माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग ५०

This Is A Love Story


भाग ५०

संग्राम गार्गीला न्यायला तिच्या माहेरी पाच वाजता आला आणि दोघेही घरी आले. गार्गीने कॉफी केली. संग्राम फ्रेश होऊन आला आणि दोघं कॉफी घेत बोलत होते.

संग्राम,“मग कसा गेला आजचा दिवस? आज खुश ना बऱ्याच दिवसांनी घरी जाऊन?” त्याने विचारल.

गार्गी,“हो! पण आज मी ठाण्याला जायचे ठरवले होते. पण अचानक दादाचा फोन आला!” ती म्हणाली.

संग्राम,“त्यात काय इतकं आपण पुढच्या रविवारी ठाण्याला जाऊ!” तो म्हणाला.

संग्रामने थोडा वेळ आराम केला आणि दोघे डिनरला बाहेर गेले. त्या नंतर संग्राम त्याच्या ऑफिस आणि कंपनीच्या कामात गढून गेला. तो ऑफिस मधून डायरेक्ट त्याच्या कंपनीत जात असे कधी रात्री नऊ तर दहा वाजता येत असे. आला की जेवून थकून झोपून जात असे. आता तर रविवारी देखील त्याला वेळ मिळत नव्हता. रविवारी गार्गी कधी ठाण्याला तर कधी तिच्या माहेरी जात असे. असेच हा हा म्हणता म्हणता तीन महिने निघून गेले पण या काळात शरीरापेक्षा गार्गी संग्रामच्या मानसिक दृष्टीने अधिक जवळ आली. त्याच्या सवयी त्याच्या आवडी निवडी, तो कधी कसा रियाक्ट होत हे सगळं तिला आता कळू लागलं होतं. बऱ्याचदा संग्रामने न सांगता तिला त्याच्या बऱ्याच गोष्टी त्याला पाहून कळू लागल्या होत्या. संग्राम मात्र त्याच्या कामात गढून गेला होता पण तो गार्गीला शक्य होईल तितका वेळ देण्याचा प्रयत्न करत असे पण सध्या तरी त्याला ते जमत नव्हते. गार्गीने मात्र त्याला विना तक्रार समजून घेतले होते याचे समाधान मात्र त्याला होते.

मेहाताचे प्रोजेक्ट त्याने आणि सुशांतने तीनच महिन्यात म्हणजे वेळेच्या आधीच पूर्ण केले होते. काम देखील अगदी चोख होते. युजर फ्रेंडली आणि वापरायला सोपे असे सॉफ्टवेअर त्यांनी डेव्हलप करून दिले होते त्यामुळे मेहता अँड मेहता कंपनी संग्रामच्या कामावर फारच खुश होती. इतकेच नाही तर आता त्यांनी ट्रिपल एस कंपनीची माऊथ पब्लिसिटी देखील करायला सुरुवात केली होती आणि हे पाहून राजवीर मात्र आता खूपच अस्वस्थ होता त्यातच आगीत तेल ओतणारी आणखीन एक घटना घडली.

सुंदरम या बंगलोर बेस्ड कंपनीने मुंबईत एक ब्रँच सुरू केली आणि त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम मुंबई मधील कंपनीला द्यायचे ठरवले अर्थातच हे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी संग्राम आणि राजवीर पुन्हा आमने सामने आले. संग्रामने त्याचे प्रेझेन्टेशन सादर केले आणि राजवीरने त्याचे! पण कंपनीने प्रोजेक्ट मात्र संग्रामच्या कंपनीला दिले कारण त्यांना राजवीर पेक्षा त्याचे प्रेझेन्टेशन आवडले. राजवीर मात्र आता चांगलाच चिडला आणि संग्राम व सुशांत काम करत असलेल्या कंपनीतील md मानेची त्याने अपॉइंटमेंट घेतली.

संग्राम आणि सुशांत त्यांच्या त्यांच्या डेस्कवर काम करत होते आणि त्यांना राजवीर कोरिडॉर मधून आत येताना दिसला! दोघांनाही कळून चुकलं की नक्कीच त्याच्या कुरापती डोक्यात इथे आग लावायचा प्लॅन असणार!

