माझिया प्रियाला प्रीत कळेना भाग 45

This Is A Love Story


भाग ४५

सकाळी दारावर कोणी तरी नॉक केलं आणि गार्गी जागी झाली. दारावर संजयराव होते.

संजयराव,“गार्गी, चिनू! उठा आपल्याला लवकर निघायचे आहे. आवरून खाली या आम्ही आहोत खाली!”

गार्गी,“हो बाबा आलोच!” तिने पडल्या जागेवरून उत्तर दिले आणि तिने डोळे चोळून घड्याळ पाहिले तर सहा वाजले होते.

संग्राम पालथा झोपला होता. तो अजून ही गाढ झोपेत होता. गार्गी उठून बसली तिने केस बांधले आणि दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवले आणि संग्रामच्या केसात हात फिरवत हळूच त्याला म्हणाली.

गार्गी,“उठा साहेब आपल्याला आज निघायचे आहे!”

त्याने तिचा हात धरला आणि गालात हसून तिला जवळ ओढले आणि तिच्या कानात हळूच म्हणाला.

संग्राम, “म्हणजे छान स्वप्न संपले तर आता उद्या पासून पुन्हा रुटीन सुरू!” तो डोळे न उघडताच गार्गीला मिठीत घेऊन बोलत होता.

गार्गी,“नाही अजून पाच दिवस तुम्हाला घरात राहायचे आहे साहेब! विसरलात का आणि हे काही स्वप्न नव्हते सत्य आहे सगळे!” त्याच्या हाताला चिमटा घेत ती म्हणाली.

संग्राम, “आss इतका जोरात चिमटा घेतलास! थांब तुला दाखवतो आता!”

त्याने असं म्हणून डोळे उघडले आणि गार्गीच्या मानेत हात घालून तिला आणखीन जवळ ओढले आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला गार्गीने ही त्याला काहीच विरोध केला नाही. तिचा हात त्याच्या केसातून फिरत राहिला आणि बराच वेळ दोघे एकमेकांमध्ये विरघळत राहिले. गार्गीने भानावर येत स्वतःला सोडवून घेतले आणि ती लटक्या रागाने म्हणाली.

गार्गी,“उठतो का आता!”

संग्राम, “नाही उठत जा! तुला काय करायचं ते कर!” असं म्हणून त्याने पुन्हा तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली.

गार्गी, “gd ऐक ना प्लिज! खाली आई-बाबा, मम्मा निघण्यासाठी आपली वाट पाहत आहेत!तुला हवं ते मिळालं ना आता मग उठ ना!” ती त्याच्या डोळ्यात पाहून त्याला विनवत होती.

संग्राम, “हुंम! पण माझी एक अट आहे!” तो तिला आणखीन जवळ ओढत म्हणाला.

गार्गी,“आता काय अजून?” तिने प्रश्नार्थक नजरेने विचारले.

संग्राम, “राहिलेल मी घरी गेल्यावर वसूल करणार!”तो डोळे मिचकावत म्हणाला

गार्गी, “अजून काय राहिलं रे तुझं! उठतो का आता का देऊ एक ठेवून! जास्त शेफारु नकोस एक तर आज मला खूप काम आहेत!” ती त्याला ढकलून देत उठून बसली.

तो पर्यंत पुन्हा दार वाजले आणि मनीषाताई लवकर या म्हणून सांगून गेल्या. संग्राम उठला आणि गार्गी जाणार तर तिच्या आधी वॉशरूममध्ये पळाला. गार्गी त्याला पाहून हसत होती. तो काही मिनिटात तयार होऊन आला आणि तिला म्हणाला.

संग्राम, “मी तर तयार झालो आता तू कधी तयार होणार बघ आणि तुझा बदला तर मी घेणारच!” तो नाटकीपणे डोळे मिचकावून म्हणाला.

