त्या बेशुद्ध आहेत! आम्ही त्यांना आयुर्मान हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत तुम्ही लवकरात लवकर तिथे या!”

हे ऐकून गौरवच्या पायाखालची जमीनच सरकली. तो आणि मीनाताई हॉस्पिटमध्ये निघाले. त्याने आधी संग्रामला फोन लावला पण संग्राम प्रेझेन्टेशन देत होता त्यामुळे त्याचा फोन सायलेंटवर होता. त्यामुळे त्याने फोन उचलला नाही. मग गौरवने संजयरावांना फोन लावून गार्गीच्या अपघाताची कल्पना दिली. संजयराव आणि मनीषाताईनी ही घाबरून हॉस्पिटलकडे धाव घेतली.

संग्रामचे प्रेझेन्टेशन संपले. तो आणि सुशांत कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर पडले. संग्रामने मोबाईल पाहिला तर आधी गौरव आणि नंतर संजयरावांचे पन्नास भर मिस कॉल ते पाहून त्याने लगेच गौरवला फोन लावला आणि त्याने संग्रामला गार्गीच्या अपघाताची बातमी दिली. ते ऐकून संग्राम दोन मिनिटं जागीच थिजला सुशांतने त्याला हलवले आणि तो भानावर आला आणि सुशांतला घेऊन हॉस्पिटलकडे निघाला.

गाडी सुशांत चालवत होता आणि संग्राम त्याच्या शेजारी बसला होता. तो खूपच घाबरलेला दिसत होता. त्याच्या कानावर सतत गार्गीने काही दिवसा पूर्वी बोललेले शब्द पडत होते.

“समज माझा अपघात झाला आणि मी on the spot गेले तर?”
त्याने कानावर हात ठेवला आणि तो ओरडला.

“नाही गार्गी तू माझ्या बरोबर असं करू शकत नाहीस समजलं तुला! तू मला असं सोडून नाही जाऊ शकत!”

ते ऐकून सुशांत दचकला आणि तो संग्रामला समजावत म्हणाला.

सुशांत, “संग्राम सावर स्वतःला! गार्गीला काही नाही होणार! उगीच तू भलता सलता विचार नको करुस!”

संग्राम,“नाही सुशा ती मला म्हणाली होती काही दिवसां पूर्वी की माझा accident झाला आणि मी….” त्याला पुढे बोलवेना त्याच्या डोळ्यातून कढ वाहू लागले.

सुशांत, “उगीच काही तरी विचार करू नकोस तू... ती सहज बोलून गेली असेल! हे बघ हॉस्पिटल आले चल!” तो त्याला पुन्हा समजावत म्हणाला.

आणि दोघे रिसेप्शनला चौकशी करून इमर्जन्सी रूमकडे धावले. तिथे मीनाताई, गौरव आणि संजयराव-मनिषाताई रूम बाहेर उभे होते. मीनाताई रडत होत्या आणि मनीषाताई त्यांना धीर देत होत्या. संग्रामने गौरवला नजरेनेच विचारले तर गौरवने नुसते इमर्जन्सी रूमकडे बोट दाखवले. त्या रूमच्या गोल काचेतून त्याने धीर एकवटून आत डोकावले तर त्याला दोन-डॉक्टर आणि दोन-तीन नर्सचा घोळका एका बेड कडेने दिसत होता. गार्गी तर त्याला दिसली देखील नाही. ते सगळं पाहून त्याच्या छातील धस्स झाले. पण आपण कोलमडलो तर सगळेच कोलमडतील म्हणून त्याने कसा बसा स्वतःचा धीर एकवटला आणि तो रूम बाहेर शांतपणे उभा राहिला.

राजवीर आता पुढे काय खेळी खेळणार होता? गार्गीला काही गंभीर तर झाले नसेल ना?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all