राजवीर रिसेप्शनिस्ट पाशी गेला आणि त्याची अपॉइंटमेंटची वेळ पाहून आत गेला. तो मानेच्या केबिनमध्ये गेला त्याची अपॉइंटमेंट बरोबर बारा वाजता होती आणि त्या वेळेत तो पोहोचला होता.

राजवीरने केबिनचे दार उघडून मानेंना विचारले.

राजवीर, “mr. mane may I come in?”

माने,“oh mr. More please come in & take a seat!” ते हसून म्हणाले.

राजवीर, “Mr. माने मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून मी इथे आलो आहे. तुमच्या कंपनीतील ऍप्लॉइजकडे सध्या तुमचे लक्ष दिसत नाही!” तो थोडा उद्धटपणे म्हणाला.

माने,“what do you mean?” त्यांनी डोळे बारीक करून जरा रागातच विचारले.

राजवीर, “I am saying that तुमचे ऍप्लॉईज तुमच्याच विरुद्ध बाहेर काय काय करत आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?” त्याने विचारले.

माने,“म्हणजे? मी समजलो नाही... काय म्हणायचे आहे तुम्हाला स्पष्ट बोला!”

राजवीर, “तुमच्या कंपनीत काम करणारे संग्राम सरनाईक आणि सुशांत माळी हे दोन लोक इथे काम करून त्याचा स्टार्ट अप बिझनेस चालवत आहेत. ते तुमच्या कंपनी मधून मिळणाऱ्या माहितीचा किंवा कॉन्ट्रॅक्ट चा गैर फायदा घेऊ शकतात!” तो त्यांना शिकवण्याच्या सुरात बोलत होता.


मानेनी शांतपणे त्याचे बोलणे ऐकून घेतले आणि इंटर कॉम वरून सुशांत आणि संग्रामला केबीनमध्ये बोलवून घेतले. राजवीरच्या चेहऱ्यावर आता जिंकल्याचे भाव होते त्याला वाटले की आता माने दोघांना एक तर जॉब सोडायला सांगेल किंवा बिझनेस करू नका म्हणून सांगेल. दोन्ही कडून फायदा त्याचाच होता. दोघांची नोकरी केली तर ते आर्थिक विवंचनेत सापडतील असं त्याला वाटत होतं त्या पेक्षा दोघे बिझनेस थांबवतील असं तो मनोमन धरून चालला होता. सुशांत आणि संग्राम दोघे ही केबीन मध्ये हजर झाले. राजवीर त्यांना पाहून कुत्सितपणे हसत होता.

माने,“Mr. सरदेसाई आणि Mr. माळी काय म्हणत आहेत मिस्टर मोरे की तुम्ही...” ते पुढे बोलणार तर सुशांत त्यांना मध्येच थांबवत म्हणाला.

सुशांत, “पण सर आम्ही आधी आपल्या कंपनीला याची कल्पना…” तो पुढे बोलणार तर मानेनी त्याला हातानेच थांबण्याचा इशारा केला.

माने,“हो या दोघांनी कंपनीला आधीच ते बिझनेस करत आहेत ते ही याच क्षेत्रात अशी पूर्व कल्पना दिली होती. Mr. मोरे! मी किंवा माझे ऍप्लॉइज तुम्हाला कोणते ही उत्तर द्यायला बांधील नाही तरीही मी सांगतो! आमच्या कंपनीचा या दोघांनी कोणताच रूल ब्रेक केलेला नाही. आमच्या कंपनीची अशी कोणतीही पॉलिसी नाही की आमचे ऍप्लॉइज बिझनेस करू शकत नाहीत. उलट आम्ही तरुणांना स्टार्ट अप बिझनेससाठी प्रोत्साहनच देतो आणि Mr. मोरे तुम्ही विसरताय आमची कंपनी मल्टीनॅशनल कंपनी आहे. आम्ही लोकल मधील छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेत नाही. ते कोणाला मिळतात याचे आम्हाला काही देणे घेणे नाही. आमच्या कंपनी मधील हे दोघे खूप चांगले ऍप्लाइ आहेत! त्यांचं काम ते चोख करतात आणि पुढे जाऊन आमच्याच कंपनीला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे छोटे-मोठे कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचे असेल तर आम्ही प्राधान्याने ट्रिपल एसचा विचार करू! एवढंच काय जर त्यांनी मोठी झेप घेतली तर आम्ही ट्रिपल एसला आमच्या कंपनीशी मर्ज करून घेऊ! Am I clear all doubts? then you can leave!” ते रागाने म्हणाले आणि राजवीर तोंड वाकडे करून निघाला. सुशांत तोंडावर हात ठेवून हसत होता ते पाहून राजवीर आणखीनच चिडला आणि निघून गेला.