गार्गी,“मी तर घाबरलेच की तुला! जा खाली मी आलेच! नौटंकी कुठला!” ती हसून म्हणाली आणि अंघोळीला निघून गेली

संग्राम मात्र तीच आवरून होईपर्यंत रूममध्येच थांबला. संग्रामने दोघांनाचे ही समान बॅगांमध्ये व्यवस्थित भरून ठेवले होते आणि वेटरला ते कार की देऊन कार बूटमध्ये ठेवायला सांगितले होते. गार्गीचा मेकअप बॉक्स फक्त वर होता. गार्गी चुडीदार घालून केस पुसत बाहेर आली आणि हसून संग्रामला म्हणाली.

गार्गी,“हुशार आहे की माझा नवरा!”

संग्राम,“मग आहेच मी हुशार! बरं आवर साडे सात वाजले आहेत आपण निघू!”

दहाच मिनिटात दोघे खाली गेले. संजयराव, मीनाताई आणि मनीषाताई त्यांची वाटच पाहत होते. सगळ्यांनी नाष्टा केला. तो पर्यंत त्यांना निरोप द्यायला सगळे जमा झाले. संग्रामने आणि गार्गीने काका-काकुला वाकून नमस्कार केला. रौनक, अमरने आणि बाकी सगळ्यांनी संग्रामची गळा भेट घेतली.

संजयराव,“मी आणि मनीषा खरं तर तुमच्या बरोबर येणार होतो सांगलीला पण संग्रामची तब्बेत ठीक नाही म्हणून…..” ते पुढे बोलणार तर काकांनी त्यांना मध्येच थांबवले.

काका,“परत ये रे संज्या आधी याच्याकडे लक्ष दे! आणि गेल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा! याला चांगलं आठवडा भर सोडू नको घराच्या बाहेर! याने चांगलं घायकुतील आणले होते आपल्याला! काळजी घे याची आधी आणि ऐकलं नाही तर रट्टे दे!” ते संग्रामचा गाल ओढत म्हणाले.

काकू,“गपा ओ तुम्ही! पोराची बायको आहे समोर! चिनू काळजी घे बाबा! गार्गी लक्ष ठेवा ग जरा आणि कळवत राहा आम्हाला याच्या तब्बेती बद्दल!” त्या संग्रामच्या अलाबला घेत गार्गीला म्हणाल्या आणि गार्गीने होकारार्थी मान हलवली. सगळे रिसॉर्ट बाहेर आले.

संजयराव,“गार्गी गाडी डायरेक्ट ठाण्याला घ्यायची कळले!” ते तंबी देत म्हणाले आणि गार्गीने हो म्हणून मान हलवली.

संजयराव, मनिषाताई आणि मीनाताई संजयरावांच्या गाडीत बसले आणि संग्राम आणि गार्गी त्यांच्या! ड्रायव्हिंग सीटवर गार्गीला बसलेले पाहून संग्राम तिला हसून म्हणाला.

संग्राम, “ड्रायव्हिंग येते ना नीट मॅडम? नाही तर घरी पोहोचण्या ऐवजी आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू!”

गार्गी,“गप्प बसतो का आता! तुझ्या तोंडाला कुलूप लावायला हवं संग्राम कोणत्या अँगलने तू सगळ्यांना शांत मितभाषी वगैरे वाटतो देव जाणे!” ती गाडी स्टार्ट करत म्हणाली.

येताना संग्राम इतका थकलेला दिसत असताना सुद्धा गार्गीने मात्र त्याला ड्रायव्हिंग मी करू का असे विचारले नव्हते. ते आठवून आपण कसे असे निष्ठूरपणे वागलो याचे गार्गीला वाईट वाटले आणि तिचा चेहरा पडला. संग्रामच्या ते लक्षात आले आणि त्याने तिला डोळ्यांनीच काय म्हणून विचारले तर तिने काही नाही म्हणून सांगितले. संग्रामने तिच्या हँड ब्रेकवर ठेवलेल्या हातावर हात ठेवला आणि गार्गी गालात हसली.

