माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग 48

This Is A Love Story


भाग ४८

गार्गी आज लवकरच उठली होती. आज बऱ्याच दिवसांनी संग्राम ऑफिसला जाणार होता. म्हणून तिची लगबग सुरू होती. ते दोघे कालच फ्लॅटवर राहायला आले होते कारण संग्रामला आणि गार्गीला देखील ठाण्यातून ऑफिसला जायला दगदग करावी लागणार होती. ती व्हायला नको म्हणून संजयरावांनीच त्यांना कालच फ्लॅटवर पाठवून दिले होते. संग्रामला तिने उठवले नव्हते. निनाताई चपात्या लाटत होत्या आणि गार्गी सलाद कपात होती. तिने आज लवकरच सगळं आवरलं होत आणि स्वतःही ऑफिसला जायला गुलाबी रंगाचा पंजाबी सूट घालून तयार होती. तिने किचनमधील घड्याळ पाहिले तर नऊ वाजले होते म्हणून ती संग्रामला उठवण्याचा विचार करत होती तर संग्राम उठून तयार होऊन बेडरूम मधून बाहेर आला. तो गार्गीला पाहून किचनमध्ये जाणार तर त्याने दारातूनच निनाताईंना पाहिले आणि त्याने हॉल मध्ये येऊन गार्गीला हाक मारली.

संग्राम, “गार्गी sss!” तो हाक मारून बेडरुममध्ये गेला.

गार्गी, “आले” असं म्हणून ती बेडरूमध्ये गेली.

संग्राम दाराच्या मागे उभा होता. गार्गी रूममध्ये आली आणि तिला मागून त्याने मिठी मारली.

गार्गी,“संग्राम सोड बरं मला! निनाताई आहेत अजून आणि तुझं काय रे!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

संग्राम,“सकाळ पासून एक तर तू दिसली नाहीस मग काय करणार मी!” तो तिला सोडून स्वतःच्या समोर उभं करत म्हणाला.

गार्गी, “मग बेडरूममध्ये बोलवायची काय गरज किचनमध्ये पण दिसले असते ना मी! मला वाटलं की तुला काहीतरी हवं आहे!” ती हसून म्हणाली.

संग्राम,“तू ना वेडी आहेस! अगं प्रत्येक वेळी काही तरी हवच असं नसत ग! सहवास सुद्धा हवा असतो ना एकमेकांना!” तो तिचा चेहरा ओंजळीत धरून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

गार्गी, “हुंम! खरं आहे! बरं चल नाष्टा करून घे! उशीर होईल!” ती दार उघडत म्हणाली


आणि पुन्हा किचनमध्ये गेली. संग्राम डायनिंग टेबलवर जाऊन बसला.

निनाताई, “ताई आज काय दादाचा सेंट का काय असतं त्यो मारला काय? पर मघाशी तर येगळा वास येत हुता आता येगळा!” असं म्हणून ती हसायला लागली.

आणि जशी काही गार्गीची चोरी पकडली गेली आहे अशी ती गोरिमोरी झाली आणि तिला म्हणाली.

गार्गी,“ताई झाल्या ना चपात्या तुम्ही जा आता!” ती खाली मान घालून बोलत होती आणि मान हलवून हसतच निनाताई निघून गेल्या.

गार्गीने केलेल्या शिऱ्याची प्लेट त्याच्या समोर ठेवली आणि ती ही नाष्टा करायला बसली. डबा वगैरे तिने आधीच दोघांचे भरून ठेवले होते. संग्रामने तिला तिच्या ऑफिसमध्ये सोडले आणि तो निघून गेला. गार्गीच्या कपड्याला मात्र सकाळी मारलेल्या मिठीमुळे त्याच्या परर्फ्युमचा दरवळ येतच होता आणि गार्गीला त्याच्या अवती भवती असण्याची जाणीव होत होती. तिने डेस्कवर बसत एकदा स्वतःच्याच कपड्याचा वास श्वासात भरून घेतला आणि ती खुदकन हसली. तिचा वेडेपणा श्रध्दा तिच्या डेस्कवर बसून पाहत होती. ती फाईल देण्याच्या निमित्ताने तिच्या जवळ आली आणि मस्क परफ्युमचा वास तिच्या नाकात शिरला तशी ती गार्गीला फाईल देत म्हणाली.