संग्राम,“thanks sir!” तो म्हणाला.

माने,“अरे thanks काय त्यात? अरे हे असे दगड धोंडे तुमच्या वाटेत येतच राहणार... म्हणजेच तुम्ही प्रगती पथावर आहात all the best!” ते हसून म्हणाले आणि दोघे ही त्यांच्या कामाला निघून गेले.


सुशांत ऑफिस सुटल्यावर संग्रामला पाहून मोठ्याने हसत होता. कारण त्याला राजवीरचा चेहरा आठवत होता. संग्राम मात्र थोडा गंभीर होता. त्याला तसं पाहून सुशांतने विचारले.

सुशांत, “काय झालं संग्र्या कसला इतका विचार करत आहेस? अरे माने सर काय म्हणाले ऐकलस ना आणि आपण कोणता ही रुल ब्रेक केला नाही!”

संग्राम,“सुशा राजवीर आज आपल्या ऑफिस पर्यंत पोहोचला आहे उद्या तो काय करेल आपण नाही सांगू शकत!” तो काळजीने म्हणाला.

सुशांत, “तो आपलं काही वाकडं करू शकत नाही! चल लवकर आज आपल्या ऑफिसमध्ये ही जास्त काम नाही ऑफिसमध्ये जाऊन लगेच घर गाठू!” तो त्याला समजावत म्हणाला.

आणि दोघे त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे थोडं काम करून आज संग्राम आठ वाजताच घरी पोहोचला गार्गी त्याला लवकर घरी पाहून खुश झाली. तिने त्याला कॉफी करून आणून दिली आणि तासा भरात स्वयंपाक केला आणि दोघे जेवले. एव्हाना दहा वाजत आले होते. संग्राम जेवण करून रूममध्ये गेला आणि गार्गी सगळं आवरून रूममध्ये आली तर संग्राम लॅपटॉपवर काही तरी करत होता. पण त्याच्या मनात मात्र राजवीरने आज जे केले त्याचे विचार पिंगा घालत होते. गार्गी येऊन बेडवर बसली आणि ती संग्रामला म्हणाली.

गार्गी,“ठेव ना लॅपटॉप! संग्राम अरे जवळ जवळ तीन महिने होत आले आपण नीट बोललो देखील नाही. आज तू लवकर आला तर म्हणलं गप्पा माराव्यात पण नाही तू पुन्हा लॅपटॉप घेऊन बसलास! (ती नाराज होत बोलत होती पण संग्रामचे तिच्याकडे लक्षच नव्हते. तो काहीच उत्तर देत नाही हे पाहून ती त्याला हलवत म्हणाली) लक्ष कुठे आहे संग्राम तुझे किती वेळ झाला मी एकटी बडबडत आहे!” ती म्हणाली आणि तिच्या हलवण्याने तो भानावर आला.

संग्राम,“दिसत नाही का तुला मी काम करतोय?” तो तिच्यावर खेकसला! आणि गार्गी रागाने उठून हॉलमध्ये गेली. संग्रामने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला कारण त्याला त्याची चूक लक्षात आली होती. तो तिला मनवायला हॉलमध्ये गेला. गार्गी तोंड फुगवून टी. व्ही लावून सोफ्यावर बसली होती. संग्राम तिच्या जवळ जाऊन बसला आणि कान धरून तिला म्हणाला.

संग्राम, “sorry ना! चल ना आपण गप्पा मारू!”

गार्गी,“माझा मूड नाही आता! एक तर एकाच घरात राहून मी तुझ्याशी बोलायला तरसले आहे! रोज सकाळी जातोस रात्री उशिरा थकून येतोस! मग तुला काय बोलणार म्हणून मी गप्प बसते. पण आज लवकर आलास म्हणल थोडा वेळ मिळेल मला तुझा पण नाही! तुला तो लॅपटॉपचा डब्बा प्रिय आहे ना! घेऊन बस त्याला!” ती चिडून म्हणाली.