संग्राम, “बाबांचा राज रंग काही ठीक दिसत नाही गार्गी! आज माझं काही खरं नाही!” तो बारीक तोंड करत म्हणाला.

गार्गी,“कुणी सांगितली होती इतकी धावपळ करायला! पनवेलला जायला त्या तुझ्या बॉसला कुठे तक्रार करायची तिथे करू द्यायची ना आणि मी तर आहेच मूर्ख पण मला सांगायला पण तोंड शिवले होते ना तुझे! एक वाजवुन दिली असतीस संग्राम मला तर चालले असते पण तू जी शिक्षा दिलीस ना ती खूप भयंकर होती. नालायक माणसा भोग आता तुझ्या कर्माची फळं!” ती काहीशा नाराजीने बोलत होती.

संग्राम, “कित्ती बेकार ग तू! माझी बाजू घेशील म्हणाल तर मलाच घाबरवत आहेस! मी मुद्दाम केले का सगळे? तू सापड माझ्या तावडीत मग तुला सांगतो!” तो लटक्या रागाने तिला म्हणाला.

गार्गी,“पहिल्यांदा बाबांच्या तावडीतून सूट मग मला धमकी दे!” ती डोळे मिचकावून म्हणाली.

संजयरावांनी मीनाताईना त्यांच्या घरी सोडले कारण चार-पाच दिवस रागिणी घरी एकटीच होती. गौरव होता तिच्या सोबत पण तो दिवसभर ऑफीसमध्ये असायचा म्हणून मीनाताईच हट्ट करून घरी गेल्या होत्या. संजयराव आणि मनिषाताई घरी पोहोचले आणि त्यांच्या पाठोपाठ गार्गी आणि संग्राम! सगळ्यांना आत जाऊन गार्गीने पाणी आणून दिले आणि संजयराव संग्रामला म्हणाले.

संजयराव, “जा चिनू फ्रेश होऊन ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे!” ते गंभीर होत म्हणाले.

संग्राम, “आता हॉस्पिटलमध्ये कशाला बाबा मी ठीक आहे आता!” तो थोडा कचरत म्हणाला.

संजयराव, “ते तू नाही डॉक्टर ठरवतील! तू फ्रेश होऊन ये मी अपॉइंटमेंट घेतल्या आहेत डॉक्टरणाच्या!” ते तंबी देत म्हणाले.

आणि संग्राम पाय आपटत त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या मागोमाग गार्गी ही रूममध्ये गेली. तो फ्रेश होऊन टॉवेलने तोंड पुसत बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी साफ दिसत होती. ती त्याला पाहून हसली आणि त्याला समोर उभ करून त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.

गार्गी,“इतकं तोंड वाकड करायला काय झालं रे तुला? बाबा डॉक्टरकडेच घेऊन जात आहेत! कुठे शिक्षा द्यायला नाही!”

संग्राम, “सोड बरं गार्गी एक तर बाबांनी डोकं उठवले आहे आणि त्यांची बाजू घेऊन तू नको मला इरिटेड करू! मी आता ठीक आहे म्हणालो ना पण कोण ऐकणार माझं? असं ही मला किंमत नाहीच आहे इथे!” तो चिडून तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

गार्गी,“उगीच काही ही बोलू नकोस किंमत नाही म्हणे! तुझ्या काळजी पोटीच घेऊन जात आहेत ना ते तुला आणि तुझं चेक अप होणं खूप गरजेचं आहे संग्राम! त्या रात्री तुझी कंडिशन काय होती आम्हांला माहिती! ती रात्र आठवली तरी अंगावर काटा येतो आमच्या; जास्त नखरे नको करू जा! आणि मी पण येईल ऑफीस मधून रजा वाढवून आल्यावर तुझ्यासाठी स्पेशल काही तरी करेन लंच मध्ये!” ती त्याच्या डोळ्यांत पाहत त्याला म्हणाली.