श्रद्धा,“काय ग गार्गी जेड्स परर्फ्युम तो ही मस्क केंव्हा पासून लावायला लागलीस?”

गार्गी, “नाही ग ताई मी चुकून संग्रामचा पर्फ्युम मारला असेल!” ती नजर चोरत म्हणाली.

श्रध्दा,“तुझ्या सारखी हुशार मुलगी अशी चूक कशी करेल ग? आज कुछ तो हुआ हैं! तभी तो ये चेहरा खिला हैं!” ती भुवया उडवत तिला चिडवत म्हणाली.

गार्गी,“दिलीस ना फाईल... आता जा!” ती लाजून म्हणाली आणि श्रध्दा हसायला लागली.
★★★★
इकडे संग्रामचे ऑफिसमध्ये सगळ्या सहकाऱ्यानी बुके आणि शुभेच्छा देऊन स्वागत केले. आज खास md साहेब देखील त्याला भेटायला आले होते. त्यांनी संग्रामला बुके देऊन त्याचे स्वागत केले आणि ते बोलू लागले.

Md.माने,“मिस्टर सरनाईक वेलकम! तुम्हाला जो त्रास झाला त्या बद्दल कंपनी दिलगीर आहे. तुम्ही one of the best employee आहात आपल्या कंपनीचे पण ऑफिस पॉलिटीक्समुळे तुम्हाला सगळं सोसाव लागलं! त्या जांभळेना आम्ही शिक्षा दिली आहे!” ते म्हणाले.

संग्राम,“thanks sir!” तो हसून म्हणाला.

माने, thanks मला नको मिसेस सरनाईकांना म्हणा त्यांनीच हा प्रकार आमच्या समोर आणून दिला. You are so lucky! तुम्हांला इतकी प्रेमळ आणि जागरूक बायको मिळाली आहे... ok मी निघतो! आणि इथून पुढे तुम्हांला काय स्टाफ मधील कोणालाच असा त्रास होणार नाही याची दक्षता कंपनी घेईल!” ते असं म्हणून निघून गेले.

लंच ब्रेक झाला आणि डबा पाहून संग्रामने डोक्याला हात लावला. संग्रामला लांबून सुशांतने डोक्याला हात लावलेले पाहिले आणि तो त्याच्या जवळ आला आणि टेबलवर ठेवलेला डबा पाहून मोठ्याने हसू लागला. कारण ही तसेच होते चार थाळी मोठ्या डब्यातील वांग्याची भाजी-चपाती, भात-वरण, सलाड, फळांचे काप तसेच डिंकाचे लाडू इतके सगळे पदार्थ टेबलवर पसरले होते. सुशांत हसत होता आणि संग्राम डोक्याला हात लावून हे सगळं मी कधी खाऊ या अविर्भावात ते सगळे पदार्थ पाहत होता. तेव्हढ्यात त्याचा मोबाईल वाजला फोन गार्गीचा होता. संग्राम हॅलो म्हणायच्या आधीच गार्गी बोलू लागली.

गार्गी,“लंच ब्रेक झाला आहे जेवायला बसला आहेस ना! मी दिलेला सगळा डबा संपला पाहिजे नाही तर मी बाबांना सांगणार बघ!” ती तंबी देत म्हणाली.

संग्राम, “गार्गी अगं इतकं जेवतो का मी? तू दोन वेळच सगळं एकदाच दिलंस वाटतं!” तो आवंढा गिळत म्हणाला.

गार्गी,“एकाच वेळच आहे ते सगळं कळले तुला आत्ताच आजारातून उठलास ना! किती विकनेस आहे अजून तुला म्हणून आता असाच डबा रोज मिळणार आहे तुला! बरं मी ठेवते फोन आणि सगळं संपव ते!” असं म्हणून तिने फोन ठेवला आणि संग्राम बारीक तोंड करून दोन्ही गालांवर हात ठेवून ते सगळे पदार्थ पाहू लागला.