संग्राम,“लॅपटॉपचा डब्बा! (असं म्हणून तो हसू लागला) गार्गी तू सॉफ्टवेअर इंजिनिअर असून लॅपटॉपला डब्बा म्हणतेस! बरं चल ना बेडरूम मध्ये... आपण गप्पा मारू मी कॉफी बनवून आणू का?” तो तिला म्हणाला.

गार्गी,“हो डब्बाच आहे तो! मी पण जॉब करते. मला मान्य की तू जॉब आणि बिझनेस करतोस पण माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही संग्राम!” ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.

संग्राम,“sorry ना... चल ना आता!” तो तोंड बारीक करून म्हणाला.

गार्गी,“चला! असलं क्युट थोबाड केल्यावर समोरच्याने काय करायचे? आणि कॉफी वगैरे काही मिळणार नाही ऍसिडीटी होईल तुला!” ती त्याचा गाल ओढत हसून म्हणाली. दोघे ही बेडरूममध्ये गेले. संग्राम बेडला टेकून बसला आणि गार्गी त्याच्या जवळ बसली.

संग्राम,“मग कसा गेला आजचा दिवस आणि रागिणी वहिनीची तब्बेत कशी आहे?” त्याने विचारले.

गार्गी,“नेहमी सारखाच होता दिवस! कदाचित मला टीम लीडरचे प्रमोशन मिळेल! आणि रागिणी वहिनी बरी आहे आठवा महिना सुरू झाला तिला. हात पाय सुजत आहेत तिचे. उठताना बसताना त्रास होतो तिला. मी रविवारी गेले होते ना तर बेबी किक मारत आहे पोटात! कधी बेबीच डोकं लागत हाताला तर कधी पाय! मला ना जाम गम्मत वाटते!” ती निरागसपणे सांगत होती आणि संग्राम तिचे बोलणे ऐकत होता.

संग्राम,“पण त्याचा ही त्रास होत असेल की त्यांना... तुम्ही बायका हे सगळं कसं सहन करता काय माहीत!” तो काळजीने म्हणाला.

गार्गी,“अरे त्या त्रासात ही वेगळं सुख असते! ते असं शब्दात नाही सांगता येणार! आपल्या पोटात एक जीव जो आपलाच अंश असतो तो श्वास घेत आहे. तो वाढत आहे याची फिलिंग अमेझिंग असते. ते तुम्हा पुरुषांना नाही कळणार!” बोलत बोलत तिने त्याच्या मांडीवर डोके ठेवले.

संग्राम,“हो का आजी बाई? जस काही तुम्ही तर दोन-तीन मुलांना जन्म दिला आहे असं बोलत आहात!” तो तिच्या केसातून हात फिरवत हसून म्हणाला.

गार्गी,“नाही दिला जन्म मी मुलाला पण एका हट्टी मुलाला सांभाळत आहे की!” ती त्याची खेचत म्हणाली.

संग्राम,“अच्छा! मी काय लहान आहे का?” तो हसून म्हणाला.

गार्गी,“लहान मुला पेक्षा कमी देखील नाही!” ती ही हसून म्हणाली.

गार्गी बराच वेळ बडबड करत होती आणि संग्राम तीच ऐकून घेत होता. शेवटी तिला बडबड करत कधी झोप लागली तिला ही कळले नाही. ती संग्रामाच्या मांडीवर झोपून गेली. संग्रामने तिचे डोके हळूच त्याच्या मांडीवरून वरून उशीवर ठेवले आणि तिच्या कपाळावर येणारे केस बाजूला करून तिच्या कपाळावर ओठ ठेवले त्याच्या ओठांच्या मृदू स्पर्शाने ती झोपेतच गालात हसली आणि ते पाहून संग्राम ही हसला आणि तिला त्याने पांघरूण घालून नीट झोपवले.

गार्गीला जर राजवीर पुन्हा त्याच्या आयुष्यात आल्याचं कळले तर ती कशी रियाक्ट होईल?

©स्वामिनी चौगुले


🎭 Series Post

View all