संग्राम, “अच्छा! जसं काही तू लंच मध्ये पंच पक्वान्न करणार आणि तुम्ही सगळे मला ते खाऊ देणार! त्या मूर्ख डॉक्टरने अजून चार-पाच दिवस बेचव जेवण जेवायची शिक्षा दिली आहे मला!” तो रागाने म्हणाला.

गार्गी,“किती चिडचिड करशील! अरे तू जाऊन तर ये! मी पथ्याचेच बनवेन पण तुला आवडेल असं!” ती हसून म्हणाली.

संग्राम, “अच्छा पण मला आवडेल असं तू अजून ही देऊ शकतेस!” तो तिच्या कमरेत हात घालून खट्याळ हसत म्हणाला.

गार्गी त्याचे हात त्याच्या गळ्यात तसेच गुंफून त्याच्या जवळ जवळ जात होती. ती त्याच्या इतकी जवळ गेली होती की तिचा श्वास त्याच्या श्वासात मिसळत होता. त्याच्या ओठांवर ओठ टेकवणार तो पर्यंत खालून संजयराव ओरडले

संजयराव, “चिनू आवरलं का? ये लवकर!”

आणि गार्गी दचकून त्याच्या पासून लांब झाली. संग्राम वैतागून आलो बाबा असं म्हणाला आणि गार्गीच्या कानात कुजबुजला!

संग्राम, “तुझ्यावर उधारी आहे ही! मी आलोच आणि लवकर ये ऑफिस मधून!”

गार्गी त्याला जाताना पाहून हसत होती. ती ही फ्रेश होऊन मनीषाताईंना काही तरी तयारी करायला सांगून ऑफिसला निघून गेली. तिने ऑफिसमध्ये बॉसला घडलेला प्रकार सांगितला आणि अजून पाच दिवसांच्या रजेचा अर्ज दिला. तिची बॉस तशी चांगली असल्याने आणि गार्गी तिच्या कामात चोख असल्याने तिची रजा मंजूर केली. गार्गी खरं तर मेल पाठवून आणि फोन करून देखील रजा वाढवून घेऊ शकत होती पण तिला श्रध्दाला भेटून तिची माफी मागायची होती आणि ती बोलत असलेले तिला पटले आहे हे तिला सांगण्यासाठी ती ऑफिसमध्ये आली होती. ती सरळ बॉसच्या केबिन मधून श्रद्धा जवळ गेली. ती तिच्या डेस्कवर बसून काम करत होती. तिने गार्गीला पाहिले आणि तिला इग्नोर करत पुन्हा कॉम्प्युटरमध्ये डोके खुपसले. ते पाहून तिला गार्गी तिचा हात धरत म्हणाली.

गार्गी,“sorry ना ग ताई मी तुझ्याशी उगीच भांडले! तू म्हणत होती ते बरोबर होते!”

श्रद्धा,“हा साक्षात्कार तुला केंव्हा झाला आणि गेल्या पासून एक फोन किंवा एक मेसेज तरी केला का मला?” ती तोंड फुगवून म्हणाली.

गार्गी,“वेळच नाही मिळाला ताई मला! तिकडे गेल्यावर संग्रामची तब्बेत इतकी बिघडली की काय सांगू तुला आज ही बाबा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. मी ही रजा वाढवायला आले होते ऑफिसमध्ये!” ती तोंड पाडून बोलत होती.

श्रद्धा,“काय? काय झालं संग्रामला तो ठीक तर आहे ना गार्गी! बरं आपण कँटीनमध्ये जाऊन बोलू!” ती इकडे तिकडे पाहत म्हणाली आणि दोघी कँटीनमध्ये त्यांच्या आवडत्या कॉर्नरच्या टेबलवर जाऊन बसल्या आणि गार्गी बोलू लागली.

डॉक्टर संग्रामच्या तब्बेती बद्दल काय सांगणार होते?

©swamini chougule

🎭 Series Post

View all