सुशांत, “असं पाहून हे सगळं संपणार नाही खायला लागेल ते!” तो हसू दाबून म्हणाला.

संग्राम, “साल्या दोस्त आहेस की दुष्मन! मला मदत करायची सोडून हसतोस काय? एक वेळ आई परवडली पण बायको नको!” तो वैतागून म्हणाला.

सुशांत, “किती वैतागतोस रे! मी करतो मदत तुला हे सगळं संपवायला पण फक्त आज! तुझ्या त्या हुशार गार्गीला समजाव की एवढं सगळं खाल्लं तर अपचन होईल आणि त्रास कमी होण्या ऐवजी अजून वाढेल. उद्या पासून कमी दे म्हणावं सगळं!” तो हसून त्याला समजावत म्हणाला आणि संग्रामने होकारार्थी मान हलवली.
★★★

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर संग्रामने गार्गीला फोन करून आज त्याला मिटींगला जायचे आहे आणि त्यामुळे घरी यायला उशीर होईल असे कळले. त्याच्या कंपनीला मिळालेल्या नवीन कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आज संध्याकाळी त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये मिटींग होती. सुशांत आणि तो सात वाजता मिटिंग मध्ये पोहोचले तर समोर कॉन्फरन्स हॉलमध्ये त्या कंपनीचे ceo मेहता आणि राजवीर मोरे तसेच आणखीन काही सहकारी बसले होते. हो राजवीर मोरे जो गार्गीच्या बॉय फ्रेंड होता आणि संग्रामने ज्याच्यामुळे संघवी कॉलेज सोडले होते. आज पुन्हा संग्राम आणि तो सामोरासमोर होते. आधी कॉलेजमध्ये दोघांचे शत्रुत्व सर्वश्रुत होते आणि आता बिझनेस रायव्हल्स म्हणून दोघे एकमेकांच्या समोर होते आणि दर वेळी मोरेज् अँड सन्सला म्हणजेच राजवीरच्या कंपनीला मिळणारे काँट्रॅक्ट या वेळी मात्र संग्रामाच्या ट्रिपल एसला मिळाले होते. हेच नाही तर अजून एक काँट्रॅक्ट संग्रामाच्या कंपनीला मिळाले होते आणि इतके दिवस संग्राम आणि सुशांत फोनवर या बद्दलच चर्चा करत होते.

खरं तर राजवीर मोरेची मोरे अँड सन्स ही खूप जुनी आणि नावाजलेली कंपनी ज्यात त्याच्या काका बरोबर तो फक्त वीस टक्केचा पार्टनर होता आणि त्याच कंपनीत नोकरी देखील करत होता ती कंपनी पुणे बेस्ड होती पण त्यांनी आता मुंबईमध्ये ही एक ब्रांच ओपन केली होती आणि गेल्या एक वर्षा पासून त्यांना मेहता अँड मेहता कडून सॉफ्टवेअर डिझायनिंगचे काँट्रॅक्ट मिळत होते पण या वेळी मात्र ते काँट्रॅक्ट संग्रामाच्या ट्रिपल एसला मिळाले होते. जे खूप मोठे होते. म्हणूनच आज मिटिंगसाठी संग्रामला आणि सुशांतला मेहता अँड मेहताच्या ऑफिसमध्ये बोलबवण्यात आले होते. पण तिथे राजवीर का आला होता हे मिटिंग सुरू झाल्यावरच कळणार होते.

संग्राम आणि सुशांत मेहताला हसून गुड इव्हनिंग म्हणून खुर्चीवर बसले आणि मिटिंग सुरू झाली.

मेहता,“आज ही मिटिंग मी बोलावली आहे कारण मोरे अँड मोरे आमच्या कंपनीचे काम आता ट्रिपल एस कडे सुपूर्द करणार आहेत कारण गेल्या वर्षी त्यांनी आमच्या कंपनीची सॉफ्टवेअर डिझाइन करून दिली होती आणि या वर्षी सॉफ्टवेअर अपडेट अँड डेव्हलपमेंटचे ते काम आम्ही ट्रिपल एसला दिले आहे.” ते म्हणाले.

संग्राम, “first of all thanks sir आमच्या वर विश्वास ठेवून तुम्ही हे काम आमच्या स्टार्टअप कंपनीला दिले. खरं तर हे आमच्या कंपनीला मिळालेले पहिले मोठे काम आहे आणि ते आम्ही वेळेत आणि उत्तम रित्या पूर्ण करू आणि तुमचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू सर!” तो नम्रपणे म्हणाला.

मेहता,“मिस्टर मोरे ती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची गेल्या वर्षीची फाईल मिस्टर सरनाईकांना द्या म्हणजे त्यांचे काम ते सुरू करू शकतील!” ते म्हणाले.

राजवीर,“हो सर का नाही!” असं म्हणून छद्मी हसत त्याने त्याच्या जवळची फाईल संग्रामाच्या हातात दिली.

संग्राम, “मेहता सर आम्ही तुम्हाला पंधरा पंधरा दिवसांनी फॉलोअप देत जावू!” तो म्हणाला.

मेहता,“ok than and see you!” ते म्हणाले आणि मिटिंग संपली.

संग्राम आणि सुशांत ऑफिसच्या बाहेर पडले आणि राजवीरने त्या दोघांना कॉरिडोर मध्ये गाठले.

राजवीर,“अरे थांबा थांबा इतकी काय घाई आहे निघण्याची!” तो नाटकीपणे हसून म्हणाला.

संग्राम, “बोला मिस्टर मोरे!” तो थांबून म्हणाला.

राजवीर,“not bad! कॉलेज मधला चंपु आता सुधारला आहे तर! तुला काय वाटत रे की मेहताचं एक काँट्रॅक्ट तुला मिळालं म्हणजे तू जग जिंकलं! मी नागपूर ब्रांच मध्ये बिझी होतो आणि ही मुंबई ब्रांच हा पाटील सांभाळत होता. याच्या मूर्खपणामुळे तुला हे कन्ट्रॅक्ट मिळाले आहे! पण मोरे अँड सन्स ब्रँड आहे आणि आमच्या समोर तुमची ही कंपनी काहीच नाही! इथून पुढे कोणत्याच कंपनीचे काँट्रॅक्ट तुझ्या कंपनीला मिळणार नाहीत कारण आता मी आलो आहे!” तो गर्वाने त्याला पाहून बोलत होता संग्राम मात्र त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेत होता. सुशांत काही बोलणार तर संग्रामने त्याला हाताने इशारा करून थांबवले आणि तो बोलू लागला.

संग्राम, “खरं बोलतो आहेस राजवीर तू मोरे अँड सन्स एक ब्रँड आहे! खूप मोठी आणि जुनी कंपनी आहे तुमची आम्ही तर आत्ता स्टार्ट अप बिझनेस सुरू केला आहे. तुम्ही ही बिझनेस करता आणि आम्ही ही तो करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज मेहताच काँट्रॅक्ट आम्हाला मिळालं आहे. उद्या दुसरं एखादं तुम्हाला मिळेल. त्यामुळे यात वाद घालण्यासारखे काहीच नाही! निघतो आम्ही आता... काय आहे आमच्या बायका वाट पाहत असतील आमची!” तो मनगटावरचे घड्याळ पाहून सुशांतकडे पाहत शांतपणे म्हणाला आणि तिथून निघून गेला. राजवीर मात्र त्याला रागाने पाहत राहिला.



राजवीरची एन्ट्री पुन्हा एकदा संग्राम आणि पर्यायाने गार्गीच्या आयुष्यात झाली होती. संग्राम आणि राजवीर बिझनेसच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने सामने आले होते. आता याचा परिणाम संग्राम आणि गार्गीच्या आयुष्यावर काय होणार होता?
©स्वामिनी चौगुले

🎭 Series Post

View all